शुक्रवार, १६ डिसेंबर, २०१६

लोकसत्ताच्या ब्लॉगबेंचर्स स्पर्धेत या आठवड्यातील विषय "अजून येतो वास फुलांना" या अग्रलेखावरती मी व्यक्त केलेले माझे मत........


भारताला जगातील सर्वात विशाल आणि विविधतापूर्ण  लोकशाही संपन्न असलेला देश  म्हणून ओळखले जाते.  भारताच्या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून प्रसारमाध्यमांना महत्व आहे. गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून ते देशातील जनतेच्या सरक्षणासाठी, हितासाठी कायदे बनवणाऱ्या संसदेच्या निवडणुकांच्या मध्ये लोकांचे मत तयार करण्यापासून ते जनतेचा आवाज सत्ताधारी शासनापर्यंत पोहचविण्याचे काम प्रसारमाध्यमे करत असतात. अर्थातच जनता आणि सरकार यांच्यातील दुवा म्हणून प्रसारमाध्यमांनी काम करणे  गरजेचे आहे, यामुळेच लोकशाही बळकट होण्यास मदत होते. स्वातंत्र्य पूर्वकाळामध्ये भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांनी दैनिक वृत्तपत्र,  साप्ताहिक, मासिकांच्या माध्यमांतुन ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध स्वातंत्र्यलढ्याची माहिती देशातील जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम केले.  आता स्वतंत्र भारतामध्ये प्रसारमाध्यमांची भूमिका ही देशातील सर्वसामान्य नागरिकांचा आवाज, त्यांचे प्रश्न, सरकारच्या कानापर्यंत पोहचवण्यासाठी आणि  राष्ट्रीय विकासाच्या पूर्ततेसाठी लोकांना प्रेरित करणारी असावी. तसेच लोकशाही व्यवस्थेला सदृढ बनविण्याची जबाबदारीही प्रसारमाध्यमांवर आहे असे मला ठाम वाटते.
             "देशातील प्रत्येक क्षेत्रात बदल होत असताना माध्यमे मात्र बदलास तयार नाहीत" हे अर्थमंत्री अरुण जेटली यांचे  वक्तव्य निश्चितपणे देशातील  माध्यमाना प्रमाणिकपणाचे मिळाले प्रमाणपत्रच आहे या लोकसत्ताच्या अग्रलेखाशी मी सहमत आहे.  देश बदलतो आहे, घडतो आहे हे १००% जरी  खरे असले तरी भारतासारख्या लोकशाही संपन्न असलेल्या देशात प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यास  संरक्षण देण्याची प्राथमिक जबाबदारी हि सरकारची असते. देशातील सत्ताधारी सरकारच्या मताप्रमाणे प्रसारमाध्यमांनी वागणे हे लोकशाहीस बिलकुल अभिप्रेत नाही. जर सरकारचीच पाठराखण प्रसारमाध्यमांनी वेळोवेळी केली तर माध्यमांनी सत्ताधाऱ्यांचे भक्तभाट झाल्याचे ते लक्षण आहे. सरकारने घेतलेल्या कोणत्याही निर्णयावर समाजात काय वास्तविक परिस्थिती चालू आहे, सर्वसामान्यांचे  सरकारच्या निर्णयावर काय मत आहे? हे जाणून घेणे कोणत्याही निपक्षपातीपणे काम करणाऱ्या  प्रसारमाध्यमांचे कर्तव्य असते आणि ते कर्तव्यच पार पाडण्याचे काम देशातील प्रसारमाध्यमे करत आहेत.  8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी  देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी निश्चलीकरणाचा निर्णय घेतल्यानंतर सर्वच माध्यमांनी व देशातील जनतेने या निर्णयाचे स्वागत केले होते. मोदिजीनी देशाच्या उज्वल भवितव्याच्या दृष्टीने देशाला आर्थिक शिस्त लावण्यासाठी कडक चहासारखा घेतलेला निर्णय नक्कीच स्वागतार्ह असाच होता यामध्ये माझ्या मनात तरी  शंका नाही परंतु गेल्या महिन्याभरात सरकारकडून निश्चलीकरणाच्या निर्णयाची जी काही अंमलबजावणी केली गेली ती नक्कीच अपुरी अशीच होती.  8 नोव्हेंबर पासून  सर्वसामान्यांच्या दररोजच्या जीवनात होणारा त्रास दररोज वाढतच गेला. अनेकांना तर मृत्यूला कवटाळावे लागले. मग हाच सर्वसामान्याना होणारा त्रास माध्यमांनी तुमच्या माझ्यासमोर मांडला, सरकारच्या कानावर घातला तर यात माध्यमांची चूक काय होती? आणि मला वाटते देशातील प्रसारमाध्यमे हि सर्वसामान्यांचे मतच जाणून घेत होती.    सर्वसामान्याना होणारा त्रास माध्यमांनी मांडायचा नाही तर मग कोणी मग कोणी मांडायचा???   निश्चलीकरणाच्या निर्णयाचे भविष्यात देशाला होणारे फायदे हि अनेक माध्यमांनी विशेष भागाच्या रूपाने देशातील जनतेसमोर निरपेक्षपणे  मांडले गेले हेही विद्यमान सरकारने पाहिले पाहिजे.  तसेच मोदीजींनी देशातील जनतेला कॅशलेस  व्यवहाराचं आव्हान केल्यानंतर माध्यमांनी कॅशलेस  व्यवहाराचे फायदे हि अप्रतिमरीत्या मांडले आहेत.  सरकारच्या मतानुसार खाजगी प्रसारमाध्यमे  सरकारविरुद्ध  मुद्दामच वातावरण निर्मिती करत आहेत असे वाटत असेल तर  सरकारी माध्यमांच्या द्वारे त्या खाजगी माध्यमांची सरकारने पोलखोल करावी.. पण असे न करता माध्यमाच्या नावाने ओरडणे हे माझ्या तरी मनाला पटत नाही.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या मैदानात काँग्रेस च्या सरकारचे घोटाळे, भ्रष्टाचार माध्यमांनी ज्या पद्धतीने दाखवले तसेच घोटाळेबाज सरकारविरुद्ध जनमत तयार करण्यात माध्यमांची भूमिका हि भाजपला निवडुन येण्यासाठी खूप महत्वाची ठरली होती...   त्यावेळेस  अर्थमंत्री आदरणीय अरुण जेटलींना प्रसारमाध्यमे बदलल्याचा साक्षात्कार झाला नव्हता काय??  यामुळे भारतात सत्ताधारी बाकावर कोणता जरी पक्ष असला तरी सत्ताधारी   पक्षाची उत्तरे हि ठरलेली आहेत. सरकारने निश्चलीकरणाच्या निर्णयामुळे  सर्वसामान्यांना होणारा त्रास कमी कसा होईल याकडे लक्ष दिले गेले पाहिजे असे मला वाटते .
आज काही माध्यमात अभ्यासात्मक मुद्देसूद चर्चा न करता उतावीळ पणाने  नोटबंदीच्या निर्णयांवर चर्चा केली जात आहे.  21 व्या शतकात जर तुमच्या माझ्या देशाला आधुनिकतेकडे, महासत्तेकडे न्यावयाचे असेल तर माध्यमांनी सकारात्मक दृष्टीकोनातून निपक्षपातीपणे चालू घटनांवर भाष्य करणे गरजेचे आहे. देशामधील सामान्य माणसांचे प्रश्न, समस्या, अडचणी या निपक्षपातीपणे सरकारच्या कानावर घालण्यासाठी माध्यमांचा खूप मोठ्या प्रमाणात वापर झाला पाहिजे. सरकारच्या विविध योजना ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार यांच्या  पर्यंत  माध्यमेच पोहचू शकतात. यामुळे लोकशाहीचे चारही स्तंभ ज्यावेळी हातात हात घालून निरपेक्षपणे कार्य करतील त्याचवेळी डाँ. ए. पी. जे. अब्दुल कलाम साहेबांच्या स्वप्नातील  सक्षम आणि सशक्त असा महासत्ता भारत आकाराला  येईल असे मला वाटते.

धन्यवाद
श्री. पोपटराव यमगर
बाळेवाडी, ता. : आटपाडी
जि. सांगली
7709935374

शनिवार, ३ डिसेंबर, २०१६

💐मोठे मात्तबर सहकार सम्राट जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नोटाबंदी वरून एवढे चिंतीत का???💐




प्रत्येकाने स्वत:पुरते व स्वतंत्रपणे कार्य न करता, अनेकांनी एकत्र व परस्पर सहाय्याने कार्य करणे, हा सहकार या शब्दाचा साधा नि सोपा अर्थ आहे. परंतु हल्ली आमच्या सहकार सम्राट झालेल्या मात्तबर नेत्यांनी
मात्र सहकार या शब्दाची पूर्ण व्याख्या बदलून सहकार म्हंणजे सर्व संचालक एकत्र येऊन त्याच्या  संगनमताने शेतकऱ्यांनी ठेवलेल्या ठेवी या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून वाटून खाऊ अशी केली आहे. एका शब्दात सांगायचे झाले तर सहकाराचा स्वाहाकार केला आहे.
सहकारी संस्थांना आर्थिक दु:स्थितीच्या खाईत लोटणारे पदाधिकारी गब्बर झाले आहेत. त्या संपत्तीचा व प्रतिष्ठेचा वापर करून त्यांनी अन्य संस्थामध्ये मानाचे स्थान मिळवून ते दिमाखाने मिरवताहेत. सहकारी साखर कारखान्यातून धनाढय़ झालेले काही महाभाग हाच कारखाना मोडीत काढला तर खासगीत विकत घेण्याचीसुद्धा तयारी दर्शवतात. राज्यातील बहुतेक जिल्हा सहकारी बँका वर्षानुवर्षे सहकार क्षेत्रातील यांच्या कारनाम्यावरून बदनाम झाल्या आहेत. या सर्व कारनाम्यामुळे
केंद्र सरकारने सहकारी बँकाना ५०० आणि १००० च्या नोटा घेण्यास घातलेली बंदी  हि १००% बरोबरच आहे. आदरणीय अर्थमंत्री अरुण जेटलीजी यांनी सांगितल्या प्रमाणे जर या बँकांना ५०० आणि १००० च्या नोटा घेण्यास परवानगी दिली तर राज्यासह देशातील मातब्बर नेत्यांनी गोरगरीब जनतेला लुटून मिळविलेला काळा पैसा  पांढरा करणाऱ्या एजन्सी ठरतील. हे विधान मला १०० % बरोबर आहे असे वाटते. कारण देशाच्या रिझर्व्ह बँकेने या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकासह सर्व सहकारी बँकांना वेळोवेळी  सांगितलेल्या सल्यांचे  आणि सूचनांचे कोणतेही पालन केलेलं दिसून येत नाही.  रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालामध्ये या सहकारी बँकावरती अनेक ठपके ठेवले आहेत. या सहकारी बँकांचा इतिहास समोर ठेऊन रिझर्व्ह बँकेने घेतलेला निर्णय योग्यच आहे असे मला वाटते.  
पहिला आणि तांत्रिक मुद्दा म्हणजे या बँकांनी खातेदाराचे KYC आणि Core Banking  पूर्ण केलं नाही आणि त्याचं प्रमाण हि फार कमी आहे. यानंतर दुसरा आणि  सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे या बँकाच्या संचालक मंडळाचे गाजलेले घोटाळे.. भ्रष्टाचारी कारभार, संगनमताने भ्रष्टाचारी नोकरीभरती,   त्यामुळे बंद पडलेल्या बँका, पतसंस्था, सहकारी साखर कारखाने यामध्ये हजारो गोरगरीब शेतकरी आणि कामगारांच्या,  ठेवीदारांच्या बुडालेल्या ठेवी या सर्व अंदाधुंदीच्या कारभारामुळे या सहकारी बँकांची बँकिंग क्षेत्रामध्ये व समाजामध्ये विश्वाससार्हता किती आहे ???  महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेसह अनेक जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सरकारला प्रशासक का नेमावे लागतात????  अनेक सहकारी बँका या मात्तबर प्रस्थापित नेत्यांच्या आहेत हे सर्वानाच माहिती आहे, मग या मात्तबर नेत्यांच्याकडे असलेला काळा पैसा या सहकारी बँकाच्या माध्यमातून पांढरा कशावरून करणार नाहीत????   गोरगरीब शेतकरी, कामगार, सर्वसामान्य जनता यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन त्यांना सहकाराच्या नावाने अनेक मात्तबर नेत्यांनी लुबाडून आपली घरे भरून घेतली आहेत. आज अनेक मोठमोठे उदयॊग सहकाराच्या नावाने चालतात पण याची खरी मालकी हि या मात्तबर नेत्यांचीच असते.  या अश्या मातब्बर नेत्यांनाच आज केंद्र सरकारने सहकारी बँकाना ५०० आणि १००० नोटा घेण्यास घातलेली बंदी हि उठवायला है असे वाटत आहे. हे सर्वच पक्षातील नेते (याला कोणताही पक्ष अपवाद नाही) आज जिल्हा मध्यवर्ती बँकांवर घातलेल्या बंदीमुळे शेतकरी  आणि कामगारांच्या नावाने गळे काढत आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकामध्ये अनेक शेतकरी बांधवांची खाती आहेत पण ती फक्त पीक कर्ज आणि पीक  विमा यांचा लाभ या खात्याच्या माध्यमातून मिळतो यासाठीच आहेत. संचालक मंडळाच्या भ्रष्टचारामुळे या बँका कधी डबघाईला जातील याची कोणतीही सुतराम शक्यता नसल्याने  शेतकरी आणि सर्वसामान्य जनता हे या बँकात ठेवी ठेवायला धजावत नाहीत, हि अनेक सहकारी बँकांतील वस्तू स्थिती आहे. या सहकारी बँकाच्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे, शेतकरी देशोधडीला लागला आहे  अशी ओरड या सहकार सम्राटांच्या कडून चालू आहे. सहकारी बँकाच्या संचालकांनी अनेक सहकारी साखर कारखाने संगनमताने मोडून खाल्ले त्यावेळी शेतकरी देशोधडीला लागला नाही का ?? कित्येक पतसंस्थांमधील ठेवी बुडाल्याने सर्वसामान्य ठेवीदार देशोधडीला लागला नाही का??? जिल्हा बँकांत भ्रष्टाचार करून शेतकऱ्यांच्या पैशावर डल्ला मारला गेला त्यावेळी शेतकरी देशोधडीला लागला नाही का???  जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकरभरतीमध्ये  घोटाळा करून आपल्या पै पाव्हण्यांना नोकरभरती करतांना शेतकरी देशोधडीला लागला नाही काय??      असे अनेक प्रश्न आज ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मनात आहेत. आज राष्ट्रीयकृत बँका या परिसरातील अनेक गावामध्ये पोहचल्या आहेत.  या राष्ट्रीयकृत बँकामध्ये प्रधानमंत्री जनधन योजने च्या माध्यमातून गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेने आपली खाती काढली आहेत. त्यामुळे या  राष्ट्रीयकृत बँकामध्ये शेतकरी नोटा बदलून घेत आहेत आणि  ठेवीही ठेऊ लागले आहेत. येणारे काही दिवस आमच्या शेतकऱ्यांना  त्रास नक्कीच होईल पण भविष्यात याचे परिणाम चांगले होणार आहेत. आणि खरं सांगायचं तर आमच्या शेतकऱ्यांना हा त्रास काही नवीन नाही. 12 महिने शेतकरी त्रासच सहन करत आहे त्यावेळी होणारा हा त्रास या सहकार सम्राटाना  दिसत नाही का???जिल्हा  सहकारी बँकांवर  500 आणि 1000 च्या नोटा बंदी केल्यामुळे होणार त्रास मात्र पटकन आणि जलदगतीने दिसला. मित्रांनो खरी अडचण आणि सर्वात मोठा त्रास हा  सहकाराच्या नावाने राजकारण करणाऱ्या या मात्तबर नेत्यांना  निर्माण झाला आहे.  या मातबर सहकार सम्राट नेत्यांची आणि त्यांच्या बगलबच्यांची फार तडफड चालू आहे ही बंदी हटविण्यासाठी....   त्यामुळे त्यांच्याजवळ असणारा काळा पैसा या सहकार सम्राटांना बदलता येत नाही आणि काळा पैसा बाहेर काढताही  येत नाही, अशा दुहेरी संकटात हे सहकार सम्राट सापडले आहेत.  या मुळे ग्रामीण भागातील जर काळा पैसा बाहेर काढायचा असेल तर केंद्र सरकारने सहकारी बँकांना घातलेली बंदी कदापि उठवू नये असे माझे ठाम मत आहे.

धन्यवाद..
श्री.  पोपटराव यमगर
बाळेवाडी, ता. आटपाडी,
जि. सांगली
०७७०९९३५३७४
p

माणदेशाचं लोकनृत्य : गजनृत्य(गजीढोल)




महाराष्ट्राला अनेक लोककलांचा, लोकनृत्यांचा  प्रदीर्घ असा इतिहास लाभला आहे. याच महाराष्ट्रातील गजनृत्य (गजीढोल नृत्य) लोकप्रिय आहे. त्यामुळे ते लोकनृत्य माणदेशासह  महाराष्ट्रात गजीढोल या नावाने लोकप्रसिद्ध आहे. माणदेशाला  गजीढोलाची दीड-दोनशे वर्षांची उज्वल अशी परंपरा लाभली आहे. माणदेशातील सांगली सातारा सोलापूर या जिल्ह्यातील खानापूर आटपाडी माण खटाव सांगोला माळशिरस जत कवठे महांकाळ या तालुक्यासह महाराष्ट्रात गजीढोल मोठ्या प्रमाणात  खेळला जातो. अनेक गावोगावी वाड्या वस्त्यावरती  गजी ढोल मंडळाचे  ताफे  अस्तित्वात आहेत.
गजीढोल नृत्यामध्ये गजी वर्तुळाकार नाच करतात.  गजनृत्यामध्ये नृत्य करणाऱ्यास गजी म्हणतात. ढोल वाजवणाऱ्यास ढोल्या म्हणतात.ढोलाच्या तालावरच ताल धरला जातो. गजाची घाई लावणाऱ्यास म्होऱ्या म्हणतात. या खेळात म्होऱ्याची भूमिका महत्वाची असते. रंगीत रुमाल  उडवत डाव्या-उजव्या बाजूला वळत तालबध्द नृत्य करतात. नृत्यात पंचवीस ते तीस लोकांचा सहभाग असतो. त्यांचा पोषाख अंगात तीन बटनी नेहरु शर्ट, डोक्यावर तुरा काढलेला फेटा, दोन्ही हातांत रुमाल, कमरेलाही रंगीत रुमाल  व विजार किवां धोतर घातलेली असा असतो.  अनेक ठिकाणी गजनृत्याला  चुळण असेही म्हटले जाते.
गजीढोलात नृत्य करणारे गजी अनेक प्रकारे गजीनृत्य करतात. नृत्यात ढोलाच्या आणि सनईच्या सुरावर पावलांचा संबंध जोडला जातो. नृत्य करताना गुणगुणणे चालू असते. त्याला ढोलाची साथ असते. ढोलवादक समुहाचा नायक असतो. ढोलवादक ज्याप्रमाणे ढोलावर टिपरी मारतो त्याप्रमाणे नृत्याचा प्रकार चाल बदलतो. ढोलवादकाचा हावभाव, त्याच्या पायांची हालचाल महत्त्वपूर्ण असते. तो आवाजामध्ये चढउतार करतो, त्याक्षणी नृत्याला गती आणि हळुवारपणा  येत असतो. सनई, सूर, तुतारी नृत्यास ताल निर्माण करतात. नृत्य करणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात त्यामुळे उत्साह निर्माण होतो. गजनृत्याच्या पंचावन्न प्रकारांपैकी उपलब्ध असलेल्या नऊ-दहा प्रकारांना घाय असे म्हणतात. कापसी घाय, थोरली घाय, गळा मिठी घाय, रिंगन घाय, घोड घाय, टिपरी घाय, दुपारतीची घाय, इत्यादी. एक घाय बारा ते पंधरा मिनिटे चालते. नृत्य तीन तास चालत असते.
अनेक लोकनृत्याप्रमाणे  गजीढोल हा नृत्यप्रकार हि फार जोशपूर्ण असा आहे. तो फक्त पुरुष मंडळी सादर करतात. ग्रामीण महाराष्ट्रातील यात्रा, जत्रा, सप्ताह, भंडारा, वालुग, दिवाळी , दसरा, यासह अनेक महत्वाच्या कार्यक्रमा च्या ठिकाणी  गजनृत्याचे  सादरीकरण केले जाते. चपळता, कल्पकता, बुद्धिमत्ता आणि नैसर्गिक रचनाबद्ध असा तो नृत्यप्रकार असल्याने गजीढोल या नृत्याची रचना वैशिष्‍ट्यपूर्ण आहे. गजीढोल खेळत असताना चांगभलं चा तसेच यळकोट यळकोट जय मल्हार' असा मुक्त जयघोष केला जातो. एक वैशिष्ट्य म्हणजे वाद्यांच्या तालावरून रांगडे स्वर, खणखणीत आवाज आणि जोशपूर्ण वातावरणात केलं जाणारं जोमदार गजनृत्य! आरेवाडी  परिसरातल्या अशा एका चैतन्यपूर्ण गजनृत्याचा पथकाचा समावेश दिल्लीच्या प्रजासत्ताकदिनाच्या संचालनात करण्यात आला होता, आणि परदेशातही  ते सादर करण्याची संधी त्या कलाकारांना मिळाली होती. हि नक्कीच आनंदनीय अशीच बाब म्हणावी लागेल. आमच्या आधुनिक शिकलेल्या पिढीने माणदेशाची हि लोकनृत्य कला समजावून घेतली पाहिजे.  हल्ली लग्नाच्या वरातीमध्ये डॉल्बीच्या तालावर बेधुंदपणे   झिंगाट होऊन नाचणारी तरुणाई पाहतो त्यावेळी  मला या पूर्वी च्या लग्नातील वरातीमध्ये नाचणारी गजी ढोल पथके आणि लेझम पथके आठवतात. मित्रानो गजिढोल हि आपल्या समाजाची परंपरा आहे. ती काळाच्या ओघात इतिहातात दडप होऊ नये हीच छोटीशी अपेक्षा......।

श्री पोपटराव यमगर
बाळेवाडी ता आटपाडी
7709935374