शनिवार, २९ एप्रिल, २०१७

छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंदजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हे कोणत्याही एका संकुचित विचारांच्या चौकटीत बसणारी व्यक्तिमत्त्वे अजिबात नव्हती त्यामुळे त्यांना एक चौकटीत बंदीस्त करून आपण त्यांच्या विचारांना पराभूत तरी करत नाही ना याचा विचार आपल्यासारख्या सुजाण नागरिकांनी केला पाहिजे. खरंतर आजपर्यंत संकुचित विचाराच्या राजकारण्यांनी त्यांच्या वैयक्तीक राजकीय स्वार्थासाठी या महापुरुषांना चुकीच्या पद्धतीने समाजासमोर मांडले आहेत. वरील नेतृत्वे ही जागतिक दर्जाची व्यक्तिमत्वे आहेत. त्यांना एका चौकटीत बांधून न ठेवता समग्र बुद्धीने जगाने स्वीकारावीत आणि आपलीशी करावीत असे वाटत असेल तर समग्र विचारातूनच त्यांना मांडले गेले पाहिजे असे मला वाटते.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचाही अभ्यास आम्ही संकुचित जातीय चष्म्यातून न करता तो चष्मा बाहेर टाकून देऊनच अभ्यास केला गेला पाहिजे. सावरकर यांनी मांडलेले हिंदुत्व हे व्यापक अर्थाने पाहायला गेल्यास खरे भारतीयत्वच होते हे त्यांचा समग्र बुद्धीने अभ्यास केल्यास समजून येते. कट्टरतावाद्यांनीही त्यांचे फक्त हिंदुत्वाचे विचार स्वीकारले पण पुरोगामी विचार सोयीस्कररित्या बासनात गुंडाळून ठेवले आहेत. खरंतर सावरकर यांच्यावर स्वातंत्र्यापूर्वीही आणि त्यांनतर खूप अन्याय झाला आहे. परंतु काळाच्या दुष्टीने आपण आता खूप पुढे आलो आहोत त्यामुळे आपल्यासारख्या सुजाण आणि सुशिक्षित तरुणांनी आधुनिक विचारांचे सावरकर अभ्यासले पाहिजेत आणि ते स्वीकारले पाहिजेत.
✍पोपट यमगर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा