21 व्या शतकाच्या जगामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान हे माणसांच्या विकासातील प्रमुख साधन असणार आहे. हे खरे आहेही पण विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे जो मानव जातीचा विकास होणार आहे तो शाश्वत आणि आरोग्यपुर्ण विकास असेल याची मात्र शाश्वती देता नाही. भारताच्या प्रमुख महानगरांमधील गेल्या काही दिवसापासून वाढत असलेले हवा प्रदूषण नक्कीच भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेला नक्कीच भूषणावह नाही. भारताची राजधानी दिल्ली मध्ये गेल्या अनेक वर्षातील हवा प्रदूषणाचे सारे उचांक मोडीत काडत तिथली परिस्थीती प्रदूषित हवेमुळे गंभीर अशी झाली आहे. अनेक शाळा सार्वजनिक व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. या दिल्लीच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्यास हवेच्या प्रदूषणामुळे निर्माण झालेली दिल्लीसारखी परिस्थिती उद्या भारतातील बाकीच्या शहरामध्ये हि भविष्यात उदभवण्यास वेळ लागणार नाही.
भारतात वाढत जाणारे औद्योगिकीकरण हे एका बाजूला विकासाचे ध्योतक जरी मानले जात असले तरी या औद्योगिकीकरणामुळे वाढत जाणारे हवा आणि पाणी प्रदूषण हे मात्र तुमच्या, माझ्या आणि या देशातील नागरिकांच्या आरोग्याला नक्कीच परिणाम करणारे असेच आहे. हवा प्रदूषणामुळे ओझोन वायूचा थर हि दिवसेंदिवस कमी होताना दिसून येत आहे. हवा प्रदूषणाने माणसाच्या श्वसन संस्थेला पहिला फटका बसतो. फुफ्फुसाचा कर्करोग, विविध प्रकारचे हृदयरोग जडण्यासाठी श्वसनातून शरीरात घुसणारी अस्वच्छ हवा कारणीभूत ठरते. तेल अविव येथील संशोधकांनी, हवेच्या प्रदूषणामुळे हृदयाच्या झटक्यासोबत दीर्घ काळ जडणाऱ्या हृदयरोगांचा आढावा घेतला आहे. प्रदूषित वातावरणात वास्तव्य असलेल्या लोकांना तुलनात्मकदृष्टय़ा हृदयविकाराचे वारंवार झटके येत राहतात.
मानवास जी गोष्ट सुखासाठी उपभोग्य आहे त्या गोष्टीचा उपभोग हा मानव कधी कधी अतिरेकीपणाने करतो त्या उपभोग्य वस्तूंचा उपभोग अतिरेकीपणाने केल्यामुळे मानवी जीवन आणि आरोग्य संपुष्ठात आल्याचे मात्र तो जाणीवपूर्वक विसरून जातो. भारतामध्ये दररोज खाजगी वाहनांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भारतामध्ये नुकतीच दिवाळी होऊन गेली पण या दिवाळीमध्ये उत्साह आनंद आणि जल्लोषाच्या नावाखाली फटाक्यांचे वाढते प्रमाण आणि त्यामुळे होणारे हवेचे प्रदूषण नक्कीच तुम्हा आम्हाला विचार करायला लावणारे असेच ठरले. दिल्ली सरकारने पाठीमागे वाढत्या हवा प्रदूषणास आला घालण्यासाठी सम विषम चा केलेला प्रयोग नक्कीच चांगला होता असे मला वाटते. भारतामध्ये असणाऱ्या प्रमुख समस्यांपैकी हवा प्रदूषण हि एक प्रमुख समस्या निर्माण झाली आहे. आपले भारतीय नागरिक हि आपण केलेल्या हवा प्रदूषणाचा गांभीर्याने विचार करण्यास तयार नाहीत.
भारतामध्ये एक वर्ग मोठ्या प्रमाणात उदयास येताना दिसतो आहे तो म्हणजे समाजात काही झाले तरी त्याची संपूर्ण जबाबदारी हि सरकारवर ढकलून सरकारवर टीका करायला मोकळा होतो. देशात घडणाऱ्या महत्वाच्या घटनांवर लक्ष ठेवणे हि सरकारची जबाबदारी असते हे खरे आहे परंतु एक भारतीय नागरिक म्हणून तुमची माझी एक जबाबदारी असते कि देशात प्रदूषित वातावरण निर्माण होऊ न देणे. सरकारने दिल्लीमध्ये झालेल्या हवा प्रदूषणावर अल्पकालीन अश्या उपाययोजना न करता दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे आहे. आपल्या सारख्या प्रत्येक सुजाण आणि सुशिक्षित नागरिकानीही आपल्या आणि आपल्या भावी पिढीच्या निरोगी आणि आनंदी जीवनासाठी देशात हवा आणि पाणी प्रदूषण होणार नाही यासाठी गांभीर्याने वर्तमानकाळात वर्तन करणे काळाची गरज आहे. जर खरंच आपण अश्याप्रकारे आचरण करू शकलो तरच खऱ्या अर्थाने भारत हा स्वच्छ भारत होण्यास वेळ लागणार नाही.
धन्यवाद.
श्री. पोपट यमगर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा