विवेक विचार

विवेक विचार

मंगळवार, १० मे, २०१६

✍ विवेक प्रहार ✍

आज कर्मवीर भाऊराव पाटील(आण्णा) यांचा स्मृतीदिन।।त्यानिमीत्त प्रथमतः त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन।।
           माझं जवळ जवळ अर्ध शिक्षण आण्णांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेत झालं यांचा मला आनंद वाटतो.  कारण शिक्षण घेत असताना रयत शिक्षण संस्था कधीच परकीय संस्था वाटली नाही. संस्थेत शिक्षण घेत असताना आपुलकी प्रेमच मिळाले संस्थेत शिक्षण घेत असताना आण्णां सारख्या महापुरुषांच्या  आदर्श चारित्र्याचे धडे मिळत गेले आणि त्यातुनच माझं हे व्यक्तीगत चारित्र्य घडत गेले. आजच्या काळात शैक्षणिक क्षेत्राचं अनेक मोठ्या राजकीय नेत्यांनी बाजारीकरण करुन टाकलं आहे. पैसे घेऊन जशा बाजारात वस्तु मिळतात तशा अनेक खाजगी विद्यापीठ संस्थामधुन पदव्या मिळत आहेत. आज छोट्या मुलांच्या केजी ला प्रवेश घ्यायला 50000 फी मागितली जाते. या आर्थिक कारणासाठी अनेक गोरगरीब पालकांना आपल्या मुलास दर्जेदार शिक्षणापासुन वंचित ठेवावं लागतं ही मनाला बोचणारी खंत आहे. पण मी ठामपणे सांगु शकतो की माझं संस्थेतील शिक्षण हे खुप कमी खर्चात झालं आहे .
आणांनी रयत शिक्षण संस्था चालु करण्यामागचं खरं उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण भागातील गोरगरीब बहुजन समाजातील मुला मुलींना शिक्षण घेता यावं हे होतं. स्वतः आण्णा फक्त सहावी शिकले आहेत पण त्यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेतुन लाखो कोट्यावधी मुलांनी पदव्युत्तर पदव्या घेतल्या आहेत.
        आण्णानी  4 ऑक्टोंबर 1919 रोजी कार्ले या गावी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यांनी 1919 ला रयत शिक्षण संस्थेच्या नावाने लावलेला वेल आज गगणाला गवसणी घालताना आपल्याला दिसुन येतोय.  संस्थेच्या नावाप्रमाणेच ही रयतेची म्हणजेच गोरगरीब, दलीत, सर्वसामान्य, वंचीत, शेतकरी, कामगार यांची संस्था आहे असं आण्णानी अनेक वेळा बोलुनही दाखवले आहे.  अनेक विद्यार्थ्यांना घरच्या आर्थिक परिस्थीतीमुळे शिक्षण घेता येत नाही अशा शिकण्याची इच्छा असणारया गरजु विद्यार्थ्यासाठी आण्णानी कमवा आणि शिका ही योजना संस्थेत चालु केली. संस्थेतील अनेक शाखामधे  बाहेरगावच्या वंचित विद्यार्थ्यासाठी वसतिगृहे चालु केली.  स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीदवाक्य असं सांगतांना आण्णांनी संस्थेचं चिन्हसुद्धा वटवृक्ष ठेवलं आहे याचं कारण म्हणजे वटवृक्षाप्रमाणे संस्थेच्या शाखाचा विस्तार होत जावो हीच त्यांची मनोमनी इच्छा होती.
      महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाणसाहेब यांनी कर्मवीर आण्णांच्या विषयी  पुढील गौरवोदगार काढले आहेत, "कर्मवीर ही व्यक्ती नव्हती ती एक संस्था होती, बहुजन समाजात ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले व महाराष्ट्रात नवयुग निर्माण केले. त्यांची रयत शिक्षण संस्था म्हणजे महाराष्ट्रात नवजीवन ओतणारी गंगा आहे." सार्वजनिक शिक्षणाबाबत आज सरकारी पातळीवर निर्णय झालेले आहेत. पण एक काळ असा होता की त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अशा काळात मागासवर्गीय बहुजन   गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे दूर केले. कष्टकरी विद्यार्थ्यांना रात्रशाळांचा पर्याय उपलब्ध केला. खेड्यातील मुलांना दैनंदिन सुविधा मिळाल्या तर त्यांना शिक्षण घेता येईल या विचारातून त्यांनी मोफत वसतीगृहे चालवली. ‘रयत शिक्षण संस्थे’च्या रूपाने त्यांनी उभे केलेले कार्य सर्वांना परिचित आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबी शिक्षण, श्रमप्रतिष्ठा आणि स्वातंत्र्याची मूल्ये रुजवली. त्यांच्या स्मृतिदिनी त्यांचा आदर्श न विसरण्याची शपथ आपण घेतली पाहिजे. पुन्हा एकदा आण्णाच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन।।
धन्यवाद।

  श्री. पोपटराव यमगर
  बाळेवाडी ता. आटपाडी,
  जि. सांगली
 7709935374

✍✍विवेक प्रहार✍✍

✍✍विवेक प्रहार✍✍

आजचा लोकसत्ताचा अग्रलेख विचार करण्यास प्रवृत्त करणारा अग्रलेख आहे. महाराष्ट्रात सध्या 18 वर्षाखालील मुलींचे लग्न लावून देण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी मुलगी 14, 15 वर्षाची झाली की तिचे  पालक लग्न लावुन देतात. लग्न लावुन दिल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया ही फार बोलकी असते ती म्हणजे झालो एकदाशी या कटकटीतुन मोकळा???? म्हणजे मुलगी म्हणजे कटकट,, मुलगी म्हणजे डोक्यावरील कर्जाचं ओझं ही समाजाची धारणा झाली आहे.  परवाच मातृदीन साजरा झाला. अल्पवयीन वयात लग्न झाल्यामुळे लवकरच मातृत्व येते त्यामुळे ज्या वयात स्वतःचे बालपण खेळण्या बागडण्यात घालवायचे असते त्याच वयात स्वतःच्या मुलांची जबाबदारी खांद्यावर येऊन पडते. हे चित्तथरारक दृश्य असल्याचं आपणास दिसुन येईल. लवकर लग्न झाल्यामुळे  स्त्रीला डीलीव्हरी होताना होणारा त्रास आणि त्यामुळे अनेक भगिनींचे होणारे मृत्यु याचंही प्रमाण जास्त होत असल्याचं आपल्याला दिसुन येत आहे. लवकर लग्न करण्यामागची कारणंही लोकसत्तानं चांगल्या पद्धतीने स्पष्ट केली आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे मुलीबद्दलची असुरक्षिततेची भावना।। आज आम्हो कितीही महासत्तेच्या गप्पा मारत असलो तरी तुमच्या माझ्या भगिनीच्या मनात सुरक्षिततेची भावना उतरवण्यास आपण कुठेतरी नक्कीच कमी पडतोय असं मला ठामपणे वाटतं. ती सुरक्षिततेची भावना आपण आपल्या भगिनींच्या मनात जेव्हा उतरवु तो नक्कीच सुदीन असेल असं मी समजतो.

धन्यवाद
(जागृत विचारातुन✍✍✍)
श्री. पोपटराव यमगर

गुरुवार, १४ एप्रिल, २०१६

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर : मानवतेचा, समतेचा, स्वातंत्र्याचा, विश्वबंधुत्वाच्या विचारांचा अखंड वाहणारा प्रवाह............

           अद्वितीय बुद्धिमत्ता, त्या आधारे स्वत: घेतलेले अतिउच्च दर्जाचे शिक्षण, जागतिक दर्जाची विद्वत्ता, बंडखोरी व क्रांतिकार्य करण्याची प्रवृत्ती, संघटन कौशल्य, शिस्तबद्धता व वक्तशीरपणा, असामान्य वक्तृत्व, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, प्रचंड वाचन, संशोधनात्मक अभ्यास, अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी लेखन... अशा अनेक गुणविशेषांनी गौरविलेले व्यक्तीमत्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अर्थतज्ञ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस 125 व्या जयंतीनिमीत्त प्रथमतः विनम्र अभिवादन।

          आज भारतासह पुर्ण जगभर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे. नक्कीच मनामधे आनंद आहे. सर्वानी बाबासाहेबांचे विचार त्यांचे चरित्र , त्यांचा संघर्ष जाणुन घेतला पाहीजे. लेखाचं शिर्षक देतानाच माझ्या मनात विचार आला की काय द्यावं शिर्षक??? पटकन अनेक विचार मनात आले ते म्हणजे तुम्हा आम्हाला बोलण्याचं लिहीण्याचं स्वातंत्र्य दिलं, तुमच्या माझ्या मनात वर्षानुवर्षे भिनलेल्या जातीव्यवस्था धर्मव्यवस्था(खरंतर हा मानवतेवर लागलेला कलंक आहे) यापलीकडे जाऊन आपण सर्व या विश्वाची लेकरे आहोत, असा विश्वबंधुत्वाचा, समतेचा, एकतेचा, विचार भारतीय मनामनात पेरणारे डाॅ बाबासाहेब आंबेडकर हे अखंड वाहणार्या माणुसकीच्या प्रेमाचा झरा आहेत असं मला वाटतं. म्हणुनच विचारी मनाला या अर्थबोधातुन वरील शिर्षक सुचलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समता, बंधुता, लोकशाही, स्वातंत्र्य, जागतिक अर्थकारण व राजकारण यांविषयी मांडलेले विचार आजही समर्पक ठरतात. त्यांचे कार्य आजही तेवढेच परिणामकारक व स्फूर्तिदायी ठरते. भारतात असलेल्या जातीव्यवस्थेच्या वर्णवर्चस्वाच्या होणार्या अन्याय अत्याचारातुन आपल्या देशाला व समाजबांधवांना या सामाजिक विषमतेच्या विळख्यातून बाहेर काढायचे त्यांनी ठरवले. प्राथमिक शिक्षण संपवुन परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी गेले. त्यांना कोलंबिया विद्यापीठाने पीएच.डी. ची पदवी बहाल केली. १९२५ मध्ये त्यांनी मिळवलेल्या या डॉक्टरेटचा विषय होता, ‘नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया - ए हिस्टॉरिकल अँड अनॅलिटिकल स्टडी'. कोलंबिया विद्यापीठात त्यांनी समाजशास्त्र, राज्यशास्त्र व अर्थशास्त्र या विषयांचे अध्ययन केले. पुढे त्यांनी लंडन येथील विद्यापीठात ‘दी प्रॉब्लेम ऑफ रूपी’ हा प्रबंध सादर केला आणि डी. एस्सी. ही पदवी मिळवली. 
        भारतात आल्यावर सामाजिक विषमता दूर करण्याच्या हेतूने, अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजाची कैफियत समाजासमोर मांडण्यासाठी, त्यांनी ‘मूकनायक (१९२०), ‘बहिष्कृत भारत’ (१९२७), ‘जनता’ (१९३०) आणि ‘प्रबुध्द भारत’ (१९५६) अशी वृत्तपत्रे चालवली. या काळात जी काही वृत्तपत्रे महाराष्ट्रात होती, त्यातून अस्पृश्यांचे प्रश्न मांडले जात नव्हते. त्यामुळे (तत्कालीन) अस्पृश्यांसाठी स्वतंत्र वृत्तपत्रांची गरज होतीच. सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय घडामोडी तसेच नवीन समाजाची निर्मिती या अनुषगांने त्यांनी त्यातून लिखाण केले. वृत्तपत्रांचा वापर त्यांनी कधीच केवळ आपल्या पक्षाची राजकीय ध्येयधोरणे राबविण्यासाठी केला नाही. आजच्या वृत्तपत्रांनी माध्यमांनी बाजारीकरणाचे रुप घेतले आहे. स्पृश्य आणि तथाकथित अस्पृश्य अशा दोन्ही समाजांच्या लोकांना विचार करण्यास प्रवृत्त करणे हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्टय होय. केवळ वृत्तपत्रांमधूनच नाही तर त्यांनी ‘दी अनटचेबल्स,’ ‘शूद्र पूर्वीचे कोण होते?’, ‘बुध्दा अँड हिज धम्म,’ असे ग्रंथ लिहिले. याशिवाय ‘थॉटस् ऑन पाकिस्तान’ हा जागतिक राजकारणावरील ग्रंथदेखील लिहिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ जातिव्यवस्थेच्या विरोधातच लढत होते असे नव्हे, किंवा ते केवळ विशिष्ट एका समाजाच्या विकासाचाच केवळ विचार करत होते असेही नव्हे. त्यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्याचेही भान होते. शिक्षण, अंधश्रद्धा, स्त्रियांची स्थिती, अर्थकारण, राजकीय किंवा प्रशासकीय व्यवस्था या मुद्यांकडेही त्यांनी भारताचे लक्ष वेधुन घेतले होते. 
       शाळेत असताना  १८- १८ तास अभ्यास करणारे डॉ. बाबासाहेब  आंबेडकर शिक्षणाचे महत्त्व चांगल्या प्रकारे ओळखून होते. 'शिक्षण हे वाघिणीचं दुध आहे जो कोणी ते पील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही' असं त्यांचं स्पष्ट मत होतं. "फक्त वही पेन म्हणजे शिक्षण नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे, शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण होय. जसे जेवल्यावर होणारे समाधान हे तात्पुरते असते, याउलट शिक्षणातुन मिळणारी ज्ञानाची शिदोरी आयुष्यभर पुरते. पोटाची भूक भागवावीच पण एक पाऊल पुढे टाकुन शिक्षण घेऊन माणसाने बुद्धीची भुकही भागवावी" असं त्यांनी अनेक भाषणातुन सांगितलं आहे. शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी त्यांनी मुंबई येथे १९४६ मध्ये सिध्दार्थ महाविद्यालयाची, तर औरंगाबाद येथे १९५० मध्ये मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. याशिवाय त्यांनी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ आणि ‘डिप्रेस्ड क्लास एज्युकेशन सोसायटी’ या शैक्षणिक संस्थांची देखील स्थापना केली. स्वतंत्र भारताचे लोकप्रतिनिधी, मंत्री कसे असावेत याचंही उत्तम उदाहरण त्यांनी कायदामंत्री असताना स्वतः घालुन दिलं आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर ६ डिसेंबर, १९५६ ला हे जग सोडून गेले. आज भारतीय लोकशाहीच्या कसोटीचा काळ सुरू आहे. स्वतंत्र भारतातील लोकशाहीविषयी चिंतन करतांना डॉ. आंबेडकर म्हणतात की, "जोपर्यंत इंग्रज सरकार होते, तोपर्यंत आपल्या देशातील चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपण त्यांच्यावरच टाकत होतो. पण आता आपण स्वतंत्र झाल्यामुळे चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपलीच राहणार आहे. त्यामुळे आपल्याला आता अधिक जबाबदारीने वागावे लागणार आहे."          मला लिहीताना, बोलताना, समाजात वावरताना, जगताना धुमसणार्या डोक्यात सतत बाबासाहेबांचे विचार आठवत राहतात. त्यांनीच आमच्यासारख्या वंचित समाज घटकातील मुलांना सांगितलं की अन्याय, अत्याचार सहन करु नका, अन्यायाची चीड व न्यायाची चाड ठेऊन शिक्षणाच्या माध्यमातुन प्रगतीकडे वाटचाल करा. आताच्या लोकशाहीसंपन्न असलेल्या देशात घडणार्या अन्याय, अत्याचार, अंधश्रद्धा, पारंपारीक रुढी, भ्रष्टाचार, घोटाळे, कट्टरतावाद यासारख्या घटनावर प्रहार करण्यासाठी आमच्यासारख्या नवतरुणांच्या हाती दिलेलं लेखणी हे शस्त्र नक्कीच वेळोवेळी मानवतेसाठी, अहिंसेसाठी, समतेसाठी, एकतेसाठी, बंधुत्वासाठी नक्कीच उचलेन असा ठाम विश्वास माझ्या मनामधे आहे.
        "मोजु तरी कशी उंची तुझ्या कर्तुत्वाची,
         तु जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची..
         तु देव नव्हतास तु देवदुतही नव्हतास... 
         तु मानवतेची पुजा करणारा खरा महामानव होतास...
         घायाळ पाखरांना पंख दिले तू!
         मुक्या वेदनांना शब्द दिले तू! 
         तुझ्याच चेतनेने जगण्यास अर्थ आला...
         युगा युगाच्या शोषितांचा उद्धार तूच केला!"
हे महामानवा पुन्हा एकदा तुज कोटी कोटी वंदन।।।
💐💐💐💐💐
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री. पोपटराव यमगर
🏡बाळेवाडी ता.- आटपाडी,
जि.- सांगली📞07709935374

विवेक प्रहार @@ खास युवकांसाठी@@


आज जगामधे भारतात सर्वात जास्त युवावर्गाची संख्या आहे. युवकांच्या झुंडीच्या झुंडी चौका चौकात, नाक्या नाक्यावर एकमेकांच्या उणीदुणी काढत असते. शक्यतो हुल्लडबाजी , धिंगाणा, लफडी, मारामारी करण्यात या युवकांना पुरुषार्थ वाटतो. कुठल्या तरी नेत्यांच्या जीवावर त्याच्याच दारू आणि डाॅल्बीवर हिजड्यासारखे नाचण्यात स्वतःला धन्य मानत असतात.शिवाजी महाराज जर त्यांच्या तारुण्यात नाचत बसले असते तर स्वराज्यच निर्माण झाले नसते. स्वातंत्र्यासाठी लढणारे नेते व क्रांतीकारक त्याकाळात नुसते हुल्लडबाजी करत बसले असते तर कदाचित् या देशाला स्वातंत्र्यच मिळाले नसते.
आपल्या नालायकीने आई-बापाला मान खाली घालायला लावण्यात कसला आला आहे पुरुषार्थ? हिजड्यासारखं वागणं आणि बोलणं असणारे हे कसले मर्द? मुलींना आचकट विचकट अश्लील बोलण्यात आणि छेडण्यात कसली आलीय मर्दानगी? ...
मर्द तर ते होते ज्यांनी स्वतःचे जीवन राष्ट्राचे जीवन बनवले. देशासाठी, समाजासाठी, अखंड आयुष्य वेचले. अत्यंत नितीमान जीवन जगत राजा असतांनाही राज्याचा उपभोग न घेता केवळ रयतेसाठी स्वराज्य निर्माण करणारे शिवाजीराजे मर्द होते. आपली भारतीय संस्कृती ही जगभरामधे पोहचविणारे स्वामी विवेकानंदजी मर्द होते, रोज मरणप्राय यातना सोसत औरंग्याच्या अमिषांना लाथाडुन मृत्यूवर विजय प्राप्त करणारे संभाजीराजे मर्द होते. स्वतःचे तारुण्य क्रांतिच्या लढ्यात भिरकावून देणारे, अनेक सुंदर सुंदर तरुणी मागे लागल्या असताना त्यांच्याकडे पाठ फिरवून स्वातंत्र्यासाठी तारुण्य खर्च करत हसत हसत फासावर जाणारे भगतसिंह, सुखदेव, राजगुरु मर्द होते. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून इंग्रजाना टक्कर देणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई मर्द होती. असे असंख्य मर्द या भारताच्या मातीत जन्मास आले. या तमाम मर्दांच्या कर्तृत्वाने पावन झालेली ही भुमी सध्याच्या हुल्लडबाज आणि लफडेबाज युवावर्गामुळे कलंकीत होत आहे
आपण काय आहोत? काय करतो आहोत? यावर माझ्या मित्रांनी गांभीर्याने विचार करावा. आज देशासमोर असंख्य प्रश्न आहेत यातल्या एका एका प्रश्नाला भिडुन त्यांवर आपल्या क्षेत्रात आपल्यापरीने काम केलं तर दिवंगत डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम साहेबांनी 2020 साली भारत महासत्ता होण्याचे पाहिलेले स्वप्न पुर्ण व्हायला वेळ लागणार नाही.
भारत हा देश जगामधे तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. त्या तरुणाईची आज काय अवस्था आहे हे पाहुया. आजच्या तरुणाईमधे दोन टोकाचे भिन्न प्रवाह दिसुन येतात. एका बाजूला राष्ट्रप्रेम, ज्ञानाधिष्टीत संशोधन, वाचक, विज्ञानवादी , धर्म जात पंत यामध्ये भेदभाव न मानणारी , कौशल्य, आपण समाजाचे कायतरी देणं लागतो या विचाराने आपआपल्या परीने कार्य करणारी तरुणाई एका बाजूला आहे तर दुसर्या बाजूला व्यसनाधीन,वासनांध, पाश्चात्यांच्या भोगवादी अश्लील संस्कृतीच आकर्षण, मुलींना आचकट विचकट बोलणं, गुंडगिरी अशी तरुणाई एका बाजूला उभी राहतेय. आणि यामधे दुसर्या बाजूची तरुणाई खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे हे देशाचं आणि समाजाचं मोठं दुर्दैव आहे. म्हणून यावरती मात करण्यासाठी स्वामीजींचं चरित्र समजुन घेऊन ते स्वतः आचरणात आणून ते प्रत्येक युवकापर्यंत पोहचविण्यासाठी आपणासारख्या सुशिक्षीत तरुणांनी प्रयत्न करणं ही काळाची गरज आहे. स्वामी विवेकानंदजींच्या स्वप्नातील आदर्श युवक या संकल्पनेत आपण बसतो का ? याचा आपण स्वतः मनाला प्रश्न विचारला पाहिजे. आणि जर बसत नसेल तर संकल्पनेत बसण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
युवक हा देशाचा कणा असतो जर देशाचा कणाच बरबाद झाला तर देशाचा भविष्यकाळ खूप बिकट(भयावह) आहे. जगामधे ज्या काही क्रांत्या झाल्या किंवा परिवर्तने घडून आली ती फक्त तरुणांच्या संघटीतपणामुळेच।
आधुनिक काळात बदलत्या जगाचे साक्षीदार होत असताना जातीपाती आणि द्वेषभाव विसर्जित करत, आपापल्या परीनं आपापल्या मार्गानं देशकार्य करुया।
श्री. पोपटराव यमगर
🏡आटपाडी, सांगली
📞7709935373

(मित्रांनो तुमचे याबद्दल
विचार मांडा व हे जास्तीत जास्त मित्रांपर्यँत
पोहचविण्यासाठी शेअर करा व सर्वात महत्वाचे म्हणजे
स्वतःच्या आचरणामध्ये आणा.)

शुक्रवार, २५ मार्च, २०१६

लोकशाहीचा विजय

दिल्ली विधानसभा निवडणुक निकालानंतर बिहार विधानसभा निवडणुक निकालांनी पुन्हा एकदा देशातील लोकशाही ही सदृढ आहे हे दाखवुन दिले. निकाल पाहत असतानाच माझ्या मनात आले की या विषयावर आपण काय तरी विचार मांडले पाहिजेत म्हणुनच हे प्रहार तुमच्यापर्यंत पोहचवतोय. लोकसभा निवडणुकीच्या यशाने हवेत असलेल्या भाजपने दिल्लीतील दारुण पराभवाने काही धडा घेतला नाही असे दिसते. बिहार मधील निवडणुकांमधे नरेंद्र मोदी अमित शहा आणि त्यांच्या टीमने आपली पुर्ण प्रतिष्ठा पणाला लावली होती पण नितीशकुमार आणि त्यांच्या महाआघाडीने ती स्पेशल धुळीस मिळविली. जनतेला गृहीत धरुन जे पक्ष राजकारण करतात. त्यांना जनतेने मतदानाच्या माध्यमातुन असंच प्रत्युत्तर दिलं गेलं पाहिजे असं मला वाटतं, आणि जनता ते देतेय याचा मला आनंद वाटतो. 2014 च्या निवडणुकीमध्ये
काॅग्रेसने जनतेला गृहीत धरले होते त्याचे प्रत्युत्तर जनतेने त्यांना दिले. जनता ही लोकशाही मधे श्रेष्ठ असते. याचं हे एक उत्तम उदाहरण। मी शीर्षक असं दिलं आहे की लोकशाहीचा विजय तर याचे कारण म्हणजे जनता ही स्वतःचं व्यक्तीस्वातंत्र्य वापरत असते. त्यांना योग्य अयोग्य सर्व समजत असते.
      लोकप्रतिनिधीनी असं कधीच समजु नये की मी निवडुन आलो पदाधिकारी झालो मी काहीही केले तरी चालतंय किंवा छुपे अजेंडे राबविले तरी काय फरक पडतोय पण त्यांनी हे लक्षात घ्यावं की जनता ही झोपलेली नसते ,जनता तुमची कारस्थाने उघड्या डोळ्यांनी पाहत असते, आणि त्याचं प्रत्युत्तर लोकशाहीच्या माध्यमातुन देत असते. दिल्ली बिहारसारख्या उदाहरणांनी ते अधिक अधोरेखीत
होत आहे असं म्हणावं लागेल. 2014 च्या निवडणुकीपुर्वी जी आश्वासने भाजपकडुन दिली गेली होती ती आश्वासने
पाळण्याऐवजी वादग्रस्त विधाने करणे , हिदुंनी चार मुलं जन्माला घालणं, संसदेतील निरंजन जोतीचं वक्तव्य, दलीत कुटुंबाची कुत्र्याशी तुलना, सरसंघचालकांचे आरक्षणासंदर्भातील वादग्रस्त वक्तव्य, गोमांस खाल्याच्या खोट्या अफवेतुन अखलाखची हत्या, राज्यघटनेच्या सरनाम्यातुन धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे शब्द काढणे, हिंदुत्वाचा छुपा अजेंडा पुढं करणे यासारख्या गोष्टीवरती जास्त लक्ष दिलं गेलं
आणि जनतेनं जो मोदीजींच्या वरती प्रचंड विश्वास दाखवला , भरभरुन मतदान केले ते काय या हिंदुत्वाच्या छुप्या अजेंड्यासाठी नाही तर काॅग्रेसचा 10 वर्षातील नाकर्तेपणा, प्रचंड भ्रष्टाचार , घोटाळे तसेच त्यांच्या विरोधातील सामाजिक कार्यकर्त्यांची आंदोलने यामुळे काॅग्रेस च्या विरोधात जनमाणसामधे निर्माण झालेली प्रचंड चीड ही लोकसभेला भाजपला निवडुण देण्याची महत्वाची कारणे होती. तसेच गुजरातचे विकासाचे माॅडेल पाहुन असेल किंवा एक सक्षम नेतृत्वामुळे मतदान केले. मोदीजींनी दिलेल्या आश्वासनावरती मतदान केले. पण दिलेल्या आश्वासनाकडे गांभीर्याने पाहिलंच नाही त्यापैकीच एक उदाहरण म्हणजे धनगर आरक्षण ।
         महाराष्ट्र निवडणुकीवेळी प्रचारसभामध्ये मोठमोठ्या भाषणात भाजपचे नेते सांगत होते की एका महिन्यात आरक्षण देऊ , महाराष्ट्रात
सत्ता येऊन एक वर्ष झाले तरी धनगर समाजाच्या आरक्षणाकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष तर केलेच पण भाजप मधल्या काही नेत्यांची विधाने
आरक्षणविरोधी आहेत. भाजपने आरक्षण देण्याऐवजी धनगर समाजाच्या नेत्यांना छोटी- मोठी पदं देणे चालु केले आहे, म्हणजे
मागच्या दहा वर्षामधे काॅग्रेस राष्ट्रवादीने जे केलं तेच आता भाजप करतंय. समाजाचे नेते पदासाठी लाचार झाले असतील पण समाज मात्र कधीच नाही. तुम्ही ज्यांना पदाचे गाजर दाखवलंय ते जरी पदाच्या लालसेने शांत बसले असले तरी जागरुक तरुण छावे शांत कधीच बसणार नाहीत. पदांच्या लालसेने प्रत्येक ग्रामपंचायतीपासुन महानगरपालिका, विधानसभा निवडणुकामधे समाजाचे स्वाभिमानी नेते म्हणुन जोरजोरात ओरडुन भाजपचा प्रचार करत आहेत. एका महिन्यात आरक्षण देऊ असं म्हणणार्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे दौरे आयोजित करत आहेत पण मुख्यमंत्र्यांना जाहीर भाषणात आरक्षणाबद्दल जाब विचारण्याची हिम्मत त्यांनी दाखविली नाही ही लाजीरवाणी गोष्ट आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी वाल्यानी 60 वर्षे फसविले हे 100 % खरं आहे त्यात दुमत असण्याचे नक्कीच कारण नाही पण भाजपही आता त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत असल्याचं दिसून येतंय. आघाडी सरकारने गेली 60 वर्ष फसवले म्हणुन तर तुम्हाला आम्ही सत्तेवर आणले आहे. तुम्ही सारखेच घोकणपट्टी करत आहात की त्यांनी 60 वर्षात केलं नाही मग आम्ही एका वर्षात कसं काय करायचे? तसेच न्यायालयात मराठा आरक्षणासारखे धनगर आरक्षणाचे होऊ नये त्यासाठी आम्ही अभ्यास करुन आरक्षण देऊ असं जे सध्या सत्ताधारयाकडुन बोललं जातंय ही समाजाची निव्वळ शुद्ध फसवणूक आहे याचे कारण म्हणजे मराठा आरक्षण टिकले नाही कारण मराठा समाजाला नव्याने आरक्षण चालु केले होते पण धनगर समाजाला राज्यघटनेमध्येच अनुसुचित जमाती मधे समाविष्ट केले आहे. परंतु धनगर व धनगड या र आणि ड च्या चुकीमुळे ते गेली
60 वर्ष धनगर समाजाला ते लागू झाले नाही त्यासाठी धनगर व धनगड या जाती वेगळ्या नसून त्या एकच आहेत अशी फक्त शिफारस राज्य
सरकारने केंद्र सरकारला पाठवायची आहे. त्यामुळे आम्ही मराठा समाजासारखे नव्याने आरक्षण मागत नसून जे आम्हाला पुर्वी घटनेमधे
दिलंय तेच लागु करा याची आम्ही मागणी करतोय.
           महाराष्ट्रात भाजप सत्तेवर येऊन जवळजवळ एक वर्ष होत आले तरी अजूनही सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की आम्ही अभ्यास करतोय? मग माझ्या सारख्या तरुणाला हा प्रश्न पडतो की आरक्षण या प्रश्नावर सन्माननीय देवेंद्रजी Phd करत आहेत की काय? शरद पवार साहेबांनी गेली 60 वर्ष अभ्यास केला देवेंद्रजी तुम्ही किती वर्ष समाजाचा अभ्यास करणार आहात? सन्माननीय देवेंद्रजी तुम्हाला तर फक्त केंद्राला शिफारस पत्र पाठवायचे आहे. एक वर्ष होऊन गेले तरी तुम्ही अजून त्यादृष्टीने पावलेही उचलल्याचं दिसून येत नाही. 4 जानेवारी च्या आरक्षणाच्या मेळाव्यामधे आदरणीय देवेंद्रजी तुम्ही म्हणाला होता 15 दिवसाच्या आत निर्णय घेऊ, आज एक वर्ष होत आले तरी तुम्ही अजुन निर्णय घेतला नाही तुम्हाला वाटलं असेल की समाजाला टोलवाटोलवीची उत्तरे दिली तरी चालतील पण आज धनगर समाज अशिक्षीत राहिलेला नाही, समाजातील अनेक सुशिक्षीत तरुण छावे विविध माध्यमातुन जनजागृतीचे काम करत आहेत. या जनजागृतीच्या माध्यमातुन समाज तुम्हाला टोलवायला कमी पडणार नाहीच नाही तर जसं दिल्लीत बिहारमधे लाथ मारुन ठेसललं गेलं तसंच महाराष्ट्रातही ठेसलुन काढतील. त्यामुळे विचार करुन लवकरात लवकर निर्णय घ्यावा हीच नम्रतीची विनंती ।
श्री. पोपट यमगर
बाळेवाडी ता. आटपाडी,
जि. सांगली
🌷विवेक प्रहार🌷
आज लातुरच्या मोहिनी चे पत्र वाचुन काळजात धस्स्स झाल. आज 21व्या शतकातही हुंड्यासारख्या सनातनी रुढीवरुन छत्रपतीं शिवाजी महाराज , शाहु, फुले , आंबेडकर यांच्या सुधारणावादी विचारांच्या महाराष्ट्रात हत्या आत्महत्या होत आहेत ही मनाला थक्क करणारी गोष्ट आहे. आज एकटी मोहीनीच अशी मुलगी नाहीये मित्रांनो ।।। मोहिनीसारख्या अशा हजारो मुलींचे जीवन उध्वस्थ होत आहे. आज सांगायलाही लाज वाटते की अशिक्षीत व्यक्तींच्या पेक्षा शिक्षीत आणि श्रीमंत व्यक्तीच जास्त हुंडा घेत आहेत कारण काय तर म्हणे हुंडा जास्त घेतल्याने आमच्या कुटुंबाची समाजात जास्त प्रतिष्ठा, मान सन्मान वाढतो.
जर जास्त हुंडा घेतल्याने तुमची प्रतिष्ठा वाढत असेल तर गोरगरीब सर्वसामान्य मुलींच्या (मोहिनीसारखींच्या) प्रतिष्ठेचे त्यांच्या मान सन्मानाचे काय???
त्यांचे जीवन तुम्ही परत मिळवुन देऊ शकता का???
मग तुम्ही शिक्षणातुन कोणते विचार घेतले??? अशा प्रश्नांची उत्तरे आपण आपल्या मनातुन मिळविणे खुप गरजेचे आहे.
मी यापुर्वीही बीडच्या सातभाई कुंटुबातील वडिलांने आत्महत्या केली तेव्हा सांगितले होते की जर तुमचा होणारा जावई हा हुंड्याच्या स्वरुपात भीक मागत असेल तर अशा भिकारी जावयाला कदापी तुमची मुलगी देऊ नका।(फक्त गोरगरीब आणि सर्वसामान्य पालकासाठी) आज समाजात मुलींचे प्रमाण खुप कमी आहे मुलगी अविवाहीत राहील याची कोणतीही काळजी करु नका।।
माझ्या सर्व तरुण सुशिक्षीत सुसंस्कृत अविवाहीत मित्रांना आणि मैत्रीणीना नम्रतीची विनंती आहे की आपण सर्वानी अशी शप्पथ घेतली पाहिजे की मी हुंडा घेणार नाही आणि कोणाला देणारही नाही, तरच येणार्या काळात बदल घडुन येईल.
आज मी परमेश्वराला साक्षी मानून वचन देतो की,
मी माझे लग्न जमवताना हुंडा मागणार नाही .
उलट त्या मुलीच्या आई वडिलांना वचन देणार की
तुमच्या काळजाच्या तुकड्याला मी प्राणपनाने जपेल.
मित्रानो फ़क्त हळहळ करू नका...
परिवर्तन करा ...सुरवात अत्ता लगेच स्वतःपासुन करुया
मी तर केलीच आहे.
जे मेले तरी आपली वचन पाळतात त्यांनी आज
वचन दया ग्रुप वर
दयाल ना वचन...?
(माझ्या साठी नव्हे..तुमचे मन सांगत आसेल तर दया...)
श्री. पोपटराव यमगर
रा.-: बाळेवाडी ता.-: आटपाडी जि.-: सांगली
7709935374
🌷विवेक प्रहार🌷
आरपार प्रामाणिकता अन निरागसता …
महात्मा गांधींवर सगळ्यात जास्त विनोद आपल्या देशात होतात . मजबुरी का नाम महात्मा गांधी हा त्यातला लोकप्रिय विनोद . वास्तविक गांधींचे जीवन पहिले तर या माणसाला कोणतीच मजबुरी नव्हती पण तरीही मजबुरीचे नाव आपल्या देशात गांधी ठेवले जाते . या देशातले आंबेडकरवादी [कट्टर ] गांधींना आपला शत्रू मानतात बामसेफ , मूलनिवासी संघ वगैरे गांधी कसे खलनायक होते याचीच मांडणी करीत आले आहेत . गांधी हा असा माणूस आहे जो एकाच वेळी पुरोगामी अन प्रतिगामी यांचा शत्रू ठरला आहे .
लोक… नेते … वाटेल तेव्हा गांधीला वापरतात अन वाटेल तेव्हा फेकून देतात पण गांधीवर त्याचा तसूभरही परिणाम होत नाही . कधी पाकिस्तान निर्मिती तर कधी ५५ कोटीचे आरोप तर कधी मुस्लिम अनुनयाचे बालंट सहन करीत गांधी या आरोपांचे प्राणवायू मध्ये रुपांतर करून अमरत्वाकडे सरकत आहे . कोणे एकेकाळी अस्थिपंजर म्हाताऱ्याला नथुराम गोडसे नावाच्या तरुणाने मारले पण त्यानंतर सतत गांधीला मारण्यासाठी जोतो टपलेला असतो तरीही गांधी मरत नाही . गांधी मरत का नाही ? या प्रश्नाने आपल्या देशात काही जणांना वेड लागण्याची पाळी आली आहे तर काही लोक ठार वेडे झालेले आहेत . गांधी या सगळ्यांकडे पाहून निष्पाप बालकाचे निरागस हास्य फेकतो .
गांधींवर खूप आरोप झाले पण त्याने कशाचीही तमा न बाळगता आपले सत्याचे प्रयोग अव्याहत सुरु ठेवले . जीवनात जे जे केले ते मोठ्या मानाने काबुल पण करून टाकले . हो हो … व्यसने … सेक्स … सगळे काही . या आरपार प्रामाणिक पणाला अन निरागसतेला सलाम .
श्री. पोपट यमगर
आटपाडी जि. : सांगली
7709935374