रविवार, १९ फेब्रुवारी, २०१७

लोकशाहीचं सर्वस्व अर्थातच सार्वभौमत्व जनता म्हणजेच तुम्ही आम्ही......


देशातील अनेक राज्यातील विधानसभा निवडणुकीसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा जोरदार रणसंग्राम चालू आहे. महाराष्ट्रात २१ फेब्रुवारीला महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी मतदान होत आहे.
लोकशाही म्हटले की  मला तर अब्राहम लिंकन यांची लोकशाही विषयी केलेली साधी, सरळ सोप्या शब्दातील व्याख्या आठवतेच आठवते, ती म्हणजे " लोकानी लोकांसाठी  चालवलेले लोकांचे राज्य म्हणजे लोकशाही"  लोकशाहीत जनतेचा कौल हा सर्वाधिक महत्वाचा असतो. हा कौल जनतेकडून मागण्यासाठी गेल्या महिन्याभरात सर्वच राजकीय पक्षांचा
प्रचारांचा उडालेला धुरळा आपण पाहिला.. एकमेकांवरील आरोप , प्रत्यारोप,  उमेदवारांचे फटाक्यांनी केलेलं स्वागत,  प्रचाराच्या भोंग्याचे कर्णकर्कश आवाज, विविध रॅली, पदयात्रा आपण सर्वांनीच पहिल्या. आता जनता   21 तारखेला  कोणाला कौल देणार याकडे तुमच्या माझ्यासह राजकर्त्यांचेही लक्ष लागले आहे.
 ज्या ज्या क्षेत्रात मतदान होत आहे त्या क्षेत्रातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींना माझी एक नम्र विनंती आहे कि प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे. मतदान हा फक्त प्रत्येक व्यक्तीचा अधिकारच नसून ते एक राष्ट्रीय कर्तव्यसुद्धा आहे. लोकशाही मध्ये जनता ही सार्वभौम आहे. हे आपण अनेक निवडणूकातून पहिले आहे, पाहतोय, आणि येथून पुढेही नक्कीच दिसेल यामध्ये माझ्या मनात तरी कोणतीच शंका नाही.  मी अनेकवेळा समाजात वावरत असताना पाहतो कि 'राजकारण्याविषयी असलेली प्रचंड चीड' आणि 'आमची काहीच काहीच कामं करत नाहीत तर स्वतःचं घरे भरण्यासाठीच' हे आम्हाला मतं मागायला येतात'  हि नकारात्मक भावना अनेक मतदारांमध्ये असल्याचे पाहायला मिळते. यासाठी अनेकजण (सुशिक्षित तर मोठ्या प्रमाणात) मतदान न करण्याचा निर्णय घेऊन बाहेर फिरायला जातात. त्यामुळे अश्या  मतदार बंधू आणि भगिनींना माझी एक नम्र विनंती आहे की बाहेर कितीही ओरडून सांगितले तरी राज्यकर्त्यांना काही फरक पडणार नाही, तो तुमच्या एका एका मतदानाच्या माध्यमातूनच फरक पडू शकतो.  तुमचं एक मत लोकशाहीमध्ये खूप महत्वाचे आहे. तुमचे एक मत एखाद्या उमेदवारास विजयी करू शकते किंवा पराभूत करू शकते. सद्याच्या राजकीय प्रचाराच्या लढाईमध्ये विचारांची लढाई विचारांनी करणारे राज्यकर्ते फार कमी प्रमाणात उरले आहेत हि एक लोकशाही समोरचे आव्हान आहे पण जनतेने जर योग्य वैचारिकतेने पुढे जाणाऱ्या नेतृत्वाला संधी दिली तर ते आव्हान लोकशाही नक्की पेलू  शकेल याचा ठाम विश्वास मला आहे. यासाठी जनतेची राजकीय प्रगल्भता वाढली पाहिजे. फक्त टीका टिपण्या करणाऱ्यांच्या पेक्षा एक चांगल्या विकासाच व्हिजन देणाऱ्या उमेदवारांना महापालिकेत किंवा जिल्हा परिषदेत पाठवा.. लोकशाहीतील तुमच्या मतांची किमंत खूप मोठी आहे. त्याचा तात्पुरत्या स्वार्थासाठी  सौदा करू नका. निवडणुका आल्यावर अनेक नेते जरी स्वाभिमान गहाण ठेवत असले, तडजोड करत असले तरी तुम्ही मात्र तुमचा स्वाभिमान मतपेटीतून व्यक्त केलाच पाहिजे.  तुमच्या एका मताच्या माध्यमातून 100% बदल घडू शकतो, लोकशाहीत तुमचे एक मत खूप महत्वाचे आहे. उमेदवार वर्षानुवर्षे फक्त घराणेशाहीच्या जोरावर जर राजकारण करत असेल तर  अश्या  प्रस्थपित उमेदवारांना नाकारले पाहिजे.  तुम्हाला जर आता योग्य पर्याय निवडता आला नाही तर पुन्हा पाच वर्ष वाट पाहावी लागेल. यासाठी तुम्हाला तुमच्या भागातील समस्यां भविष्यात कोणता उमेदवार सोडवू शकतो अश्या पारदर्शक आणि कार्यक्षम,  सुशिक्षीत आणि सुसंकृत उमेदवाराना निवडुया, आणि भारतीय  लोकशाही सदृढ करूया.
धन्यवाद.

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✍पोपटराव यमगर
बाळेवाडी, ता. आटपाडी,
जि. सांगली.
7709935374

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा