विवेक विचार

विवेक विचार

गुरुवार, २६ मे, २०१६

                           केंद्रामधील   NDA (भाजपच्या) सरकारला आज दोन वर्षे पूर्ण  होत आहेत.  सकाळी वर्तमानपत्र उघडल्या उघडल्या केंद्र सरकारच्या मागील दोन वर्षामध्ये केलेल्या कामाच्या जाहिराती(अर्थात मोदिजींच्या खूप मोठ्या छबीसह… माझा देश  बदलतो आहे.... पुढे  जातो आहे  ) पहिल्या पानावरतीच आलेल्या पाहिल्या. त्या  पाहत असतानाच थोडेसे पाठीमागील दोन वर्षाच्या काळात डोकाऊन पाहिले…२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मतदारांनी  भाजपला मोठ्या अपेक्षेने दिल्लीच्या सत्तेच्या सिंहासनावर बसवले होते. मागील  10 वर्षातील काॅग्रेसचा नाकर्तेपणा, प्रचंड भ्रष्टाचार , घोटाळे तसेच त्यांच्या विरोधातील सामाजिक कार्यकर्त्यांची आंदोलने यामुळे काॅग्रेस च्या विरोधात जनमाणसामधे निर्माण झालेली प्रचंड चीड ही लोकसभेला भाजपला निवडुन देण्याची महत्वाची कारणे होती. तसेच गुजरातचे विकासाचे माॅडेल पाहुन असेल किवा नरेंद्र मोदीजी यांच्या  सक्षम नेतृत्वाकडे पाहून जनतेने भाजपला मतदान केले होते. समाजातील सर्व घटकांच्या ज्या काही अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या आहेत असे सध्या तरी म्हणता येणार नाही. अर्थात सर्वच अपेक्षा दोन वर्षाच्या काळात कोणतच सरकार पूर्ण करू शकणार नाही हे हेही त्रिवार सत्य आहे. सकारात्मक  दुर्ष्टीकोनातून पहिले तर त्या अपेक्षा काही प्रमाणात तरी सरकारने पूर्ण केल्याही आहेत असं म्हणायला काही हरकत नसावी असे मला वाटते. 
                         पंतप्रधान नरेंद्र मोदिजी यांच्या नेत्तृत्वाखाली केंद्र सरकारने अनेक महत्वाच्या योजना जाहीर केल्या आहेत. या योजनामध्ये उद्योग आणि औद्योगिक क्षेत्रातील गुंतवणूकवाढीसाठी 'मेक इन इंडिया', 'स्टार्ट अप इंडिया, स्टन्ड अप इंडिया' 'डिजीटल इंडिया' , तरुणांमध्ये कौशल्य निर्मितीसाठी 'स्कील इंडिया', शहरांच्या नवनिर्माणासाठी 'स्मार्ट  सिटी, स्वच्छतेसाठी 'स्वच्छ भारत', शेतकर्यासाठी 'प्रधानमंत्री जन धन योजना' मुलीसाठी 'बेटी बचावो बेटी पढाओ' आणि  'सुकन्या समृद्धी योजना' गरिबांसाठी 'अटल पेन्शन योजना','प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना'  यासह सर्व क्षेत्रातील अनेक योजनांचा समावेश होतो. या योजना फक्त कागदावर न राहता प्रत्यक्षात त्याचा लाभ लाभार्थ्यापर्यंत पोहचला पाहिजे. आपल्याकडे अनेक योजना खूप चांगल्या असतात पण त्या योग्य अंमलबजावणी अभावी तशाच पडून राहतात किवा त्याची माहिती सर्वसामान्य गोरगरीब लाभार्थ्यापर्यंत पोहचत नाही. सरकार ज्या योजना आखतम त्यातील बर्याच योजना ज्यांच्या साठी आखत असते  त्यांनाच त्या योजनाची माहिती मिळत नाही हि वस्तू स्थिती आहे. अर्थात अलीकडील काळामध्ये माध्यमातील वाढत्या जाहिरातीमधून हि माहिती गावातील घराघरामध्ये पोहचते हि एक सकारात्मक बाब आहे.
                        देशाचा आर्थिक विकासाचा दर GDP  ७.५% आहे. म्हणजेच जगातील अर्थव्यवस्थेचा विचार करता भारताची  अर्थव्यवस्था  वेगाने बदलत पुढे  जात आहे.  गेल्या दोन वर्षातील मोदिजींच्या परराष्ट्रीय धोरणामुळे नक्कीच भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमा चांगली होत असल्याचे आपल्याला दिसून येईल…
                         भारतातील सर्व काही समस्या संपल्या असेही म्हणता येणार नाही. समस्या अडचणी ह्या आहेतच. देशासमोर दुष्काळ, दहशतवाद, भ्रष्टाचार, अत्याचार, बेरोजगारी, वाढती लोकसंख्या, दारिद्र्य, जातीयवाद यासारख्या समस्या आ वासून उभ्या आहेत.  यावरती सकारात्मक तोडगा काढण्याचे काम केंद्रात बसलेले सरकार करत आहे. 

✍✍✍✍✍✍पोपट यमगर

बुधवार, २५ मे, २०१६

वरील गुरुदेव टागोर यांच्या एका अप्रतिम कवितेचा पु.ल. नी मराठीत भाषांतर केलेला सारांश....................

      एकदा सुर्यास्ताच्या वेळेला सुर्याने सर्व दिव्यांची सभा बोलावली, आणि विचारले की, "मी तर अस्ताला चाललो, उद्या उगवून येईपर्यंत जगाला प्रकाश देण्याचे काम कोण करेल??" सगळ्या दिव्यांची छाती दडपली, हा साक्षात सुर्यनारायण त्याची एवढी ताकद आणि हा म्हणतो माझ्या अनुपस्थितीमधे जगाला प्रकाश देण्याचे काम कोण करेल?? सगळे गप्प बसले. एक छोटी टिमटिमती पणती होती. ती घाबरत घाबरत पुढे सरकली. सुर्याला वंदन करुन म्हणाली, "सुर्यनारायणा जगाला प्रकाश देण्याचे मला माहित नाही, माझ्यापरीने जळत राहण्याचं काम मी करीन." यावर सुर्य म्हणाला,"अस्ताला जायला मी मोकळा झालो."
        वरील गुरुदेव टागोर यांच्या एका अप्रतिम कवितेचा पु.ल. नी मराठीत भाषांतर केलेला सारांश… या कवितेच्या सारांशमधुन जितके आपण चिंतन करू तितकं कमी आहे, उलट यामधून मिळणारा अर्थ उत्रोत्तर वाढतच जाईल यामध्ये माझ्या मनामध्ये तरी कोणतीच शंका नाही. आपण दररोज एकतो, पाहतो, वाचतो कि सध्याच्या वर्तमान युगामध्ये सगळीकडे अंधाधुंदी चालू आहे. माझे जवळचे अनेक मित्र मी लिहित असलेल्या छोट्या छोट्या लेखावर प्रतिक्रिया देताना म्हणतात कि तुझ्या या लेखनामुळे समाजावर काय फरक पडणार आहे. यामुळे माझ्या मनामध्येही नकारात्मक विचार येतात पण वरील सरांशमधील पणतीने दिलेल्या उत्तरातून खूप काही शिकण्यासारखे आहे असे मला वाटते. आम्ही म्हणतो हे सर्व बदलेल केव्हा???? तेव्हा सगळे बदलेल केव्हा हे मला माहित नाही, माझ्या परीने त्या छोट्यास्या पणतीप्रमाणे जळत राहण्याचे कार्य मी करेन असं जेव्हा आपण म्हणायला लागू तेव्हा नक्कीच परिवर्तन झाल्याचे आपल्याला पाहायला मिळेल…
धन्यवाद……

(✍✍✍✍✍✍ मनाच्या गाभार्यातून .................. )

मंगळवार, १७ मे, २०१६

✍✍✍✍सर्वोच्च न्यायालयाच्या MBBS, BDS पुढील वर्षाच्या नीट परीक्षेच्या सक्तीवरून चाललेल्या वादासंदर्भात माझं ही मत ✍✍✍✍✍✍

            सर्वोच्च न्यायालयाच्या MBBS, BDS पुढील वर्षाच्या प्रवेषासाठी  नीट परीक्षेच्या सक्तीवरून महाराष्ट्रातील शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या  नीट परीक्षेच्या सक्तीविरोधात जवळ जवळ सगळेच राज्यकर्ते  विद्यार्थ्याच्या हितासाठी (???????) मैदानात उतरले आहेत. लोकसत्ताच्या १५ मे च्या वर्तमान पत्रामध्ये लोकसत्ताच्या जेष्ठ पत्रकार रेश्मा शिवडेकर यांची 'नीट मुळे शिक्षण सम्राटांचे अर्थकारण कोलमडले'  हि बातमी वाचल्यानंतर आपल्या राज्यकर्त्यांना विद्यार्थ्यांचे नेमके कोणते  हित जोपासायचे आहे हे  लक्षात येईल. MBBS, BDS पुढील वर्षाच्या प्रवेषासाठी काही आर्थिक संपन्न असलेल्या विद्यार्थ्यांनी काही शिक्षण सम्राटांच्याकडे आर्थिक लॉबिंग कसे लावले आहे हे हि या बातमीत चांगल्या पद्धतीने स्पष्ट केले आहे.   आज  शिक्षणासारख्या ज्ञान देणाऱ्या पवित्र क्षेत्रात  लाखो रुपये घेऊन जशा बाजारात वस्तू विकल्या जातात तशा  विद्यापीठात, महाविद्यालयामध्ये पदव्या विकल्या जात आहेत. त्यामुळे प्रामाणिक असणारे गरीब विद्यार्थी हुशार असुनही त्यांना योग्य संधी किंवा योग्य स्थान मिळत नाही. MBBS, BDS हे वैद्यकीय कोर्स झाल्यानंतर होणारा डॉक्टर हा तज्ञच असला पाहिजे तसेच हुशार असूनही येथील शिक्षणव्यवस्थेतील शिक्षणसम्राटांच्या वर्चस्वामुळे गोरगरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेऊ शकत नाहीत. आम्ही तज्ञ आणि गुणवंत डॉक्टर घडविण्याऐवजी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी घातलेले पैसे पुन्हा उकळणारे डॉक्टरच तयार करत आहोत कि काय?? असा प्रश्न माझ्या विचारी मनाला पडल्याशिवाय राहत नाही.
          केंद्रीय पातळीवर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी नीट हि परीक्षा घेतली जात होती.  पण गेली काही दिवस  सध्या ती परीक्षा बंद होती पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे पुन्हा त्या चालू होणार आहेत. नीटसाठी ११ वी आणि बारावी NCERT   अभ्यासक्रमावर आधारित हि परीक्षा घेतली जाते. महाराष्ट्रातील CET हि परीक्षा राज्य शिक्षण मंडळाच्या १२ वी च्या अभ्यासक्रमावर आधारित घेतली जाते.  सध्या नीट या परीक्षेसाठी अभ्यास साहित्य उपलब्ध नाही हि वास्तविक परिस्थिती आहे. ते अभ्यास साहित्य उपलब्ध करून देण्याएवजी आपले महाराष्ट्र सरकार  नीट परीक्षा सक्ती रद्द करण्यासाठी केंद्राच्या मदतीने अध्यादेश आणण्याच्या तयारीत आहे. कदाचित तो अध्यादेश येण्याची दाट शक्यता मला वाटते आहे.  तो अध्यादेश येउन नीट परीक्षा बंद होतात कि नाही ??? विद्यार्थ्यांचे ( शिक्षण सम्राटांचे) हीत जोपासले जाते कि नाही???? हे पाहणे आपणासाठी ओत्सुक्याचे ठरेल.

✍✍✍✍पोपट यमगर
आटपाडी, सांगली
popatgyamgar.blogspot.com

गुरुवार, १२ मे, २०१६

जागतिक परिचारिका दिनानिमित्त

आज जागतिक परिचारिका दिन आहे. रूग्णांवर मायेची फुंकर घालून त्यांची अहोरात्र सेवा करणाऱ्या परिचारिकांचं जीवन कष्टमय, दु:खप्रद आहे. पण अशातही स्वत:च्या आयुष्यातला काळोख विसरून रूग्णाच्या जीवनात आनंदाचा दिवा प्रज्वलित करण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. दरवर्षी 6 ते 12 मे हा आठवडा संपूर्ण जगभरात आतंरराष्ट्रीय नर्सेस आठवडा म्हणून साजरा केला जातो. रूग्णाची सेवा कोण करतं ? असा प्रश्न विचारल्यानंतर आपल्या मनात डॉक्टरआधी नाव येतं ते म्हणजे परिचारिकेचं. रूग्णाच्या वेदनेवर फुंकर घालण्याचं काम या परिचारिकां करीत असतात. त्यांना तमा नसते वेळेची, त्यांना पर्वा नसते स्वताच्या सुखदुःखाची. वैयक्तिक हालअपेष्टांकडे दुर्लक्ष करत अहोरात्र त्या रूग्णसेवेत गुंतलेल्या असतात. या रूग्णसेवेला खऱ्या अर्थानं सुरूवात केली ती फ्लॉरेन्स नाईटिंगेल या परिचारिकेनं. 12 मे 1820 ला फ्लॉरेन्स यांचा जन्म झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी फ्लॉरेन्स यांनी जखमी सैनिकांची सेवा केली. आणि संपूर्ण जगाला त्यांनी रूग्णसेवेचा पायंडा घालून दिला. दिवा घेतलेली स्त्री' असंही फ्लॉरेन्स यांच्याबाबतीत म्हटंलं जातं. भारतामध्ये  ४२ वर्ष मृत्यूशी झुंझ देत गेल्या १८ मे ला निधन पावलेली परिचारिका अरुणा शानबाग हिची  जागतिक परिचारिका दिनानिमित्त नक्कीच आठवण आल्याशिवाय राहत नाही. दवाखान्यात परिचारिकाना अनेक वेळा असुरक्षिततेला सामोरे जावे लागते.   ग्रामीण भागात या परिचारिका लसीकरण, प्रसुती, कुटुंबकल्याण यासारखी कामं पार पाडताना दिसुन येतात. एखाद्या व्रतस्थाप्रमाणे परिचारिका आपली भूमिका बजावत आहेत. स्वत:चं दु:ख विसरून रूग्णांच्या वेदनेवर मायेची फुंकर घालणाऱ्या या परिचारिका भगिनींना मनापासुन सलाम।।

✍✍✍✍ पोपट यमगर

मंगळवार, १० मे, २०१६

✍ विवेक प्रहार ✍

आज कर्मवीर भाऊराव पाटील(आण्णा) यांचा स्मृतीदिन।।त्यानिमीत्त प्रथमतः त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन।।
           माझं जवळ जवळ अर्ध शिक्षण आण्णांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेत झालं यांचा मला आनंद वाटतो.  कारण शिक्षण घेत असताना रयत शिक्षण संस्था कधीच परकीय संस्था वाटली नाही. संस्थेत शिक्षण घेत असताना आपुलकी प्रेमच मिळाले संस्थेत शिक्षण घेत असताना आण्णां सारख्या महापुरुषांच्या  आदर्श चारित्र्याचे धडे मिळत गेले आणि त्यातुनच माझं हे व्यक्तीगत चारित्र्य घडत गेले. आजच्या काळात शैक्षणिक क्षेत्राचं अनेक मोठ्या राजकीय नेत्यांनी बाजारीकरण करुन टाकलं आहे. पैसे घेऊन जशा बाजारात वस्तु मिळतात तशा अनेक खाजगी विद्यापीठ संस्थामधुन पदव्या मिळत आहेत. आज छोट्या मुलांच्या केजी ला प्रवेश घ्यायला 50000 फी मागितली जाते. या आर्थिक कारणासाठी अनेक गोरगरीब पालकांना आपल्या मुलास दर्जेदार शिक्षणापासुन वंचित ठेवावं लागतं ही मनाला बोचणारी खंत आहे. पण मी ठामपणे सांगु शकतो की माझं संस्थेतील शिक्षण हे खुप कमी खर्चात झालं आहे .
आणांनी रयत शिक्षण संस्था चालु करण्यामागचं खरं उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण भागातील गोरगरीब बहुजन समाजातील मुला मुलींना शिक्षण घेता यावं हे होतं. स्वतः आण्णा फक्त सहावी शिकले आहेत पण त्यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेतुन लाखो कोट्यावधी मुलांनी पदव्युत्तर पदव्या घेतल्या आहेत.
        आण्णानी  4 ऑक्टोंबर 1919 रोजी कार्ले या गावी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यांनी 1919 ला रयत शिक्षण संस्थेच्या नावाने लावलेला वेल आज गगणाला गवसणी घालताना आपल्याला दिसुन येतोय.  संस्थेच्या नावाप्रमाणेच ही रयतेची म्हणजेच गोरगरीब, दलीत, सर्वसामान्य, वंचीत, शेतकरी, कामगार यांची संस्था आहे असं आण्णानी अनेक वेळा बोलुनही दाखवले आहे.  अनेक विद्यार्थ्यांना घरच्या आर्थिक परिस्थीतीमुळे शिक्षण घेता येत नाही अशा शिकण्याची इच्छा असणारया गरजु विद्यार्थ्यासाठी आण्णानी कमवा आणि शिका ही योजना संस्थेत चालु केली. संस्थेतील अनेक शाखामधे  बाहेरगावच्या वंचित विद्यार्थ्यासाठी वसतिगृहे चालु केली.  स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीदवाक्य असं सांगतांना आण्णांनी संस्थेचं चिन्हसुद्धा वटवृक्ष ठेवलं आहे याचं कारण म्हणजे वटवृक्षाप्रमाणे संस्थेच्या शाखाचा विस्तार होत जावो हीच त्यांची मनोमनी इच्छा होती.
      महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाणसाहेब यांनी कर्मवीर आण्णांच्या विषयी  पुढील गौरवोदगार काढले आहेत, "कर्मवीर ही व्यक्ती नव्हती ती एक संस्था होती, बहुजन समाजात ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले व महाराष्ट्रात नवयुग निर्माण केले. त्यांची रयत शिक्षण संस्था म्हणजे महाराष्ट्रात नवजीवन ओतणारी गंगा आहे." सार्वजनिक शिक्षणाबाबत आज सरकारी पातळीवर निर्णय झालेले आहेत. पण एक काळ असा होता की त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अशा काळात मागासवर्गीय बहुजन   गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे दूर केले. कष्टकरी विद्यार्थ्यांना रात्रशाळांचा पर्याय उपलब्ध केला. खेड्यातील मुलांना दैनंदिन सुविधा मिळाल्या तर त्यांना शिक्षण घेता येईल या विचारातून त्यांनी मोफत वसतीगृहे चालवली. ‘रयत शिक्षण संस्थे’च्या रूपाने त्यांनी उभे केलेले कार्य सर्वांना परिचित आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबी शिक्षण, श्रमप्रतिष्ठा आणि स्वातंत्र्याची मूल्ये रुजवली. त्यांच्या स्मृतिदिनी त्यांचा आदर्श न विसरण्याची शपथ आपण घेतली पाहिजे. पुन्हा एकदा आण्णाच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन।।
धन्यवाद।

  श्री. पोपटराव यमगर
  बाळेवाडी ता. आटपाडी,
  जि. सांगली
 7709935374

✍✍विवेक प्रहार✍✍

✍✍विवेक प्रहार✍✍

आजचा लोकसत्ताचा अग्रलेख विचार करण्यास प्रवृत्त करणारा अग्रलेख आहे. महाराष्ट्रात सध्या 18 वर्षाखालील मुलींचे लग्न लावून देण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी मुलगी 14, 15 वर्षाची झाली की तिचे  पालक लग्न लावुन देतात. लग्न लावुन दिल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया ही फार बोलकी असते ती म्हणजे झालो एकदाशी या कटकटीतुन मोकळा???? म्हणजे मुलगी म्हणजे कटकट,, मुलगी म्हणजे डोक्यावरील कर्जाचं ओझं ही समाजाची धारणा झाली आहे.  परवाच मातृदीन साजरा झाला. अल्पवयीन वयात लग्न झाल्यामुळे लवकरच मातृत्व येते त्यामुळे ज्या वयात स्वतःचे बालपण खेळण्या बागडण्यात घालवायचे असते त्याच वयात स्वतःच्या मुलांची जबाबदारी खांद्यावर येऊन पडते. हे चित्तथरारक दृश्य असल्याचं आपणास दिसुन येईल. लवकर लग्न झाल्यामुळे  स्त्रीला डीलीव्हरी होताना होणारा त्रास आणि त्यामुळे अनेक भगिनींचे होणारे मृत्यु याचंही प्रमाण जास्त होत असल्याचं आपल्याला दिसुन येत आहे. लवकर लग्न करण्यामागची कारणंही लोकसत्तानं चांगल्या पद्धतीने स्पष्ट केली आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे मुलीबद्दलची असुरक्षिततेची भावना।। आज आम्हो कितीही महासत्तेच्या गप्पा मारत असलो तरी तुमच्या माझ्या भगिनीच्या मनात सुरक्षिततेची भावना उतरवण्यास आपण कुठेतरी नक्कीच कमी पडतोय असं मला ठामपणे वाटतं. ती सुरक्षिततेची भावना आपण आपल्या भगिनींच्या मनात जेव्हा उतरवु तो नक्कीच सुदीन असेल असं मी समजतो.

धन्यवाद
(जागृत विचारातुन✍✍✍)
श्री. पोपटराव यमगर

गुरुवार, १४ एप्रिल, २०१६

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर : मानवतेचा, समतेचा, स्वातंत्र्याचा, विश्वबंधुत्वाच्या विचारांचा अखंड वाहणारा प्रवाह............

           अद्वितीय बुद्धिमत्ता, त्या आधारे स्वत: घेतलेले अतिउच्च दर्जाचे शिक्षण, जागतिक दर्जाची विद्वत्ता, बंडखोरी व क्रांतिकार्य करण्याची प्रवृत्ती, संघटन कौशल्य, शिस्तबद्धता व वक्तशीरपणा, असामान्य वक्तृत्व, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, प्रचंड वाचन, संशोधनात्मक अभ्यास, अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी लेखन... अशा अनेक गुणविशेषांनी गौरविलेले व्यक्तीमत्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अर्थतज्ञ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस 125 व्या जयंतीनिमीत्त प्रथमतः विनम्र अभिवादन।

          आज भारतासह पुर्ण जगभर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे. नक्कीच मनामधे आनंद आहे. सर्वानी बाबासाहेबांचे विचार त्यांचे चरित्र , त्यांचा संघर्ष जाणुन घेतला पाहीजे. लेखाचं शिर्षक देतानाच माझ्या मनात विचार आला की काय द्यावं शिर्षक??? पटकन अनेक विचार मनात आले ते म्हणजे तुम्हा आम्हाला बोलण्याचं लिहीण्याचं स्वातंत्र्य दिलं, तुमच्या माझ्या मनात वर्षानुवर्षे भिनलेल्या जातीव्यवस्था धर्मव्यवस्था(खरंतर हा मानवतेवर लागलेला कलंक आहे) यापलीकडे जाऊन आपण सर्व या विश्वाची लेकरे आहोत, असा विश्वबंधुत्वाचा, समतेचा, एकतेचा, विचार भारतीय मनामनात पेरणारे डाॅ बाबासाहेब आंबेडकर हे अखंड वाहणार्या माणुसकीच्या प्रेमाचा झरा आहेत असं मला वाटतं. म्हणुनच विचारी मनाला या अर्थबोधातुन वरील शिर्षक सुचलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समता, बंधुता, लोकशाही, स्वातंत्र्य, जागतिक अर्थकारण व राजकारण यांविषयी मांडलेले विचार आजही समर्पक ठरतात. त्यांचे कार्य आजही तेवढेच परिणामकारक व स्फूर्तिदायी ठरते. भारतात असलेल्या जातीव्यवस्थेच्या वर्णवर्चस्वाच्या होणार्या अन्याय अत्याचारातुन आपल्या देशाला व समाजबांधवांना या सामाजिक विषमतेच्या विळख्यातून बाहेर काढायचे त्यांनी ठरवले. प्राथमिक शिक्षण संपवुन परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी गेले. त्यांना कोलंबिया विद्यापीठाने पीएच.डी. ची पदवी बहाल केली. १९२५ मध्ये त्यांनी मिळवलेल्या या डॉक्टरेटचा विषय होता, ‘नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया - ए हिस्टॉरिकल अँड अनॅलिटिकल स्टडी'. कोलंबिया विद्यापीठात त्यांनी समाजशास्त्र, राज्यशास्त्र व अर्थशास्त्र या विषयांचे अध्ययन केले. पुढे त्यांनी लंडन येथील विद्यापीठात ‘दी प्रॉब्लेम ऑफ रूपी’ हा प्रबंध सादर केला आणि डी. एस्सी. ही पदवी मिळवली. 
        भारतात आल्यावर सामाजिक विषमता दूर करण्याच्या हेतूने, अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजाची कैफियत समाजासमोर मांडण्यासाठी, त्यांनी ‘मूकनायक (१९२०), ‘बहिष्कृत भारत’ (१९२७), ‘जनता’ (१९३०) आणि ‘प्रबुध्द भारत’ (१९५६) अशी वृत्तपत्रे चालवली. या काळात जी काही वृत्तपत्रे महाराष्ट्रात होती, त्यातून अस्पृश्यांचे प्रश्न मांडले जात नव्हते. त्यामुळे (तत्कालीन) अस्पृश्यांसाठी स्वतंत्र वृत्तपत्रांची गरज होतीच. सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय घडामोडी तसेच नवीन समाजाची निर्मिती या अनुषगांने त्यांनी त्यातून लिखाण केले. वृत्तपत्रांचा वापर त्यांनी कधीच केवळ आपल्या पक्षाची राजकीय ध्येयधोरणे राबविण्यासाठी केला नाही. आजच्या वृत्तपत्रांनी माध्यमांनी बाजारीकरणाचे रुप घेतले आहे. स्पृश्य आणि तथाकथित अस्पृश्य अशा दोन्ही समाजांच्या लोकांना विचार करण्यास प्रवृत्त करणे हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्टय होय. केवळ वृत्तपत्रांमधूनच नाही तर त्यांनी ‘दी अनटचेबल्स,’ ‘शूद्र पूर्वीचे कोण होते?’, ‘बुध्दा अँड हिज धम्म,’ असे ग्रंथ लिहिले. याशिवाय ‘थॉटस् ऑन पाकिस्तान’ हा जागतिक राजकारणावरील ग्रंथदेखील लिहिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ जातिव्यवस्थेच्या विरोधातच लढत होते असे नव्हे, किंवा ते केवळ विशिष्ट एका समाजाच्या विकासाचाच केवळ विचार करत होते असेही नव्हे. त्यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्याचेही भान होते. शिक्षण, अंधश्रद्धा, स्त्रियांची स्थिती, अर्थकारण, राजकीय किंवा प्रशासकीय व्यवस्था या मुद्यांकडेही त्यांनी भारताचे लक्ष वेधुन घेतले होते. 
       शाळेत असताना  १८- १८ तास अभ्यास करणारे डॉ. बाबासाहेब  आंबेडकर शिक्षणाचे महत्त्व चांगल्या प्रकारे ओळखून होते. 'शिक्षण हे वाघिणीचं दुध आहे जो कोणी ते पील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही' असं त्यांचं स्पष्ट मत होतं. "फक्त वही पेन म्हणजे शिक्षण नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे, शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण होय. जसे जेवल्यावर होणारे समाधान हे तात्पुरते असते, याउलट शिक्षणातुन मिळणारी ज्ञानाची शिदोरी आयुष्यभर पुरते. पोटाची भूक भागवावीच पण एक पाऊल पुढे टाकुन शिक्षण घेऊन माणसाने बुद्धीची भुकही भागवावी" असं त्यांनी अनेक भाषणातुन सांगितलं आहे. शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी त्यांनी मुंबई येथे १९४६ मध्ये सिध्दार्थ महाविद्यालयाची, तर औरंगाबाद येथे १९५० मध्ये मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. याशिवाय त्यांनी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ आणि ‘डिप्रेस्ड क्लास एज्युकेशन सोसायटी’ या शैक्षणिक संस्थांची देखील स्थापना केली. स्वतंत्र भारताचे लोकप्रतिनिधी, मंत्री कसे असावेत याचंही उत्तम उदाहरण त्यांनी कायदामंत्री असताना स्वतः घालुन दिलं आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर ६ डिसेंबर, १९५६ ला हे जग सोडून गेले. आज भारतीय लोकशाहीच्या कसोटीचा काळ सुरू आहे. स्वतंत्र भारतातील लोकशाहीविषयी चिंतन करतांना डॉ. आंबेडकर म्हणतात की, "जोपर्यंत इंग्रज सरकार होते, तोपर्यंत आपल्या देशातील चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपण त्यांच्यावरच टाकत होतो. पण आता आपण स्वतंत्र झाल्यामुळे चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपलीच राहणार आहे. त्यामुळे आपल्याला आता अधिक जबाबदारीने वागावे लागणार आहे."          मला लिहीताना, बोलताना, समाजात वावरताना, जगताना धुमसणार्या डोक्यात सतत बाबासाहेबांचे विचार आठवत राहतात. त्यांनीच आमच्यासारख्या वंचित समाज घटकातील मुलांना सांगितलं की अन्याय, अत्याचार सहन करु नका, अन्यायाची चीड व न्यायाची चाड ठेऊन शिक्षणाच्या माध्यमातुन प्रगतीकडे वाटचाल करा. आताच्या लोकशाहीसंपन्न असलेल्या देशात घडणार्या अन्याय, अत्याचार, अंधश्रद्धा, पारंपारीक रुढी, भ्रष्टाचार, घोटाळे, कट्टरतावाद यासारख्या घटनावर प्रहार करण्यासाठी आमच्यासारख्या नवतरुणांच्या हाती दिलेलं लेखणी हे शस्त्र नक्कीच वेळोवेळी मानवतेसाठी, अहिंसेसाठी, समतेसाठी, एकतेसाठी, बंधुत्वासाठी नक्कीच उचलेन असा ठाम विश्वास माझ्या मनामधे आहे.
        "मोजु तरी कशी उंची तुझ्या कर्तुत्वाची,
         तु जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची..
         तु देव नव्हतास तु देवदुतही नव्हतास... 
         तु मानवतेची पुजा करणारा खरा महामानव होतास...
         घायाळ पाखरांना पंख दिले तू!
         मुक्या वेदनांना शब्द दिले तू! 
         तुझ्याच चेतनेने जगण्यास अर्थ आला...
         युगा युगाच्या शोषितांचा उद्धार तूच केला!"
हे महामानवा पुन्हा एकदा तुज कोटी कोटी वंदन।।।
💐💐💐💐💐
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री. पोपटराव यमगर
🏡बाळेवाडी ता.- आटपाडी,
जि.- सांगली📞07709935374