8 मार्च म्हणजेच जागतिक महिला दिन...
जागतिक महिला दिनाच्या सर्व माता, भगिनी, मैत्रिणी या सर्वांनाच सर्वप्रथम खूप साऱ्या शुभेच्छा आहेत... त्या व्यक्त करत असताना समाजातील महिलासंबंधीच्या काही प्रश्नावर चर्चा करणे हे आपले कर्तव्य आहे . माझ्या परीने हा विषय मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय.
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता: । यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया:
अर्थात ज्या ठिकाणी महिलांचा सन्मान होतो तेथे देवतांचे वास्तव्य असते आणि ज्या ठिकाणी महिलांवर अत्याचार होतात तेथे कोणतीही क्रिया सफल होत नाही... असं मानणारी आमची संस्कृती एवढेच काय तर संपुर्ण जगाच्या पाठीवर ईश्वराची सुद्धा स्त्रीरुपामधे पुजा करणारे बहुधा आपली एकमेव संस्कृती आहे. एवढेच नाहीतर आपण आपल्या देशाला भारतमाता म्हणतो. आपल्यासाठी ही मायभुमी आहे मातृभुमी आहे.एका बाजुला संस्कृतीमधे हे सगळे पण दुसर्या बाजुला दररोज वर्तमापत्रात, टी व्ही वरच्या बातम्या ऐकुन मन सुन्न होते. आजच्या आधुनिक युगातही हुंडाबळी, स्त्री भ्रुण हत्या, घरगुती छळाला कंटाळुन विवाहितेची आत्महत्या, जातपंचायतीकडुन अमानुष मारहाण, रस्त्यावरुन चालत असताना होणारी छेडछाड , बलात्कार यासारख्या घटना ऐकल्या, वाचल्या, पाहिल्या की मान शरमेने खाली जाते आणि मग मनामधे विचारांचं वादळ निर्माण होतं, आणि विचारी मनाला काही प्रश्न पडतात ते म्हणजे हीच आपली संस्कृती आहे का ?? ज्या स्त्रीचा आपण सन्मान करत होतो त्याच स्त्रीवर आज अत्याचारासारख्या घटना का घडत आहेत??? स्त्रीयावरतीच बंधने का?? यासारख्या असंख्य प्रश्नाच्या मंथनातून मग कविवर्य कुसुमाग्रजांनी स्वांतत्र्यदेवतेची विनवणी या फटका काव्यप्रकारातुन परखड केलेले प्रहार आठवतात,
" समान मानव माना स्त्रीला
तिची अस्मिता खुडु नका।
दासी म्हणुनी पिटु नका वा
देवी म्हणुनी भजू नका॥"
देवघरात तीची पुजा करायची आणि तिला चार भिंतीच्या आतच बंदिस्त करायचं अश्या संकुचित प्रथाना स्त्रियांनीच आव्हान दिले गेले पाहिजे, असे मला वाटते आणि त्या देत आहेत याचाही नक्कीच मनात आनंद आहे.
स्त्रीवाद हा विषय फक्त माहिलांशीच संबंधित न राहता तो पुरुषांशीही संबंधित आहे. स्त्रीचा विकासाचा संबंध हा पुरुषांचा विकासाशी आहे.यामुळेच ज्या संधी पुरुषाला उपलब्ध आहेत त्या स्त्रियांनाही मिळाल्या पाहिजेत हा वर्षानुवर्षाचा आग्रह आजही आहे. त्यासाठी अजूनही स्त्री लढते आहे, संघर्ष करते आहे. आज अनेक स्त्री विषयी काम करणाऱ्या चळवळी देशात आणि जगात काम करत आहेत. त्यांना त्यांच्या आयुष्यात जन्मताच मिळालेले हक्क इथल्या प्रस्थापित समाज व्यवस्थेने नाकारल्यामुळे ते हक्क मिळविण्यासाठी प्रदीर्घ लढा देण्यासाठी झगडत असल्याचे आपणास दिसून येते. खरंतर भारत सोडून अनेक देशामध्ये मतदानाचा हक्क हि पुरुषांच्या बरोबरीने न मिळता त्यासाठी त्यांना संघर्ष करून तो मिळवावा लागला. याबाबतीत तुमच्या माझ्या देशाचं एक सुदैव म्हटले पाहिजे की इथल्या प्रत्येक स्त्रीला मतदानाचा अधिकार हा राज्यघट्नाकारांनी राज्यघटनेच्या चौकटीत पुरुषांच्या बरोबरीने दिला आहे.
आज अनेक ठिकाणी महिला मोठ्या पदावर काम करत आहेत. राजकीय क्षेत्रात हि स्त्री पुढे जाण्यासाठी धडपडते आहे. महिला आरक्षणामूळे अनेक ठिकाणी महिला या पदाधिकारी झाल्या पण त्यांना तिथंही स्वातंत्र्य मिळत नाही कारण तिथेही तिच्या कामात तिचा पती किंवा इतर नातेवाईक हस्तक्षेप करीतच असतो.त्यामुळे ग्रामीण भागात तर त्या महिलेपेक्षा तिच्या पतीलाच सरपंच म्हंटलं जाते. म्हणूनच म्हणावेसे वाटते की स्त्रिया या मोठमोठ्या राजकीय पदावरती पोहचल्या पण त्या खुर्चीवर बसण्यापुरत्याच नाममात्र पदाधिकारी झाल्या आहेत की काय असा प्रश्न मला पडतो??ही जी राजकीय पदं मिळतात त्यापदामधील अधिकारामधुन महिलांचे विविध प्रश्न, उपेक्षीत वंचीत घटकांचे काही प्रश्न, शेतकर्यांचे प्रश्न, समस्या अडचणी सोडवण्यात येतात. काही प्रमाणात चांगल्या योजना राबवुन सामाजिक विकास करता येतो. स्वतः सर्व आढावा बैठकांना उपस्थित राहुन वेळोवेळी अधिकार्यांच्या कडुन कामाची माहिती घेतली पाहिजे. शहरातील अनेक ठिकाणी महिलांनी कृतीतुन सिद्धही केले आहे, तळागाळातील ग्रामीण भागातील महिलांनी स्वतः पुढे येऊन ही कमतरता भरुन काढली पाहिजे.
आज भारतामध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेत आणि नंतर महाविद्यालयात मुलींचे गळतीचे प्रमाण मुलांच्या पेक्षा खूप मोठे म्हणजेच दुप्पट आहे. यामागील कारणे ही खूप आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाचे म्हणजे मुलीवर शिक्षणासाठी जास्त पैसे खर्च करून काय उपयोग? पुढे तिच्या लग्नासाठीच्या पैशाचे काय?? कितीही केले तरी मुलगी हि परक्या घरची संपत्ती या सारखी खुळचट विचारांची प्रवृत्ती, वंशाचा दिवा (पणती नको पण दिवा पाहिजे) यासारखी अनेक कारणे आपल्याला पाहायला मिळतील. आजही स्त्रीभ्रूण हत्या सारखी स्त्रीला मुळातूनच संपवण्यासारखी समस्या घडत आहे आणि ती वाढत हि आहे. दुर्दैवाने सांगावं लागते कि स्त्री भ्रूण हत्याही सुशिक्षित समाजात मोठ्या प्रमाणात घडत आहेत... मग आम्ही शिक्षण घेतले ते कशा साठी हा प्रश्न कुठेतरी मनालाच विचारण्याची गरज निर्माण झाली आहे. तिला भीती आहे की कदाचित आईच्या उदरामध्ये तिला मृत्यु येईल व जरी जन्मले तरी तिचे रडणे हसणे हे कचराकुंडी मध्ये बंदीस्त होईल. आजही ती जन्मताच ती च्या लग्नाची काळजी वडिलांना व्याकुळतेच्या दुर्गंधीमध्ये बुडवत असते. आजही तिला घराच्या बाहेर सात नंतर एकटे न पडण्याची सक्ती असते आणि पडलीच तर बाहेरील जगात असणाऱ्या गिधाडांच्या अत्याचारापासून तिला सतत चिंता करावी लागते. आजही शिव्यांची लाखोली वाहताना हि तिच्या अब्रूची लक्तरे तोडली जातात, म्हणूनच कितीही कायदे करूनही निर्भयकांड ते कोपर्डी घटना सगळ्या देशाला हादरवून गेल्या पण त्यातून आपण किती शिकलो हा खरंतर चिंतनाचा विषय आहे.

लेखाच्या शेवटी मला आवडणारी आणि भावलेली 'जगदंब' नावाची कविता मला आपणाशी शेअर करायला आवडेल,
" ती जीव लावते, जीव टाकते, जीव गुंतवते,
तुम्ही जीव घेता, ती सुद्धा जीव घेते पण तिनीच का मरावं ?? अशा पद्धतीने जीव घेते.
तुमचंच जगताना, ती स्वताःला विसरते,
तुम्ही तिलाच विसरता।
ती सर्व सांभाळते, तुम्ही तिचं मनसुद्धा सांभाळत नाही.
तुमच्या यशात ती आनंद घेते, तुम्ही आनंदाच्या भरात तिचा उल्लेख सुद्धा विसरता।।
तिचं अस्तित्वच सुंदर आहे,
पण तुम्हाला तिच्या शरीरापलीकडे काही दिसत नाही.
ती जीवन सुंदर करते तिच्या वाट्याला कायम विटंबनाच येते .
तिचं रक्षण काय करणार? ,,
अरे तिचं रक्षण काय करणार?
तीच तुमची तटबंदी आहे तिलाच बंदिस्त करुन तुम्ही आत्मपात करुन घेताय.
घरात ती लक्ष्मी बनुन येते, तुम्ही तिचं पोत्यारं करता.
ती धनधन्याचं माफ घरात येताना ओलांडते, तुम्ही तिच्या आईबापासकट लुटून तिचं मातेरं करता.
ती माणूस आहे, आई आहे, बहीण आहे, मैत्रीण, बायको, प्रेयसी इत्यादी इत्यादी आहे
तमच्या लेकी ती फक्त मादी आहे.
ती लक्ष्मी, ती सरस्वती, ती दुर्गा, गौरी आहे,
निपात केलेल्या दुष्टांच्या कप्यांची माळ गळ्यात घालुन रक्तांनी वितळणारं राक्षसाचं मुंडकं हातात धरुन लाल भडक जीभ बाहेर काढत ती अष्टपुजा आहे, ती चंडीका आहे,
तुम्ही शिवशंकर व्हावं। तुम्ही शिवशंकर व्हावं। "
धन्यवाद।
✍✍पोपट यमगर
popatgyamgar.blogspot.com