विवेक विचार

विवेक विचार

रविवार, १९ फेब्रुवारी, २०१७

लोकशाहीचं सर्वस्व अर्थातच सार्वभौमत्व जनता म्हणजेच तुम्ही आम्ही......


देशातील अनेक राज्यातील विधानसभा निवडणुकीसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा जोरदार रणसंग्राम चालू आहे. महाराष्ट्रात २१ फेब्रुवारीला महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी मतदान होत आहे.
लोकशाही म्हटले की  मला तर अब्राहम लिंकन यांची लोकशाही विषयी केलेली साधी, सरळ सोप्या शब्दातील व्याख्या आठवतेच आठवते, ती म्हणजे " लोकानी लोकांसाठी  चालवलेले लोकांचे राज्य म्हणजे लोकशाही"  लोकशाहीत जनतेचा कौल हा सर्वाधिक महत्वाचा असतो. हा कौल जनतेकडून मागण्यासाठी गेल्या महिन्याभरात सर्वच राजकीय पक्षांचा
प्रचारांचा उडालेला धुरळा आपण पाहिला.. एकमेकांवरील आरोप , प्रत्यारोप,  उमेदवारांचे फटाक्यांनी केलेलं स्वागत,  प्रचाराच्या भोंग्याचे कर्णकर्कश आवाज, विविध रॅली, पदयात्रा आपण सर्वांनीच पहिल्या. आता जनता   21 तारखेला  कोणाला कौल देणार याकडे तुमच्या माझ्यासह राजकर्त्यांचेही लक्ष लागले आहे.
 ज्या ज्या क्षेत्रात मतदान होत आहे त्या क्षेत्रातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींना माझी एक नम्र विनंती आहे कि प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे. मतदान हा फक्त प्रत्येक व्यक्तीचा अधिकारच नसून ते एक राष्ट्रीय कर्तव्यसुद्धा आहे. लोकशाही मध्ये जनता ही सार्वभौम आहे. हे आपण अनेक निवडणूकातून पहिले आहे, पाहतोय, आणि येथून पुढेही नक्कीच दिसेल यामध्ये माझ्या मनात तरी कोणतीच शंका नाही.  मी अनेकवेळा समाजात वावरत असताना पाहतो कि 'राजकारण्याविषयी असलेली प्रचंड चीड' आणि 'आमची काहीच काहीच कामं करत नाहीत तर स्वतःचं घरे भरण्यासाठीच' हे आम्हाला मतं मागायला येतात'  हि नकारात्मक भावना अनेक मतदारांमध्ये असल्याचे पाहायला मिळते. यासाठी अनेकजण (सुशिक्षित तर मोठ्या प्रमाणात) मतदान न करण्याचा निर्णय घेऊन बाहेर फिरायला जातात. त्यामुळे अश्या  मतदार बंधू आणि भगिनींना माझी एक नम्र विनंती आहे की बाहेर कितीही ओरडून सांगितले तरी राज्यकर्त्यांना काही फरक पडणार नाही, तो तुमच्या एका एका मतदानाच्या माध्यमातूनच फरक पडू शकतो.  तुमचं एक मत लोकशाहीमध्ये खूप महत्वाचे आहे. तुमचे एक मत एखाद्या उमेदवारास विजयी करू शकते किंवा पराभूत करू शकते. सद्याच्या राजकीय प्रचाराच्या लढाईमध्ये विचारांची लढाई विचारांनी करणारे राज्यकर्ते फार कमी प्रमाणात उरले आहेत हि एक लोकशाही समोरचे आव्हान आहे पण जनतेने जर योग्य वैचारिकतेने पुढे जाणाऱ्या नेतृत्वाला संधी दिली तर ते आव्हान लोकशाही नक्की पेलू  शकेल याचा ठाम विश्वास मला आहे. यासाठी जनतेची राजकीय प्रगल्भता वाढली पाहिजे. फक्त टीका टिपण्या करणाऱ्यांच्या पेक्षा एक चांगल्या विकासाच व्हिजन देणाऱ्या उमेदवारांना महापालिकेत किंवा जिल्हा परिषदेत पाठवा.. लोकशाहीतील तुमच्या मतांची किमंत खूप मोठी आहे. त्याचा तात्पुरत्या स्वार्थासाठी  सौदा करू नका. निवडणुका आल्यावर अनेक नेते जरी स्वाभिमान गहाण ठेवत असले, तडजोड करत असले तरी तुम्ही मात्र तुमचा स्वाभिमान मतपेटीतून व्यक्त केलाच पाहिजे.  तुमच्या एका मताच्या माध्यमातून 100% बदल घडू शकतो, लोकशाहीत तुमचे एक मत खूप महत्वाचे आहे. उमेदवार वर्षानुवर्षे फक्त घराणेशाहीच्या जोरावर जर राजकारण करत असेल तर  अश्या  प्रस्थपित उमेदवारांना नाकारले पाहिजे.  तुम्हाला जर आता योग्य पर्याय निवडता आला नाही तर पुन्हा पाच वर्ष वाट पाहावी लागेल. यासाठी तुम्हाला तुमच्या भागातील समस्यां भविष्यात कोणता उमेदवार सोडवू शकतो अश्या पारदर्शक आणि कार्यक्षम,  सुशिक्षीत आणि सुसंकृत उमेदवाराना निवडुया, आणि भारतीय  लोकशाही सदृढ करूया.
धन्यवाद.

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✍पोपटराव यमगर
बाळेवाडी, ता. आटपाडी,
जि. सांगली.
7709935374

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

सोमवार, १३ फेब्रुवारी, २०१७

या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे...


आज प्रेम दिवस जगभरामध्ये साजरा करण्यात  येत आहे.  त्या प्रेमदिवसाच्या आपणा सर्वांना अगदी मनापासून प्रेमळ शुभेच्छा...
कवी मंगेश पाडगावकर एका सुंदर अश्या कवितेतून आपल्याला सांगतात की,
 "या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे"  दररोज चे  जीवन जगत असताना  मानवतेच्या नात्याने सर्वांशी प्रेमानं वागणे आणि बोलणे गरजेचे आहे. आपले साने गुरुजी हि सांगून गेलेत कि "खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे"  एखादी व्यक्ती रागावली असल्यास प्रेमाने चार शब्द बोलल्यास त्याच्याही मनातील कटुता दूर होऊन जाते. म्हणूनच म्हणतात ना प्रेमाने जग जिंकता येते. प्रेम म्हटले की आपुलकी, माया, जिव्हाळा असे बरेच काही असताना आज  काही जणांनी मात्र हल्ली प्रेमाचा अर्थ फारच संकुचित करून ठेवला आहे. फक्त प्रियकर आणि प्रेयसी यांच्यामधीलच प्रेम आपल्या सर्वांना दिसते. तेही प्रेम असतेच, नक्कीच असले पाहिजे यामध्ये माझ्या मनात तर नक्कीच दुमत नाही पण त्याच्या पलीकडेही जाऊन प्रेम नावाची संकल्पना समग्र बुद्धीने आम्ही कधी समजावून घेणार कि नाही?? ती समजावून घेणे गरजेचे आहे. आजच्या युगामध्ये समोर दिसणाऱ्या घटना पहिल्या कि  प्रेम म्हणजे फक्त शारीरिक आकर्षण अशीच व्याख्या आजच्या मजनू आणि लैला यांनी करून ठेवली आहे. यासाठी कोणतेही समाजभान, संस्कृतीभान न ठेवता गार्डन्स किंवा सार्वजनिक ठिकाणी  चालणारे प्रकार तुमच्या माझ्या देशात लोकसंख्येने सर्वाधिक असलेल्या तरुण पिढीला (अर्थात देशाचा कणा) नक्कीच विचार करावयास लावणारेच आहेत. आज देशात लव्ह जिहाद (अनेक मुलींना  प्रेमाच्या नावाने फसवून धर्मांतर करावयास लावणे) सारखीही प्रकरणे मोठ्या प्रमाणात घडत आहेत. ती फक्त घडतच नाहीत तर दररोज वाढत आहेत हे आपल्या सारख्या छत्रपतीच्या राज्यात राहणार्या मावळ्यांनी समजावून घेतले पाहिजे. शारीरिक आकर्षण आणि उपभोगासाठी केलेले प्रेम हे खरे प्रेम नसते तर ते ढोंगी प्रेम स्वतःच्या स्वार्थासाठी तात्पुरत्या कार्यकाळासाठी केलेले असते. एखाद्या आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीवर, वस्तुवर, देशावर, निसर्गावर,  ह्रद्यापासुन मनातुन निस्वार्थी भावनेने  केलेले प्रेम हे खरे प्रेम असते. अशा निस्वार्थी भावनेने प्रेम हि संकल्पना जपणाऱ्या तुम्हा सर्व मित्रांना माझ्या पुन्हा एकदा प्रेम दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...
धन्यवाद...

✍पोपटराव यमगर

शनिवार, ११ फेब्रुवारी, २०१७

समाज माध्यमे (सोशल मीडिया), समाज आणि आपण...


मानवी संस्कृतीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे माणसाने केलेली स्वतःची समूह रचना. प्रत्येक माणूस हा मन, मेंदू आणि विचार यांनी दुसऱ्याशी जोडला गेला आहे. आपण दररोजचे जीवन जगत असताना आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांचा आपल्या आयुष्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे परिणाम होत असतो. त्यातूनच आपले व्यक्तिमत्व घडत जाऊन आपण सवेंदनशील होतो.
'बदल' हा निसर्गाचा नियम आहे. गेल्या काही वर्षापासून माणसाच्या आयुष्यात खूपच आमूलाग्र बदल घडून आले आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या काळात रेडिओ, साठ सत्तर च्या दशकात दूरदर्शन, ऐंशीच्या दशकात संगणक, नव्वदच्या दशकात केबल नेटवर्क, मोबाईल आणि एकविसाव्या शतकात इंटरनेटच्या माध्यमातून, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप, ब्लॉग अशी विविध माध्यमे माणसांच्या हातात आली. तंत्रज्ञान क्षेत्रात झालेले हे बदल तुमच्या माझ्या आयुष्यात आमूलाग्र अश्या पद्धतीचेच आहेत. 1991 ला भारताने जागतिकीकरण स्वीकारल्यांनतर संपूर्ण जग हीच भारतासाठी एक बाजारपेठ निर्माण झाली. तशी आज या सर्व सोशल मीडियाच्या प्रगतीने संपूर्ण जग हे तुमच्या एका क्लीक वर संपर्कात आले आहे. आज शेतीपासून उद्योगधंद्यापर्यंत, समाजकारणापासून ते राजकारणापर्यंत, विज्ञापासून शिक्षणापर्यंत सगळीच क्षेत्रे सोशल मीडियाच्या कल्पनाविष्काराने बहरली आहेत. तरुणाईसह इतर वर्गाची सोशल मीडियाच्या वापरकर्त्यांची संख्या जास्त आहे. आणि दिवसेंदिवस ती वाढतच आहे. या तरुणाईला सोशल मीडिया च्या माध्यमातून वैचारिक आणि तांत्रिक पाया असणारा तत्वांचा एक गट आहे. ज्याद्वारे आपले विचार आपले मत समाजसमोर बिनधास्तपणे मांडता येते. तसेच आपल्या विचारांची देवाण घेवाण करता येते. दररोज विचारांच्या माध्यमातून नवीन नवीन मित्र भेटत राहतात. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक ग्रुप हे समाजाच्या विविध प्रश्नांवर समाजाची मते जाणून घेऊन त्यावरती उपाययोजना करण्याचे काम समाजात करत असताना दिसत आहेत. दररोजच्या धकाधकीच्या आणि धावत्या जीवन शैलीमुळे समाजमनावर आलेली मरगळ काहीवेळा विनोदाच्या माध्यमातून दूर होण्यासही मदत होते.
          आज विविध प्रकारच्या उद्योगधंद्यामध्ये ही स्वतःच्या उत्पादित वस्तू किंवा सेवा बाजारपेठेतील ग्राहकापर्यंत पोहचविण्यासाठी किंवा विकण्यासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. कारण सोशल मीडिया हे कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त ग्राहकापर्यंत आपल्या माहिती पोहचविणारे असे साधन आहे. सोशल मीडियामुळे उद्योजकांना आपल्या वस्तू आणि सेवांची माहिती थेट ग्राहकापर्यंत पोहचविता येते. यामध्ये कोणत्याही प्रकारची साखळी असत नाही. आज देशातील काही भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शिवारातील शेतीमालाची माहिती याच सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट ग्राहकांच्या घरापर्यंत पोहचविण्यासाठी सुरवात केली आहे. अर्थात किती वस्तू किंवा सेवा विकल्या गेल्या यापेक्षा त्या वस्तू आणि सेवांची माहिती समाज माध्यमातून ग्राहकापर्यंत पोहचली हे महत्वाचे आहे. भविष्यात गुणवत्तेच्या आधारे ग्राहकाला जर आपल्या सेवा किंवा वस्तू आवडल्या तर नक्की त्याचा फायदा त्या उद्योगास होईल हे नक्की.
        सोशल मीडियाचा राजकीय क्षेत्रावरतीही मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. 2014 ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत केंद्रातील परिवर्तनामध्ये सोशल मीडियाचा परिणाम हा मोठा होता हे आपल्या सर्वाना माहित आहेच. सध्या निवडणुकांचा रणसंग्राम चालू आहे. करोडोंच्या संख्येने सोशल साईटचा वापर करणाऱ्या मतदाराला आकर्षित करण्यासाठी प्रत्येक पक्ष, नेता आणि उमेदवार प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर करत असल्याचे आपल्याला दिसून येईल. अनेक माध्यमांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून नवीन तरुणांना व्यक्त होण्यासाठी (लोकसत्ता ब्लॉगबेंचर्स किंवा माध्यमाची विविध आप्लिकेशन) विचारपीठ उपलब्ध करून दिली आहेत. आज समाजात घडणाऱ्या विविध घटनांवर जर माध्यमे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत असतील तर सोशल मीडियातील दबाव गटाच्या माध्यमातून मीडियाला त्या घटनांची दखल घेण्यास भाग पाडले आहे. खरंतर सोशल मीडिया हा लोकशाहीचा पाचवा स्तंभ म्हणून नावारूपाला येत आहे. देशातील प्रत्येक व्यक्तीला आपले अभिव्यक्ती मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य राज्यघटनेने दिले आहे. त्याचा वापर आमच्या आधुनिक युवा पिढीने गावापासून ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध क्षेत्रातील घडामोडीवर स्वतःला व्यक्त होण्यासाठीच केला पाहिजे. आपण स्वतः एक समाजातील जबाबदार घटक म्हणून सोशल मीडियाचा वापर चांगल्या गोष्टीसाठीच केला पाहिजे.
         अगदी सकारात्मक दृष्ट्या विचार करता सोशल मीडियाने वैयक्तिक आयुष्य मनमोकळे केले आहे. असे असले तरी काही दुष्परिणामही आपल्याला नाकारून चालणार नाहीत. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वापर वाढल्यास त्याचे पडसाद नकारात्मकच अधिक पहायला मिळतात. सोशल मीडियाच्या अतिवापराने वैयक्तिक आयुष्यात कोटुंबिक जीवन दुःखाच्या छायेत गेल्याच्या घटनाही आपल्याला पाहायला मिळतील. मानसिक विकृतीतून अनेक सायबर गुन्हेगारांचा जन्म झाला आहे. आजची तरुण पिढी दहा दहा तास फक्त फेसबुक, व्हॉट्सअप वर वैयक्तिक संभाषणासाठी स्वःतला गुंतवून घेते. यामधून अनेक आजारांना स्वतःहून आमंत्रण देण्याचा हा प्रकार दिसून येतो. अनेक मुलींना वैयक्तिक अकाउंट वरून ब्लॅकमेलिंग केल्याच्या हि घटना आपल्यासमोर आहेत.. त्या आहेतच असे नाहीतर त्या दररोज वाढतच आहेत हि तुमची माझी बोचरी खंत आहे. शेवटी तीक्ष्ण हत्याराने जशी शस्त्रक्रिया करून एखाद्याचे प्राण वाचविले जातात तसेच त्याच हत्याराच्या चुकीच्या पद्धतीच्या वापराने एखाद्याचे प्राणही घेतले जाऊ शकतात . त्यामुळे सोशल मीडियाबरोबर आनंद घेत असताना आपल्या इतर मित्रांच्या किंवा समाजाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी हि आपल्या सारख्या सुशिक्षित समाजाने घ्यायला हवी हीच एक माफक अपेक्षा...!
धन्यवाद.

शनिवार, ४ फेब्रुवारी, २०१७

लोकसत्ताच्या ब्लॉगबेंचर्स या स्पर्धेत या आठवड्यातील आम्हा मेंढरासी ठावे या विषयावर मी व्यक्त केलेले माझे मत

कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था आणि  नागरिकांचा  जीवनमानाचा दर्जा हा तिथल्या सरकारच्या दृष्टीकोनावर बराचसा अवलंबून असतो. 127 कोटी इतकी विशाल लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशामध्ये फुटपाथवरील गरीब व्यक्तीपासून ते आलिशान बंगल्यात राहणाऱ्या श्रीमंत व्यक्तीपर्यंतच्या संबंधित वर्गाच्या नेमक्या समस्या , प्रश्न आणि अडचणी काय आहेत, हे ओळखुन त्यावरती आर्थिक उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना आखत असते. त्या योजनांचा लाभ तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांना किती झाला आहे याचा आढावा घेणे हे सरकारचे काम आहे. आपला भारत देश एक तळपती आर्थिक शक्ती म्हणून पुढे येत आहे. आपण जगातील महासत्तापैकी एक देश होण्याचं स्वप्न उराशी बाळगून पुढे वाटचाल करतोय. परंतु हे स्वप्न पाहत असताना वास्तव परिस्थितीचे हे भान डोक्यामध्ये ठेवत  भारतापुढे असणाऱ्या दारिद्र्य, दहशतवाद, भ्रष्टाचार, जातीयवाद, स्त्री अत्याचार यासारख्या अनेक प्रश्नावर केंद्र सरकारने प्रयत्न करणे गरजेचं आहे. 
भारत सरकारने यावर्षी  ब्रिटिशांची 28 फेब्रुवारींची अर्थसंकल्पाची परंपरा बदलत ती 1 फेब्रुवारीला केली. अर्थात त्यामागे बरीच राजकीय सामाजिक आर्थिक करणे आहेत.    सर्वात महत्वाचे म्हणजे उत्तरप्रदेश पंजाब सह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकाचा रणसंग्राम चालू आहे. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केंद्र सरकारमध्ये सत्तेत असलेला भाजपकडून नक्कीच त्यांच्या मातदारासाठी  काही तरी तरतूद करून त्याचा राजकीय फायदा घेतला जाईल अशी शक्यता दिसतेय. दरवर्षी सादर होणारा देशाचा अर्थसंकल्प देशाच्या तिजोरीतुन वर्षभरातील जमा आणि खर्चाचा व्यक्त केलेला अंदाज आहे.  यावरूनच राज्यघटनेतील मूळ शब्द अंदाजपत्रक असा आहे.  मागील वर्षीचा आर्थिक पाहणी अहवाल डोळ्यात झणझणीत अंजनच घालतो. गेल्या वर्षात आर्थिक विकासदारावर परिणामी होऊन तो अर्धा टक्यांनी खाली आला आहे, बेरोजगारी वाढली आहे, शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. बांधकाम क्षेत्रातील उद्योगावर ही नकारात्मक परिणाम झालेले आहेत.  यासाठी गेल्यावर्षी घेतलेले  नोटबंदीसारखे अनेक निर्णय कारणीभूत आहेत.   नोटबंदीच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन सकारात्मक परिणाम पहायला  मिळू शकतात. गुन्हेगारी, दहशतवाद, सीमेवर होणारी घुसखोरी यासारख्या गोष्टीवर नक्कीच काही प्रमाणात आळा बसण्यास मदत होईल. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना "इस मोड पर घबरा के न थम जाइए आप, जो बात नही हैं, उसे अपनाइए आप, डरते हैं नई राह पर क्यो चलनेसे, हम आगे आगे चलते है, आ जाइए आप"  या शायरीचा आधार घेत केंद्र सरकारची नाविण्याकडे, सर्वांगीण प्रगतीकडे आर्थिक पाऊले पडतील आणि गेल्या वर्षभराच्या काळात घेतलेल्या नवीन अर्थव्यवस्थेतील निर्णयांचे ठामपणे समर्थन करत त्यासाठी सर्वांनी त्याला साथ दिली पाहिजे हे सूचित केले. 
जगातील एकमेव महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावरील ट्रम्प यांचा धोरणांचा परिणाम, वाढत जाणाऱ्या तेलांच्या किमती यासारख्या आंतरराष्ट्रीय घडामोडीसह भारतातील नोटाबंदीचा निर्णय, पाच राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचा परिणाम हि या अर्थसंकल्पावर झाल्याचे आपल्याला दिसून येते.
2017- 18 च्या अर्थसंकल्पात शेतकरी ग्रामीण भाग आणि युवा वर्ग यांना मध्यवर्ती ठेऊन विविध योजनावरती तरतुदी केल्याचे आपणास पाहायला मिळते. मग त्या शेतकऱ्यांसाठी पाच वर्षात दुप्पट उत्पन्न, पीककर्ज आणि पीक विमा , दुग्ध प्रक्रिया उद्योगाच्या पायाभूत उद्योगासाठी  भरघोस निधीची तरतूद केल्याचे आपणास पाहायला मिळते. परंतु  जगाच्या अन्नाची गरज भागवणाऱ्या  शेतकऱ्यांपर्यंत अश्या कित्येक योजनांची माहितीही पोहचत नाही हि कटू पण सत्य वस्तुस्थिती आहे. दरवर्षी शेतकऱ्याच्या आत्महत्यांचे वाढत जाणारे आकडे पाहिले कि मान शरमेने खाली जाते आणि वाटते की अंदाजपत्रकात कृषी क्षेत्रासाठी एवढ्या मोठ्या मोठ्या आकड्यांच्या तरतूदी करूनही,  शेतकऱ्यांसाठी योजना आखूनही शेतकरी आत्महत्या सत्र काही केल्या थांबत नाही याचे  कारण म्हणजे अंदाजपत्रकात(कागदावर) शेतीसाठी केलेली गुंतवणूक ही शेतकऱ्याच्या शिवारात किती पोहचते हा खरंतर हा संशोधनाचा विषय होईल. सरकारी पातळीवर अनेक सर्वसामान्य समाजासाठी, वंचित समाज घटकासाठी अनेक योजना आखल्या जातात पण अनेक योजनांची माहितीही त्या लाभार्थ्यांला नसते. त्या योजना आपल्यासाठी आहेत याचीच माहिती त्या सर्वसामान्य लाभार्थ्यांला असत नाही हे खूप मोठे द्वैत सार्वजनिक पातळीवर आपल्याला दिसून येते. त्या योजनाचीं  माहिती योग्य त्या लाभार्थ्यापर्यंत पोहचणे  गरजेच आहे.
अर्थसंकल्पातील दुसरा महत्वाचा घटक म्हणजे युवक वर्ग... आपणा सर्वाना माहित आहेच की जगामध्ये भारतात सर्वात जास्त युवकांची संख्या आहे. त्या युवकांच्या समोर आज सर्वात मोठे आव्हान आहे ते म्हणजे बेरोजगारीचे... दिवसेंदिवस वाढत जाणारी बेरोजगारी नक्कीच सरकारसमोर चिंता वाढवणारी अशीच आहे. देशातील या  युवा शक्तीला त्यांच्या हाताला काम मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती येणाऱ्या काळात करावी लागेल. सरकारी पातळीवरून त्यासाठी 'मेक इन इंडिया', 'स्टार्ट अप इंडिया', 'स्किल इंडिया'  यासारखे नारे दिले आहेत.   त्यासाठी स्थानिक पातळीवर युवकांना प्रशिक्षण दिले गेले पाहिजे.   युवाशक्तीचा योग्य वापर केला तरच आपल्याला महासतेची पाऊले चढता येणार आहेत.  
मध्यमवर्गीयासाठी 2.5 ते 5 लाखापर्यंत केलेली 5 % कर कपात नक्कीच माध्यमवर्गीयासाठी स्वागतार्यच अशीच आहे. लोकशाही मार्गाने होणाऱ्या निवडणुकीसाठी  राजकीय पक्षांच्या देणग्यावर घातलेली 2000 रुपये पर्यंतची मर्यादा नक्कीच पारदर्शक पणाकडे उचललेली योग्य पावले  आहेत असे मला वाटते. 
2017-18 साठी 21,47,000 कोटी रुपये खर्च करण्याची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. त्या सर्व तरतूद खर्चाची योग्य अंमलबजावणी व्हावी आणि  योग्य लाभार्थ्यांपर्यंत  पारदर्शकपणे पोहचावी हीच एक एक माफक अपेक्षा...
धन्यवाद...
पोपट यमगर

मंगळवार, ३१ जानेवारी, २०१७

देशाच्या अर्थसंकल्पाविषयी ....

देशाच्या अर्थसंकल्पाविषयी ....

1 फेब्रुवारी अर्थातच उद्या आपल्या देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली हे पुढील २०17 - 18 या वर्षासाठी देशाच्या एकूण खर्च आणि उत्पन्नाचे अंदाजपत्रक (अर्थसंकल्प) संसदेच्या लोकसभा या सभागृहात सादर करतील. तत्पूर्वी उद्याच्या अर्थसंकल्पाविषयी अनेक चर्चा आपण पाहत आहोतच. आपल्याही मनात अनेक प्रश्न पडू लागले असतील ते म्हणजे उद्याचा अर्थसंकल्प कशा प्रकारचा असेल. कोणत्या क्षेत्रात जास्त गुंतवणुक केली जाईल.. सर्वसामान्यांसाठी कोणत्या नवीन योजनांचा अर्थसंकल्पात समावेश केला जाईल ??... उद्योग क्षेत्रातील नवीन बदलांना दिशा या अर्थसंकल्पातून भेटेल का?? शेती क्षेत्रात आशादायक चित्र उभारेल काय ?? नोटबंदीनंतर भारताच्या विकासदारावर झालेला परिणाम भरून काढण्यासाठी अर्थमंत्री काय तरतूद करणार ?? नवीन जीएसटी करप्रणाली कधी पासून चालू होणार?? प्राप्तिकर सवलतीची वार्षिक उत्पन्न मर्यादा वाढवली जाणार का?? या सर्वप्रश्नासह उद्या च्या अंदाजपत्रकात काय स्वस्त झाले आणि काय महाग?? आपल्या अर्थव्यवस्थेत रुपया येणार कसा आणि जाणार कसा?? यासारखे असंख्य प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात आहेत. आज उद्या आणि आणखी पुढील आठवडाभर अनेक माध्यमांमधून यासंबंधात अनेक नामवंत अर्थतज्ञांच्या चर्चा , विविध लेख आपल्याला पाहायला वाचायला मिळतील. आपल्या देशाचा अर्थसंकल्प समजून घेणं हे आपल्या सर्वांच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे.
आपल्या देशाचा रेल्वे अर्थसंकल्प 26 फेब्रुवारीला आर्थिक पाहणी अहवाल 27 फेब्रुवारीला आणि देशाचा अर्थसंकल्प हा दरवर्षी 28 फेब्रुवारी या दिवशी बरोबर 11 वाजता(1999 पूर्वी तो 5 वाजता सादर केला जायचा) लोकसभेत सादर केला जात होता. त्यानंतर पुढील मार्च महिन्यात या अर्थसंकल्पावर लोकसभेत चर्चा होऊन 1 एप्रिल पासून तो संपूर्ण देशाला लागू व्हायचा. पण यावर्षी देशाच्या मागील वर्षीचा आर्थिक पाहणी अहवाल आज लोकसभेत सादर केला जाईल . आणि अर्थसंकल्प हा 1 फेब्रुवारीला म्हणजेच उद्या मांडला जाणार आहे. रेल्वे अर्थसंकल्प यावर्षी वेगळा मांडला जाणार नाही. या सर्व घडामोडी, प्रश्नासह पुढील तीन दिवस वार्षिक अंदाजपत्रक आणि त्यातील काही आर्थिक संकल्पना आपण सोप्या भाषेत आणि शब्दात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अर्थसंकल्प संबंधित आपणही अनेक मुद्दे किंवा आपले मत नक्कीच शेअर करा..

काही महत्वाच्या संकल्पना :-

1)स्थूल देशांतर्गत उत्पादन (GDP) :-
एका वर्षाच्या कालावधीत सर्व उत्पादन घटकांनी देशाच्या भौगोलिक सीमा रेषेच्या आत उत्पादित केलेल्या अंतिम वस्तू आणि सेवा यांचे पैशातील मूल्य म्हणजेच स्थूल देशांतर्गत उत्पादन होय.

2) स्थूल राष्ट्रीय उत्पादन (GNP) :-
देशातील नैसर्गिक साधन सामग्रीच्या साहाय्याने ज्या वस्तू आणि सेवांचे उत्पादन केले जाते, त्याचे पैशातील एकूण मूल्य म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन होय.

3) निव्वळ राष्ट्रीय उत्पादन :- (NNP)
स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातुन घसारा (उत्पादित वस्तू आणि यंत्रसामग्रीची होणारी झीज) वजा केली असता निव्वळ राष्ट्रीय उत्पादन मिळते.

4) दरडोई उत्पन्न(PCI ) :-
एका विशिष्ट कालखंडातील देशाचे सरासरी उत्पन्न म्हणजे दरडोई उत्पन्न होय. देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाला देशाच्या एकूण लोकसंख्येने भागले असता आपणास दरडोई उत्पन्न मिळते.

5) एकूण सार्वजनिक खर्च :-
देशाच्या विविध सार्वजनिक आर्थिक विकास प्रकल्पासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या भवितव्यासाठी आखलेल्या कल्याणकारी योजनांसाठी केल्या जाणाऱ्या खर्चाचा समावेश एकूण सार्वजनिक खर्चात केला जातो. 

धन्यवाद..
✍श्री. पोपटराव यमगर
बाळेवाडी, ता. आटपाडी,
जि. सांगली.
7709935374

 

गुरुवार, २६ जानेवारी, २०१७

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त




भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटना समितीच्या 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाच्या अथक परिश्रमातून तयार केली गेलेली भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आली आणि त्या दिवसापासून भारतात लोकशाही मार्गाने प्रजेच्या हाती सत्ता आली, तो दिवस म्हणजेच आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन... आज आपण सर्वजण 68 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत, त्यानिमित्त  प्रथमतः  देशामध्ये प्रजेचं राज्य यावं यासाठी स्वतःच्या वैयक्तिक  जीवनामध्ये त्याग आणि बलिदान देणाऱ्या सर्व महापुरुषांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन.
आज जगातील नव्या बदलांना  आपला भारत देश सामोरे जात असताना मागील 67 वर्षातील चांगल्या वाईट गोष्टीच्या बेरजा वजाबाक्यांचा ताळेबंद लक्षात घेता एक निश्चितपणे दिसून येईल ते म्हणजे आपला भारत देश  सकारात्मक दृष्टीकोनातून पुढे वाटचाल करतोय, यामध्ये माझ्या मनात तरी कोणतीच शंका नाही. देशाचे माजी राष्ट्रपती मा. अब्दुल कलाम साहेबांनीं देशाला   महासत्ता करण्याचं पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपापल्या क्षेत्रात अविरत प्रयत्न करावे लागणार आहेत.
तुमच्या माझ्या समोर दररोजच्या दैनंदिन जीवनात अनेक प्रश्न, समस्या, आव्हाने आहेतच पण त्या आव्हानांना सामोरे जाण्याची ताकद भारतीय राज्यघटनेने तुम्हा आम्हाला दिली आहे. भारतामध्ये इतकी विविधता, धर्म, जाती, पंथ, भाषा आहेत तरीही भारत हा एकसंघ देश राहू शकतो याचा आदर्श आज आपण सर्वांनी  जगासमोर ठेवला आहे.  एवढेच नाहीतर जगातील सर्वात मोठा लोकशाही संपन्न देश म्हणून भारताची जगात ओळख आहे.
गेल्या वर्षभरात अनेक सकारात्मक गोष्टी देशाच्या राजकीय, सामाजिक आणि  आर्थिक क्षेत्रात घडून आल्या. त्यापैकीच एक म्हणजे देशाच्या रिझर्व्ह बँकेनं काळा पैसा आणि भ्रष्टचार विरोधी निश्चलीकरणाचा निर्णय घेतल्यानंतर देशातील सर्व जनतेनं याचं स्वागत केलं आणि रांगेत उभा राहण्याचा  त्रास होऊनही भारतीय जनता सरकारच्या निर्णयाच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली.
जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे पहिले जातेय. नक्कीच उद्याच्या जगातील नेतृत्वापैकी भारत हा एक प्रमुख देश असेल अशी आशा मला वाटते.
देशाची एकात्मता विस्कळीत करण्यासाठी शेजारील पाकिस्थानकडून देशाच्या सीमारेषेवर वारंवार हल्ले केले जायचे, जात आहेत. पण या हल्ल्यांना एक जोरदार प्रत्यत्तर भारतीय जवानांनी 'लक्ष्यभेदी' कारवाई करून सगळ्या जगाला दाखवुन दिले की आमच्या देशावर हल्ले करणाऱ्याना आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ शकतो.
भारतीय राज्यघटने आपल्याला अनेक  अधिकार/ हक्क दिले आहेत. आपण आपल्या देशाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्याचें पालन करणे गरजेचे आहे. मला वाटतं अधिकार आणि कर्तव्ये हि एकमेकांच्या हातात हात घालून जातात . जेवढे अधिकार महत्वाचे आहेत  तेवढीच कर्तव्ये देखील आहेत.
ती कर्तव्य समजावून घेऊन त्याचे पालन करणे हीच आजची गरज आहे असे मला वाटते.
केंद्रसरकारमध्ये एक सकारात्मक दुरदृष्टिकोन असणारे नेतृत्व सत्तेमध्ये आहे. त्यांच्याकडून भारतवासीयांना  खूप साऱ्या अपेक्षा आहेत . त्याची पुर्ती करण्यासाठी ते अहोरात्र काम करत आहेत. आपणही आपल्या मार्गाने आपल्याला जमेल तसं देशकार्य करत राहूया हीच एक छोटीशी सदिच्छा...

धन्यवाद..
✍श्री. पोपटराव यमगर
बाळेवाडी, ता. आटपाडी,
जि. सांगली.
7709935374

बुधवार, ११ जानेवारी, २०१७

राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ यांची आज 419 वी जयंती... जयंती निमीत्त


लाखो मावळ्यांच्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्या   राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ यांची आज 419 वी जयंती...
जयंती निमीत्त त्यांच्या स्मृतीस
विनम्र अभिवादन..

"जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसते झाले शिवराय नी शंभू छावा…!
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसता मिळाला स्वराज्य ठेवा…!
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसते लढले मावळे…!
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसते दिसले विजयाचे सोहळे…!"

महाराष्ट्रासह भारत देश ज्यावेळी सततच्या परकीय आक्रमणाच्या वर्चस्वाखाली भरडला गेला होता,  ज्यावेळी इथल्या माणसांच्या शरीरात ताकद होती पण स्वाभिमान शून्य होऊन दररोजची गुलामासारखी जीवन जगत होता, त्यावेळेला इथल्या  गोरगरीब वंचित, सर्वसामान्य शेतकरी, मावळे यांना राजमाता जिजाऊनीं स्वराज्याचा विचार दिला. आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली हिंदवी स्वराज्य स्थापन केले.
आज वर्तमानात अनेक वेळा बोलले जाते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जर जन्मास यावयाचे असतील तर  माँसाहेब जिजाऊ सारख्या आदर्श माता निर्माण होणे गरजेचे आहे. त्या आदर्श माता घडवण्यासाठी व  दररोज आपल्या माता भागीनींवरील  होणाऱ्या अत्याचारांच्या घटना रोखण्यासाठी आपण सुशिक्षित आणि संपन्न समाज
होऊया हीच राजमाता माँसाहेब  जिजाऊंच्या जयंती दिनी मनोमनी सदिच्छा..

धन्यवाद....
✍✍पोपट यमगर
बाळेवाडी ता. आटपाडी
जि. सांगली
7709935374