मंगळवार, १९ जुलै, २०१६

गुरुपौर्णिमेनिमीत्त मनाच्या गाभाऱ्यातून.... ✍✍✍✍✍✍

                 आज आषाढी पौर्णिमा अर्थातच भारतामध्ये गुरु पौर्णिमा म्हणून  साजरी केली जाते.  गुरूपौर्णिमा हा गुरूपूजनाचा दिवस. .....आज आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरूजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.  आपल्या भारतीय संस्कृतीत मध्ये देवदेवता ह्यांना जितके महत्त्व आहे. त्यापेक्षा थोड अधिकच महत्व गुरूंना आहे.  गुरूंच्या मानवी जीवनातल्या जडण घडणी मध्यें गुरूचे स्थान हे खूप महत्वाचे  आहे. ज्यांच्यामुळे आपल्या जीवनाला आकार मिळतो. ज्यांच्यामुळे आपलं व्यक्तिमत्व घडतं. जे  आपल्याला अडचणीच्या वेळेस योग्य मार्गदर्शन करतात. लढण्यासाठी ऊर्जा, उमेद देतात, आपल्यामध्ये  आत्मविश्वास निर्माण करतात.  जर  आपल्या आयुष्याचा रस्ता चुकत असेल तर योग्य दिशा देण्याचं  काम करतात ते आपले गुरु होत. प्रथम मी माझ्या आई वडिलांना गुरु मानतो. ज्यांनी मला हे सुंदर जग दाखविले. ज्यांनी माझ्यावर चांगले संस्कार केले.  ज्यांच्यामुळे माझं या जगात अस्तित्व आहे त्या माझ्या आई आणि वडिलांना मी माझे प्रथम गुरु समझतो.
                  आईवडिलांच्यानंतर  मी वाचलेल्या पुस्तकांनाच माझा गुरु समजतो. त्यांनीच मला विचार करण्याची दृष्टी दिली. अन्याय अत्याचारा विरुद्ध व्यक्त होण्यासाठी लेखणी म्हणून  शस्त्र हाती दिले. पुस्तकांनीच देशाची अनादिकालीन संस्कृती, माती आणि गौरवशाली इतिहास समजावून सांगितला आणि त्यातूनच तो अभिमानास्पद इतिहास सांगण्याचं कौशल्य प्रपात झाले, याचा मला मनोमनी आनंद आहे.  अर्थात आयुष्याच्या शेवटपर्यंत खूप समग्र वाचनाची इच्छा आहे. वाचनाची भूक कधीच  भागणार नाही हे ही त्रिवार सत्य आहे.  या बदलत्या आधुनिक जगात  जगायचं  कसं हे पुस्तकांनीच सांगितले.यानंतर मला माझ्या शालेय जीवनापासून आजपर्यंत अनेक आदर्श शिक्षक अर्थातच गुरु मला भेटत गेले. त्यांनी दिलेले  ज्ञान  याचा आयुष्याच्या प्रत्येक  वाटेवर त्याची  राहील. शालेय जीवनात ज्ञान, कला, विज्ञान ह्यांचे जे आपल्याला धडे देतात ते शिक्षक-शिक्षिका, आपण कोण आहोत, आपल्या जन्माच कारण काय, प्राप्त जन्माची खरी सार्थकता कशी सिद्ध कराल  ह्याचे मार्गदर्शनही आपले गुरूच करतात. अशा शाळेपासून ते विद्यापीठापर्यंतच्या अनेक व्यक्तीमत्वांमधून ते गुरूतत्त्व आपण अनुभवत असतो. जेव्हा कर्तृत्वाने मोठा होऊन शिक्षकांच्या समोर आपण जातो तेव्हा खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमा साजरी केल्याचे समाधान शिक्षकांनाही आणि आपल्यालाही मिळते . आजही अनेक ध्येयवेडे शिक्षक आहेत. आदर्श कल्पना डोक्यात घेऊन झपाटलेले कृतिशील, उपक्रमाशील शिक्षक समाजात आहेत. शिक्षक अर्थातच गुरु हा खऱ्या अर्थाने समाजाचा शिल्पकार असतो.

✍✍✍✍✍✍✍✍ पोपटराव यमगर
07709935374

सोमवार, १८ जुलै, २०१६

********कोपर्डीतील धुमसणारया सामाजिक अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध माझ्या लेखणीतुन मांडलेले सणसणीत आणि झणझणीत विवेक प्रहार .....✍✍✍

अहमदनगर जिल्ह्यामधील कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात एका नववीत शिकणार्या मुलीवर पाच हरामखोर नराधमांनी सामुहिक बलात्कार करुन अतिशय निघृण पद्धतीने तिच्या शरीराचे हालहाल करत तिची हत्या केली. ही बातमी वाचली, ऐकली, पाहिली आणि मन सुन्नच झाले. विचारांच काहुर माजलेल्या सैरभैर डोक्यामधे मेंदु धुमसत राहिला, आणि त्या धुमसणार्या मेंदुतुन छोट्या भगिनीवर झालेल्या अन्याय अत्याचारावर आपण आपली लेखणी उचलली पाहिजे असं मनाच्या गाभार्यातुन वाटलं म्हणुन लेखणी उचलली आणि त्या लेखणीतुन सणसणीत निघालेले प्रहार तुमच्यासारख्या संवेदनशील सुशिक्षीत आणि सुसंस्कृत वाचकांसमोर मांडत आहे.
                      संपुर्ण जगाच्या पाठीवर ईश्वराची सुद्धा स्त्रीरुपामधे पुजा करणारे बहुधा आपली एकमेव संस्कृती आहे. एवढेच नाहीतर आपण आपल्या देशाला भारतमाता म्हणतो. आपल्यासाठी ही मायभुमी आहे मातृभुमी आहे. पण सध्याच्या काही घटना (कोपर्डीसारख्या) पाहिल्या की मान शरमेने खाली जाते. तुमच्या माझ्या या संस्कृतीनं महान आसणार्या राज्यात, देशात स्त्रियावर होणारया अत्याचाराचे दिवसेंदिवस वाढणारे प्रमाण नक्कीच माझ्यातरी मनावर घावच घालुन जाते. आणि मग मनातुन काही हुंकार उमटत राहतात ते म्हणजे आमच्या या लिंगपिसाट झालेल्या हरामखोर नराधमांना नेमकं झालंय तरी काय??? जर खरंच यांना मर्दुनकीचा इतकाच घंमड आणि गर्व असेल तर या लिंगपिसाट झालेल्या हरामखोरांची मर्दानकी शांत करण्यासाठी छत्रपतींचाच कलम कायदा अंमलात आणावा लागेल. छत्रपतींच्या स्वराज्यामधे "स्त्री वर हात उचलणार्याचे म्हणजेच छेडछाड बलात्कार करणार्याचे हातपाय कलम केले जातील" असा सक्त आदेश होता. या आदेशासमोर सगळेच समान होते. हा आदेश गावच्या रांझ्या पाटलाने मोडला म्हणुन त्याचे हातपाय कलम केले गेले. आज घडत असलेल्या घटनावर सुद्धा आजच्या सरकारने छत्रपतीचे हे कलम अंमलात आणले पाहिजे असं माझं ठाम मत आहे.
                       आपल्या असल्या पौरुष्यार्थामध्ये असलेल्या नालायकीने आई-बापाला मान खाली घालायला लावण्यात कसला आला आहे पुरुषार्थ? हिजड्यासारखं वागणं आणि बोलणं असणारे हे कसले मर्द? मुलींना आचकट विचकट अश्लील बोलण्यात आणि छेडण्यात कसली आलीय मर्दानगी? ... मर्द तर ते होते ज्यांनी स्वतःचे जीवन राष्ट्राचे जीवन बनवले. देशासाठी, समाजासाठी, अखंड आयुष्य वेचले. अत्यंत नितीमान जीवन जगत राजा असतांनाही राज्याचा उपभोग न घेता केवळ रयतेसाठी स्वराज्य निर्माण करणारे शिवाजीराजे मर्द होते. आपली ही अनादीकालीन भारतीय संस्कृती ही जगभरामधे पोहचविणारे स्वामी विवेकानंदजी मर्द होते, रोज मरणप्राय यातना सोसत औरंग्याच्या अमिषांना लाथाडुन मृत्यूवर विजय प्राप्त करणारे संभाजीराजे मर्द होते. स्वतःचे तारुण्य क्रांतिच्या लढ्यात भिरकावून देणारे, अनेक सुंदर सुंदर तरुणी मागे लागल्या असताना त्यांच्याकडे पाठ फिरवून स्वातंत्र्यासाठी तारुण्य खर्च करत हसत हसत फासावर जाणारे भगतसिंह, सुखदेव, राजगुरु मर्द होते. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून इंग्रजाना टक्कर देणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई मर्द होती. चहुबाजुंनी कौटुंबिक दुःखे कोसळत असतानाही माळव्यावर सल्लग तीस वर्ष राज्य करणार्या लोकमाता अहिल्यादेवी मर्द
होत्या असे असंख्य मर्द या भारताच्या मातीत जन्मास आले. या तमाम मर्दांच्या कर्तृत्वाने पावन झालेली ही भुमी सध्याच्या हुल्लडबाज आणि लफडेबाज युवावर्गामुळे कलंकीत होत आहे. व्यसनाधीन, वासनांध, पाश्चात्यांच्या भोगवादी अश्लील संस्कृतीच आकर्षण, मुलींना आचकट विचकट बोलणं, गुंडगिरी अशा बिघडणार्या तरुणाईला या देशाची माती आणि इतिहास गालाखाली सणसणीत चपराक देऊनच सांगावाच लागेल. आपल्यासारख्या नवयुवकांनी आपली ही माती आणि माता समग्र बुद्धीने समजाऊन घेतली पाहिजे. आणि जर कोणी नराधम चुकीचे वागत असल्यास तिथेच ती प्रवृत्ती ठेचुन काढली पाहिजे आणि पुन्हा त्याचं स्त्रीकडे वाकड्या नजरेनं पाहण्याचं धाडसही झालं नाही पाहिजे. समाजातील चांगली माणसंच कोपर्डीसारख्या घटना भविष्यात रोखु शकतील. नाहीतर सरकारने कितीही कठोर कायदे केले तरीही ही अमानुष प्रवृत्ती सहजासहजी थांबेल अशी सुतराम
कोणतीही शक्यता नाही. अशा घटनांच्याबद्दल मुळात समाजातुनच जागृती हवी आहे आणि जर आपणासारख्या सुशिक्षीत आणि सुसंस्कृत युंवकांनी ती समाज जागृतीची
मशाल हाती घेतली तरच उदयाचा वैभवशाली आणि अत्याचारमुक्त चांगला समाज उभा राहु शकेल असं मला वाटतं.

धन्यवाद...
✍✍✍✍✍✍पोपटराव यमगर
आटपाडी, सांगली
०७०९९३५३७४

सोमवार, ११ जुलै, २०१६

........... ........... ........... जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने ........... ........... ........... ...........


                      आज ११ जुलै. म्हणजेच जागतिक लोकसंख्या दिन आहे. सध्या लोकसंख्या झपाट्याने वाढते आहे. जगातील वाढत्या लोकसंख्येच्या समस्यांविषयी लोकांच्या मनात जागरुकता निर्माण  करण्यासाठी दरवर्षी ११ जुलैला जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. आज वाढत्या लोकसंख्येमुळे बेरोजगारी, दारिद्रय़, एक वेळची भूक भागविण्याची धडपड, वाढती गुन्हेगारी, ढासळणाऱ्या पर्यावरणाचा असमतोल यामुळे कमी होणारी वने, जंगलतोड, वाढते स्थलांतर असे आजचे चित्र दिसत आहे. लोकसंख्या वाढीचा परिणाम निसर्गावर झाल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. ही स्थिती बदलण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण हाच एकमेव उपाय आहे. भारताची लोकसंख्या जागतिक लोकसंख्येच्या 17 टक्के इतकी आहे. लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. वाढती लोकसंख्या ही भारताच्या आर्थिक विकासातील मोठा अडथळा आहे. दिवसेंदिवस लोकसंख्येचे वाढत जाणारे प्रमाण नक्कीच चिंताजनक आहे.
                      भारतामध्ये लोकसंख्या वाढीची कारणे अनेक आहेत.  दारिद्र्य असलेल्या कुटुंबात लोकसंख्या वाढण्याचे प्रमाण जास्त आहे. एकीकडे घरात दोनवेळच्या अन्नासाठी धडपडत असताना दुसरीकडे त्याच कुटुंबात वाढत्या मुलांचे प्रमाणही काळजाचा ठोका चुकवून जाते.  त्या कारणांचा शोध घेण्यासाठी गेले असता पुढील कारणे नक्कीच मनामध्ये स्पष्टपणे दिसून येतात.   निरक्षरता, भारतीय समाजात असणाऱ्या काही अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, दारिद्र्य, वंशाला वारस (दिवा) म्हणून मुलगाच हवा यासारख्या वेडपट समजूती यासारख्या कारणामुळे भारताची भरमसाठ लोकसंख्या वाढत आहे, वाढते आहे.  यातील वंशाला वारस अर्थातच दिवा मुलगाच हवा यासाख्या कारणामुळे तर मनात चीडच  येऊन जाते आणि धुमसणाऱ्या मनाला एक प्रश्न पडतो तो म्हणजे वंशाचा दिवा(मुलगा) लावण्यासाठी पणती(मुलगी) हवी का नको??  जर पणतीच नसेल तर दिवा लावणार कसा???   २१  व्या आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या शतकात जगत असतानाही आम्हाला वरील कारणांना सामोरे जावे लागते हे नक्कीच तुमचे माझे दुर्दैव आहे.
                    जागतिक महाशक्ती म्हणून आपला देश पुढे येत असताना लोकसंख्या वाढीवर नियंत्रण राखणे अतिशय आवश्यक आहे.  यासाठी कुटुंबनियोजन करणे  काळाची गरज आहे. देशाच्या विकासाच्या दृष्टीने लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कुटुंब नियोजन जितके महत्वाचे आहे तितकेच समाजातील प्रत्येक  कुटुंबाचे उज्वल  भवितव्य  घडविण्यासाठी  कुटुंब कल्याण  कार्यक्रमही तितकाच आवश्यक आहे.  जागितक लोकसंख्येच्या आकडेवारीत अग्रस्थानावर असलेल्या चीनचा लोकसंख्या वाढीचा दर भारतापेक्षाही कमी आहे. अनेक तज्ञाच्या मते २०२५ साली भारत हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्येचा देश असेल.  चीनने राबविलेले  ‘हम दो हमारा एक’ हे कुटुंब नियोजनाचे धोरण यशस्वी होत असल्याचे दिसून येत आहे. चीनच्या या धोरणाच्या धर्तीवर भारतानेही अनेक धोरणे,  योजना, कायदे आखले पण या सर्वांची अंमलबजावणी मात्र फार कमी प्रमाणात होताना दिसून येत आहे. लोकसंख्या वाढ नियंत्रणाविषयीच्या सरकारच्या धोरणाचा,  योजनांचा  सन्मान ठेऊन त्या आचरणात आणणे ही प्रत्येक सुजाण  भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे.
                      सध्याच्या लोकसंख्येचे आकडे पाहिले तर मुलांचं म्हणजेच १५ वर्षाखालील व्यक्तींचं प्रमाण ३१ %, कमावत्या वयातील म्हणजेच १५ ते ५९ वयोगटातील व्यक्तींची संख्या ६० % आहे, आणि ज्येष्ठ नागरिकांची म्हणजेच ६० वर्षावरील व्यक्तींची संख्या ९% आहे.  भारताच्या लोकसंख्या वाढीतील जमेची बाजू जर कोणती असेल तर ती म्हणजे  तरुणांची वाढती संख्या. परंतु या नव्या पिढीला चांगल्या दर्जाचे शिक्षण आणि रोजगाराच्या संधी पुरवण्याची नितांत गरज आहे. जर या युवकांना चांगले शिक्षण आणि रोजगार मिळाला तर हीच वाढती लोकसंख्या देशाच्या आर्थिक विकासातील ओझं ठरणार नाही तर ती एक देशाची आर्थिक संपत्ती असेल असं म्हणायला काही हरकत नसावी असे  मला वाटते..

धन्यवाद....
✍✍✍पोपटराव यमगर
07709935374