संपुर्ण जगाला आपली भारतीय संस्कृती आपल्या वाणीने आणि विचारांनी ज्यांनी समजावून सांगितली असे भारतमातेचे थोर सुपुत्र विश्वविजयी स्वामी विवेकानंदजी यांची आज जयंती.. त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन...
स्वामी विवेकानंदजी हे तुमच्या माझ्या सारख्या सळसळत्या नवरक्ताच्या नवतरुणासाठी नेहमीच आदर्श असे व्यक्तिमत्व आहेत. विवेकानंदजीनीं कोलंबोपासून अल्मोऱ्यापर्यंत ठिकठिकाणी युवकांना उद्देशून जी व्याख्याने दिली ती अत्यंत स्फूर्तिदायक अशीच आहेत. त्यामधून तुम्हाला मला सकारात्मक विचार करण्याची ताकद मिळते. त्याच स्वामी विवेकानंदजी यांच्या जन्मदिनी संपूर्ण भारतभर राष्ट्रीय युवक दिन साजरा केला जातो. हि नक्कीच आनंदाची आणि युवकांसाठी स्वामीजींचे चरित्र समजावून घेण्याची संधी आहे असे मला वाटते.
मला दररोजच्या जगण्यात लिहिताना, बोलताना आठवतात स्वामी विवेकानंदजी... जीवनाच्या वाटेवर चालत असताना कधी चुकीचं पाऊल पडलं तर स्वामीजींचे ते प्रखर शब्द मनाला गुंजन घालतात. आणि स्वामीजी विचारतात... "काय करतोयस तू"? कधी कधी अपयशाच्या, निराशेच्या, वेळेसही आठवतात ते स्वामीजींचे प्रेरणादायी विचार... " उठा। जागे व्हा। ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका!. याबरोबरच सन्माननीय व्यक्तींनी केलेल्या कौतुकाच्या वेळेसही सतत मनात जाणीव निर्माण होते कि आपल्यावरील जबाबदारी अजून वाढली आहे.
स्वामी विवेकानंदजी यांचं आयुष्य हे अनेक खाचखळग्यांनी, यशाअपयशानीं भरलेलं आहे. लहानपणी खोडकर, खट्याळ कशाचीही भीती दाखवून न भिणारा बालक विरेश्वर (लहानपणीचे नाव ..प्रेमाने बिले म्हणत असत), महाविद्यालयीन तरुणवयात कोणत्याहीं सांगोपांगी गोष्टीवर विश्वास न ठेवता तर्कनिष्ठ बुद्धीच्या आधारे अभ्यास करून स्वीकारणारा युवक नरेंद्र, ईश्वराला पाहण्यासाठी किंवा त्याच्या अनुभूतीसाठी व्याकुळ झालेला वीर नरेंद्र, ते पुढे भारतभर भ्रमण करताना भारतात असणाऱ्या दारिद्र्याची, जातीयतेची, विषमतेची जाणीव झालेला योद्धा नरेंद्र, दक्षिणेश्वरच्या कालीमातेच्या मंदिरात कालीमातेकडे ज्ञान दे.. विवेक दे... वैराग्य दे... भक्ती दे अशी प्रार्थना करणारा नरेंद्रनाथ.... 11 सप्टेंबर 1893 ला शिखागो येथील सर्वधर्मपरिषदेत आपल्या विश्वबंधुत्वाच्या विचारांनी संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध करणारे विश्वविजयी स्वामी विवेकानंदजी... किती अगम्य असा हा प्रवास ... नक्कीच त्यांच्या जीवनातून माझ्यासारख्या नवविचारांच्या आधुनिक भारतातील युवकांना सतत प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही.
सध्याच्या वर्तमानकाळात जगत असताना आपणास एक दिसून येते ते म्हणजे जग झपाट्याने बदलत आहे. या बदलत्या जगाबरोबरच हजारो वर्षांची दीर्घ अशी परंपरा असलेला तुमचा माझा भारत देश सुद्धा बदलतोय... घडतोय... एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात स्वामी विवेकानंदजींनी संपूर्ण भारतवासीयांना सांगितले., "जा साऱ्या जगाला सांगा, हि पुण्य पुरातन भारत भूमी पुन्हा एकदा जागी होत आहे." आजच्या तरुणाईमधे राष्ट्रप्रेम, ज्ञानाधिष्टीत संशोधन, वाचक, विज्ञानवादी , धर्म जात पंत यामध्ये भेदभाव न मानणारी , कौशल्य, आपण समाजाचे कायतरी देणं लागतो या विचाराने आपआपल्या परीने कार्य करणारी तरुणाई निर्माण होत आहे. जगामधे ज्या काही क्रांत्या झाल्या किंवा परिवर्तने घडून आली ती फक्त तरुणांच्या संघटीतपणामुळेच.. स्वामीजींच्या जयंतीदिनी स्वामीजींचं चरित्र समजावून घेऊन ते प्रत्येक युवकापर्यंत पोहचविण्यासाठी आपणासारख्या सुशिक्षीत तरुणांनी प्रयत्न करणं ही काळाची गरज आहे. शेवटी मनामध्ये प्रामाणिक एकच इच्छा., " मिळो प्रेरणा, अखिल जगाला, दिव्य विवेक विचाराने....!
धन्यवाद...
✍✍ पोपट यमगर
7709935374
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा