विवेक विचार

विवेक विचार

मंगळवार, २८ जून, २०१६

..... जपानी माणसाची कविता......

(मला आवडलेली कविता. तुम्हालाही नक्की  आवडेल....... मी चार पाच दिवसापूर्वी कोल्हापूरच्या विशेष पोलीस महानिरीक्षक निवड झालेले  मा. विश्वास नांगरे पाटील साहेब यांच्या सांगली येथे झालेल्या भाषणातून ही कविता ऐकली होती. )

To dream the impossible dream,
To fight the unbeatable foe,
To bear the unbearable sorrow,
To run where the brave dare not to go,
To love the pure and chest from a far,
To right the unforgivable wrong,
To try when your arms are too weary,
To reach that unreachable star,
This is my quest to follow that star,
No matter how place,no matter how far,
To fight for the right,without questions without pause
To be willing to march into hell for heavenly cause.

जे अशक्य वाटतंय
ते स्वप्न मला पहाचय...।
ज्या शञुचा कोणी पराभव करु शकत नाही त्यास मला हरवाचय...।

कोणालाही सहन होत नाही
अस दुःख मला सहन कराचंय...।
ज्या ठिकाणी धाडसी माणसं जाण्याचं धाडस करत नाही ,त्या ठिकाणी मला जाऊन धावाचंय...।

ज्या वेळी माझे बाहू थकलेत ,
पाय थकलेत, हात थकलेत,शरीर थकलंय, त्या वेळेस मला,समोर मला " एव्हरेस्ट " दिसतय ,
त्या वेळी मला माझे एक एक पाऊल त्या " एव्हरेस्ट " च्या दिशेने टाकायचंय...।

तो " स्टार " मला गाठाचाय ।
मला " सत्यासाठी "झगडायचंय संघर्ष कराचाय.।
कुठलाही प्रश्न मला त्यासाठी विचारायचा नाही । थांबा घ्यायचा नाही...।

माझी नर्कात जायची सुद्धा तयारी आहे,
पण त्याला कारण हे " स्वर्गीय " असलं   पाहिजे...!

सोमवार, २७ जून, २०१६

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक जीवनाचा अविभाज्य अंग असलेला वारीचा सोहळा आजपासुन सुरु होत आहे. त्या निमीत्ताने✍✍✍

               महाराष्ट्र हि संतांची भूमी आहे. महाराष्ट्रासारखी संतांची परंपरा लाभलेला भूप्रदेश जगाच्या पाठीवर अन्यत्र सापडणे अशक्यच आहे. संत ज्ञानेश्वर माऊली पासून ते जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पर्यंत संतांची महान परंपरा महाराष्ट्रात निर्माण झाली. "ज्ञानेश्वरे रचिला पाया। तुका झालासे कळस।।" या संतांनी आपल्याला केवळ ईश्वर भक्तीच शिकवली नाही तर मानवी जीवन उदात्तपणे जगण्याचे तत्वज्ञान त्यांनी महाराष्ट्राला शिकविले. आणि स्वतः तसे जगून दाखविले. वारीच्या माध्यमांतून संतांनी मानवतेचा धर्म शिकविला, एकात्मतेची दिंडी निघाली, समतेची पताका खांद्यावर फडकली.  या संतांनी परकीय आक्रमणाच्या काळातही महाराष्ट्राची संस्कृती, भाषा आणि स्वाभिमान याचे रक्षण केले.  एकीकडे संताच्या परंपरेतून निर्माण होणारा शुद्ध अध्यात्मिक भाव तर दुसरीकडे वीर पुरुषांच्या पराक्रमातून निर्माण होणारा वीर रस. यातून महाराष्ट्राचे एक अलौकिक व्यक्तिमत्व तयार झाले आहे.
                जनमनाचा वेध घेऊन जनातील देव शोधणे आणि मनातील देवत्वाला आवाहन  करणे यासाठी विवेकाच्या मार्गाने होणारी भ्रमंती म्हणजे पंढरीची वारी होय. 'ग्यानबा तुकाराम' हा नामगजर म्हणजे महाराष्ट्राच्या लोकजीवनाचा एक महामंत्र होय. आषाढची एकादशी जवळ येऊ लागली की आमच्या मनात  पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाची ओढ निर्माण होते. आणि मग "पाऊले चालती पंढरीची वाट " अशी स्थिती निर्माण होते. आज जगदगुरु संत तुकाराम महाराजांची पालखी देहुहुन प्रस्थान होते आहे तर उद्या मंगळवारी माऊली ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहुन प्रस्थान होत आहे.  त्यामुळे येणारे 15 ते 20 दिवस अवघा महाराष्ट्र विठ्ठल भक्तीच्या ज्ञानसागरात समरस झालेला आपणास  दिसुन येईल.
                 मला माझ्या मनामधे विठ्ठल भक्तीची ओढ ही अगदी लहानपणापासुनच  लागली. याचं कारण म्हणजे  माझ्या घरी असलेली वारकरी सांप्रदायाची परंपरा अर्थातच माझी आई धार्मिक वृत्तीची असल्याने घरातूनच लहानपणी मला अध्यात्मिकतेची ओढ निर्माण झाली. तसेच आमच्या गावात जरवर्षी संपन्न होणारा अखंड हरिनाम  सप्ताह। या सप्ताहामधे  ज्ञानेश्वरी पारायण केले जाते. यामुळे सहावी सातवीत असल्यापासुन मला ज्ञानेश्वरी वाचनाची सवय लागली. सुरवातीला ज्ञानेश्वरी त्यातील भाषा अवघड(काही संस्कृत शब्द) असल्याकारणाने काहीच समजत नव्हते पण पुढे पुढे बारावीनंतर ती हळु हळु समजु लागली. त्या सप्ताहाच्या वेळी सादर होणारे गोड आणि मधुर आवाजातील अभंग माझे नेहमी लक्ष वेधून घेत होते.  कदाचित मला वाचनाची आवडही यातुनच निर्माण झाली असावी असं मला  वाटतं. आज अनेकांना (मलाही)  कधी कधी बोलताना, लिहीताना भाषण करताना ज्ञानेश्वरी मधील ओव्यांचा आधार घ्यावा लागतो. खरंच मला तर नेहमी वाटत राहतं ते म्हणजे ज्ञानेश्वरी हाच महाराष्ट्राचा आद्यग्रंथ आहे. हा महाराष्ट्राचा आद्यग्रंथ अर्थातच विचार ग्रंथ जोपासण्याचा समाजात जगताना, वावरताना मनोमनी आपण प्रयत्न केला पाहिजे.
                या 20 दिवसाच्या चालणार्या वारी मधे लाखो वारकरी, हजारो दिंड्या सहभागी झाल्याचे आपणास दिसुन येतात. वारीच्या वाटेवर वारकरी हे नेहमी स्वयंशिस्तीने चालत असतो. अध्यात्म, एकात्म, भक्ती, भजन, अभंग यासारख्या अविष्कारातुन दिसणारी वारकर्यांची भावपुर्ण शिस्त तर दुसरीकडे वाटचाल, संयम, वारकर्यांचे परस्परांशी बोलणे, भोजन, कामाचे नियोजन, त्यासाठी योग्य व्यवस्थापन अशा स्वंयशिस्तीने प्रत्येक वारकरी हा वारी सोहळ्याशी बांधला गेला आहे.
लेखाचा शेवटही माऊलींच्याच एका गोड आणि  सुंदर अश्या अभंगाने करू इच्छितो .......,
              "अवघाचि संसार सुखाचा करीन।
                 आनंदे भरीन तिन्ही लोक।।
                जाईनगे माये तया पंढरपुरा।
                भेटेन माहेरा आपुलिया।।"

धन्यवाद।
✍✍✍✍✍✍श्री. पोपटराव यमगर
०७७०९९३५३७४
बाळेवाडी ता. आटपाडी, जि. सांगली

मंगळवार, २१ जून, २०१६

... आंतरराष्ट्रीय योग दिनाविषयी माझ्या लेखणीतून .... ✍✍✍✍

आज जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. योगा आणि योगासनांचे जीवनक्रिया विषयक महत्त्व यापूर्वी विविध योगतज्ज्ञ, मान्यवरांनी जागतिक समुहासमोर सातत्याने मांडले. योगाची ही जगातील स्वीकार्हता डोळ्यांसमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्तराष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेत १९३ देशांच्या प्रतिनिधींसमोर ‘योगा आणि योगासन’ याचे महत्त्व स्पष्ट केले. दि. ११ डिसेंबर २०१४ ला झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत दि. २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्यासाठी जवळजवळ सर्व राष्ट्रांनी संमती दर्शवली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात ठरावाच्या बाजूने सकारात्मक मतदान होण्याची ही ऐतिहासिक घटना होती. त्यामुळे दि. २१ जून हा आंतरराष्ट्रीय कॅलेंडरवर ‘जागतिक योगदिन’ म्हणून नोंदला गेला. खरतर भारताच्या प्राचिन परंपरेत योग आणि योगासने ही भारतीयांच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग होती. भारतीयांच्या आचार, विचार आणि आचरणात योगा आणि योगासनांचा काही ना काही प्रकारे वापर होत असे. खालील कवितेच्या काही ओळींमधून फार सुंदर शब्दात योगाबद्दल समर्पक असं मांडलं आहे.

               "हर कोई योगा कर सकता है,
               छोटा, बड़ा, अमीर, गरीब।
               न औषधि की आवश्यकता है,
               न ही बीमारी आये करीब।
               भांति-भांति के आसन हैं,
               और भिन्न-भिन्न हैं नाम।
               शरीर के हर एक हिस्से को,
              मिलता इससे बहुत आराम।"

 आज आपण आपल्या वास्तववादी भारताकडे पाहायचं ठरवल्यास अलीकडे आपल्या देशात जुनं ते सगळं बुरसटलेलं आहे, टाकून देण्याच्या लायकीचं आहे अशी समाजमनामध्ये भावना झालेली दिसून येते. परंतु जुनं ते सोनं असही न म्हणत बसता, आपल्या संस्कृतीत ज्या प्राचीन चांगल्या परंपरा आहेत त्या खुल्या मनानं स्वीकारणं आणि नको असलेलं काढून टाकून नव्या उमेदीने आधुनिक जगात जगताना चांगले ते बदल स्वीकारणं ही काळाची गरज आहे असे मला ठाम पणे वाटते. आज जगामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे याचा तुमच्या माझ्यासह सर्व भारतीयांच्या मनात नक्कीच आनंद असला पाहिजे. आज जगभरातील राजकीय आणि सामाजिक चालू घडामोडींचा विचार करता एक गोष्ट स्पष्ट दिसून आल्याशिवाय राहत नाही ती म्हणजे जगभरातील देशांच्या संस्कृती-संस्कृती मधील चालू असलेला संघर्ष.याविषयावरतीही लिहीण्याची खूप इच्छा आहे) मला तर आंतरराष्ट्रीय योग दिनादिवशी ११ सप्टेंबर १८९३ ची आठवण आल्याशिवाय राहत नाही. कारण याचदिवशी अमेरिकेतील शिखागो येथील सर्वधर्मपरिषदेत विश्वविजयी विचाररत्न स्वामी विवेकानंदजी यांनी आपल्या भारतीय संस्कृतीचा इतिहास आणि महिमा जगभरातील जमलेल्या विचारवंत आणि महंत यांना भारतीय शब्दात त्यांच्या वाणीतून फार थोडक्या शब्दात समजावून सांगितला. त्यानंतर त्यांनी समस्त भारतीयांना एक संदेश दिला तो म्हणजे "जा, साऱ्या जगाला सांगा, ही पुण्य पुरातन भारत भूमी पुन्हा एकदा जागी होत आहे". विवेकांनदजींच्या वाणीतून जगाला भारतीय संस्कृती श्रेष्ठ वाटू लागली. आणि आजच्या वर्तमानात जगताना सुद्धा आपली भारतीय संस्कृती जाणून घेण्यात समस्त जगाला रस वाटतो आहे. मुळात आपला भारतीय विचारच सहिष्णुताशील विश्वबंधुत्वाचा आहे. ज्ञानेश्वर माऊलीनीही १३ व्या शतकात मांडलेल्या पसायदानातुनही विश्वकल्याणाचे विचारच सर्वकाही सांगून जातात.

    सूर्यनमस्कार, प्राणायाम, योगासन या सर्वांमुळे आपल्या दैनदिन जीवनात होणारे आरोग्यदायी फायदे यावरती आज सर्व वर्तमानपत्रातून, माध्यमांतून चर्चा चालू आहे, होत आहे. त्यामुळे यावरती मी जास्त लिहिणार नाही. फक्त मी एवढेच सांगू इच्छितो की, ते म्हणजे आपल्या निरोगी आरोग्यासाठी दररोजची फक्त ४० मिनिटे सूर्यनमस्कार, प्राणायाम, योगासने यासाठी दिली पाहिजेत. यामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता तर वाढतेच वाढते पण दिवसभराच्या धकाधकीतून काम करत असताना आलेला थकवा, आळस झटकून टाकण्यास मदत होते. शेवटी आपण म्हणतोच ना, "शुभम करोति कल्याणम, आरोग्यम धन संपदा, शत्रु-बुद्धि विनाशायः, दीपःज्योति नमोस्तुते!"
         आताच्या काळात योगाला आलेलं महत्व ते कमी होऊ न देता उलट ते दिवसेंदिवस वाढतच राहावं हीच आजच्या आंतरराष्ट्रीय योगदिनी माझ्या विचारी मनाची एक सदिच्छा ...।

धन्यवाद...
✍✍✍✍ पोपट यमगर…

गुरुवार, ९ जून, २०१६

                                      महाराष्ट्रात येणाऱ्या चार ते पाच दिवसात मान्सून पाऊस  येउन धडकेल असा  भारतीय हवामान शास्त्र विभाग(IMD) आणि स्कायमेट या प्रसिद्ध हवामान संस्थाचा अंदाज आहे. गेल्या दोन वर्षापेक्षा यावर्षी जास्त पाऊस पडण्याचा अंदाज या दोन्हीही नामवंत संस्थांनी व्यक्त केला आहे. हि नक्कीच सर्व शेतकऱ्यांच्या साठी तसेच शेतीमालावर आधारित असलेल्या सर्व उद्योगासाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या दोन वर्षापासून प्रशांत महासागरात एल निनो च्या प्रवाहामुळे महाराष्ट्रासह देश मोठ्या दुष्काळाला सामोरे जातो आहे. अर्थात  एल निनो च्या प्रवाह कमी झाल्यामुळे नक्कीच यावर्षी चांगला पाऊस पडण्याची आशा निर्माण झाली आहे. जास्त पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करून हि आमच्या सरकारी व्यवस्थापन यंत्रणेने आपत्तीपूर्व नियोजन केल्याचे पहावयास मिळत नाही. म्हणजेच एखादी घटना घडल्यानंतर आपली व्यवस्था धावाधाव सुरु करते असा आजपर्यंतच्या अनेक उदाहरणामधून आपणास दिसून येते. येणाऱ्या काळात अश्या घटना घडूच नयेत आणि समजा घडलीच तर  त्या आपत्ती साठी आपली आपत्तीपूर्व यंत्रणा सक्षम आणि तत्पर असली पाहिजे. दुष्काळासारख्या समस्येवर  हि दरवर्षी तात्पुरत्या स्वरुपाची उपाययोजना आपले सरकार करत आहे. दीर्घकालीन दृष्टीकोन मनात ठेऊन दुष्काळासारख्या समस्येवर सरकार उपाययोजना करत असल्याचे मला तरी दिसून येत नाही. (अर्थात पुढील निवडणुकां कोणत्या प्रश्नावर लढवायच्या???? हाही प्रश्न राज्यकर्त्यांना महत्वाचा वाटतो.)
                                        महारष्ट्रातील मराठवाड्यासह, पश्चिम महारष्ट्रातील माणदेशात (सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यातील  काही तालुके) पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागली आहे. पिण्यासाठीच पाणी नसेल तर मग शेती, उद्योगधंदे यासाठी तर पाणी मिळणेच मुश्किल अशी वास्तविक  परिस्थिती अनेक गावामध्ये होती.    भारतीय हवामान शास्त्र विभाग (IMD)  आणि स्कायमेट या प्रसिद्ध हवामान संस्थाचा अंदाजामुळे सकारात्मक दृष्टीकोनातून आपल्या शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.
      ‘ठायीठायी थेंब सांडले आमच्या घामाचे, कधी न कोणी मोल मोजले आमच्या घामाचे, सुपीक सारे शेतशिवारी आम्हीच करणारे, कष्टाने कोठार धान्याचे आम्हीच भरणारे.' या आशेने जगाच्या पोठाची भूक भागविणारा म्हणजेच जगाचा पोशिंदा असणारा शेतकरीराजा आभाळातून कधी पावसाच्या सरी बरसतात याची वाट पाहतो आहे. आभाळाकडे डोळे लावून तो वरूण राजाला विनवणी करतो आहे कि,
                                     "पावसांच्या धारांनो या, करपलेल्या पिकाला नवजीवन द्या. या थुई थुई थुई थुई धारा, हा शिवार फुलवा सारा "


धन्यवाद……
✍✍✍✍ पोपट यमगर

मंगळवार, ७ जून, २०१६

मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर रविवारी पहाटे झालेल्या ताज्या अपघातात १८ जणांचे प्राण गेले. आतापर्यंतच्या अनेक अपघातांप्रमाणे हा अपघातही भरधाव आणि काळजाला धडकी भरवणारा असाच होता. आजकाल इतके चांगले रस्ते तयार झाले असूनही मानवी चुकामुळे अपघातांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याच अपघाताताबद्दल व्यवस्थेवर तसेच वाहतुकीचे नियम न पाळणार्या नागरिकांच्यावर आजच्या लोकसत्ताच्या अग्रलेखात सणसणीत प्रहार केले आहेत वेळ मिळाल्यास आपण हा अग्रलेख आवर्जुन वाचावा असाच आहे.(खरेतर लोकसत्ताचे सर्वच अग्रलेख योग्य जागेवर मार्मिक बोट ठेऊन केलेले सणसणीत आणि झणझणीत प्रहर असतात. मला तर खूप आवडतात.) आजच्या अग्रलेखातील शेवटचा परिच्छेद आपल्या वाचनासाठी मी मुद्दामहुन देत आहे.
"वास्तविक इतकी सरकारी अनास्था ज्या समाजात असते तो आपल्या हिताविषयी अधिक सजग हवा. परंतु येथील परिस्थिती बरोबर उलट. सरकार ढिम्म आणि नागरिक स्वत:च्याच मस्तीत. त्यात नियम पाळणे म्हणजे कमीपणा असे मानणारा एक मोठा वर्ग. हाती पैसा आहे म्हणून सर्व काही घ्यावयाचे, पण ते वापरावे कसे याचे ज्ञान शून्य. उत्तम फोन आहेत, पण ते वापरण्याची संस्कृती नाही. मोटारी आहेत, पण त्या कशा वापराव्यात हे यांना माहीत नाही आणि जाणून घ्यायची इच्छाही नाही. अशा परिस्थितीत रविवारसारखे अपघात हे नवीन नाहीत आणि ते जुनेही होणारे नाहीत. समाजच्या समाज जर इतका अज्ञानी आणि असंस्कृत असेल आणि त्यास तितक्याच बेजबाबदार व्यवस्थेची साथ असेल तर हे असेच होत राहणार
आणि रस्त्यांवरची ही अशी (अपघात) कार्ये रोखायला ‘श्री’ देखील असमर्थच असणार".

धन्यवाद……
✍✍✍✍ पोपट यमगर

(संदर्भ :- लोकसत्ता वर्तमानपत्र…)

शनिवार, ४ जून, २०१६

भारतीय राज्यघटने आपल्याला अनेक  अधिकार/ हक्क दिले आहेत. भारतीय राज्यघटनेतील तिसर्या भागामध्ये कलम १२ ते ३५ मध्ये हे सर्व अधिकार/ हक्क दिले आहेत. भारतीय राज्यघटनेतील चौथ्या भागामध्ये कलम ५१ अ मध्ये मुलभूत कर्तव्ये दिली आहेत.  आपण नेहमी आपल्या हक्कांचा विचार करतो. (उदा. अभिव्यक्ती स्वातंत्र्य) मुलभूत हक्कांचा विचार करत असताना आपण आपल्या देशाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये हे  विसरून जातो. मला वाटतं अधिकार आणि कर्तव्ये हि एकमेकांच्या हातात हात घालून जातात . जेवढे अधिकार महत्वाचे असतात  तेवढीच कर्तव्ये देखील असतात. घटनेच्या कक्षेत राहून जगायचे, विचार मांडायचे, बोलायचे,  म्हणजे फक्त आणि फक्त अधिकारच चालवायचे नाहीत तर 
कर्तव्ये काय आहेत हे समजून घेऊन ती आचरणात आणली पाहिजेत. आपणा सर्वांचे कर्तव्य हे आहे की या देशात विचारांची विविधता आहे हे आधी मान्य करणे. नंतर माझा जसा विचार आहे तसाच समोरच्या व्यक्तीचा असेल किंवा असलाच पाहिजे अशी मनोभुमिका किंवा असा आग्रह  मी ठेऊ नये. समोरच्याचा विचार समजून घेण्याची भूमिका मी ठेवली पाहिजे. समोरच्याला न दुखावता आपला असा वेगळा विचार त्याच्यापर्यंत ठामपणे  पोहोचवता आला पाहिजे. पण तो विचार ऐकताना समोरच्याची भूमिका हि कोणत्याही विषयाच्या बाबतीत  पूर्वग्रह दुषित असू नये. हाच समग्र विचारांचा पाया आहे असे मला नेहमी वाटत राहतं…

धन्यवाद …
✍✍✍✍पोपट यमगर

शुक्रवार, ३ जून, २०१६


                       आज समाजाच्या मनावर, विचारावर माध्यमाचं(Media) वर्चस्व मोठ्या प्रमाणात वाढत आहे.  मी  वर्चस्व वाढत आहे असं म्हटले, याचं  कारण म्हणजे एखादी बातमी दाखवताना त्या बातमीला इतक्या आक्राळ विक्राळ स्वरुपात दाखवली जाते कि त्या बातमीचा परिणाम हा समाजमनावरती खूप मोठ्या प्रमाणात पडला जातो किवां पडत आहे. एखादी घटना घडली रे घडली कि त्या घटनेची  पूर्ण सत्यता न तपासता त्याची पहिली बातमी आपल्या चनेल वर येण्यासाठी किवा सनसनाटी ब्रेकिंग न्यूज देण्यासाठी खूप गडबड करून ती बातमी दाखवली जाते. काही वेळा एखादी नकारात्मक बातमी चानेलच्या TRP साठी  इतक्या वेळा दाखवली जाते कि त्याचा नकारात्मक परिणाम समाजावर पडत असतो हे ना रिपोर्टरला समजते, ना संपादकाला… 
                            आज आपण बातम्या चे चानेल लावले कि काय बातम्या असतात?? हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या चांगल्या बातम्या असतात नाहीतर राजकारणातील दररोजची एकमेकावरील चिखलफेक (निवडणुकीतील आश्वासनावरून जनतेचे लक्ष हटविण्यासाठीच असेल कदाचित) ,त्यातही चघळून चघळून चोथा झालेल्या टीका, भ्रष्टाचाराच्या घोटाळ्याच्या बातम्या, राजकीय नेत्यांची चानेल च्या कार्यक्रमातील वाद्ग्रात वक्तव्य, गुंडगिरी, सेलिब्रेटीज च्या प्रकरणाचे रेपोर्ट,  बलात्काराच्या बातम्या, फसवणुक दरोड्याच्या बातम्या  त्यातच निम्याहून जास्त जाहिराती असतात. अर्थात त्या बातम्या चानेल वर  येतात म्हणजे समाजामध्ये घडत आहेत हे खरंय पण त्याच त्याच बातम्या सारख्या सारख्या दाखवून एकप्रकारे समाजाच्या मनामध्ये नकारात्मक विचार पेरतात कि काय असं मला नेहमी वाटत राहतं. मला चानेलवरील दररोजच्या नवीन विषयावरील  वरील विशेष  चर्चा ऐकायला खूप आवडतात. मी घरी बातम्यांचा चानेल लावला कि लगेच माझ्या घरातून विरोधात्मक सूर येतो  कारण सकाळपासून संध्याकाळ पर्यंत चालत राहणाऱ्या, त्याच त्याच चघळून चोथा झालेल्या बातम्या ऐकायला आणि पाहायला हि नकोश्या वाटतात.
                  माध्यमांना आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ मानतो. लोकशाहीचा चौथा स्तंभाने जागरूकतेने समाजातील चांगल्या घटनावर लक्ष केंद्रित करणं करणं गरजेचं आहे. देशामधील सामान्य माणसांचे प्रश्न, समस्या, अडचणी या निपक्षपातीपणे सरकारच्या कानावर घालण्यासाठी माध्यमांचा खूप मोठ्या प्रमाणात वापर झाला पाहिजे. सरकारच्या विविध योजना सर्वांच्या पर्यंत माध्यमेच पोहचू शकतात. सरकार आणि जनता यांच्या मधील दुवा म्हणून माध्यमांनी कार्य केलं पाहिजे.   २०१४ मधील निवडणुकातील माध्यमांची भूमिका ही खूप महत्वाची ठरली होती.  सध्याच्या काळात सर्वच क्षेत्रात माध्यमांची भूमिका खूप महत्वाची ठरत आहे. अर्थात माध्यमांची भूमिका महत्वाची असली पाहिजे यात नक्कीच दुमत नाही पण ती सकारात्मक आणि चांगल्या समाजासाठी असावी शेवटी एवढीच  माझ्या विचारी मनाची एक छोटीशी इच्छा…

धन्यवाद…

✍✍✍✍पोपट यमगर…
popatgyamgar.blogspot.com