विवेक विचार

विवेक विचार

गुरुवार, ९ जून, २०१६

                                      महाराष्ट्रात येणाऱ्या चार ते पाच दिवसात मान्सून पाऊस  येउन धडकेल असा  भारतीय हवामान शास्त्र विभाग(IMD) आणि स्कायमेट या प्रसिद्ध हवामान संस्थाचा अंदाज आहे. गेल्या दोन वर्षापेक्षा यावर्षी जास्त पाऊस पडण्याचा अंदाज या दोन्हीही नामवंत संस्थांनी व्यक्त केला आहे. हि नक्कीच सर्व शेतकऱ्यांच्या साठी तसेच शेतीमालावर आधारित असलेल्या सर्व उद्योगासाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या दोन वर्षापासून प्रशांत महासागरात एल निनो च्या प्रवाहामुळे महाराष्ट्रासह देश मोठ्या दुष्काळाला सामोरे जातो आहे. अर्थात  एल निनो च्या प्रवाह कमी झाल्यामुळे नक्कीच यावर्षी चांगला पाऊस पडण्याची आशा निर्माण झाली आहे. जास्त पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करून हि आमच्या सरकारी व्यवस्थापन यंत्रणेने आपत्तीपूर्व नियोजन केल्याचे पहावयास मिळत नाही. म्हणजेच एखादी घटना घडल्यानंतर आपली व्यवस्था धावाधाव सुरु करते असा आजपर्यंतच्या अनेक उदाहरणामधून आपणास दिसून येते. येणाऱ्या काळात अश्या घटना घडूच नयेत आणि समजा घडलीच तर  त्या आपत्ती साठी आपली आपत्तीपूर्व यंत्रणा सक्षम आणि तत्पर असली पाहिजे. दुष्काळासारख्या समस्येवर  हि दरवर्षी तात्पुरत्या स्वरुपाची उपाययोजना आपले सरकार करत आहे. दीर्घकालीन दृष्टीकोन मनात ठेऊन दुष्काळासारख्या समस्येवर सरकार उपाययोजना करत असल्याचे मला तरी दिसून येत नाही. (अर्थात पुढील निवडणुकां कोणत्या प्रश्नावर लढवायच्या???? हाही प्रश्न राज्यकर्त्यांना महत्वाचा वाटतो.)
                                        महारष्ट्रातील मराठवाड्यासह, पश्चिम महारष्ट्रातील माणदेशात (सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यातील  काही तालुके) पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागली आहे. पिण्यासाठीच पाणी नसेल तर मग शेती, उद्योगधंदे यासाठी तर पाणी मिळणेच मुश्किल अशी वास्तविक  परिस्थिती अनेक गावामध्ये होती.    भारतीय हवामान शास्त्र विभाग (IMD)  आणि स्कायमेट या प्रसिद्ध हवामान संस्थाचा अंदाजामुळे सकारात्मक दृष्टीकोनातून आपल्या शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.
      ‘ठायीठायी थेंब सांडले आमच्या घामाचे, कधी न कोणी मोल मोजले आमच्या घामाचे, सुपीक सारे शेतशिवारी आम्हीच करणारे, कष्टाने कोठार धान्याचे आम्हीच भरणारे.' या आशेने जगाच्या पोठाची भूक भागविणारा म्हणजेच जगाचा पोशिंदा असणारा शेतकरीराजा आभाळातून कधी पावसाच्या सरी बरसतात याची वाट पाहतो आहे. आभाळाकडे डोळे लावून तो वरूण राजाला विनवणी करतो आहे कि,
                                     "पावसांच्या धारांनो या, करपलेल्या पिकाला नवजीवन द्या. या थुई थुई थुई थुई धारा, हा शिवार फुलवा सारा "


धन्यवाद……
✍✍✍✍ पोपट यमगर

मंगळवार, ७ जून, २०१६

मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर रविवारी पहाटे झालेल्या ताज्या अपघातात १८ जणांचे प्राण गेले. आतापर्यंतच्या अनेक अपघातांप्रमाणे हा अपघातही भरधाव आणि काळजाला धडकी भरवणारा असाच होता. आजकाल इतके चांगले रस्ते तयार झाले असूनही मानवी चुकामुळे अपघातांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याच अपघाताताबद्दल व्यवस्थेवर तसेच वाहतुकीचे नियम न पाळणार्या नागरिकांच्यावर आजच्या लोकसत्ताच्या अग्रलेखात सणसणीत प्रहार केले आहेत वेळ मिळाल्यास आपण हा अग्रलेख आवर्जुन वाचावा असाच आहे.(खरेतर लोकसत्ताचे सर्वच अग्रलेख योग्य जागेवर मार्मिक बोट ठेऊन केलेले सणसणीत आणि झणझणीत प्रहर असतात. मला तर खूप आवडतात.) आजच्या अग्रलेखातील शेवटचा परिच्छेद आपल्या वाचनासाठी मी मुद्दामहुन देत आहे.
"वास्तविक इतकी सरकारी अनास्था ज्या समाजात असते तो आपल्या हिताविषयी अधिक सजग हवा. परंतु येथील परिस्थिती बरोबर उलट. सरकार ढिम्म आणि नागरिक स्वत:च्याच मस्तीत. त्यात नियम पाळणे म्हणजे कमीपणा असे मानणारा एक मोठा वर्ग. हाती पैसा आहे म्हणून सर्व काही घ्यावयाचे, पण ते वापरावे कसे याचे ज्ञान शून्य. उत्तम फोन आहेत, पण ते वापरण्याची संस्कृती नाही. मोटारी आहेत, पण त्या कशा वापराव्यात हे यांना माहीत नाही आणि जाणून घ्यायची इच्छाही नाही. अशा परिस्थितीत रविवारसारखे अपघात हे नवीन नाहीत आणि ते जुनेही होणारे नाहीत. समाजच्या समाज जर इतका अज्ञानी आणि असंस्कृत असेल आणि त्यास तितक्याच बेजबाबदार व्यवस्थेची साथ असेल तर हे असेच होत राहणार
आणि रस्त्यांवरची ही अशी (अपघात) कार्ये रोखायला ‘श्री’ देखील असमर्थच असणार".

धन्यवाद……
✍✍✍✍ पोपट यमगर

(संदर्भ :- लोकसत्ता वर्तमानपत्र…)

शनिवार, ४ जून, २०१६

भारतीय राज्यघटने आपल्याला अनेक  अधिकार/ हक्क दिले आहेत. भारतीय राज्यघटनेतील तिसर्या भागामध्ये कलम १२ ते ३५ मध्ये हे सर्व अधिकार/ हक्क दिले आहेत. भारतीय राज्यघटनेतील चौथ्या भागामध्ये कलम ५१ अ मध्ये मुलभूत कर्तव्ये दिली आहेत.  आपण नेहमी आपल्या हक्कांचा विचार करतो. (उदा. अभिव्यक्ती स्वातंत्र्य) मुलभूत हक्कांचा विचार करत असताना आपण आपल्या देशाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये हे  विसरून जातो. मला वाटतं अधिकार आणि कर्तव्ये हि एकमेकांच्या हातात हात घालून जातात . जेवढे अधिकार महत्वाचे असतात  तेवढीच कर्तव्ये देखील असतात. घटनेच्या कक्षेत राहून जगायचे, विचार मांडायचे, बोलायचे,  म्हणजे फक्त आणि फक्त अधिकारच चालवायचे नाहीत तर 
कर्तव्ये काय आहेत हे समजून घेऊन ती आचरणात आणली पाहिजेत. आपणा सर्वांचे कर्तव्य हे आहे की या देशात विचारांची विविधता आहे हे आधी मान्य करणे. नंतर माझा जसा विचार आहे तसाच समोरच्या व्यक्तीचा असेल किंवा असलाच पाहिजे अशी मनोभुमिका किंवा असा आग्रह  मी ठेऊ नये. समोरच्याचा विचार समजून घेण्याची भूमिका मी ठेवली पाहिजे. समोरच्याला न दुखावता आपला असा वेगळा विचार त्याच्यापर्यंत ठामपणे  पोहोचवता आला पाहिजे. पण तो विचार ऐकताना समोरच्याची भूमिका हि कोणत्याही विषयाच्या बाबतीत  पूर्वग्रह दुषित असू नये. हाच समग्र विचारांचा पाया आहे असे मला नेहमी वाटत राहतं…

धन्यवाद …
✍✍✍✍पोपट यमगर

शुक्रवार, ३ जून, २०१६


                       आज समाजाच्या मनावर, विचारावर माध्यमाचं(Media) वर्चस्व मोठ्या प्रमाणात वाढत आहे.  मी  वर्चस्व वाढत आहे असं म्हटले, याचं  कारण म्हणजे एखादी बातमी दाखवताना त्या बातमीला इतक्या आक्राळ विक्राळ स्वरुपात दाखवली जाते कि त्या बातमीचा परिणाम हा समाजमनावरती खूप मोठ्या प्रमाणात पडला जातो किवां पडत आहे. एखादी घटना घडली रे घडली कि त्या घटनेची  पूर्ण सत्यता न तपासता त्याची पहिली बातमी आपल्या चनेल वर येण्यासाठी किवा सनसनाटी ब्रेकिंग न्यूज देण्यासाठी खूप गडबड करून ती बातमी दाखवली जाते. काही वेळा एखादी नकारात्मक बातमी चानेलच्या TRP साठी  इतक्या वेळा दाखवली जाते कि त्याचा नकारात्मक परिणाम समाजावर पडत असतो हे ना रिपोर्टरला समजते, ना संपादकाला… 
                            आज आपण बातम्या चे चानेल लावले कि काय बातम्या असतात?? हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या चांगल्या बातम्या असतात नाहीतर राजकारणातील दररोजची एकमेकावरील चिखलफेक (निवडणुकीतील आश्वासनावरून जनतेचे लक्ष हटविण्यासाठीच असेल कदाचित) ,त्यातही चघळून चघळून चोथा झालेल्या टीका, भ्रष्टाचाराच्या घोटाळ्याच्या बातम्या, राजकीय नेत्यांची चानेल च्या कार्यक्रमातील वाद्ग्रात वक्तव्य, गुंडगिरी, सेलिब्रेटीज च्या प्रकरणाचे रेपोर्ट,  बलात्काराच्या बातम्या, फसवणुक दरोड्याच्या बातम्या  त्यातच निम्याहून जास्त जाहिराती असतात. अर्थात त्या बातम्या चानेल वर  येतात म्हणजे समाजामध्ये घडत आहेत हे खरंय पण त्याच त्याच बातम्या सारख्या सारख्या दाखवून एकप्रकारे समाजाच्या मनामध्ये नकारात्मक विचार पेरतात कि काय असं मला नेहमी वाटत राहतं. मला चानेलवरील दररोजच्या नवीन विषयावरील  वरील विशेष  चर्चा ऐकायला खूप आवडतात. मी घरी बातम्यांचा चानेल लावला कि लगेच माझ्या घरातून विरोधात्मक सूर येतो  कारण सकाळपासून संध्याकाळ पर्यंत चालत राहणाऱ्या, त्याच त्याच चघळून चोथा झालेल्या बातम्या ऐकायला आणि पाहायला हि नकोश्या वाटतात.
                  माध्यमांना आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ मानतो. लोकशाहीचा चौथा स्तंभाने जागरूकतेने समाजातील चांगल्या घटनावर लक्ष केंद्रित करणं करणं गरजेचं आहे. देशामधील सामान्य माणसांचे प्रश्न, समस्या, अडचणी या निपक्षपातीपणे सरकारच्या कानावर घालण्यासाठी माध्यमांचा खूप मोठ्या प्रमाणात वापर झाला पाहिजे. सरकारच्या विविध योजना सर्वांच्या पर्यंत माध्यमेच पोहचू शकतात. सरकार आणि जनता यांच्या मधील दुवा म्हणून माध्यमांनी कार्य केलं पाहिजे.   २०१४ मधील निवडणुकातील माध्यमांची भूमिका ही खूप महत्वाची ठरली होती.  सध्याच्या काळात सर्वच क्षेत्रात माध्यमांची भूमिका खूप महत्वाची ठरत आहे. अर्थात माध्यमांची भूमिका महत्वाची असली पाहिजे यात नक्कीच दुमत नाही पण ती सकारात्मक आणि चांगल्या समाजासाठी असावी शेवटी एवढीच  माझ्या विचारी मनाची एक छोटीशी इच्छा…

धन्यवाद…

✍✍✍✍पोपट यमगर…
popatgyamgar.blogspot.com

सोमवार, ३० मे, २०१६

रणरागिणी लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ……

                                                    
             अठराव्या शतकाच्या इतिहासाच्या पानावर स्वबळावर, स्वकर्तृत्वावर राज्य मिळविण्याचे कार्य आपल्या कतृत्वातुन घडवुन जगासमोर 'स्त्री' या शब्दाची व्याख्याच बदलवुन टाकणार्या तसेच मल्हार रावांच्या मार्गदर्शनाच्या जडणघडणीतुन घडलेले क्रांतीकारी स्त्रीरत्न लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज जयंती। त्यांच्या जयंतीनिमीत्त प्रथमतः त्यांच्या विनम्र स्मृतीस विनम्र अभिवादन।।
             31मे 1725 साली माणकोजी-सौ.सुशिलाबाईंच्या पोटी जन्मास आलेल हे धगधगत क्रांती रत्न म्हणजेच अहिल्यादेवी होळकर..  ज्या वयात मुली बाहुली-बाहुली चा खेळ खेळणे पसंद करतात, त्या वयात घोड्यावर बसुन रपेट मारणे,तिरंदाजी करणे, तलवार चालविणे या सार्या गोष्टी छोट्याशा अहिल्येस  प्रिय होत्या. अशा युद्धनितीचा प्रभाव बालपणीच अहिल्यादेवींच्या मनावरती पडला होता. त्यातच त्यांच्या मातोश्री सुशिलाबाई ह्या धार्मिक असल्यामुळे अहिल्यादेवींना मानपान, सन्मान देणे,कार्यनिष्ठा, संयमि वृत्ती,सोज्वळता तथा निर्मळता हे अंगवळणीच पडले होते. अशा दुहेरी संस्कारांच्या गर्तेत अहिल्याराणी घडल्या होत्या.  असेच एकदिवस बाजीराव पेशवे आणि मराठ्यांचे  लढवय्ये शुरसरदार मल्हार राव
होळकर  वेशपालटुन फिरतीवर असताना अहिल्यादेवींशी त्यांची  गाठ पडली. पहिल्याच नजरेत त्या कोवळ्या अहिल्येने त्यांना जरब देऊन तुम्ही व्यापार्याच्या सोंग घेऊन आलेले सोंगी असुन मल्हार रावांचे खरे रूप ओळखले. तसेच मल्हाररावांनी अहिल्येस तिरंदाजी करून समोरील झाडावरचा पक्षी मारण्यासाठी सांगितला. .तेव्हा अहिल्यादेवी उदगारल्या,
   "आम्ही कोण्या मुक्या प्राण्यावर व गरिबांवर हल्ला करून आमची शुरता सिद्ध करत नाही आणि पक्षी तर आमचे पाहुनेच मग त्यांचा तर सन्मान करायला आमच्या मातोश्रींनी शिकविले आहे, संहार नाही"
             त्या प्रसंगाने मल्हारराव अचंबित झाले आणि  अशी शुरकन्या जर आपली सुन जाहली तर ...????? या विचाराने मनोमन सुखावले.  सन 1733 साली अहिल्याराणीचा विवाह मराठ्यांचे शुरसरदार मल्हारराव-गौतमाबाई होळकर यांचे एकुलते पुत्र खंडोजीराव होळकर यांच्याशी पार पडला.
             राज्याची महाराणी म्हणुन प्रतिकुल परिस्थितही काम करत असताना अहिल्यादेवींनी आपला संयम व प्रजेच्या काळजीखातीर कुठलेही भावनात्मक पाऊल उचललेले नाही, कारण खुःद अहिल्यादेवी भावनेपेक्षा कर्तृव्याला श्रेष्ठ माणनार्या होत्या. त्यामुळे आजच्या माता भगिनींनी लहान लहान गोष्टीवरून चिडचिडपणा करून थेट भांडण, घटस्फोट,सासु सासरे वृद्धाश्रमा पर्यंत पोहचविण्यार्या मालिका पाहण्यापेक्षा टीव्हीचे रिमोट बाजुला करून कधीतरी बुद्धीची भुक भागविण्यासाठी  अहिल्या-जिजाऊ-सावित्री-झाशीची राणी वाचल्या पाहिजेत. 
           अहिल्यादेवीनी त्यांच्या स्वराज्यात अनेक लोककल्याणकारी कामे केलेली आपणास पहायला मिळतात. या देशातील अनेक मंदीरे, धर्मशाळा, अन्नछत्रे,वृक्ष संवर्धन, विहिरी, पाण्यचे कुंड असे अनेक लोकहितकारी कार्य केली आहेत. त्यांच्या कालखंडात तर झाडतोड ही अदखलपात्र गुन्हा होता. त्यांनी नदीच्या मुख्य प्रवाहापासुन अनेक कृत्रिम प्रवाह निर्माण करून ऊजाड ठिकाणी पाणी पोहेचवुन शेतकर्यांना शेती करण्यासाठी पाणी ऊपलब्ध करून दिले. तसेच शेतकर्यांना वेळेप्रसंगी शेतसारा मध्ये योग्य ती सवलत देऊन शिवरायांच्या शेतकरी प्रती धोरणांचा अवलंबही केला होता. आजही माहेश्वरच्या साड्या प्रसिद्ध आहेत. तेथे  वस्त्र ऊद्ध्योगासाठी अहिल्यादेवीनीच पुढाकार घेऊन वस्त्रोद्ध्योगास चालना दिली होती. अहिल्यादेवीने "ज्याच्या मनगटात बळ, बुद्धी, चातुर्य आहे. तोच स्वबळावर लोकाभिमुख राजा बनु शकतो" या विचाराच्या आधारे तत्कालीन व्यवस्थेला जबरदस्त 'चपराक' लगावली होती. अहिल्यादेवींनी रणांगणातील लढाईत शक्तीच्या जोरावर अनेक शत्रुंना नामोहरण केले होते, त्याचबरोबर  बुद्धीच्या बळावर अनेक लढायात चित्तपटही केले होते. अहिल्यादेवींनी सती प्रथा,बालविवाह, व विधवांसाठी विशेष योजना राबवुन अन्यायकारी व्यवस्थेस लाथाडले होते. अहिल्यादेवींच्या जयंतीदिनी त्यांचं सामाजिक कार्य, त्यांचे  सर्वसमावेशक विचार आणि पराक्रमाचा इतिहास आपणासारख्या सुशिक्षीत तरुणांनी निरपेक्षपणे जाणुन घेऊन तो जाज्वल्यप्रेमी इतिहास तळागाळातील समाजाच्या अशिक्षीत, शोषित,  वंचित घटकापर्यत पोहचविणे हीच आजच्या काळातील खरी गरज आहे असं मला वाटतं.
           एका प्रसिद्ध इंग्रजी लेखकाने अहिल्यादेवी होळकर, यांना भारताच्या 'कॅथरीन द ग्रेट, पहिल्या एलिझाबेथ, मार्गारेट' म्हटले आहे. भारतातील, माळव्याच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या 'तत्त्वज्ञानी राणी' म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नर्मदातीरी, इंदूरच्या दक्षिणेस वसलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली.  मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केलेल होते. त्या आधाराने अहिल्याबाईंनी इ.स. १७६६ ते इ.स. १७९५, म्हणजे जवळ जवळ ३० वर्षे  त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले.
           लेखाच्या शेवटी विनया खडपेकर यांच्या 'ज्ञात अज्ञात अहिल्यादेवी होळकर' या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरती  दिलेली एक कविता आठवते. या कवितेतुन विनया ताईंनी नक्कीच अहिल्यादेवीच्या कार्याचा फार थोड्या शब्दात खुप मोठा गौरव केला आहे असं मला वाटतं.

"ती सत्ताधारी होती,पण ती सिंहासनावर नव्हती.
ती राजकारणी होती, पण ती सत्तेच्या चढाओढीत नव्हती.
ती पेशव्यांशी निष्ठावंत होती. पण ती त्यांच्यापुढे नतमस्तक नव्हती.
जेव्हा लढाई हे जीवन होते आणि लूट हा जेत्यांचा धर्म होता, हुकमत हा
सत्तेचा स्वभाव होता, तेव्हा-तिच्या कल्याणी प्रतिभेचे किरण नदीवरच्या घाटांमधून उमटले.
तिच्या जीवनदायिनी प्रेरणेने तळी, अन्नछ्त्रे, धर्मशाळांचे रुप घेतले.
तिच्या अनाक्रमक धर्मशीलतेचे मंगल प्रतिध्वनी भरतखंडाच्या मंदिरामंदिरांतून घुमले.
मात्र ती सर्वगुणसंपन्न देवता नव्हती. तिलाही माणूसपणाच्या सगळ्या मर्यादा होत्या.
अठराव्या शतकातल्या मराठयांच्या इतिहासाच्या पटावर ती शुक्राच्या
चांदणीसारखी लुकलुकली."

धन्यवाद.....
✍✍✍✍ पोपट यमगर

शनिवार, २८ मे, २०१६

स्वांतत्र्यवीर सावरकर यांची 133 वी जयंती त्यानिमीत्त................

            आज स्वांतत्र्यवीर सावरकर यांची 133 वी जयंती। त्यानिमीत्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन। स्वांतत्रवीर सावरकर म्हटले की आपल्याला आठवतात ते क्रांतीकारक सावरकर. भारताच्या स्वांत्र्यासाठी आपल्या आयुष्याचा त्याग करणारे सावरकर. काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेले सावरकर, अंदमान तुरुंगातील छळाला निर्भीड सामोरे गेलेले सावरकर.. साहित्यीक विज्ञानवादी सावरकर... सावरकरांच्या जीवनात अदभुत पराक्रम, अस्सीम त्याग, राष्ट्रनिष्ठा, असामान्य वक्तृत्व, हिंदुत्व, अस्पृश्यता निवारण, विज्ञाननिष्ठा हे सर्व सामावलेले आहे. त्यांच्या आयुष्यात भरपुर दुःखप्रद कारावास, हालाखीचे जगणे, देशासाठी केलेला अस्सीम त्याग आहे. तरीही एका असामान्य व्यक्तीचा जीवनाशी झालेला हा लढा आहे.
           सावरकरांनी वयाच्या १४व्या वर्षी देशाच्या स्वातंत्र्यासाठी घरातील अष्टभूजा देवीपुढे ‘मी या देशाचे स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी मारिता मारिता मरेतॊ झुंझेन’ अशी शस्त्र क्रांतीची शपथ घेतली. या घटनेचे मूळआई-वडिलांच्या आदर्शात व त्यांच्याकडुन होणार्‍या संस्कारांमध्ये दडलेले होते असे दिसून येते. सावरकरांचे एकुण जीवनच आपल्या सारख्या तरुणांना भारावुन टाकणारे आहे. आजच्या काळात अनेक संकुचित विचार असणारे लोक स्वांतत्रपुर्वकाळातील महापुरुष, क्रांतीकारक,सामाजिक राजकीय नेते यांची एकमेकांशी तुलना करतात. एकमेकांना त्यांच्या नावाप्रमाणे विभागण्याचा प्रयत्न करतात. नक्कीच ही एक मनातील बोचरी खंत आहे. एकमेकांशी तुलना न करता सर्व महापुरुषांनी देशासाठी, समाजासाठी केलेलं कार्य, त्यांचे विचार आपण समजुन घेतले पाहिजेत असं माझं ठाम मत आहे. या सर्व महापुरुषांच्या विचारामध्ये मतभेद जरुर होते पण त्यांनी ते मतभेद देश हिताच्या आड येऊ दिले नाहीत... त्यांनी राजकीय स्वांतत्र्याचे स्वप्न पाहिले. त्यांना अंदमानमधील तुरुंगात कोणत्याही सुविधा पुरविल्या गेल्या नाहीत, म्हणून 'कमला' हा काव्यसंग्रह एका अणकुचीदार खिळ्याने भिंतीवर लिहुन तो पाठ करणारे सावरकर हे पहिलेच कैदी होते. ते एकदा म्हणाले होते, "माझी अशी इच्छा आहे की, मी
सागरात उडी टाकली होती ही गोष्ट लोक विसरले तरी चालतील, पण मी जे सामाजिक विचार मांडले आहेत त्यांचे समाजाने नेहमी स्मरण ठेवावे." अर्थात त्यांच्या जयंतीदिनी त्यांचे विचार एक समंजसवादी सुशिक्षीत युवक म्हणुन जाणुन घेणं हीच आजच्या काळातील गरज आहे, असं मला ठामपणे वाटतं.

✍✍✍✍✍✍पोपट यमगर… ………

शुक्रवार, २७ मे, २०१६

वाढदिवसाच्या निमित्ताने

        आज माझ्या वाढदिवसानिमित्त अगदी सकाळपासून दिवसभर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यापार, क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी, मित्र, मैत्रिणी, या सर्वांनी  शुभेच्छा दिल्या त्याबद्दल  त्या सर्वांना शतशः धन्यवाद देतो…आपल्या शुभेच्छानी नक्कीच भाराऊन गेलो आहे.  वाढदिवसाच्या निमित्ताने  मागील आयुष्याचं अभिष्टचिंतन करत पुढील आयुष्याकडे सकारात्मक ध्येयासक्त नजरेने पाहतोय… आज खूप जणांनी शुभेच्छा देत असताना  चांगले लेख वाचायला मिळोत या सह खूप अशा सदिच्छा हि व्यक्त केल्या. अर्थात या सर्व सदिच्छा पुढील वर्षभरात पूर्ण करणं हे माझे कर्तव्य आहे, आणि त्या पूर्ण करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन…
       वाढदिवसानिमित मी हि काही चांगले संकल्प केले आहेत.   शैक्षणिक  पदव्युत्तर पदवी प्राप्त करणे हे माझे धेय्य आहे. लेखना बरोबरच भाषण कोशल्य हि आत्मसात करण्याची इच्छा आहे. यासह खूप सारे संकल्प मनात आहेत. ते संकल्प येणाऱ्या काळात मी माझ्या आचरणात आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. पुनश्च एकदा सर्व प्रेमळ मित्रांचे आभारी आहे…असंच आपले मित्रवत प्रेम कायम राहावं हि माझी आजच्या वाढदिनी आपणा सर्वाकडून एक सदिच्छा आहे.
धन्यवाद…।

✍✍✍पोपट यमगर…