विवेक विचार

विवेक विचार

बुधवार, २६ ऑक्टोबर, २०१६

दिपावलीच्या सर्वाना कोटी कोटी शुभेच्छा

आजपासून सगळीकडे दिवाळीची धामधूम चालू होत आहे. दीपावली हा उत्सव म्हणजे दीपोत्सव. दिव्यांचा उत्सव दिव्यांच्या असंख्य ओळी घरात अंगणात लावल्या जातात. म्हणून तिचं नाव दीपावली. ह्या सणाची सुरवात वसुबारसेपासून म्हणजेच आजपासुन होते आणि भाऊबीज साजरी केल्यानंतर दिवाळीची सांगता होते. सर्व अबाल वृद्ध, मुले, स्त्रीया ह्यांचा हा लाडका सण. दिवाळी येणार म्हटलं की आवराआवर रंगरंगोटी. नव्या कपड्यांची, दागिन्यांची, घरातील वस्तूची खरेदीची ही पर्वणी. फटाक्यांची आतिषबाजी अन चविष्ट दिवाळी फराळाचा स्वाद हे ह्या सणाच आणखी एक वैशिष्ट्य.
आपला भारत देश हा कृषीप्रधान देश. आपली थोर संस्कृती सर्वांवर प्रेम करायला शिकवणारी. म्हणूनच की काय वसुबारस ह्या दिवशी आपण गाय आणि वासरू ह्यांची पूजा करतो. त्यांना गोडाचा घास खाऊ घालतो. दुध-दुपत्यासाठी होणारा गायीचा उपयोग शेतीच्या कामी बैलाची होणारी मदत ह्या गोष्टी लक्षांत घेऊन त्या गोधनाची केलेलीही कृतज्ञता पूजा हि नक्कीच अविस्मरणीय अशीच आहे.
धनत्रयोदशीला तिन्ही सांजेला केली जाणारी धनाची पूजा, नैवेद्याला ठेवला जाणारा धने-गुळाचा प्रसाद ह्याला ही फार मोठे महत्त्व आहे.
नरक चतुर्दशी हा मुख्य दिवाळीचा पहिला दिवस. ह्या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान करायचे. नवीन वस्त्रे परिधान करून देवदर्शन घ्यायचे आणि सर्वांनी एकत्र जमून दिवाळी फराळ करायचा असा हा आनंद साजरा करण्याचा दिवस. ह्या दिवसाची एक पौराणिक कथा जोडली आहे ती अशी की श्रीकृष्णानी अत्याचारी नरकासुराचा वध करून त्याच्या बंदी शाळेतल्या सोळा सहस्त्र कन्यांची मुक्तता केली. तो हा दिवस, दुष्टाचा नाशा आणि मुक्ताचा आनंद हे या दिवसामागचे आनंद साजरा करण्याचे कारण आहे.
अश्विन वद्य‍अमावस्येला संध्याकाळी घरोघरी, दुकानांतून सोन्या-चांदीच्या पेढ्यातून, ऑफिसातून लक्ष्मीपूजन केले जाते. घरातल सोन नाणं-रोकड ह्यांची पूजा करतात. व्यापारी सर्व हिशेबाच्या वह्यांच पूजन करतो. ह्या धनलक्ष्मीच्या पूजनाबरोबरच त्या दिवशी आरोग्य लक्ष्मी ( केरसुणी ) हिची पण पूजा करतात. लक्ष्मी पूजनानंतर फटाक्यांची अतिषबाजी करून आनंद साजरा केला जातो. पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त. ह्या दिवशी अनेक नवे प्रकल्प चालू केले जातात. कार्तिक शुद्ध द्वितीयेलाच भाऊबीज असे म्हणतात. बहिण भावाच्या उत्कट प्रेमाचा हा दिवस, बहिण भावाला स्नान घालते, गोड भोजन देते, ओवाळते. बहीण भावाला ओवाळत असतानाच "ईडा पीडा टळू दे बळीचे राज्य येउ दे" असे म्हणते. हजारो वर्षे ज्याच्या पुनरागमनाची प्रतीक्षा केली जात आहे, असा बळीराजा... सात काळजाच्या आत कायमचा जपून ठेवावा इतका जिवलग.. आपल्या प्रजेतील प्रत्येक व्यक्तीला तिच्या कष्टाचे व हक्काचे फळ सम्यक रीतीने विभागून देणारा......बळीराजा... आणि त्याच बळीचे राज्य म्हणजे न्यायाच, समतेचं, कष्टकरी शेतकऱ्यांचं, गोरगरीब जनतेचं राज्य यावे म्हणून हि आपली भगिनी लाडक्या भावाला ओवाळताना बळीचे राज्य येउदे अशी प्रार्थना करत असते.
दिवाळीच्या सणातला लहान मुला मुलींचा आनंदाचा भाग म्हणजे आकाशकंदिल तयार करणे, किल्ला करणे, त्यावर चित्रे मांडणे, संध्याकाळी दारापुढे छान छान रांगोळ्या काढणे आणि फटाके वाजविणे इ. दिपावली हा सण सर्वत्र आनंद व उत्साहाने साजरा होतो. परस्परांना भेट वस्तू, शुभेच्छापत्रे इ. देवून आनंद दिला घेतला जातो. अज्ञानाचा नाश आणि ज्ञानाचा प्रकाश देणारी ही दिवाळी सर्वांनाच प्रिय आहे. जो तो आपापल्या परीने ती साजरी करतो आणि आनंद लुटतो. अशी हि येणारी दिवाळी आपल्या सारख्या सर्व प्रेमळ मित्रांना
आनंदाची सुखाची, समाधानाची, यशाची जावो हीच मनापासून सदिच्छा....
नवी स्वप्ने नवी क्षितिजे, घेउन येवो ही दिवाळी,
ध्येयार्पण प्रयत्नांना, दिव्ययशाची मिळो झळाळी,
आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो, ही दिवाळी
दिपावलीच्या पुनश्च एकदा आपण सर्वाना कोटी कोटी शुभेच्छा

..अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या संदर्भात माझ्याही लेखणीतुन उमटलेले विवेक प्रहार....


The Most Powerfull Man in The World असा उल्लेख ज्या राष्ट्राध्यक्षांचा संपुर्ण जगभरात केला जातो त्या महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीच्या शेवटच्या टप्यातील पडघम  वाजत आहेत. गेली वर्षभर राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीची चाललेली प्रक्रिया अंतिम टप्यात म्हणजेच दोन तीन आठवड्यावरती येऊन ठेपली आहे. संपूर्ण जगाचे लक्ष ८ नोव्हेंबर २०१६ ला अमेरिकेचा ४६ वा राष्ट्राध्यक्ष  कोण निवडला जाणार याकडे लागले आहे. डेमॉक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डॉनल्ड ट्रम्प यांच्यामध्ये हि राष्ट्राध्यक्षपदाची सरळ लढत होत आहे. हिलरी क्लिंटन या अत्यंत बुद्धिमान, आपल्यापुढे असलेल्या विषयाचा मुद्देसूद अभ्यास करणाऱ्या म्हणून  आंतराष्ट्रीय राजकारणात ओळखल्या जातात. तर दुसऱ्या बाजुला डोंनाल्ड ट्रम्प हे आक्रमक स्वभावाचे आणि स्पष्ट वक्ते म्हणून आंतराष्ट्रीय राजकारणात ओळखले  जातात. त्यांनी आक्रमकपणे केलेली अनेक विषयावरची वक्तव्ये हि वादग्रस्त आहेत. अमेरिकेच्या २०० वर्षाच्या इतिहासात प्रथमच एका महिलेला अमेरिकन  पक्षाची राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी हिलरी क्लिंटन यांना मिळाली आहे.  सध्याच्या तरी मतदानाच्या आकडेवारीवरून त्या आघाडीवर असल्याचे आपणास पाहायला मिळतात. २००८ च्या जागतिक महामंदीचे परिणाम आर्थिक महासत्ता  असलेल्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला सर्वप्रथम सहन करावे लागले होते.  त्यानंतर संपूर्ण जगभर जागतिक महामंदी विस्तारली गेली.  लोकसत्ताचे संपादक गिरीशजी कुबेर सर यांनी अमेरिकेत जाऊन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे केलेले सडेतोड विश्लेषण "ओपन अमेरिका" या लेख मालिकेच्या  माध्यमांतून लोकसत्ता मध्ये गेले महिनाभर प्रकाशित होत होते. जवळ जवळ त्यांनी लिहिलेले सर्वच लेख अमेरिकेच्या निवडणुकीविषयीची माहिती मिळण्यास  उपयुक्त ठरले. दोन्ही उमेदवारांच्या अमेरिकन मीडियाने घेतलेल्या चर्चेच्या  वादफेऱ्या, रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डॉनल्ड ट्रम्प यांची चर्चेत झालेली गोची, उपाध्यक्षपदासाठी उभे असलेले दोन्हीही नवखे उमेदवार, अमेरिका आणि  भारत यांच्या तील निवडुकाविषयीचा मुद्देसूद तुलनात्मक आढावा इत्यादी विषयीचे लेख नक्कीच अप्रतिम असेच आहेत. खरंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक हि अत्यंत किचकट आणि गुंतागुंतीची असते. जितके  मतदार मतदान करतील तितकी मते असे साधे सरळ गणित नाही. प्रत्येक राज्याला स्वतःचे वजन असते. उदा--टेक्सास, न्यूयॉर्क, फ्लोरिडा. या राज्यांना स्वतःचे वजन आहे. जितके त्या राज्यातील लोकप्रतिनिधी तितके त्या राज्याल वजन. आपले उदाहरण द्यायचे झाले तर महाराष्ट्रातून ४८ खासदार निवडले जातात, म्हणून राष्ट्र्पतींच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील लोकांच्या मताला वजन ४८... या पद्धतीमुळे उमेदवारही वजनदार राज्यांकडे जास्त लक्ष ठेवून असतात. आपल्याकडे जसे एकटा उत्तरप्रदेश देशाच्या राजकारणाची दिशा ठरवू शकतो, तसे इथे टेक्सास, न्यूयॉर्क, कॅलिफोर्नियासारखे वजनदार राज्य निवडणुकीत निर्णायक ठरू शकते. यासारखे अनेक मुद्दे हे "ओपन अमेरिका" या लेख
मालिकेच्या माध्यमातून समजले.


धन्यवाद..
श्री पोपटराव यमगर
बाळेवाडी, ता.- आटपाडी,
जि.: सांगली

आटपाडी तालुक्याविषयी भाग 2 ...... : तालुक्याचं राजकारण आणि समाजकारण....


काल आपल्या आटपाडी तालुक्याविषयी लिहिलेल्या शैक्षणिक विषया संबधीच्या लेखाला आपल्या सारख्या सुशिक्षीत आणि जागृत वाचकांच्या कडुन खुप चांगला प्रतिसाद मिळाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं प्रथमतः मनपुर्वक धन्यवाद मानतो. आजचाही लेख कसा वाटला जरुर कळवा.. काही चुका उणिवा असतील तर तसंही सांगा. त्यामधे नक्कीच दुरुस्ती केली जाईल.
भौगोलिक दृष्ट्या सांगली जिल्ह्याच्या उत्तरेला असणारा आणि वर्षानुवर्षे कायमच दुष्काळाने पिचलेला तालुका अशी ओळख सांगली जिल्ह्यात आटपाडी या तालुक्याची आहे. सांगली जिल्हा तसा राजकारण्यांचा जिल्हा म्हणुन महाराष्ट्राच्या राजकारणात प्रसिद्ध आहे. माजी मुख्यमंत्री वसंतदादा, राजाराम बापु, माजी उपमुख्यमंत्री आर आर आबा या महाराष्ट्राचं नेतृत्व केलेल्या लोकप्रिय नेत्यांचा जिल्हा....महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात अर्धा डझन मंत्री फक्त सांगली जिल्ह्यातीलच असायचे. पण आटपाडी तालुक्याच्या जनतेला इतिहासात भौगोलिक, आर्थिक दुष्काळाबरोबर राजकीय दुष्काळही कायमच सहन करावा लागला आहे. तालुक्यात फक्त दोनच आमदार होऊन गेले ते म्हणजे सन्माननीय माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख आणि सन्माननीय माजी आमदार आण्णासाहेब लेंगरे......... या दोन्ही नेत्यांच्या शिवाय तालुक्यातील अजुन कोणताही नेता आमदार होऊ शकला नाही ही बोचरी खंत तालुक्यातील जनतेच्या मनामधे आहे. यानंतर मागील चार वर्षात सांगली जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद सन्माननीय अमरसिंह देशमुख यांना मिळाले होते. त्याचबरोबर सांगली जिल्हा परिषदेचं उपाध्यक्षपद स्वर्गीय मोहनकाकांना मिळालं होतं. तालुक्याच्या नेतृत्वांना जिल्हा स्तरावर मिळालेल्या या काही मोजक्या संधी आपल्याला ठळकपणे दिसुन येतात.
1995 ला अपक्ष म्हणुन आमदार झालेल्या सन्माननीय राजेंद्रआण्णा देशमुख यांनी आटपाडी तालुक्याचा पाणीप्रश्न मिटवण्यासाठी युती सरकारला पाठिंबा दिला होता. विशेष म्हणजे त्यावेळी राजेंद्रआण्णांना युती सरकारकडुन मंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होती.. मंत्रीपद झुगारुन पाणीप्रश्न सोडवा म्हणणारा नेता या तालुक्याला लाभला आहे.अपक्ष आमदारांच्या दबावामुळे युती सरकारने टेंभुचा नारळ फोडला, काही प्रमाणात कामे झाली, पण या योजनेकडे पुढे आघाडी सरकारच्या कार्यकाळात राजकीय दुर्लक्ष झाल्यामुळे त्या योजना पूर्ण न झाल्याने पाणीप्रश्न हा पुढेही तसाच प्रलंबित राहिला. राजेंद्र आण्णांची पाण्याच्या प्रश्नाविषयीची त्यांची तळमळ वाखाणण्याजोगी आहे. अत्यंत दुष्काळी परिस्थितीतही माणगंगा सहकारी साखर कारखाना , सूतगिरणी त्यांनी यशस्वीपणे चालवून दाखविली आहे. दुष्काळी भागातील सामान्य माणसांची पत निर्माण करुन बाबासाहेब देशमुख बॅक काढण्याचे आणि ती यशस्वीपणे चालविण्याचे कार्य सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सन्माननीय अमरसिंह देशमुख यांनी केले आहे. अनेक गरजुंना या बॅकेने आधार दिला आहे.दुष्काळी भागातील गोरगरीब शेतकर्यांना दररोजच्या दुग्ध व्यवसायातुन पैसा मिळावा यासाठी दुधसंघ स्थापन केला व तो आज अतिशय वेळच्या वेळी योग्य दराने दूध उत्पादकांना दुधाचे पैसे देऊन व्यवस्थितरित्या तालुक्यातील दुध व्यवसायाला चालना मिळत आहे. या दोन्हीही नेत्याचं एक अपयश म्हणजे तालुक्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजेच टेंभुच्या पाण्याचा प्रश्न ते त्यांच्या कार्य काळात सोडवू शकले नाहीत...
आटपाडी तालुक्याच्या राजकारणात आमदार अनिलभाऊ बाबर यांचे खंदे समर्थक आणि माजी जि. प. सदस्य तानाजी पाटील आणि स्वर्गीय रामभाऊ पाटील यांचे बंधु भारततात्या पाटील यांचे स्वतंत्र असे राजकीय गट आहेत. यांनीही तालुक्यातील राजकारणाला एक वेगळी दिशा दिली आहे. गेल्या जिल्हा परिषद व विधानसभा निवडणुकीत या गटांनी आपले वेगळे राजकीय अस्तित्व दाखविले. या दोन्हीही नेतृत्वाकडुन तालुक्याचं हित होणं अपेक्षीत आहे.
काॅग्रेसचे नेते स्वर्गीय मोहनकाका यांनी तालुक्यात त्यांना मिळालेल्या विविध पदाच्या माध्यमातुन विकासकामे करत तालुक्यात काॅग्रेसचं अस्तित्व ठेवण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यांच्या जाण्यानं तालुक्यात काॅग्रेसचं अस्तित्व कमी झालं आहे.
2009 पुर्वी तालुक्यात पक्षापेक्षा गटा तटांचे राजकारण चालत होतं. पण 2009 च्या विधानसभा निवडणुकीतील तसेच तालुक्याच्या राजकारणातील मा. गोपीचंद पडळकर या युवा नेत्याचा प्रवेशाने गटा तटांचे राजकारण संपुष्टात आणले. गेल्या आठ वर्षात आटपाडी खानापुरसह सांगली जिल्ह्यातील प्रस्थापित घराण्याच्या विरोधात आवाज उठवत विस्थापीत झालेल्या बहुजन समाजाची मोट बांधत आपल्या उत्तम अशा वक्तृत्व शैलीने अनेक नामवंत राजकारण्यांना घायाळ करत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातुन तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे युवा नेते सन्माननीय गोपीचंद पडळकर साहेब काम करत आहेत. शेतकर्यासाठी, कामगारांसाठी, गोरगरीब, दीनदलीत जनतेसाठी प्रंसगी पोलिसांच्या लाठ्या काठ्या खात टेंभुसाठी आक्रमक पद्धतीने आंदोलने, ओगलेवाडी टेंभु कार्यालय तोडफोड प्रकरण, मंत्र्याना तालुक्यात येण्यास बंदी, राजेवाडी पोट कालवा प्रकरण, दुष्काळी परिषदा यासह विविध माध्यमातुन जनतेप्रती असलेली आपुलकीची जाणीव जनमाणसात रुजविली. 2009 ची विधानसभा, 2012 ची करगणी जिल्हा परिषद, 2014 ची विधानसभा निवडणुकीत त्यांना नेहमीच अपयशाचा सामना करावा लागला. तरीही "जिंकलो तरी भुलणार नाही, हरलो तरी खचणार नाही, जनतेचे शिलेदार आम्ही, लढणे कधीच सोडणार नाही" असे म्हणत त्यांचा संघर्षाचा प्रवास चालुच आहे. गोपीचंद पडळकर या नेतृत्वाकडुन तालुकावासियांना खुप अपेक्षा आहेत. त्या अपेक्षांची अपेक्षापुर्ती कशी करतात त्यावरच त्यांचं पुढील राजकारण अवलंबुन असणार आहे.
तालुक्याच्या या प्रमुख नेत्यासह दिघंचीचे माजी सरपंच हणमंतराव देशमुख, करगणीचे माजी जिप सदस्य आणासाहेब पत्की, माजी जिप सदस्य, माजी सभापती विजयसिंह पाटील, धुळा मारुती झिंबल यांच्यासह विविध भागातील स्थानिक पातळीवरच्या पदाधिकारयांचा तालुक्याच्या राजकारणात महत्वाचा सहभाग असल्याचे आपणास दिसुन येते.

धन्यवाद।।
श्री. पोपटराव यमगर
बाळेवाडी, ता. आटपाडी,
जि. : सांगली

आपल्या आटपाडी तालुक्याविषयी माझ्या लेखणीतुन उमटलेले विवेक प्रहार


आटपाडी म्हणजे प्रभु श्री रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या खरसुंडी च्या श्री सिद्धनाथाची ही भूमी, थोर साहित्यिक ग.दि माडगुळकर, व्यंकटेश माडगुळकर, ना.स. इनामदार या थोर साहित्यिकांची भूमी.., एका तराळाच्या पोरानं कर्तृत्वाच्या जोरावर अवघं अंतराळ काबीज केलं त्या साहित्यीक कुलगुरु शंकरराव खरातांची जन्मभूमी. लालभडक आणि चविष्ट आणि गुणवत्तापुर्ण अशा डाळिंबांची भूमी.....अशी कितीतरी वैशिष्ट्य आपल्या आटपाडीची आहेत.
आटपाडी तालुक्यातील दुष्काळग्रस्त जनतेला आपल्या वाट्याला आलेला भोग आपल्या मुलाबाळांच्या वाट्याला येऊ नये म्हणुन शिक्षणावर भर दिल्याशिवाय पर्याय उरत नाही.प्रतिकुल भौगोलिक, आर्थिक परिस्थितीतही या तालुक्यातील युवक युवती भविष्यातील सुखाची स्वप्न पाहत यशाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. नव्या युगाची आव्हाने पेलण्यासाठी ही पिढी सदैव सज्ज असेल यात कोणतीच शंका नाही.
तालुक्यातील मोठ मोठ्या पदावर पोहचलेल्या अनेकजणांच्या शैक्षणिक जडणघडणीमधे आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे महत्व अबाधित असेच आहे. सन्माननीय श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांनी दुष्काळी भागातील गोरगरीब व सर्वसामान्य तरुणांनी सुशिक्षीत होऊन स्वतःच्या पायावरती उभं रहावं यासाठी आटपाडी एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्या परिश्रमाने मजबुत पाया उभारल्यामुळे नावलौकिकास आलेली ही शिक्षण संस्था दिवसेदिवस विस्तारतच आहे. आज या संस्थेतुन जरवर्षी हजारो विद्यार्थी (केजी पासुन पीजी पर्यंत) शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत. आटपाडीच्या शैक्षणिक विकासात इतर अनेक संस्थानी आपला महत्वाचा वाटा उचलला आहे.त्यामधे झरे येथील अहिल्यादेवी शिक्षणसंस्था, आटपाडी येथील श्री राम एज्युकेशन सोसायटी खरसुंडीतील रयत शिक्षण संस्थेचे विद्यालय, धुळाजीराव झिंबल शिक्षण संस्था, यासह अनेक गावातील छोट्या मोठ्या शाळांचा यामधे समावेश होतो. खरंतर कोणत्याही भागाचा सर्वांगीण विकास हा त्या भागाच्या शैक्षणिक प्रगतीवर अवलंबुन असतो. विकास असतो. शैक्षणिक विकास झाल्याशिवाय आर्थिक, सामाजिक आणि वैचारिक विकास होत नाही ही वस्तस्थिती आहे. आपल्या तालुक्यातील, समाजातील मुलांमुलींनी शिकावं, शिकुन मोठ्या पदावरती विराजमान व्हावं हे प्रत्येकालाच वाटतं याचा आनंद आहे. समाजातील मुलांच्या उज्वल भविष्यासाठी आपण करिअरविषयक मार्गदर्शनपर कार्यशाळा राबविल्या पाहिजेत. भविष्यात शिक्षणाच्या जोरावरच येथील युवक युवती आकाशाला गवसणी घालुन तालुक्याचा नावलौकिक वाढवतील यामधे माझ्या मनात तरी कोणती शंका नाही...
धन्यवाद..

शनिवार, १ ऑक्टोबर, २०१६

.... तिमीरातुनी तेजाकडे जाणारा संघर्षमय प्रवास ..... .... .....


           


सांगलीच्या राजकारणात स्वतःच एक वेगळं वलंय निर्माण केलेले, गेल्या दहा वर्षात खानापुर आटपाडीसह सांगली जिल्ह्यातील प्रस्थापित घराण्याच्या विरोधात आवाज उठवत विस्थापीत झालेल्या बहुजन समाजाची मोट बांधत आपल्या उत्तम अशा वक्तृत्व शैलीने अनेक नामवंत राजकारण्यांना घायाळ करणारे भारतीय जनता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्रातील युवा नेते सन्माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांचा आज वाढदिवस.... वाढदिवसाच्या निमीत्ताने प्रथमतः माझ्यावतीने त्यांना कोटी कोटी शुभेच्छा आहेत. सांगलीच्या राजकारणात (लोकसभेला आणि विधानसभेला) आपण किंगमेकर ठरलाच आहात पण येणारया काळात सांगलीच्या राजकारणात आपण किंग व्हावं हीच मनापासुन सदिच्छा आहे...
2014 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी चे उमेदवार म्हणुन खानापुर आटपाडी मतदारसंघात ज्या झंझावत अशा पद्धतीने आपण निवडणुक लढविली ती नक्कीच सर्वसामान्य माणसांना प्रेरणा देणारी अशीच आहे..समोर आर्थिक सामाजिक दृष्ट्या प्रस्थापित असलेल्या तीन उमेदवारांना तुमची उमेदवारी आणि तुम्ही मिळविलेली मते ही नक्कीच सणसणीत चपराकच ठरली. 2007 च्या जि. प. निवडणुकीपासुन ते आजपर्यंत तुमचा जो संघर्षमय, खडतर, काटेरी वाटेवरील अनवाणी प्रवास असा जो राजकीय प्रवास आहे तो नक्कीच कौतुकास्पद असाच म्हणावा लागेल... मी तर याला तिमीरातुन तेजाकडे निघालेला संघर्षमय प्रवास असंच म्हणु इच्छितो... खरंतर गोपीचंद पडळकर हे नाव मी पहिल्यांदा ऐकलं, पाहिलं, वाचलं ते म्हणजे 2009 च्या विधानसभा निवडणुकीपुर्वी फक्त 15-20 दिवस अगोदर. .... तिथुन ते आजपर्यंत खुप कौतुकास्पद आसाच प्रवास आहे. सांगलीच्या राजकारणाच्या इतिहास ही राजकीय विश्लेषकांना ही गोपीचंद पडळकर या नावाशिवाय पुर्ण करताच येणार नाही. त्यानंतर 2009 च्या विधानसभा निवडणुकीत झंझावत पद्धतीने प्रचार करुन पहिल्याच निवडणुकीत किंगमेकर ठरलात. त्यांनतर टेंभुसाठी आक्रमक पद्धतीने आंदोलने, ओगलेवाडी टेंभु कार्यालय तोडफोड प्रकरण, मंत्र्याना तालुक्यात येण्यास बंदी, राजेवाडी पोट कालवा प्रकरण, दुष्काळी परिषदा यासह विविध माध्यमातुन जनतेप्रती असलेली आपुलकीची जाणीव जनमाणसात रुजविली. त्यानंतर 2012 मधील जि. प. पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढवत तालुक्यात दुसरया क्रंमाकाची मते मिळवत तानाजी शेठ यमगर यांच्या रुपाने एक पंचायत समिती सदस्यही निवडुन आणला..
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ग्रामपंचायत निवडणुकात तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती स्वबळावर ताब्यात घेतल्या..एकीकडे राजकारणाचा चढता आलेख चालु असताना दुसरीकडे सामाजिक कार्याबरोबरच शेतकर्यासाठी, कामगारांसाठी, गोरगरीब, दीनदलीत जनतेसाठी आक्रमक पद्धतीने आंदोलने चालुच होती. माझासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील हजारो मुलांना स्वाभिमानानं जगणं म्हणजे काय असतं हे तुमच्या वाणीतुन आणि कर्तृत्वातुन दाखवुन दिलं. राजसत्ता आणि राजपाठ कधी मागुन मिळत नसतो तर तो हिसकावुन घ्यायचा असतो असं सन्माननीय जानकर साहेबांच्यानंतर आपणच बहूजन पोरांना ठामपणे ओरडुन सांगितलं. अनेकजण जिल्ह्यात लोकसभेला निभावलेली किंगमेकर ची भुमिका विसरलेही असतील कदाचित पण सर्वसामान्य माणुस मात्र कधीच विसरणार नाही. कि आपल्या राज्यात दुसरया क्रंमाकाचा असणारा धनगर समाज डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अनुसुचित जमातीच्या आरक्षणासाठी भारताच्या स्वांतत्र्यापासुन ते आजपर्यंत गेली 68 वर्ष रस्त्यावर विविध आंदोलनाच्या माध्यमातुन रस्त्यावरती उतरत आहे. धनगर समाजाच्या आरक्षणासाठीही आपण अनेकवेळा मोर्चे, आंदोलने केली आहेत. अजुनही आरक्षणाचा प्रश्न मिटलेला नाही तोही प्रश्न आपण तत्परतेने लक्ष घालुन लवकर निकाली काढावा हीच राज्यातील तमाम समाजबांधवाची मनस्वी मागणी आहे.
खरंतर बोलण्यासारखं बरंच आहे. जर कोण चांगले काम करत असेल त्याला पाठिंबा देणं, कौतुक करणं आणि कोण चुकतही असेल तर त्यांची चुकही निपक्षपातीपणे दाखवुन देणं हे एक लेखकाचं काम आहे. आज आपला भारतीय जनता पार्टी हा पक्ष राज्यात, केंद्रात सत्तेवर आहे. आपल्याकडुन तमाम सांगलीकर यांच्यासह खानापुर आटपाडीकर यांच्या खुप सारया अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पुर्ण करण्यासाठी माझ्यावतीने तुम्हाला गणेशाची सिद्धी, चाणक्याची बुद्धी, शारदेचं ज्ञान, कर्माचं दान, भिष्माचं वचन, रामाची मर्यादा, हनुमंताची ताकद, आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं जाणतेपण देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ...आणि
पुनश्च एकदा वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा

धन्यवाद
श्री. पोपटराव यमगर
बाळेवाडी, ता. आटपाडी,
जि. सांगली
०७७०९९३५३७४

पाकिस्थानने उरी येथे भारतीय लष्करावर हल्ला केल्यानंतर भारत सरकार आणि भारतीय लष्कर यांच्या कडुन ज्या पद्धतीने पावले उचलली जात आहेत ते नक्कीच अभिनंदनीय अशीच आहेत असंच म्हणावं लागेल. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत भारताच्या परराष्ट्रमंत्री सन्माननीय सुषमा स्वराजजी यांनी केलेलं एक दमदार भाषण नक्कीच आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्थानला एकाकी पाडणार असंच आहे. सन्माननीय सुषमा स्वराजजी यांनी दहशतवाद्यांना पाकिस्थान कश्या पद्धतीने पोसतोय आणि त्यासाठी जगातील सर्व मानवतावादी राष्ट्रांनी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी एकजूट होण्याचं आव्हान केलं. त्याच दिवशी भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सिंधु पाणी वाटप करारातील भारताच्या हिश्याला आलेलं सर्व पाणी भारत वापरेल असा निर्णय घेऊन पाकिस्थानला कृतीतुन पहिला टोला दिला. त्यांतर पाकिस्थानातील इस्लामाबादमध्ये होणारया सार्क परिषदेमधे सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. असा निर्णय घेतल्यामुळे भारतीय उपखंडातील बांगलादेश अफगाणिस्थान भुतान नेपाळ यांनीही भारताच्या निर्णयाला पाठिंबा देत इस्लामाबादमध्ये होणारया सार्क परिषदेमधे सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे इस्लामाबादमधे होणारी सार्क परिषद रद्द होत आहे अशी बातमी येत आहे. आणि सर्वात महत्वाचा आणि तुमच्या माझ्या स्वाभिमानाचा आणि आनंदाचा क्षण म्हणजे काल भारतीय लष्कराने LOC पार करत पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून पाकच्या दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले... जरवेळी भारतावर हल्ला झाल्यानंतर निमूटपणे सहन करत निषेध करण्यापलीकडे आम्ही काही करू शकत नव्हतो. परंतु खरंच राजकीय इच्छाशक्तीची जोड मिळाली तर भारतीय लष्करहि दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देते हे भारतीय लष्कराने दाखवून दिले आहे. भारतानं पुढे जाऊन अजून एक पाऊल उचलले आहे ते म्हणजे most favoured nation पाकिस्थानला दिलेला दर्जा भारत कडून घेत आहे...
भारत या सर्व घटना पाहता भारतही एक सशक्त देश म्हणुन पावलं उचलतो आहे याचा तुम्हाला मला अभिमान आहे.. आम्ही जात पात, धर्म, भाषा, प्रांत, पक्षीय राजकारण यापलीकडे जाऊन आमच्यात किती जरी वेगवेगळे वाद विवाद असले तरी भारतावर म्हणजेच आमच्या मायभुमीवर ज्यावेळी दुसरा देश हल्ला करतो त्यावेळी आम्ही 'हम सब भारतीय है' म्हणत एकत्र येऊन त्यांना त्यांच्याच पद्धतीने उत्तर देऊ शकतो हे भारतानं दाखवून दिलं आहे.. त्याबद्दल भारत सरकार आणि भारतीय लष्कर यांच मनापासुन अभिनंदन... येथून पुढे भारतावर हल्ला करताना पाकिस्थानला किंवा त्यांनी पोसलेल्या दहशतवाद्यांना विचार करावाच लागेल... याच बरोबर या सर्जिकल स्ट्राइक च्या ऑपरेशन नंतर भारतावर हि खूप मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे

कदाचित पाकिस्थान भारतातील प्रमुख शहरावरती हल्ले करू शकतो.. त्यासाठी आपण सर्वानी राष्ट्रीय सुरक्षततेच्या दृष्टीने खबरदारी घेतली पाहिजे धन्यवाद ... 

 पोपट यमगर

07709935374