विवेक विचार

विवेक विचार

शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०१६

भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमीत्त...................


आज भारताला स्वातंत्र्य मिळून 69 वर्ष झाली. आज पुर्ण देशभर 70 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. भारताच्या स्वांतत्र्यासाठी अनेक स्वांतत्र्ययोद्धे झटले, झगडले, स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करुन देशाच्या संसाराचा गाडा हाकला, भावी पिढयांचे आयुष्य सुखाचे समाधानाचे आनंदाचे व्हावे यासाठी इंग्रजांशी संघर्ष केला, कित्येक क्रांतीकारकांनी भारतमातेसाठी बलिदान दिले, हसत हसत फासावर गेले... या सर्व भारतमातेच्या थोर सुपुत्रांना माझ्याकडुन स्वातंत्र्य दिनानिमीत्त प्रथमतः विनम्र अभिवादन..
आज 70 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना भारताच्या 69 वर्षात घडलेल्या कौतुकास्पद घडामोडी आणि जागतिक पातळीवर समग्र भारताचा एक शक्तिशाली राष्ट्र म्हणुन होत असलेला उदय नक्कीच तुमच्या माझ्या मनात आनंद निर्माण करणारी गोष्ट आहे. सध्याच्या वर्तमान भारताचा अभ्यास करत असताना पाठीमागील घडामोडी चा आढावा घेत आपण भारताच्या भविष्याकडेही ध्येयासक्त नजरेनं पाहतोय..
मित्रांनो आज भारत हा जगात सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून ओळखला जात आहे उद्याच्या भारताचं भविष्य तुमच्या माझ्यासारख्या नवतरुणांच्याच हातात आहे. अशा वेळी मला आठवतात ते
स्वामी विवेकानंदजीचे ते स्फुर्तीदायी शब्द... "जा सारया जगाला (मंगलमय) स्वरात सांगा, ही पुण्य पुरातन भरत भू पुन्हा एकदा जागी होत आहे"
या एका वाक्यावर चिंतन, विचार करावा तितका कमी आहे. भारत नक्कीच खडबडुन जागा होत आहे. स्वातंत्र्यानंतर अनेक चढ उतार बेरजा वजाबाक्या करत आपण आज या ठिकाणापर्यंत पोहचलो आहे. सध्या जगात संस्कृतींचा संघर्ष चालु आहे....त्या संस्कृतींच्या संघर्षामधे तुमच्या माझ्या हजारो वर्षाची दीर्घ परंपरा असलेल्या भारतीय संस्कृतीकडे जगाचं लक्ष लागलेले आहे. मानवतेचा, एकतेचा, विविधतेतुन एकात्मतेचा, समृद्धीचा असा आपला इतिहास आहे. हा गौरवशाली इतिहास जोपासण्यासाठी व भविष्यातील सर्वमावेशक समृद्धीसाठी आपल्याला काही कठोर अशी छोटी छोटी पाऊले उचलावी लागणार आहेत..ती पावले भविष्यकाळात सर्वांना सोबत घेऊन आपण आपल्या कृतीच्या माध्यमातुन टाकली पाहिजेत असं मला वाटतं.
सध्या केंद्रात सकारात्मक सरकार सत्तेवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी भारताला सर्वसमावेशक प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्याचं कार्य करत आहेत. भारत अन्नधान्याच्या बाबतीत जगातील एक स्वयंपूर्ण देश आहे. 21 व्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या शतकात भारत जगाच्या नकाशावर नेतृत्व करण्यासाठी पुढे सरकत आहे. हे वर्षापुर्वी गुगलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर निवड झालेल्या सुंदर पिचई यांच्या उदाहरणावरुन पुन्हा एकदा सिद्ध झाले. आपण उद्योग , क्रीडा, शिक्षण, विज्ञान, माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रातही गरुडभरारी घेत आहोत. स्त्रीयांनीही त्यांना मिळणारया दुय्यम वागणूकीला व
फक्त चुल आणि मुल या मुलभुत चौकटीला बगल देऊन अनेक क्षेत्रात केलेली प्रगती ही निश्चीतच उल्लेखनीय आहे. (उदा. पंतप्रधान इंदिरा गांधी, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी सनदी अधिकारी किरण बेदीजी, पेप्सीको कंपनीच्या सीईओ इंद्रा नुई, स्टेट बॅकेच्या मुख्य अरुधंती भट्टाचार्य इ.) याचाच अर्थ आपण विजयाच्या (दिवंगत डाॅ. कलाम साहेबांनी पाहिलेल्या जागतिक महासत्तेच्या) दिशेने वाटचाल करत आहोत.आज भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आज संपुर्ण जग भारताकडे एका आशेने पाहत आहे. इतकी विविधता असलेला भारत देश एकसंघ आणि एकात्मक कसा राहु शकतो यावर अनेक राष्ट्रामधे अभ्यास चालु आहे. डाॅ बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीच्या सदस्यांच्या अथक परिश्रमातून निर्माण केलेली राज्यघटना/भारतीय संविधान आपण 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले आणि त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासुन झाली. आज एवढी विभीन्नता असुनही भारत एक दिसतो आहे हे फक्त राज्यघटनेचेच द्योतक आहे.
आपल्या भारताच्या समोर अजुनही काही समस्या आणि आव्हाने आ वासून पुढे उभे आहेत. उदा. लोकसंख्या वाढ, दारिद्र्य, बेकारी, दहशतवाद, पर्यावरणाचा नाश, नक्षलवाद, दुष्काळ, भ्रष्टाचार, स्त्रियांवरचे अत्याचार, जातीयवाद यासारख्या काही समस्यांचा अजुनही आपल्याला सामना करावा लागत आहे.
या सर्वच समस्या, आव्हानावरती उपाय काढण्याचं कार्य केंद्रामधे सकारात्मक दुरदृष्टीकोन असलेलं सरकार अखंड अविरतपणे करत आहे. मी भारतीय म्हणुन जेव्हा आपण कार्य करु त्यावेळी समग्र भारताच्या दृष्टीने तो
नक्कीच आनंदाचा दिवस असेल असं मी मानतो.
मी शिवाजी विद्यापीठात होतो त्यावेळी एनसीसी भवन मधे एक खुप छान गाणं लागायचं
"हम सब भारतीय है " खरंच किती प्रेरणादायी गीत आहे आणि हे प्रेरणादायी गीत ऐकतच आपले जवान कोणताही भेदभाव न करता सीमेवरती लढत आहेत. ज्यावेळी सर्व भारतीय नागरिक हम सब भारतीय है हे गीत म्हणत कार्य करतील त्यावेळी नक्कीच भारत हा महासत्ता झालेला आपल्याला दिसुन येईल। आपणासही 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दोनच दिवशी देशाची आठवण येऊ न देता दररोज अखंडपणे एक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आणि जबाबदारी म्हणुन छोट्या छोट्या गोष्टीमधून देशकार्य केलं पाहिजे. म्हणून भारतमातेच्या उज्वल भवितव्यासाठी आपण आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करावं हीच 70 व्या स्वातंत्र्यदिनी सदिच्छा। तुम्हा सर्व बंधु आणि भगिनींना स्वातंत्र्यदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा।
शेवटी एवढेच म्हणेन,
"हेचि दान देगा देवा। भारतीयत्वाचा विसर न व्हावा॥"
जय हिंद।
श्री. पोपटराव यमगर
(बाळेवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली)
7709935374

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: