सोमवार, १४ मे, २०१८

स्वराज्य रक्षक संभाजी....



एक दोन नव्हे तर एकाच वेळी पाच आघांड्यावर निकराची झुंज देऊन लढणारे धुरंधर.! औरंगजेबाच्या पाच लाख फौजेशी सलग आठ वर्षे कडवी झुंज देणारा मराठ्यांचा दुसरा छत्रपती, ज्याने वयाच्या बत्तीसाव्या वर्षी कराल काळाच्या वेदीवर आपले मस्तक दिले; पण शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील एकही महत्त्वपूर्ण किल्ला किंवा आपल्या आरमारातील एकही जहाज गमावले नाही! असे हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्याचे धाकले धनी, अजिंक्य योद्धा, महापराक्रमी, शिवपुत्र म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रथमतः त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन...
गेली सव्वातीनशे वर्षे या विचारी, कवी-राज्यकर्त्यांची आणि पराक्रमी सेनानीची गाथा संशयाच्या धडप्यामध्ये गुंडाळून ठेवली गेली होती! तीनशे वर्ष रचलेली खोटी, मिथ्यापवादी नाटके, सिनेमे बंद करून खरी दिव्य भव्य तेजस्वी ऐतिहासिक व्यक्तिमत्वे नव्या पिढीपुढे ठेवणे गरजेचे आहे... मराठी मानसिकतेतील निर्धाराची, नवोन्मेषशालीन उत्साहाची हवा काढून मराठी मन पंक्चर करण्यासाठी ज्यांनी टोकदार लेखण्या हातात घेतल्या होत्या अशा अस्तानीतल्या निखाऱ्यांचा बंदोबस्त आजच्या नवीन मावळ्यांनी करावयास हवा. अज्ञानी, अहंकारी, जातीवर्चस्वाच्या स्वार्थासाठी बखरकारांनी आणि त्याच्या आधारे इतिहास लिहिणाऱ्या कोत्या, स्वार्थी लोकांनी महाराष्ट्राचा हा अत्यंत तेजस्वी, चिरंतन प्रेरणा देणारा इतिहास आपल्या नीच हितसबंधाचे डांबर ओतून काळाकुट करून ठेवला. इतिहास हा पुराव्याच्या आधारे तटस्थ आणि तर्कनिष्ठ पद्धतीने लिहायचा असतो परंतु गेल्या काही वर्षात आमच्याकडे स्वतःच्या जातीला पूरक असा इतिहास लिहिण्याची परंपरा काही नीच आणि जातीयवादी मानसिकतेच्या लोकांनी केली आहे. परंतु असत्य हे फारकाळ टिकत नसते कधी न कधी सत्य हे बाहेर येतच आणि ते सत्य बाहेर काढण्याचे कार्य इतिहास संशोधक स्वर्गीय वा.सी. बेंद्रे यांच्यासारख्या महान लेखकाने केले आहे. संशोधक स्वर्गीय वा.सी. बेंद्रे यांच्या संभाजी महाराज चरित्र ग्रंथाचा पुरस्कार करताना तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात, “ मराठ्यांच्या इतिहासाची साधने संग्रहित करणाऱ्या विद्वानाच्या चार पिढ्यांच्या संशोधनाला व परिश्रमाला आलेले फळ म्हणजे हे संभाजी चरित्र आहे. इतकी या पुस्तकाची योग्यता आहे.”
हिंदवी स्वराज्याच्या इमारतीला भूमी तयार करून देणारे शहाजीराजे, स्वराज्याची सशस्त्र इमारत उभी करणारे छत्रपती शिवाजी महाराज व त्या इमारतीवर भयंकर आपत्ती कोसळली असताना,तिला तोंड देऊन व नव्या पिढीमध्ये त्या आपत्तीला तोंड देण्यास चैतन्य, सामर्थ्य, शिस्त, पेरून जिवापाड सांभाळ करणारे युवराज शंभूराजे हे सर्व लहानपणापासून आपल्या अभ्यासाने वपूर्ण सुसंस्कृत, सुविद्य, राज्यव्यवहारकुल व युद्धविद्या निष्णात झालेले होते, यात कोणतीच शंका नाही. संभाजी राजांचे बालपण हे सामान्य गृह्सुखालाही मुकलेले आहे. पहिल्या १२ वर्षाच्या काळातच अशा काही आपत्ती कोसळल्या कि, त्यातून राजकारणातील व दरबारी व्यवहारातील अत्यंत कटू असे पण फार मोठे अनुभूव घेण्याची अलौकिक संधीच संभाजी राजांना मिळाली. त्यामुळे संभाजी राजेंच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण फार चांगली झाली, आत्मविश्वास वाढला. स्वतःच्या निर्णयाने राज्यकारभार आटोपण्याची खात्री झाली किवा तसे वळण लागले. हीच लहान शंभू राजांची वृत्ती रायगडावरील काही कारभाऱ्यानां जाचक वाटू लागली. शंभूराजेचे शिक्षण, अनुभव, कुवत, आत्मविश्वास वयोवृधानाही चकित करणारा असल्यामुळे त्यातून त्यांचा द्वेष करणारे व संभाजीमुळे आमचा पाणउतारा होतो असे समजणारे आणि वेळोवेळी बोलणारे काही सरकारकून आणि पेशवे संभाजीराजेबद्दल मनात अडी ठेऊन वावरत होते. जिजाऊ साहेब जिवंत होत्या, तोपर्यंत त्यांना मनातल्या मनात कुडण्यापलीकडे काही करता येत नव्हते. पण राज्यभिषेक सोहळ्यामध्ये संभाजी महाराजांचा युवराज म्हणून अभिषेक झाल्याने, अण्णाजी दत्तोसारख्या पोटात द्वेषाचे विष बाळगून असलेल्या सापांनी जिजाऊसाहेब यांच्या मृत्यूनंतर वाटेल तसे गरळ ओक्ण्यास सुरवात केली. विधियुक्त युवराज म्हणून संभाजीचे स्थानही ब्राम्हनापेक्षा श्रेष्ठ ठरले आणि ‘असा कर्तबगार, हुशार मुलगा उद्या छत्रपती झाला तर आपले काय?’ या चिंतेत अण्णाजी दत्तो आणि काही पेशवे पडले. याच चिंतेतून संभाजी राजांची बदनामी करण्याकरिता सर्वोतोपरी प्रयत्न केले आणि शास्त्र विद्यासंपन्न शौर्य, धैर्य आणि प्रचंड स्वाभिमानी असलेल्या संभाजी राजांचे चरितत्राला डाग लावण्याचे काम ह्या स्वराज्य द्रोही अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या साथीदारांनी व त्यांच्या पुढील वारसदार इतिहासकारांनी केले हे तुमचे माझे आणि या महाराष्ट्राचे दुर्दैवच....
छत्रपती संभाजी महाराज म्हणजे ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ या दिव्य विचारांचे मूर्तिमंत आचारप्रतीक... सामान्य गृहसुखालाही विन्मुख राहून शिवरायानाही जेवढ्या मोठ्या परचक्राचा सामना करावा लागला नाही अशा आलमगीर औरंगजेबाच्या अचाट शक्ती सामर्थ्याचा मुकाबला करण्यासाठी जीवनाचा प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस झगडत रहावे लागले. स्वराज्य संरक्षणासाठी थोडी थोडकी नव्हे, तर आठ-नऊ वर्षे दिवसरात्र झगडून स्वराज्याचा सांभाळ केला. एवढेच नव्हे, तर त्या भयंकर परचक्राला स्वतच्या प्राणाचे बलिदान देऊन मोगली सत्तेला नामोहरण केले आणि महाराष्ट्राला अत्याचारी परकीय सत्तेपासून दूर ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
सध्या झी मराठी या वाहिनीवर संभाजी महाराज यांच्या जीवनावर ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ म्हणून एक अप्रतिम अशी मालिका दाखवली जात आहे. संभाजी महाराजांविषयी जाणीवपूर्वक निर्माण केलेले अनेक समज, गैरसमज या मालिकेच्या माध्यमातून दूर होण्यास नक्की मदत होईल... ती मालिका पाहून शंभूराजेंचा दैदिप्यमान, शौर्याचा, त्यागाचा इतिहास आजच्या युवकांनी जाणून घेतला पाहिजे. आपले आदर्श शंभूराजे यांच्यासारखी स्वाभिमानी आणि महापराक्रमी अशी व्यक्तिमत्वे असली पाहिजेत.असे मला वाटते... शंभूराजेंचा खरा इतिहास समजावून घेणे आणि तो सर्वांच्या पर्यंत पोहचवणे हीच त्यांना खऱ्या अर्थाने आदर्नाजली ठरेल..... पुनश्च एकदा त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन......

सह्याद्रीवर शौर्याचा रेखीव पुतळा जसा ।
स्वराज्याच्या छातीवरती रायगडाचा ठसा, माझ्या रायगडाचा ठसा ।।
बुरुजावरती ऐकू येतो भगव्याचा फर्रार ।
लक्ख चमकते आणि दिपवते बुलंद भवानी तलवार ।।
अंधार भेटण्या रयतेचा हा देई तेजाचा वसा ।
रायगडाचा ठसा, माझ्या रायगडाचा ठसा ।।




धन्यवाद...
श्री. प्रतिक यमगर
बाळेवाडी, ता. आटपाडी,
जि. सांगली.
७७०९९३५३७४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा