विवेक विचार

विवेक विचार

मंगळवार, २१ जून, २०१६

... आंतरराष्ट्रीय योग दिनाविषयी माझ्या लेखणीतून .... ✍✍✍✍

आज जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. योगा आणि योगासनांचे जीवनक्रिया विषयक महत्त्व यापूर्वी विविध योगतज्ज्ञ, मान्यवरांनी जागतिक समुहासमोर सातत्याने मांडले. योगाची ही जगातील स्वीकार्हता डोळ्यांसमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्तराष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेत १९३ देशांच्या प्रतिनिधींसमोर ‘योगा आणि योगासन’ याचे महत्त्व स्पष्ट केले. दि. ११ डिसेंबर २०१४ ला झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत दि. २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्यासाठी जवळजवळ सर्व राष्ट्रांनी संमती दर्शवली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात ठरावाच्या बाजूने सकारात्मक मतदान होण्याची ही ऐतिहासिक घटना होती. त्यामुळे दि. २१ जून हा आंतरराष्ट्रीय कॅलेंडरवर ‘जागतिक योगदिन’ म्हणून नोंदला गेला. खरतर भारताच्या प्राचिन परंपरेत योग आणि योगासने ही भारतीयांच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग होती. भारतीयांच्या आचार, विचार आणि आचरणात योगा आणि योगासनांचा काही ना काही प्रकारे वापर होत असे. खालील कवितेच्या काही ओळींमधून फार सुंदर शब्दात योगाबद्दल समर्पक असं मांडलं आहे.

               "हर कोई योगा कर सकता है,
               छोटा, बड़ा, अमीर, गरीब।
               न औषधि की आवश्यकता है,
               न ही बीमारी आये करीब।
               भांति-भांति के आसन हैं,
               और भिन्न-भिन्न हैं नाम।
               शरीर के हर एक हिस्से को,
              मिलता इससे बहुत आराम।"

 आज आपण आपल्या वास्तववादी भारताकडे पाहायचं ठरवल्यास अलीकडे आपल्या देशात जुनं ते सगळं बुरसटलेलं आहे, टाकून देण्याच्या लायकीचं आहे अशी समाजमनामध्ये भावना झालेली दिसून येते. परंतु जुनं ते सोनं असही न म्हणत बसता, आपल्या संस्कृतीत ज्या प्राचीन चांगल्या परंपरा आहेत त्या खुल्या मनानं स्वीकारणं आणि नको असलेलं काढून टाकून नव्या उमेदीने आधुनिक जगात जगताना चांगले ते बदल स्वीकारणं ही काळाची गरज आहे असे मला ठाम पणे वाटते. आज जगामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे याचा तुमच्या माझ्यासह सर्व भारतीयांच्या मनात नक्कीच आनंद असला पाहिजे. आज जगभरातील राजकीय आणि सामाजिक चालू घडामोडींचा विचार करता एक गोष्ट स्पष्ट दिसून आल्याशिवाय राहत नाही ती म्हणजे जगभरातील देशांच्या संस्कृती-संस्कृती मधील चालू असलेला संघर्ष.याविषयावरतीही लिहीण्याची खूप इच्छा आहे) मला तर आंतरराष्ट्रीय योग दिनादिवशी ११ सप्टेंबर १८९३ ची आठवण आल्याशिवाय राहत नाही. कारण याचदिवशी अमेरिकेतील शिखागो येथील सर्वधर्मपरिषदेत विश्वविजयी विचाररत्न स्वामी विवेकानंदजी यांनी आपल्या भारतीय संस्कृतीचा इतिहास आणि महिमा जगभरातील जमलेल्या विचारवंत आणि महंत यांना भारतीय शब्दात त्यांच्या वाणीतून फार थोडक्या शब्दात समजावून सांगितला. त्यानंतर त्यांनी समस्त भारतीयांना एक संदेश दिला तो म्हणजे "जा, साऱ्या जगाला सांगा, ही पुण्य पुरातन भारत भूमी पुन्हा एकदा जागी होत आहे". विवेकांनदजींच्या वाणीतून जगाला भारतीय संस्कृती श्रेष्ठ वाटू लागली. आणि आजच्या वर्तमानात जगताना सुद्धा आपली भारतीय संस्कृती जाणून घेण्यात समस्त जगाला रस वाटतो आहे. मुळात आपला भारतीय विचारच सहिष्णुताशील विश्वबंधुत्वाचा आहे. ज्ञानेश्वर माऊलीनीही १३ व्या शतकात मांडलेल्या पसायदानातुनही विश्वकल्याणाचे विचारच सर्वकाही सांगून जातात.

    सूर्यनमस्कार, प्राणायाम, योगासन या सर्वांमुळे आपल्या दैनदिन जीवनात होणारे आरोग्यदायी फायदे यावरती आज सर्व वर्तमानपत्रातून, माध्यमांतून चर्चा चालू आहे, होत आहे. त्यामुळे यावरती मी जास्त लिहिणार नाही. फक्त मी एवढेच सांगू इच्छितो की, ते म्हणजे आपल्या निरोगी आरोग्यासाठी दररोजची फक्त ४० मिनिटे सूर्यनमस्कार, प्राणायाम, योगासने यासाठी दिली पाहिजेत. यामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता तर वाढतेच वाढते पण दिवसभराच्या धकाधकीतून काम करत असताना आलेला थकवा, आळस झटकून टाकण्यास मदत होते. शेवटी आपण म्हणतोच ना, "शुभम करोति कल्याणम, आरोग्यम धन संपदा, शत्रु-बुद्धि विनाशायः, दीपःज्योति नमोस्तुते!"
         आताच्या काळात योगाला आलेलं महत्व ते कमी होऊ न देता उलट ते दिवसेंदिवस वाढतच राहावं हीच आजच्या आंतरराष्ट्रीय योगदिनी माझ्या विचारी मनाची एक सदिच्छा ...।

धन्यवाद...
✍✍✍✍ पोपट यमगर…

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: