काल आपल्या आटपाडी तालुक्याविषयी लिहिलेल्या शैक्षणिक विषया संबधीच्या लेखाला आपल्या सारख्या सुशिक्षीत आणि जागृत वाचकांच्या कडुन खुप चांगला प्रतिसाद मिळाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं प्रथमतः मनपुर्वक धन्यवाद मानतो. आजचाही लेख कसा वाटला जरुर कळवा.. काही चुका उणिवा असतील तर तसंही सांगा. त्यामधे नक्कीच दुरुस्ती केली जाईल.
भौगोलिक दृष्ट्या सांगली जिल्ह्याच्या उत्तरेला असणारा आणि वर्षानुवर्षे कायमच दुष्काळाने पिचलेला तालुका अशी ओळख सांगली जिल्ह्यात आटपाडी या तालुक्याची आहे. सांगली जिल्हा तसा राजकारण्यांचा जिल्हा म्हणुन महाराष्ट्राच्या राजकारणात प्रसिद्ध आहे. माजी मुख्यमंत्री वसंतदादा, राजाराम बापु, माजी उपमुख्यमंत्री आर आर आबा या महाराष्ट्राचं नेतृत्व केलेल्या लोकप्रिय नेत्यांचा जिल्हा....महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात अर्धा डझन मंत्री फक्त सांगली जिल्ह्यातीलच असायचे. पण आटपाडी तालुक्याच्या जनतेला इतिहासात भौगोलिक, आर्थिक दुष्काळाबरोबर राजकीय दुष्काळही कायमच सहन करावा लागला आहे. तालुक्यात फक्त दोनच आमदार होऊन गेले ते म्हणजे सन्माननीय माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख आणि सन्माननीय माजी आमदार आण्णासाहेब लेंगरे......... या दोन्ही नेत्यांच्या शिवाय तालुक्यातील अजुन कोणताही नेता आमदार होऊ शकला नाही ही बोचरी खंत तालुक्यातील जनतेच्या मनामधे आहे. यानंतर मागील चार वर्षात सांगली जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद सन्माननीय अमरसिंह देशमुख यांना मिळाले होते. त्याचबरोबर सांगली जिल्हा परिषदेचं उपाध्यक्षपद स्वर्गीय मोहनकाकांना मिळालं होतं. तालुक्याच्या नेतृत्वांना जिल्हा स्तरावर मिळालेल्या या काही मोजक्या संधी आपल्याला ठळकपणे दिसुन येतात.
1995 ला अपक्ष म्हणुन आमदार झालेल्या सन्माननीय राजेंद्रआण्णा देशमुख यांनी आटपाडी तालुक्याचा पाणीप्रश्न मिटवण्यासाठी युती सरकारला पाठिंबा दिला होता. विशेष म्हणजे त्यावेळी राजेंद्रआण्णांना युती सरकारकडुन मंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होती.. मंत्रीपद झुगारुन पाणीप्रश्न सोडवा म्हणणारा नेता या तालुक्याला लाभला आहे.अपक्ष आमदारांच्या दबावामुळे युती सरकारने टेंभुचा नारळ फोडला, काही प्रमाणात कामे झाली, पण या योजनेकडे पुढे आघाडी सरकारच्या कार्यकाळात राजकीय दुर्लक्ष झाल्यामुळे त्या योजना पूर्ण न झाल्याने पाणीप्रश्न हा पुढेही तसाच प्रलंबित राहिला. राजेंद्र आण्णांची पाण्याच्या प्रश्नाविषयीची त्यांची तळमळ वाखाणण्याजोगी आहे. अत्यंत दुष्काळी परिस्थितीतही माणगंगा सहकारी साखर कारखाना , सूतगिरणी त्यांनी यशस्वीपणे चालवून दाखविली आहे. दुष्काळी भागातील सामान्य माणसांची पत निर्माण करुन बाबासाहेब देशमुख बॅक काढण्याचे आणि ती यशस्वीपणे चालविण्याचे कार्य सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सन्माननीय अमरसिंह देशमुख यांनी केले आहे. अनेक गरजुंना या बॅकेने आधार दिला आहे.दुष्काळी भागातील गोरगरीब शेतकर्यांना दररोजच्या दुग्ध व्यवसायातुन पैसा मिळावा यासाठी दुधसंघ स्थापन केला व तो आज अतिशय वेळच्या वेळी योग्य दराने दूध उत्पादकांना दुधाचे पैसे देऊन व्यवस्थितरित्या तालुक्यातील दुध व्यवसायाला चालना मिळत आहे. या दोन्हीही नेत्याचं एक अपयश म्हणजे तालुक्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजेच टेंभुच्या पाण्याचा प्रश्न ते त्यांच्या कार्य काळात सोडवू शकले नाहीत...
आटपाडी तालुक्याच्या राजकारणात आमदार अनिलभाऊ बाबर यांचे खंदे समर्थक आणि माजी जि. प. सदस्य तानाजी पाटील आणि स्वर्गीय रामभाऊ पाटील यांचे बंधु भारततात्या पाटील यांचे स्वतंत्र असे राजकीय गट आहेत. यांनीही तालुक्यातील राजकारणाला एक वेगळी दिशा दिली आहे. गेल्या जिल्हा परिषद व विधानसभा निवडणुकीत या गटांनी आपले वेगळे राजकीय अस्तित्व दाखविले. या दोन्हीही नेतृत्वाकडुन तालुक्याचं हित होणं अपेक्षीत आहे.
काॅग्रेसचे नेते स्वर्गीय मोहनकाका यांनी तालुक्यात त्यांना मिळालेल्या विविध पदाच्या माध्यमातुन विकासकामे करत तालुक्यात काॅग्रेसचं अस्तित्व ठेवण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यांच्या जाण्यानं तालुक्यात काॅग्रेसचं अस्तित्व कमी झालं आहे.
2009 पुर्वी तालुक्यात पक्षापेक्षा गटा तटांचे राजकारण चालत होतं. पण 2009 च्या विधानसभा निवडणुकीतील तसेच तालुक्याच्या राजकारणातील मा. गोपीचंद पडळकर या युवा नेत्याचा प्रवेशाने गटा तटांचे राजकारण संपुष्टात आणले. गेल्या आठ वर्षात आटपाडी खानापुरसह सांगली जिल्ह्यातील प्रस्थापित घराण्याच्या विरोधात आवाज उठवत विस्थापीत झालेल्या बहुजन समाजाची मोट बांधत आपल्या उत्तम अशा वक्तृत्व शैलीने अनेक नामवंत राजकारण्यांना घायाळ करत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातुन तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे युवा नेते सन्माननीय गोपीचंद पडळकर साहेब काम करत आहेत. शेतकर्यासाठी, कामगारांसाठी, गोरगरीब, दीनदलीत जनतेसाठी प्रंसगी पोलिसांच्या लाठ्या काठ्या खात टेंभुसाठी आक्रमक पद्धतीने आंदोलने, ओगलेवाडी टेंभु कार्यालय तोडफोड प्रकरण, मंत्र्याना तालुक्यात येण्यास बंदी, राजेवाडी पोट कालवा प्रकरण, दुष्काळी परिषदा यासह विविध माध्यमातुन जनतेप्रती असलेली आपुलकीची जाणीव जनमाणसात रुजविली. 2009 ची विधानसभा, 2012 ची करगणी जिल्हा परिषद, 2014 ची विधानसभा निवडणुकीत त्यांना नेहमीच अपयशाचा सामना करावा लागला. तरीही "जिंकलो तरी भुलणार नाही, हरलो तरी खचणार नाही, जनतेचे शिलेदार आम्ही, लढणे कधीच सोडणार नाही" असे म्हणत त्यांचा संघर्षाचा प्रवास चालुच आहे. गोपीचंद पडळकर या नेतृत्वाकडुन तालुकावासियांना खुप अपेक्षा आहेत. त्या अपेक्षांची अपेक्षापुर्ती कशी करतात त्यावरच त्यांचं पुढील राजकारण अवलंबुन असणार आहे.
तालुक्याच्या या प्रमुख नेत्यासह दिघंचीचे माजी सरपंच हणमंतराव देशमुख, करगणीचे माजी जिप सदस्य आणासाहेब पत्की, माजी जिप सदस्य, माजी सभापती विजयसिंह पाटील, धुळा मारुती झिंबल यांच्यासह विविध भागातील स्थानिक पातळीवरच्या पदाधिकारयांचा तालुक्याच्या राजकारणात महत्वाचा सहभाग असल्याचे आपणास दिसुन येते.
धन्यवाद।।
श्री. पोपटराव यमगर
बाळेवाडी, ता. आटपाडी,
जि. : सांगली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा