विवेक विचार

विवेक विचार

रविवार, ३१ डिसेंबर, २०१७

2017 वर्षातील जमाखर्चाचा ताळेबंद

2017 या  वर्षाचा आज शेवटचा दिवस......
उद्याच्या नविन वर्षाची सुरवातीची ओढ आपल्या प्रत्येकाला लागली आहे. त्या 2018 या नविन वर्षामध्ये नवचैतन्याने प्रवेश करायचाच आहे. तत्पूर्वी 2017 या वर्षातील काही बऱ्या वाईट आठवणी  माझ्या दृष्टिकोनातून मांडण्यासाठी. हा छोटासा लेखप्रपंच...  2017 या वर्षातून बरेच काही शिकलो. नवनविन विचारांचे  प्रवाह अनुभवता आले.  चौफेर वाचनाबरोबरच चौफेर विचार करून लेखन करण्याची समग्र अशी लेखणी होती तिलाच अधिक प्रगल्भतेकडे नेण्याचा प्रयत्न काही प्रमाणात यशस्वी झाला. बऱ्याच वर्तमानपत्रांकडून काही लेखांची दखल घेतली गेली. त्याचबरोबर अनेक नामवंत अश्या सन्माननीय व्यक्तीकडून प्रेरणा मार्गदर्शन आणि शुभेच्छा हि मिळाल्या... हे माझ्या दृष्टीने आनंदाचे क्षण आहेत. २०१७ या वर्षांतील माझा जो संकल्प होता तो म्हणजे इंग्रजी भाषा लिहिता बोलता आली पाहिजे... तो संकल्प पूर्ण करण्यात मी बऱ्याच प्रमाणात यशस्वी झालो आहे. मी माझ्या मनातील बरेच ठरवलेले संकल्प काही प्रमाणात पुर्ण करण्यात यश मिळाले आहे. परंतु जे पुर्ण होऊ शकले नाहीत ते येणाऱ्या वर्षात पुर्ण करण्याचा माझा मानस असेल.....
    वर्षभर तुमच्या सारख्या मित्रांच्या साथीने काम करत असताना खेळीमेळी च्या वातावरणात  २०१७ हे वर्ष कसे संपले हे सुद्धा समजले नाही. 
राष्ट्रीय भावना मनात ठेऊन राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, तसेच विविध क्षेत्रातील वास्तविक समस्यांवर  मांडलेले सणसणीत विचार आपल्यापर्यंत या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत  पोहचविण्याचा. छोटासा प्रयत्न करतो आहे.  याच बरोबर आपल्याला वर्तमानकाळात काम करत असताना आपली स्फूर्ती आणि प्रेरणा कायम प्रफुल्लित राहण्यासाठी  आपला उज्वल आणि गौरवशाली इतिहास माहित असणे गरजेचे आहे... यासाठी कधी कधी त्यावरती छोटे मोठे लेख लिहून मनाला ऊर्जा देण्याचे एक छोटसं  कार्य करण्याचा प्रयत्न करतो आहे.
खरंतर मला हरण्याची भीती कधीच वाटत नाही कारण मी जे काही निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय ते शून्यातून करतोय.... पाठीशी आईवडिलांचे आशीर्वाद आहेत. डोक्यात स्वामी विवेकानंदजी , छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले , राजमाता अहिल्यादेवी होळकर  यांचे विचार आहेत आणि तुमच्या सारख्या मित्रांची साथ आहे की जिथे हरण्याची कल्पनाच करवत नाही.
 सरत्या वर्षात चांगले वाईट खूप अनुभव  आले. काही गमावलं असेल तर खुप जवळची चांगल्या विचारांच्या माणसाना गमावलं...  Dreams  group  मधुन काही कारणास्तव बाहेर पडावं लागलं... अगदी ह्रदयाजवळची काही माणसेही दूर झाली, पण तितकीची जवळही आली... जीवनामध्ये संकटे अडचणी ह्या येतच राहतात फक्त त्या अडचणींना सामोरे सकारात्मक दृषटिकोनातून कसे जायचे हेही शिकलो. गेल्या वर्षभरात केलेल्या संघर्षातून जीवन कसं जगायच हे ही जीवनातील अनुभवाच्या शाळेतुन शिकलो ....  २०१७ मध्ये माझ्या दृष्टीने सकारात्मक जर   कोणता अनुभव असेल तर तो म्हणजे आदरणीय तुकाराम मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला भेटणे...
त्यांच्याकडून एक तत्व मात्र मी शिकलो ते म्हणजे 'कोणतंही काम करत असताना ते काम समाज हिताचे असेल  (public interest) आणि नियम व कायदा  (rules and law) याच्या चौकटीत बसणारे असेल तर कोणाचाही  विरोध असला तरी ते काम अवश्य करा... तो विरोध वैयक्तीक स्वार्थासाठी (self interest )असेल पण तुमच्या कामामुळे देशाचे हित असणार आहे. 
वर्षाच्या शेवटी नम्रपणे एक सांगु इच्छितो की, माझ्या काही  लेखाच्या मुळे चुकून काही मित्र मैत्रीनींचे, बंधू भगिनीचे, राजकीय कार्यकर्त्यांचे मन दुखावलं  असेल तर मोठ्या मनाने माफ करा .. माझ्या मनामधे सामाजिक जनजागृतीचा आणि चांगले विचार आपल्यापर्यंत पोहचविण्याचा हेतु हा शुद्धच आहे त्यामुळे काही वेळा आपल्याच चुकलेल्या माणसांच्या वरती प्रहार करावे लागतात. वास्तववादी परिस्थिती समजावून घेऊन त्यावरती परखडपणे मत व्यक्त करणे कोणत्याही सर्वांगीण विचार करणाऱ्या  लेखकाचे आद्य कर्तव्य असते तेच कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करतोय......
 तुम्हा सर्वांनीं माझ्या लेखाला दिलेला प्रतिसाद नक्कीच आत्मविश्वास वाढविणारा असाच आहे . नक्कीच येथून पुढे  अजून  चौफेर कश्या पद्धतीने लेखन होईल यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील असा विश्वास तुम्हाला देतो.. माझ्या मनात खूप साऱ्या आशा, अपेक्षा, स्वप्न मनात आहेत. त्या येणाऱ्या वर्षात पूर्ण करण्याचा 100% प्रयत्न असणार आहे.
येणारे २०१८ हे नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुखाचे, समृद्धीचे,भरभराठीचे जाओ.... हीच ईश्वर चरणी प्रार्थना।
सर्व बंधू, भगिनी , मित्र, मैत्रिणी, या सर्वांना नवीन वर्षाच्या कोटी कोटी शुभेच्छा ।।

धन्यवाद....
श्री. प्रतिक यमगर
बाळेवाडी, आटपाडी,  सांगली.
७७०९९३५३७४

शनिवार, ३० डिसेंबर, २०१७

नवीन वर्षा बद्दलच्या समज गैरसमजाबाबत

नमस्कार मित्रांनो, 
नवीन वर्षा बद्दल अनेक मेसेज आपल्या वाचनात येत आहेत. काहींचे मत असे आहे की आपले नववर्ष गुढीपाडव्याला असते त्यामुळे आम्ही गुढीपाडव्याला च शुभेच्छा देणार....  नववर्ष गुढीपाडव्याला असते या मताशी मी सहमत आहे परंतु सध्याच्या  विज्ञान आणि तंत्रद्यानाच्या युगात जागतिक स्थरावर ज्या दिनदर्शिकेचा वापर जास्त केला जातो तसेच  ज्या दिनदर्शिके चा वापर आपण आपल्या दररोजच्या जीवनात करत असतो त्या नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या किंवा स्विकारल्या तरी काही हरकत नाही. कारण आपल्या मराठी महिन्या प्रमाणे फार कमी व्यवहार चालतात सगळीकडे याच  तारखा, वेळ, कॅलेंडर प्रमाणे व्यवहार होत आहेत. खरंतर हे कॅलेंडर आपल्या दररोजच्या जगण्याशी सबंधित झाले आहे... मराठी महिने ही जास्तीत लोकांना माहीत नसतात अर्थात त्यांची काहीच चुकी नाही कारण आपल्या दररोजच्या जगण्यात याचा संबंधच कुठे नसतो...  अगदी पौर्णिमा अमावस्या सुद्धा जरी मराठी महिन्या नुसार वाटत असल्या तरी याच कॅलेंडर मध्ये आपण पाहतो. त्यामुळे नवीन स्वागत आपण सर्वांनी आनंदाने केलं पाहिजे...
फक्त ते करत असताना आपली संस्कृती काय आहे याचेही आत्मभान आपण ठेवणे गरजेचं आहे. जीवनामध्ये एन्जॉय असावा याबद्दल माझ्या मनात तरी नक्कीच दुमत नाही परंतु तो एन्जॉय करत असताना इतर समाजाला काही त्रास होणार नाही तसेच आपल्या संस्कती ला कोणताही तडा जाणार नाही याचा विचार आपण केला पाहिजे. खरंतर यामुळे आपले शरीर आणि  मनही निरोगी राहण्यास मदत होते. अर्थात हल्ली एन्जॉय,  मनोरंजनाच्या संकल्पना बदलल्या आहेत.. पण माझ्या मते व्यसन म्हणजे एन्जॉय नाही....   आपण ते समजण्या इतपत प्रगल्भ नक्कीच आहोत.... 
🖋 प्रतिक यमगर

काल कमला मिल कंपाऊंड या अनधिकृत इमारतीत आग लागून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात...

काल कमला मिल कंपाऊंड या अनधिकृत इमारतीत आग लागून झालेल्या दुर्घटनेमुळे अनधिकृत बांधकामाचा मुद्दा चर्चेत आला आहे. आदरणीय मुंढे साहेब नवी मुंबईचे आयुक्त असताना अनेक अनधिकृत बांधकामे कोणत्याही नेत्यांची भीडभाड न ठेवता जमीनदोस्त केली होती त्यावेळी सर्व राजकीय पक्षातील  सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी मुंढे साहेबांच्या अनधिकृत बांधकामाबाबतच्या मोहिमे विरोधात एकत्र आले होते. अगदी महापालिकेत ठराव ही पास केला होता. परंतु आदरणीय मुंढे साहेबांनी कोणत्याही राजकीय विरोधाला न डगमगता  प्रामाणिक आणि कार्यक्षम पणे भ्रष्ट व्यवस्थेविरोधात काम हाती घेतले होते. अखेर राजकारणी, बिल्डर आणि अधिकारी या लॉबीने मुंढे साहेबांच्या सारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याची बदली घडवून आणली...
फक्त सांगण्याचा मुद्दा इतकाच होता की आपण एखादी घटना घडल्यानंतर त्या गोष्टीकडे जास्त लक्ष देतो. मग पुन्हा त्या घटनेस जबाबदार असणाऱ्या ना काढून टाकले जाते. पण जीव जातो तो सर्वसामान्य माणसांचा..... गेलेले जीव काय कितीही कारवाई केली तर पुन्हा येऊ शकत नाहीत. एखादी दुर्घटना   घडूच नये यासाठी आपण आपत्ती पूर्व व्यवस्थापन किती करतो...  आणि आपत्तीपूर्व  व्यवस्थापन करतो त्याला आपण किती साथ देतो??   हा खरा प्रश्न आहे. 
त्या  कमला मिल कंपाऊंड चे अगोदरच अनधिकृत बांधकाम होऊ दिले नसते तर आज इतक्या जनाचा जीव गेलाच नसता...
अनेक राजकीय नेते एखादी दुर्घटना घडली की जनतेची सहानुभूती मिळावी यासाठी त्या दुर्घटना स्थळाला भेट देतात,(अगदी त्या घटना स्थळाला स्पिकनिक स्पॉट चे स्वरूप आणतात) काही प्रमुख पदाधिकारी माध्यमांना भावनिक  प्रतिक्रिया देतात परंतु आधीच जर अशा गैरव्यवहाराना साथ दिलीच नसती तर ती दुर्घटनाच घडली नसती...   ही खरी वस्तस्थिती आहे...
✒ प्रतिक यमगर
 बाळेवाडी, ता. - आटपाडी,
जि.- सांगली.
७७०९९३५३७४