प्रथमतः आपले या ब्लॉगवर मनापासून सहर्ष स्वागत आहे.. आपल्याला मिळालेले दररोजचे सुंदर जीवन जगत असताना चांगल्या समाजासाठी माझ्या मनातून उमटलेले हुंकार या ब्लॉग सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहचवण्यास मला नक्कीच आनंद वाटतो आहे. इतिहासातील आपल्या पूर्वजांच्या शौर्याचा स्वाभिमान आणि वर्तमानातील विविध क्षेत्रातील काही घटनांवर निर्भीड आणि निपक्षपातीपणे व्यक्त केलेले माझे मत तुमच्यापर्यंत या ब्लॉगच्या माध्यमातून पोहचवण्याचा माझा छोटासा प्रयत्न...
विवेक विचार

मंगळवार, ३१ जानेवारी, २०१७
गुरुवार, २६ जानेवारी, २०१७
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटना समितीच्या 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाच्या अथक परिश्रमातून तयार केली गेलेली भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आली आणि त्या दिवसापासून भारतात लोकशाही मार्गाने प्रजेच्या हाती सत्ता आली, तो दिवस म्हणजेच आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन... आज आपण सर्वजण 68 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत, त्यानिमित्त प्रथमतः देशामध्ये प्रजेचं राज्य यावं यासाठी स्वतःच्या वैयक्तिक जीवनामध्ये त्याग आणि बलिदान देणाऱ्या सर्व महापुरुषांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन.
आज जगातील नव्या बदलांना आपला भारत देश सामोरे जात असताना मागील 67 वर्षातील चांगल्या वाईट गोष्टीच्या बेरजा वजाबाक्यांचा ताळेबंद लक्षात घेता एक निश्चितपणे दिसून येईल ते म्हणजे आपला भारत देश सकारात्मक दृष्टीकोनातून पुढे वाटचाल करतोय, यामध्ये माझ्या मनात तरी कोणतीच शंका नाही. देशाचे माजी राष्ट्रपती मा. अब्दुल कलाम साहेबांनीं देशाला महासत्ता करण्याचं पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपापल्या क्षेत्रात अविरत प्रयत्न करावे लागणार आहेत.
तुमच्या माझ्या समोर दररोजच्या दैनंदिन जीवनात अनेक प्रश्न, समस्या, आव्हाने आहेतच पण त्या आव्हानांना सामोरे जाण्याची ताकद भारतीय राज्यघटनेने तुम्हा आम्हाला दिली आहे. भारतामध्ये इतकी विविधता, धर्म, जाती, पंथ, भाषा आहेत तरीही भारत हा एकसंघ देश राहू शकतो याचा आदर्श आज आपण सर्वांनी जगासमोर ठेवला आहे. एवढेच नाहीतर जगातील सर्वात मोठा लोकशाही संपन्न देश म्हणून भारताची जगात ओळख आहे.
गेल्या वर्षभरात अनेक सकारात्मक गोष्टी देशाच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात घडून आल्या. त्यापैकीच एक म्हणजे देशाच्या रिझर्व्ह बँकेनं काळा पैसा आणि भ्रष्टचार विरोधी निश्चलीकरणाचा निर्णय घेतल्यानंतर देशातील सर्व जनतेनं याचं स्वागत केलं आणि रांगेत उभा राहण्याचा त्रास होऊनही भारतीय जनता सरकारच्या निर्णयाच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली.
जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे पहिले जातेय. नक्कीच उद्याच्या जगातील नेतृत्वापैकी भारत हा एक प्रमुख देश असेल अशी आशा मला वाटते.
देशाची एकात्मता विस्कळीत करण्यासाठी शेजारील पाकिस्थानकडून देशाच्या सीमारेषेवर वारंवार हल्ले केले जायचे, जात आहेत. पण या हल्ल्यांना एक जोरदार प्रत्यत्तर भारतीय जवानांनी 'लक्ष्यभेदी' कारवाई करून सगळ्या जगाला दाखवुन दिले की आमच्या देशावर हल्ले करणाऱ्याना आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ शकतो.
भारतीय राज्यघटने आपल्याला अनेक अधिकार/ हक्क दिले आहेत. आपण आपल्या देशाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्याचें पालन करणे गरजेचे आहे. मला वाटतं अधिकार आणि कर्तव्ये हि एकमेकांच्या हातात हात घालून जातात . जेवढे अधिकार महत्वाचे आहेत तेवढीच कर्तव्ये देखील आहेत.
ती कर्तव्य समजावून घेऊन त्याचे पालन करणे हीच आजची गरज आहे असे मला वाटते.
केंद्रसरकारमध्ये एक सकारात्मक दुरदृष्टिकोन असणारे नेतृत्व सत्तेमध्ये आहे. त्यांच्याकडून भारतवासीयांना खूप साऱ्या अपेक्षा आहेत . त्याची पुर्ती करण्यासाठी ते अहोरात्र काम करत आहेत. आपणही आपल्या मार्गाने आपल्याला जमेल तसं देशकार्य करत राहूया हीच एक छोटीशी सदिच्छा...
धन्यवाद..
✍श्री. पोपटराव यमगर
बाळेवाडी, ता. आटपाडी,
जि. सांगली.
7709935374
बुधवार, ११ जानेवारी, २०१७
राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ यांची आज 419 वी जयंती... जयंती निमीत्त
लाखो मावळ्यांच्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्या राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ यांची आज 419 वी जयंती...
जयंती निमीत्त त्यांच्या स्मृतीस
विनम्र अभिवादन..
"जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसते झाले शिवराय नी शंभू छावा…!
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसता मिळाला स्वराज्य ठेवा…!
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसते लढले मावळे…!
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसते दिसले विजयाचे सोहळे…!"
महाराष्ट्रासह भारत देश ज्यावेळी सततच्या परकीय आक्रमणाच्या वर्चस्वाखाली भरडला गेला होता, ज्यावेळी इथल्या माणसांच्या शरीरात ताकद होती पण स्वाभिमान शून्य होऊन दररोजची गुलामासारखी जीवन जगत होता, त्यावेळेला इथल्या गोरगरीब वंचित, सर्वसामान्य शेतकरी, मावळे यांना राजमाता जिजाऊनीं स्वराज्याचा विचार दिला. आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली हिंदवी स्वराज्य स्थापन केले.
आज वर्तमानात अनेक वेळा बोलले जाते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जर जन्मास यावयाचे असतील तर माँसाहेब जिजाऊ सारख्या आदर्श माता निर्माण होणे गरजेचे आहे. त्या आदर्श माता घडवण्यासाठी व दररोज आपल्या माता भागीनींवरील होणाऱ्या अत्याचारांच्या घटना रोखण्यासाठी आपण सुशिक्षित आणि संपन्न समाज
होऊया हीच राजमाता माँसाहेब जिजाऊंच्या जयंती दिनी मनोमनी सदिच्छा..
धन्यवाद....
✍✍पोपट यमगर
बाळेवाडी ता. आटपाडी
जि. सांगली
7709935374
भारताच्या तरुणांना प्रेरणा देणारे आदर्शवत व्यक्तिमत्व : स्वामी विवेकानंदजी
संपुर्ण जगाला आपली भारतीय संस्कृती आपल्या वाणीने आणि विचारांनी ज्यांनी समजावून सांगितली असे भारतमातेचे थोर सुपुत्र विश्वविजयी स्वामी विवेकानंदजी यांची आज जयंती.. त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन...
स्वामी विवेकानंदजी हे तुमच्या माझ्या सारख्या सळसळत्या नवरक्ताच्या नवतरुणासाठी नेहमीच आदर्श असे व्यक्तिमत्व आहेत. विवेकानंदजीनीं कोलंबोपासून अल्मोऱ्यापर्यंत ठिकठिकाणी युवकांना उद्देशून जी व्याख्याने दिली ती अत्यंत स्फूर्तिदायक अशीच आहेत. त्यामधून तुम्हाला मला सकारात्मक विचार करण्याची ताकद मिळते. त्याच स्वामी विवेकानंदजी यांच्या जन्मदिनी संपूर्ण भारतभर राष्ट्रीय युवक दिन साजरा केला जातो. हि नक्कीच आनंदाची आणि युवकांसाठी स्वामीजींचे चरित्र समजावून घेण्याची संधी आहे असे मला वाटते.
मला दररोजच्या जगण्यात लिहिताना, बोलताना आठवतात स्वामी विवेकानंदजी... जीवनाच्या वाटेवर चालत असताना कधी चुकीचं पाऊल पडलं तर स्वामीजींचे ते प्रखर शब्द मनाला गुंजन घालतात. आणि स्वामीजी विचारतात... "काय करतोयस तू"? कधी कधी अपयशाच्या, निराशेच्या, वेळेसही आठवतात ते स्वामीजींचे प्रेरणादायी विचार... " उठा। जागे व्हा। ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका!. याबरोबरच सन्माननीय व्यक्तींनी केलेल्या कौतुकाच्या वेळेसही सतत मनात जाणीव निर्माण होते कि आपल्यावरील जबाबदारी अजून वाढली आहे.
स्वामी विवेकानंदजी यांचं आयुष्य हे अनेक खाचखळग्यांनी, यशाअपयशानीं भरलेलं आहे. लहानपणी खोडकर, खट्याळ कशाचीही भीती दाखवून न भिणारा बालक विरेश्वर (लहानपणीचे नाव ..प्रेमाने बिले म्हणत असत), महाविद्यालयीन तरुणवयात कोणत्याहीं सांगोपांगी गोष्टीवर विश्वास न ठेवता तर्कनिष्ठ बुद्धीच्या आधारे अभ्यास करून स्वीकारणारा युवक नरेंद्र, ईश्वराला पाहण्यासाठी किंवा त्याच्या अनुभूतीसाठी व्याकुळ झालेला वीर नरेंद्र, ते पुढे भारतभर भ्रमण करताना भारतात असणाऱ्या दारिद्र्याची, जातीयतेची, विषमतेची जाणीव झालेला योद्धा नरेंद्र, दक्षिणेश्वरच्या कालीमातेच्या मंदिरात कालीमातेकडे ज्ञान दे.. विवेक दे... वैराग्य दे... भक्ती दे अशी प्रार्थना करणारा नरेंद्रनाथ.... 11 सप्टेंबर 1893 ला शिखागो येथील सर्वधर्मपरिषदेत आपल्या विश्वबंधुत्वाच्या विचारांनी संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध करणारे विश्वविजयी स्वामी विवेकानंदजी... किती अगम्य असा हा प्रवास ... नक्कीच त्यांच्या जीवनातून माझ्यासारख्या नवविचारांच्या आधुनिक भारतातील युवकांना सतत प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही.
सध्याच्या वर्तमानकाळात जगत असताना आपणास एक दिसून येते ते म्हणजे जग झपाट्याने बदलत आहे. या बदलत्या जगाबरोबरच हजारो वर्षांची दीर्घ अशी परंपरा असलेला तुमचा माझा भारत देश सुद्धा बदलतोय... घडतोय... एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात स्वामी विवेकानंदजींनी संपूर्ण भारतवासीयांना सांगितले., "जा साऱ्या जगाला सांगा, हि पुण्य पुरातन भारत भूमी पुन्हा एकदा जागी होत आहे." आजच्या तरुणाईमधे राष्ट्रप्रेम, ज्ञानाधिष्टीत संशोधन, वाचक, विज्ञानवादी , धर्म जात पंत यामध्ये भेदभाव न मानणारी , कौशल्य, आपण समाजाचे कायतरी देणं लागतो या विचाराने आपआपल्या परीने कार्य करणारी तरुणाई निर्माण होत आहे. जगामधे ज्या काही क्रांत्या झाल्या किंवा परिवर्तने घडून आली ती फक्त तरुणांच्या संघटीतपणामुळेच.. स्वामीजींच्या जयंतीदिनी स्वामीजींचं चरित्र समजावून घेऊन ते प्रत्येक युवकापर्यंत पोहचविण्यासाठी आपणासारख्या सुशिक्षीत तरुणांनी प्रयत्न करणं ही काळाची गरज आहे. शेवटी मनामध्ये प्रामाणिक एकच इच्छा., " मिळो प्रेरणा, अखिल जगाला, दिव्य विवेक विचाराने....!
धन्यवाद...
✍✍ पोपट यमगर
7709935374
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)