मानवी संस्कृतीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे माणसाने केलेली स्वतःची
समूह रचना. प्रत्येक माणूस हा मन, मेंदू आणि विचार यांनी दुसऱ्याशी जोडला
गेला आहे. आपण दररोजचे जीवन जगत असताना आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या
घटनांचा आपल्या आयुष्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे परिणाम होत असतो.
त्यातूनच आपले व्यक्तिमत्व घडत जाऊन आपण सवेंदनशील होतो.
'बदल' हा निसर्गाचा नियम आहे. गेल्या काही वर्षापासून माणसाच्या आयुष्यात
खूपच आमूलाग्र बदल घडून आले आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या काळात रेडिओ, साठ
सत्तर च्या दशकात दूरदर्शन, ऐंशीच्या दशकात संगणक, नव्वदच्या दशकात केबल
नेटवर्क, मोबाईल आणि एकविसाव्या शतकात इंटरनेटच्या माध्यमातून, फेसबुक,
ट्विटर, व्हॉट्सअप, ब्लॉग अशी विविध माध्यमे माणसांच्या हातात आली.
तंत्रज्ञान क्षेत्रात झालेले हे बदल तुमच्या माझ्या आयुष्यात आमूलाग्र
अश्या पद्धतीचेच आहेत. 1991 ला भारताने जागतिकीकरण स्वीकारल्यांनतर
संपूर्ण जग हीच भारतासाठी एक बाजारपेठ निर्माण झाली. तशी आज या सर्व सोशल
मीडियाच्या प्रगतीने संपूर्ण जग हे तुमच्या एका क्लीक वर संपर्कात आले आहे.
आज शेतीपासून उद्योगधंद्यापर्यंत, समाजकारणापासून ते राजकारणापर्यंत,
विज्ञापासून शिक्षणापर्यंत सगळीच क्षेत्रे सोशल मीडियाच्या
कल्पनाविष्काराने बहरली आहेत. तरुणाईसह इतर वर्गाची सोशल मीडियाच्या
वापरकर्त्यांची संख्या जास्त आहे. आणि दिवसेंदिवस ती वाढतच आहे. या
तरुणाईला सोशल मीडिया च्या माध्यमातून वैचारिक आणि तांत्रिक पाया असणारा
तत्वांचा एक गट आहे. ज्याद्वारे आपले विचार आपले मत समाजसमोर बिनधास्तपणे
मांडता येते. तसेच आपल्या विचारांची देवाण घेवाण करता येते. दररोज
विचारांच्या माध्यमातून नवीन नवीन मित्र भेटत राहतात. आज सोशल मीडियाच्या
माध्यमातून अनेक ग्रुप हे समाजाच्या विविध प्रश्नांवर समाजाची मते जाणून
घेऊन त्यावरती उपाययोजना करण्याचे काम समाजात करत असताना दिसत आहेत.
दररोजच्या धकाधकीच्या आणि धावत्या जीवन शैलीमुळे समाजमनावर आलेली मरगळ
काहीवेळा विनोदाच्या माध्यमातून दूर होण्यासही मदत होते.
आज विविध प्रकारच्या उद्योगधंद्यामध्ये ही
स्वतःच्या उत्पादित वस्तू किंवा सेवा बाजारपेठेतील ग्राहकापर्यंत
पोहचविण्यासाठी किंवा विकण्यासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला
जात आहे. कारण सोशल मीडिया हे कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त
ग्राहकापर्यंत आपल्या माहिती पोहचविणारे असे साधन आहे. सोशल मीडियामुळे
उद्योजकांना आपल्या वस्तू आणि सेवांची माहिती थेट ग्राहकापर्यंत पोहचविता
येते. यामध्ये कोणत्याही प्रकारची साखळी असत नाही. आज देशातील काही
भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शिवारातील शेतीमालाची माहिती याच सोशल
मीडियाच्या माध्यमातून थेट ग्राहकांच्या घरापर्यंत पोहचविण्यासाठी सुरवात
केली आहे. अर्थात किती वस्तू किंवा सेवा विकल्या गेल्या यापेक्षा त्या
वस्तू आणि सेवांची माहिती समाज माध्यमातून ग्राहकापर्यंत पोहचली हे
महत्वाचे आहे. भविष्यात गुणवत्तेच्या आधारे ग्राहकाला जर आपल्या सेवा
किंवा वस्तू आवडल्या तर नक्की त्याचा फायदा त्या उद्योगास होईल हे नक्की.
सोशल मीडियाचा राजकीय क्षेत्रावरतीही मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे
आपल्याला पाहायला मिळते. 2014 ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत केंद्रातील
परिवर्तनामध्ये सोशल मीडियाचा परिणाम हा मोठा होता हे आपल्या सर्वाना माहित
आहेच. सध्या निवडणुकांचा रणसंग्राम चालू आहे. करोडोंच्या संख्येने सोशल
साईटचा वापर करणाऱ्या मतदाराला आकर्षित करण्यासाठी प्रत्येक पक्ष, नेता
आणि उमेदवार प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर करत असल्याचे आपल्याला दिसून
येईल. अनेक माध्यमांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून नवीन तरुणांना व्यक्त
होण्यासाठी (लोकसत्ता ब्लॉगबेंचर्स किंवा माध्यमाची विविध आप्लिकेशन)
विचारपीठ उपलब्ध करून दिली आहेत. आज समाजात घडणाऱ्या विविध घटनांवर जर
माध्यमे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत असतील तर सोशल मीडियातील दबाव गटाच्या
माध्यमातून मीडियाला त्या घटनांची दखल घेण्यास भाग पाडले आहे. खरंतर सोशल
मीडिया हा लोकशाहीचा पाचवा स्तंभ म्हणून नावारूपाला येत आहे. देशातील
प्रत्येक व्यक्तीला आपले अभिव्यक्ती मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य
राज्यघटनेने दिले आहे. त्याचा वापर आमच्या आधुनिक युवा पिढीने गावापासून
ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध क्षेत्रातील घडामोडीवर
स्वतःला व्यक्त होण्यासाठीच केला पाहिजे. आपण स्वतः एक समाजातील जबाबदार
घटक म्हणून सोशल मीडियाचा वापर चांगल्या गोष्टीसाठीच केला पाहिजे.
अगदी सकारात्मक दृष्ट्या विचार करता सोशल मीडियाने वैयक्तिक आयुष्य मनमोकळे केले आहे. असे असले तरी काही दुष्परिणामही आपल्याला नाकारून चालणार नाहीत. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वापर वाढल्यास त्याचे पडसाद नकारात्मकच अधिक पहायला मिळतात. सोशल मीडियाच्या अतिवापराने वैयक्तिक आयुष्यात कोटुंबिक जीवन दुःखाच्या छायेत गेल्याच्या घटनाही आपल्याला पाहायला मिळतील. मानसिक विकृतीतून अनेक सायबर गुन्हेगारांचा जन्म झाला आहे. आजची तरुण पिढी दहा दहा तास फक्त फेसबुक, व्हॉट्सअप वर वैयक्तिक संभाषणासाठी स्वःतला गुंतवून घेते. यामधून अनेक आजारांना स्वतःहून आमंत्रण देण्याचा हा प्रकार दिसून येतो. अनेक मुलींना वैयक्तिक अकाउंट वरून ब्लॅकमेलिंग केल्याच्या हि घटना आपल्यासमोर आहेत.. त्या आहेतच असे नाहीतर त्या दररोज वाढतच आहेत हि तुमची माझी बोचरी खंत आहे. शेवटी तीक्ष्ण हत्याराने जशी शस्त्रक्रिया करून एखाद्याचे प्राण वाचविले जातात तसेच त्याच हत्याराच्या चुकीच्या पद्धतीच्या वापराने एखाद्याचे प्राणही घेतले जाऊ शकतात . त्यामुळे सोशल मीडियाबरोबर आनंद घेत असताना आपल्या इतर मित्रांच्या किंवा समाजाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी हि आपल्या सारख्या सुशिक्षित समाजाने घ्यायला हवी हीच एक माफक अपेक्षा...!
धन्यवाद.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा