विवेक विचार

विवेक विचार

रविवार, २६ फेब्रुवारी, २०१७

मराठी राजभाषा दिनानिमित्त...


आज महाराष्ट्रातील मराठी साहित्याचा एक मानदंड, थोर कविवर्य वि.वा.शिरवाडकर अर्थातच कुसुमाग्रज  यांची   जयंती... त्यानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.  त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्रसह देशभरामध्ये मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. तो साजरा केला जात असताना मराठी भाषेची आधुनिक युगात प्रगती होत आहे का? या संदर्भात चर्चा करणे अनिवार्य आहे.
"माझा मराठाचि बोलू कवतुके परि अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन"  अशी मराठी भाषेची थोरवी गात संत ज्ञानेश्वर माउलींनी गीतेवर भाष्य करीत 'ज्ञानेश्वरी' सारखा विश्वाच्या साहित्यामध्ये मराठी भाषेतील सर्वश्रेष्ठ असा ग्रंथ तुम्हा आम्हाला दिला. हा ग्रंथ म्हणजे मराठी साहित्याचा भक्कम पायाच आहे आणि तिथूनच खऱ्या अर्थाने मराठी साहित्य संसाराला सुरवात झाली, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. माउलींनी लावलेला मराठी भाषेच्या समृद्धीचा वेल आज  मराठी साहित्यामध्ये तरी नक्कीच उंच उंच   जाताना दिसतो आहे.  वैचारिक ज्ञानातून खरे अभिसरण समाजमनात होत असते, या अभिसरणाची महत्वपूर्ण कामगिरी मराठी भाषा पाडत आहे याचा नक्कीच मनस्वी आनंद आहे. मराठी भाषा स्वतः  जगली, तिने महाराष्ट्राला येथील समाजाला जगवले, समृद्ध केलंय, त्यामुळे या भाषेविषयीचा अभिमान महाराष्ट्राला आहे.
मराठी भाषेला इतका उज्वल आणि प्रदीर्घ इतिहास लाभला  आहे तरीही आज  महाराष्ट्रात मराठी माध्यमाच्या शाळांची घसरत जाणारी संख्या नक्कीच चिंताजनक अशीच आहे. मातृभाषेतून घेतलेले शिक्षण लगेच आत्मसात होते किंवा कोणाचाही आधार न घेता डोक्यात शिरते त्यासाठी कोणताही वेगळा विचार करण्याची गरज भासत नाही. तळागाळातील लोकांपर्यंत  आपले विचार पोहचविण्यासाठी मातृभाषेवर प्रभुत्व असणे खूप गरजेचे आहे. आज आमच्या आधुनिक पिढीला मराठी मातीचा जाज्वल्य इतिहास समजावून सांगावाच लागेल.  जी आपली मातृभाषा आहे त्या मातृभाषेतून आपण चांगल्या पद्धतीने लिहू शकतो, बोलू शकतो, विचार मांडू शकतो. गरज आहे ती आपण मातृभाषेतून व्यक्त होण्याची... ती आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होऊच याबद्दल माझ्या मनात तरी कोणतीच शंका नाही.
महिन्याभरापूर्वी डोंबिवलीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले . त्या संमेलनात मराठी भाषेच्या संवर्धनासंदर्भात चर्चा झाली.  मराठी या भाषेला सरकारी पातळीवर लवकरच अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, तसेच मराठी  भाषेतील साहित्य जगभरातील इतर भाषिकांना वाचण्यासाठी  इतर भाषांमध्ये भाषांतर व्हावे, तसेच आधुनिक माहिती तंत्रज्ञानाची भाषा मराठी व्हावी आणि मराठी भाषेचा वापर आधुनिक तंत्रज्ञामध्ये जास्तीत जास्त केला जावा अश्या काही महत्वाच्या मागण्या त्या संमेलनातून केल्या गेल्या आहेत.  त्या येणाऱ्या काळात त्यासंदर्भात सरकारी पातळीवर पावले उचलली गेली पाहिजेत अशी सदिच्छा आहे. शेवटी कवी सुरेश भट यांच्या कवितेतील चार समर्पक ओळी,
"लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी..
जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी..
धर्म, पंथ, जात एक, जाणतो मराठी
एवढ्या जगात माय, मानतो मराठी..."
आपल्या सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
धन्यवाद...

✍पोपट यमगर
बाळेवाडी, ता. आटपाडी,
जि. सांगली.
7709935374

गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०१७

आटपाडी तालुक्याच्या राजकारणातील एक प्रामाणिक आणि कार्यक्षम नेतृत्व : मा. तानाजी शेठ यमगर


महाराष्ट्र राज्याच्या भूपटलावर आटपाडी तालुका म्हटले की आम्हाला आमच्या डोळ्यासमोर एक चित्र उभे राहते ते म्हणजे पिढ्यानपिढ्या दुष्काळ ग्रस्त असलेला तालुका... शेकडो एकर जमीन असतानाही पिण्याच्या पाण्यासाठी आणि पोटाची खळगी भागविण्यासाठी रानोवनी भटकणारे मेंढपाळ बांधव आणि सांगली जिल्ह्याच्या सदन भागात ऊसतोड करणारे मजूर यांचा हा तालुका... याच पिढ्यानपिढ्याच्या दुष्काळामुळे स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी तालुक्यातील बहुसंख्य युवक हे पुणे, मुंबई , दिल्ली यासारख्या मोठ्या शहरामध्ये जाऊन सोन्या चांदीसारख्या गलाई व्यवसायामध्ये काम करत आहेत. अनेक अश्या युवकांनी या व्यवसायामध्ये स्वतःची अशी एक छाप पाडली आहे. यामधीलच एक व्यक्तीमत्व म्हणजे आदरणीय तानाजी शेठ यमगर... आटपाडी तालुक्यातील बाळेवाडी सारख्या  छोट्याश्या खेडेगावामध्ये  एका तुमच्या माझ्या सारख्या सर्वसामान्य कुटुंबातुन   संघर्षाचे घाव झेलत, परिवर्तन वादी विचारांची बीजे पेरत पुढे वाटचाल केली आहे, करत आहेत. स्वतःच्या  व्यवसायामध्ये कर्तबगारी आणि चातुर्याने त्यांनी चांगला जम बसवला आहे. तो जम बसवत असतानाच गावातील आणि तालुक्यातील अनेक तरुणांनाही सोने चांदी किंवा इतर व्यवसायामध्ये  त्यांच्या पायावर उभे करण्यात शेठचा वाटा महत्वाचा आहे. बेरोजगारी सारखा राष्ट्रीय प्रश्न असतानाही  ते रडगाणे न गाता आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून  तालुक्यातील अनेक तरुण मुले  शेठच्या मार्गदर्शनाखाली स्वतःच्या व्यवसायामध्ये उत्तम प्रगती करत असताना आपल्याला दिसून येत आहेत. व्यावसायिक क्षेत्रात उत्तम प्रगती करत असताना आपण आपल्या गावातील, तालुक्यातील समाजालाही आपल्या सोबत पुढे घेऊन गेले पाहिजे, आणले पाहिजे या समाज हिताच्या विचाराने प्रेरीत होऊन शेठनी समाजकारणासाठी तालुक्याच्या राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. खरंतर सात वर्षांपूर्वी तालुक्याच्या राजकारणात, सत्ताकारणात आम्हीच असले पाहिजे अश्या विचारांचे  तसेच राजकारणाला धंदा मानून 'सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता ' अशासाठी वापर करणारे प्रबळ आणि धनाढ्य विरोधक समोर होते. त्यामुळे त्यांचा राजकीय प्रवास किती काटेरी वाटेवरून झाला आहे हे आपल्या लक्षात येईलच. त्यावेळेस सांगली जिल्ह्याच्या राजकारणात स्वतःचे एक वेगळं वलय निर्माण केलेले आणि आपल्या वक्तृत्व शैलीच्या आधारावर मोठ मोठ्या प्रस्थपिताना विचारातून घायाळ करणारे आदरणीय गोपीचंद पडळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली एकनिष्ठ राहून राजकारण आणि समाजकारण   करण्याचा निर्णय तानाजी शेठनी घेतला. पडळकर साहेबांनीं तालुक्यासह जिल्ह्यात केलेल्या विविध आंदोलनात , मोर्चात, रास्ता रोको मध्ये आदरणीय शेठचा सक्रिय सहभाग होता. हे सर्व करत असतानाच 2012 मध्ये जिल्हा परिषद आणिआटपाडी तालुक्याच्या राजकारणातील एक प्रामाणिक आणि कार्यक्षम नेतृत्व : मा. तानाजी शेठ यमगर  पंचायत समिती च्या निवडणुका तालुक्यामध्ये  पडळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठ्या ताकदीने लढवल्या गेल्या . त्यामध्ये अनेक उमेदवारांनी तालुक्यातून दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती.  घरनिकी पंचायत समिती गटातून तानाजी शेठ यमगर विजयी मिळवीत आटपाडी पंचायत समिती मध्ये एकमेव विरोधी गटाचे सदस्य म्हणून प्रवेश केला होता. तालुक्यात मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या अनेक पंचायत समितीच्या सभांमध्ये तानाजी शेठनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडली. तालुक्यातील वर्षानुवर्षाचा प्रश्न म्हणजे पाणी आणि चांगले रस्ते... या दोन्हीही प्रश्नावर कोणतीही न तडजोड करता ते सोडविण्यासाठी पडळकरसाहेबांच्या मार्गदर्शनाने अगदी जिल्हाधिकारी ते विविध खात्याचे मंत्री, मुख्यमंत्र्यापर्यत पाठपुरावा केला.
पंचायत समितीमध्ये फक्त एका घरनिकी गटाचे पंचायत समिती सदस्य असूनही संपूर्ण आटपाडी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांचा पाठपुरावा पंचायत समिती च्या सर्व सभांमध्ये केला. बाळेवाडी बनपुरीसह अनेक गावातील पिढ्यानपिढ्या असलेला पाण्याचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सोडवण्यात यश मिळवले आहे.  घरनिकी पंचायत समिती गटातील झरे, पारेकरवाडी, विभूतवाडी, पिंपरी, घरनिकी, घानंद, कामथ येथे रस्ते, सभामंडप यासह अनेक छोटी मोठी कामे शेठनी त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात केली आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकऱ्यासंबधीच्या,  गोरगरीब जनतेच्या कल्याणासंबधीच्या विविध योजनाची माहिती शेठनी वेळोवेळी विविध माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे. पंचायत समिती मध्ये शेतकरी बांधवांसाठी येणाऱ्या वस्तू या गरजू पर्यंत कश्या पोहचतील यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केल्याचे आपणास दिसून येतात.  तालुक्यातील विरोधकांचीही कामे कोणताही मतभेद मनात न ठेवता मार्गी लावली आहेत. एखाद्या जिल्हा परिषद सदस्याला हि पाच वर्षाच्या कार्यकाळात जितकी कामे झाली नसतील त्याच्यापेक्षाही किंबहुना जास्तच कामे तानाजी शेठ नि मार्गी लावली आहेत. तालुक्यातील गुणवंत आणि यशवंत मुलांच्या नेहमीच पाठीशी राहत त्यांना त्यांच्या भविष्यातील प्रगती साठी कायमच साथ आणि प्रोत्साहन दिले आहे.
राजकारण म्हणजे भ्रष्टाचार , 'पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा' कमावण्याचा उद्योग, अनेक नेत्यांची पोकळ आश्वासने अशी सर्वसामान्य लोकांच्या मनातील राजकारण्याविषयीची भावना झाली आहे परंतु मला ठामपणे सांगायला आवडेल ते म्हणजे या सर्वाना अपवाद व कोणत्याही वाद विवादात न पडता सर्वांशी मिळून मिसळून सर्वांशी आदराचे  असे संबंध निर्माण करणारे, आटपाडी तालुक्याच्या राजकारणातील एक स्वच्छ, प्रामाणिक आणि कार्यक्षम नेतृत्व म्हटले की मा. तानाजी शेठ यमगर यांचे नाव नक्कीच सर्वांच्या मनामध्ये येईल यामध्ये मनात तरी कोणतीच शंका नाही. इतर मुरब्बी राजकारण्यासारखे डावपेच आखून फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण न करता सर्व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वाना सोबत पुढे घेऊन जाण्याच्या विचारातून ते काम करत आहेत. स्वतःच्या कुटुंबाकडे प्रसंगी स्वतःच्या उद्योगाकडेही कमी वेळ देत सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठी स्वतःला संपूर्णपणे झोकून देऊन समाजकारणातून राजकारण करत आहेत. अनेकजण म्हणतात की राजकारण हे प्रामाणिक माणसाचे क्षेत्र नाही आहे, पण मला त्यांना सांगायला आवडेल ते म्हणजे प्रामाणिकपणाने आणि तत्वनिष्ठेने केलेलं राजकारण हे प्रदीर्घ कालावधी पर्यंत टिकते. तात्पुरत्या क्षणिक स्वार्थासाठी केलेलं मुरब्बी राजकारण हे जास्त काळ टिकू शकत नाही, हे आपण सद्य परिस्थितील  राजकीय निकालावरून पाहत आहोत.
तालुक्यामध्ये सन्माननिय  पडळकर साहेबांच्या काटेरी वाटेवरील संघर्षाच्या प्रवासामध्ये त्यांच्यासोबत वाटचाल करण्यात आणि समर्थपणे साथ देण्यात आदरणीय तानाजी शेठचा सहभाग हा महत्वपूर्ण होता. पडळकर साहेबांनीही तानाजी शेठना कायमच आदरात्मक संबोधले आहे. तानाजी शेठनी नेहमीच तालुक्यातील कार्यक्रमांना पडळकर साहेबांच्या साथीने उपस्थित राहत तळागाळातील जनमाणसापर्यंत आपला जनसंपर्क वाढवला.   करगणी जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य जनतेला वाटत होते कि तानाजी शेठनी जिल्हा परिषद निवडणूक लढवावी परंतु जिल्हा परिषद गटात पडलेलं महिला आरक्षण आणि  त्यांचे सन्माननीय मित्र हरिशेठ गायकवाड यांच्या सोबत असलेला दिलदार मैत्रीचा वसा पेलण्यासाठी एक पाऊल मागे घेऊन  जिल्हा परिषद गटातून सौ. वंदना गायकवाड यांना मोठ्या मनाने संधी दिली आणि त्यांनी  करगणी पंचायत समिती गटातून निवडणूक लढविण्याचा  निर्णय घेतला. भाजपने आणि पडळकर साहेबानी त्यांच्या आजवरच्या प्रामाणिकपणाच्या राजकारणाला साथ देत पक्षाचे तिकीट  दिले.  त्यांच्या समोरील विरोधक उमेदवार हा तालुक्याच्या राजकारणातील मुरब्बी आणि 60 वर्षाहून जास्त राजकीय अनुभव असलेले  आण्णासाहेब पत्की  होते. तरीही शेठनी पाच वर्षातील विकासकामाच्या  आणि प्रामाणिक राजकारणाच्या  जोरावर निवडणूक लढवून ती यशस्वीपणे जिंकली यांचा आनंद तुमच्या माझ्या सह तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या मनात निकालादिवशी दिसून येत होता.
सध्या तालुक्याच्या पंचायत समिती आणि जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेमध्ये भाजपची सत्ता आली आहे. अश्या रीतीने तालुक्यापासून ते केंद्रापर्यंत भाजप सत्तेत आहे, त्यामुळे खऱ्या अर्थाने आता तालुक्यात विकासपर्वाची सुरवात होत आहे असे म्हटले तरी काय वावगे ठरणार नाही.
 'Let us grow together' अशी राजकीय भूमिका मनात ठेवून वाटचाल करणाऱ्या आदरणीय तानाजी शेठना तालुक्याच्या विकास कार्यासाठी आणि राजकारणातील पुढील प्रगती साठी माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा...💐


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालाबाबत....

राज्यात काल झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निकालामध्ये राज्यात भारतीय जनता पार्टीने  प्रचंड आणि घवघवीत यश संपादन केल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन आणि महाराष्ट्राच्या  उज्वल विकासपर्वासाठी  आपल्या  वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा...
कालच्या विजयावरून करगणी गटासह आटपाडी, सांगली आणि राज्यातील अनेक भागामध्ये  सर्वसामान्य नागरिकांच्या एका मतांची  ताकद काय असू शकते हे लोकशाहीमध्ये दिसून आले. लोकशाही संपन्न  असलेल्या आपल्या देशात एखादा उमेदवार विजयी करायचा कि पराभूत याचं सर्वस्व अर्थात सार्वभौमत्व जनता आहे, हे कालच्या विजयावरून स्पष्टपणे दिसून येते.  यावेळेस  राज्यातील  मतदानाची टक्केवारी दिवसेंदिवस वाढत आहे याचा नक्कीच सकारात्मक परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. राज्याच्या राजकारणात सांगली जिल्हा हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जायचा पण याच बाल्लेकिल्ल्यात कधीही न उमळणारे कमळ मात्र या निवडणुकीत जबरदस्त उमलले. आटपाडी तालुक्यावर हि राज्याचे युवा नेते गोपीचंद पडळकर आणि माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांच्यातील एकीने तालुक्यावर प्रथमच भाजपची सत्ता पाहायला मिळाली. पुढील काळात तालुक्यांत खूप काही सकारात्मक होण्याच्या दृष्टीने  हा विजय भाजप साठी खूप महत्त्वाचा आहे.
राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचा झंझावाती दौरा , प्रचार सभा, आणि त्यांचा प्रामाणिक, पारदर्शक  चेहरा हे भाजपच्या विजयाचे कारण आहे. तसेच देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदींजी यांचेही भ्रष्टाचार विरोधी नोटबंदी ची मोहीम, देशातील पारदर्शकपणे   चालू असलेला कारभार, देशाची जगामध्ये उंचावलेली प्रतिमा,  यासह भाजप पक्षाची वाढ कशी होईल यासाठी वरिष्ठ पातळीवर चालू असलेले प्रयत्न या विजयास कारणीभूत आहेत  असे मला वाटते. सद्य परिस्थितीत तालुक्यात भाजप , जिल्ह्यात भाजप,  राज्यात भाजप आणि देशातही भाजप सत्तेत आहे त्यामुळे आता खऱ्या अर्थाने विकासकामे होतील अशी आशा प्रत्येक तालकावासीयांच्या मनामध्ये आहे. टेंभुच्या पाण्यासारखे विषय, रस्त्यांचे विषय मार्गी लागतील अशी आशा जनतेच्या मनात आहे. जनतेने जो लोकशाही मार्गाने मतपेटीतुन विश्वास दाखवला आहे तो विश्वास सार्थ ठरावा हीच एक छोटीशी सदिच्छा...
धन्यवाद...

श्री पोपट यमगर
बाळेवाडी, आटपाडी
सांगली.
7709935374

रविवार, १९ फेब्रुवारी, २०१७

लोकशाहीचं सर्वस्व अर्थातच सार्वभौमत्व जनता म्हणजेच तुम्ही आम्ही......


देशातील अनेक राज्यातील विधानसभा निवडणुकीसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा जोरदार रणसंग्राम चालू आहे. महाराष्ट्रात २१ फेब्रुवारीला महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी मतदान होत आहे.
लोकशाही म्हटले की  मला तर अब्राहम लिंकन यांची लोकशाही विषयी केलेली साधी, सरळ सोप्या शब्दातील व्याख्या आठवतेच आठवते, ती म्हणजे " लोकानी लोकांसाठी  चालवलेले लोकांचे राज्य म्हणजे लोकशाही"  लोकशाहीत जनतेचा कौल हा सर्वाधिक महत्वाचा असतो. हा कौल जनतेकडून मागण्यासाठी गेल्या महिन्याभरात सर्वच राजकीय पक्षांचा
प्रचारांचा उडालेला धुरळा आपण पाहिला.. एकमेकांवरील आरोप , प्रत्यारोप,  उमेदवारांचे फटाक्यांनी केलेलं स्वागत,  प्रचाराच्या भोंग्याचे कर्णकर्कश आवाज, विविध रॅली, पदयात्रा आपण सर्वांनीच पहिल्या. आता जनता   21 तारखेला  कोणाला कौल देणार याकडे तुमच्या माझ्यासह राजकर्त्यांचेही लक्ष लागले आहे.
 ज्या ज्या क्षेत्रात मतदान होत आहे त्या क्षेत्रातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींना माझी एक नम्र विनंती आहे कि प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे. मतदान हा फक्त प्रत्येक व्यक्तीचा अधिकारच नसून ते एक राष्ट्रीय कर्तव्यसुद्धा आहे. लोकशाही मध्ये जनता ही सार्वभौम आहे. हे आपण अनेक निवडणूकातून पहिले आहे, पाहतोय, आणि येथून पुढेही नक्कीच दिसेल यामध्ये माझ्या मनात तरी कोणतीच शंका नाही.  मी अनेकवेळा समाजात वावरत असताना पाहतो कि 'राजकारण्याविषयी असलेली प्रचंड चीड' आणि 'आमची काहीच काहीच कामं करत नाहीत तर स्वतःचं घरे भरण्यासाठीच' हे आम्हाला मतं मागायला येतात'  हि नकारात्मक भावना अनेक मतदारांमध्ये असल्याचे पाहायला मिळते. यासाठी अनेकजण (सुशिक्षित तर मोठ्या प्रमाणात) मतदान न करण्याचा निर्णय घेऊन बाहेर फिरायला जातात. त्यामुळे अश्या  मतदार बंधू आणि भगिनींना माझी एक नम्र विनंती आहे की बाहेर कितीही ओरडून सांगितले तरी राज्यकर्त्यांना काही फरक पडणार नाही, तो तुमच्या एका एका मतदानाच्या माध्यमातूनच फरक पडू शकतो.  तुमचं एक मत लोकशाहीमध्ये खूप महत्वाचे आहे. तुमचे एक मत एखाद्या उमेदवारास विजयी करू शकते किंवा पराभूत करू शकते. सद्याच्या राजकीय प्रचाराच्या लढाईमध्ये विचारांची लढाई विचारांनी करणारे राज्यकर्ते फार कमी प्रमाणात उरले आहेत हि एक लोकशाही समोरचे आव्हान आहे पण जनतेने जर योग्य वैचारिकतेने पुढे जाणाऱ्या नेतृत्वाला संधी दिली तर ते आव्हान लोकशाही नक्की पेलू  शकेल याचा ठाम विश्वास मला आहे. यासाठी जनतेची राजकीय प्रगल्भता वाढली पाहिजे. फक्त टीका टिपण्या करणाऱ्यांच्या पेक्षा एक चांगल्या विकासाच व्हिजन देणाऱ्या उमेदवारांना महापालिकेत किंवा जिल्हा परिषदेत पाठवा.. लोकशाहीतील तुमच्या मतांची किमंत खूप मोठी आहे. त्याचा तात्पुरत्या स्वार्थासाठी  सौदा करू नका. निवडणुका आल्यावर अनेक नेते जरी स्वाभिमान गहाण ठेवत असले, तडजोड करत असले तरी तुम्ही मात्र तुमचा स्वाभिमान मतपेटीतून व्यक्त केलाच पाहिजे.  तुमच्या एका मताच्या माध्यमातून 100% बदल घडू शकतो, लोकशाहीत तुमचे एक मत खूप महत्वाचे आहे. उमेदवार वर्षानुवर्षे फक्त घराणेशाहीच्या जोरावर जर राजकारण करत असेल तर  अश्या  प्रस्थपित उमेदवारांना नाकारले पाहिजे.  तुम्हाला जर आता योग्य पर्याय निवडता आला नाही तर पुन्हा पाच वर्ष वाट पाहावी लागेल. यासाठी तुम्हाला तुमच्या भागातील समस्यां भविष्यात कोणता उमेदवार सोडवू शकतो अश्या पारदर्शक आणि कार्यक्षम,  सुशिक्षीत आणि सुसंकृत उमेदवाराना निवडुया, आणि भारतीय  लोकशाही सदृढ करूया.
धन्यवाद.

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✍पोपटराव यमगर
बाळेवाडी, ता. आटपाडी,
जि. सांगली.
7709935374

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

सोमवार, १३ फेब्रुवारी, २०१७

या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे...


आज प्रेम दिवस जगभरामध्ये साजरा करण्यात  येत आहे.  त्या प्रेमदिवसाच्या आपणा सर्वांना अगदी मनापासून प्रेमळ शुभेच्छा...
कवी मंगेश पाडगावकर एका सुंदर अश्या कवितेतून आपल्याला सांगतात की,
 "या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे"  दररोज चे  जीवन जगत असताना  मानवतेच्या नात्याने सर्वांशी प्रेमानं वागणे आणि बोलणे गरजेचे आहे. आपले साने गुरुजी हि सांगून गेलेत कि "खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे"  एखादी व्यक्ती रागावली असल्यास प्रेमाने चार शब्द बोलल्यास त्याच्याही मनातील कटुता दूर होऊन जाते. म्हणूनच म्हणतात ना प्रेमाने जग जिंकता येते. प्रेम म्हटले की आपुलकी, माया, जिव्हाळा असे बरेच काही असताना आज  काही जणांनी मात्र हल्ली प्रेमाचा अर्थ फारच संकुचित करून ठेवला आहे. फक्त प्रियकर आणि प्रेयसी यांच्यामधीलच प्रेम आपल्या सर्वांना दिसते. तेही प्रेम असतेच, नक्कीच असले पाहिजे यामध्ये माझ्या मनात तर नक्कीच दुमत नाही पण त्याच्या पलीकडेही जाऊन प्रेम नावाची संकल्पना समग्र बुद्धीने आम्ही कधी समजावून घेणार कि नाही?? ती समजावून घेणे गरजेचे आहे. आजच्या युगामध्ये समोर दिसणाऱ्या घटना पहिल्या कि  प्रेम म्हणजे फक्त शारीरिक आकर्षण अशीच व्याख्या आजच्या मजनू आणि लैला यांनी करून ठेवली आहे. यासाठी कोणतेही समाजभान, संस्कृतीभान न ठेवता गार्डन्स किंवा सार्वजनिक ठिकाणी  चालणारे प्रकार तुमच्या माझ्या देशात लोकसंख्येने सर्वाधिक असलेल्या तरुण पिढीला (अर्थात देशाचा कणा) नक्कीच विचार करावयास लावणारेच आहेत. आज देशात लव्ह जिहाद (अनेक मुलींना  प्रेमाच्या नावाने फसवून धर्मांतर करावयास लावणे) सारखीही प्रकरणे मोठ्या प्रमाणात घडत आहेत. ती फक्त घडतच नाहीत तर दररोज वाढत आहेत हे आपल्या सारख्या छत्रपतीच्या राज्यात राहणार्या मावळ्यांनी समजावून घेतले पाहिजे. शारीरिक आकर्षण आणि उपभोगासाठी केलेले प्रेम हे खरे प्रेम नसते तर ते ढोंगी प्रेम स्वतःच्या स्वार्थासाठी तात्पुरत्या कार्यकाळासाठी केलेले असते. एखाद्या आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीवर, वस्तुवर, देशावर, निसर्गावर,  ह्रद्यापासुन मनातुन निस्वार्थी भावनेने  केलेले प्रेम हे खरे प्रेम असते. अशा निस्वार्थी भावनेने प्रेम हि संकल्पना जपणाऱ्या तुम्हा सर्व मित्रांना माझ्या पुन्हा एकदा प्रेम दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...
धन्यवाद...

✍पोपटराव यमगर

शनिवार, ११ फेब्रुवारी, २०१७

समाज माध्यमे (सोशल मीडिया), समाज आणि आपण...


मानवी संस्कृतीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे माणसाने केलेली स्वतःची समूह रचना. प्रत्येक माणूस हा मन, मेंदू आणि विचार यांनी दुसऱ्याशी जोडला गेला आहे. आपण दररोजचे जीवन जगत असताना आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांचा आपल्या आयुष्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे परिणाम होत असतो. त्यातूनच आपले व्यक्तिमत्व घडत जाऊन आपण सवेंदनशील होतो.
'बदल' हा निसर्गाचा नियम आहे. गेल्या काही वर्षापासून माणसाच्या आयुष्यात खूपच आमूलाग्र बदल घडून आले आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या काळात रेडिओ, साठ सत्तर च्या दशकात दूरदर्शन, ऐंशीच्या दशकात संगणक, नव्वदच्या दशकात केबल नेटवर्क, मोबाईल आणि एकविसाव्या शतकात इंटरनेटच्या माध्यमातून, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप, ब्लॉग अशी विविध माध्यमे माणसांच्या हातात आली. तंत्रज्ञान क्षेत्रात झालेले हे बदल तुमच्या माझ्या आयुष्यात आमूलाग्र अश्या पद्धतीचेच आहेत. 1991 ला भारताने जागतिकीकरण स्वीकारल्यांनतर संपूर्ण जग हीच भारतासाठी एक बाजारपेठ निर्माण झाली. तशी आज या सर्व सोशल मीडियाच्या प्रगतीने संपूर्ण जग हे तुमच्या एका क्लीक वर संपर्कात आले आहे. आज शेतीपासून उद्योगधंद्यापर्यंत, समाजकारणापासून ते राजकारणापर्यंत, विज्ञापासून शिक्षणापर्यंत सगळीच क्षेत्रे सोशल मीडियाच्या कल्पनाविष्काराने बहरली आहेत. तरुणाईसह इतर वर्गाची सोशल मीडियाच्या वापरकर्त्यांची संख्या जास्त आहे. आणि दिवसेंदिवस ती वाढतच आहे. या तरुणाईला सोशल मीडिया च्या माध्यमातून वैचारिक आणि तांत्रिक पाया असणारा तत्वांचा एक गट आहे. ज्याद्वारे आपले विचार आपले मत समाजसमोर बिनधास्तपणे मांडता येते. तसेच आपल्या विचारांची देवाण घेवाण करता येते. दररोज विचारांच्या माध्यमातून नवीन नवीन मित्र भेटत राहतात. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक ग्रुप हे समाजाच्या विविध प्रश्नांवर समाजाची मते जाणून घेऊन त्यावरती उपाययोजना करण्याचे काम समाजात करत असताना दिसत आहेत. दररोजच्या धकाधकीच्या आणि धावत्या जीवन शैलीमुळे समाजमनावर आलेली मरगळ काहीवेळा विनोदाच्या माध्यमातून दूर होण्यासही मदत होते.
          आज विविध प्रकारच्या उद्योगधंद्यामध्ये ही स्वतःच्या उत्पादित वस्तू किंवा सेवा बाजारपेठेतील ग्राहकापर्यंत पोहचविण्यासाठी किंवा विकण्यासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. कारण सोशल मीडिया हे कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त ग्राहकापर्यंत आपल्या माहिती पोहचविणारे असे साधन आहे. सोशल मीडियामुळे उद्योजकांना आपल्या वस्तू आणि सेवांची माहिती थेट ग्राहकापर्यंत पोहचविता येते. यामध्ये कोणत्याही प्रकारची साखळी असत नाही. आज देशातील काही भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शिवारातील शेतीमालाची माहिती याच सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट ग्राहकांच्या घरापर्यंत पोहचविण्यासाठी सुरवात केली आहे. अर्थात किती वस्तू किंवा सेवा विकल्या गेल्या यापेक्षा त्या वस्तू आणि सेवांची माहिती समाज माध्यमातून ग्राहकापर्यंत पोहचली हे महत्वाचे आहे. भविष्यात गुणवत्तेच्या आधारे ग्राहकाला जर आपल्या सेवा किंवा वस्तू आवडल्या तर नक्की त्याचा फायदा त्या उद्योगास होईल हे नक्की.
        सोशल मीडियाचा राजकीय क्षेत्रावरतीही मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. 2014 ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत केंद्रातील परिवर्तनामध्ये सोशल मीडियाचा परिणाम हा मोठा होता हे आपल्या सर्वाना माहित आहेच. सध्या निवडणुकांचा रणसंग्राम चालू आहे. करोडोंच्या संख्येने सोशल साईटचा वापर करणाऱ्या मतदाराला आकर्षित करण्यासाठी प्रत्येक पक्ष, नेता आणि उमेदवार प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर करत असल्याचे आपल्याला दिसून येईल. अनेक माध्यमांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून नवीन तरुणांना व्यक्त होण्यासाठी (लोकसत्ता ब्लॉगबेंचर्स किंवा माध्यमाची विविध आप्लिकेशन) विचारपीठ उपलब्ध करून दिली आहेत. आज समाजात घडणाऱ्या विविध घटनांवर जर माध्यमे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत असतील तर सोशल मीडियातील दबाव गटाच्या माध्यमातून मीडियाला त्या घटनांची दखल घेण्यास भाग पाडले आहे. खरंतर सोशल मीडिया हा लोकशाहीचा पाचवा स्तंभ म्हणून नावारूपाला येत आहे. देशातील प्रत्येक व्यक्तीला आपले अभिव्यक्ती मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य राज्यघटनेने दिले आहे. त्याचा वापर आमच्या आधुनिक युवा पिढीने गावापासून ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध क्षेत्रातील घडामोडीवर स्वतःला व्यक्त होण्यासाठीच केला पाहिजे. आपण स्वतः एक समाजातील जबाबदार घटक म्हणून सोशल मीडियाचा वापर चांगल्या गोष्टीसाठीच केला पाहिजे.
         अगदी सकारात्मक दृष्ट्या विचार करता सोशल मीडियाने वैयक्तिक आयुष्य मनमोकळे केले आहे. असे असले तरी काही दुष्परिणामही आपल्याला नाकारून चालणार नाहीत. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वापर वाढल्यास त्याचे पडसाद नकारात्मकच अधिक पहायला मिळतात. सोशल मीडियाच्या अतिवापराने वैयक्तिक आयुष्यात कोटुंबिक जीवन दुःखाच्या छायेत गेल्याच्या घटनाही आपल्याला पाहायला मिळतील. मानसिक विकृतीतून अनेक सायबर गुन्हेगारांचा जन्म झाला आहे. आजची तरुण पिढी दहा दहा तास फक्त फेसबुक, व्हॉट्सअप वर वैयक्तिक संभाषणासाठी स्वःतला गुंतवून घेते. यामधून अनेक आजारांना स्वतःहून आमंत्रण देण्याचा हा प्रकार दिसून येतो. अनेक मुलींना वैयक्तिक अकाउंट वरून ब्लॅकमेलिंग केल्याच्या हि घटना आपल्यासमोर आहेत.. त्या आहेतच असे नाहीतर त्या दररोज वाढतच आहेत हि तुमची माझी बोचरी खंत आहे. शेवटी तीक्ष्ण हत्याराने जशी शस्त्रक्रिया करून एखाद्याचे प्राण वाचविले जातात तसेच त्याच हत्याराच्या चुकीच्या पद्धतीच्या वापराने एखाद्याचे प्राणही घेतले जाऊ शकतात . त्यामुळे सोशल मीडियाबरोबर आनंद घेत असताना आपल्या इतर मित्रांच्या किंवा समाजाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी हि आपल्या सारख्या सुशिक्षित समाजाने घ्यायला हवी हीच एक माफक अपेक्षा...!
धन्यवाद.

शनिवार, ४ फेब्रुवारी, २०१७

लोकसत्ताच्या ब्लॉगबेंचर्स या स्पर्धेत या आठवड्यातील आम्हा मेंढरासी ठावे या विषयावर मी व्यक्त केलेले माझे मत

कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था आणि  नागरिकांचा  जीवनमानाचा दर्जा हा तिथल्या सरकारच्या दृष्टीकोनावर बराचसा अवलंबून असतो. 127 कोटी इतकी विशाल लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशामध्ये फुटपाथवरील गरीब व्यक्तीपासून ते आलिशान बंगल्यात राहणाऱ्या श्रीमंत व्यक्तीपर्यंतच्या संबंधित वर्गाच्या नेमक्या समस्या , प्रश्न आणि अडचणी काय आहेत, हे ओळखुन त्यावरती आर्थिक उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना आखत असते. त्या योजनांचा लाभ तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांना किती झाला आहे याचा आढावा घेणे हे सरकारचे काम आहे. आपला भारत देश एक तळपती आर्थिक शक्ती म्हणून पुढे येत आहे. आपण जगातील महासत्तापैकी एक देश होण्याचं स्वप्न उराशी बाळगून पुढे वाटचाल करतोय. परंतु हे स्वप्न पाहत असताना वास्तव परिस्थितीचे हे भान डोक्यामध्ये ठेवत  भारतापुढे असणाऱ्या दारिद्र्य, दहशतवाद, भ्रष्टाचार, जातीयवाद, स्त्री अत्याचार यासारख्या अनेक प्रश्नावर केंद्र सरकारने प्रयत्न करणे गरजेचं आहे. 
भारत सरकारने यावर्षी  ब्रिटिशांची 28 फेब्रुवारींची अर्थसंकल्पाची परंपरा बदलत ती 1 फेब्रुवारीला केली. अर्थात त्यामागे बरीच राजकीय सामाजिक आर्थिक करणे आहेत.    सर्वात महत्वाचे म्हणजे उत्तरप्रदेश पंजाब सह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकाचा रणसंग्राम चालू आहे. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केंद्र सरकारमध्ये सत्तेत असलेला भाजपकडून नक्कीच त्यांच्या मातदारासाठी  काही तरी तरतूद करून त्याचा राजकीय फायदा घेतला जाईल अशी शक्यता दिसतेय. दरवर्षी सादर होणारा देशाचा अर्थसंकल्प देशाच्या तिजोरीतुन वर्षभरातील जमा आणि खर्चाचा व्यक्त केलेला अंदाज आहे.  यावरूनच राज्यघटनेतील मूळ शब्द अंदाजपत्रक असा आहे.  मागील वर्षीचा आर्थिक पाहणी अहवाल डोळ्यात झणझणीत अंजनच घालतो. गेल्या वर्षात आर्थिक विकासदारावर परिणामी होऊन तो अर्धा टक्यांनी खाली आला आहे, बेरोजगारी वाढली आहे, शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. बांधकाम क्षेत्रातील उद्योगावर ही नकारात्मक परिणाम झालेले आहेत.  यासाठी गेल्यावर्षी घेतलेले  नोटबंदीसारखे अनेक निर्णय कारणीभूत आहेत.   नोटबंदीच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन सकारात्मक परिणाम पहायला  मिळू शकतात. गुन्हेगारी, दहशतवाद, सीमेवर होणारी घुसखोरी यासारख्या गोष्टीवर नक्कीच काही प्रमाणात आळा बसण्यास मदत होईल. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना "इस मोड पर घबरा के न थम जाइए आप, जो बात नही हैं, उसे अपनाइए आप, डरते हैं नई राह पर क्यो चलनेसे, हम आगे आगे चलते है, आ जाइए आप"  या शायरीचा आधार घेत केंद्र सरकारची नाविण्याकडे, सर्वांगीण प्रगतीकडे आर्थिक पाऊले पडतील आणि गेल्या वर्षभराच्या काळात घेतलेल्या नवीन अर्थव्यवस्थेतील निर्णयांचे ठामपणे समर्थन करत त्यासाठी सर्वांनी त्याला साथ दिली पाहिजे हे सूचित केले. 
जगातील एकमेव महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावरील ट्रम्प यांचा धोरणांचा परिणाम, वाढत जाणाऱ्या तेलांच्या किमती यासारख्या आंतरराष्ट्रीय घडामोडीसह भारतातील नोटाबंदीचा निर्णय, पाच राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचा परिणाम हि या अर्थसंकल्पावर झाल्याचे आपल्याला दिसून येते.
2017- 18 च्या अर्थसंकल्पात शेतकरी ग्रामीण भाग आणि युवा वर्ग यांना मध्यवर्ती ठेऊन विविध योजनावरती तरतुदी केल्याचे आपणास पाहायला मिळते. मग त्या शेतकऱ्यांसाठी पाच वर्षात दुप्पट उत्पन्न, पीककर्ज आणि पीक विमा , दुग्ध प्रक्रिया उद्योगाच्या पायाभूत उद्योगासाठी  भरघोस निधीची तरतूद केल्याचे आपणास पाहायला मिळते. परंतु  जगाच्या अन्नाची गरज भागवणाऱ्या  शेतकऱ्यांपर्यंत अश्या कित्येक योजनांची माहितीही पोहचत नाही हि कटू पण सत्य वस्तुस्थिती आहे. दरवर्षी शेतकऱ्याच्या आत्महत्यांचे वाढत जाणारे आकडे पाहिले कि मान शरमेने खाली जाते आणि वाटते की अंदाजपत्रकात कृषी क्षेत्रासाठी एवढ्या मोठ्या मोठ्या आकड्यांच्या तरतूदी करूनही,  शेतकऱ्यांसाठी योजना आखूनही शेतकरी आत्महत्या सत्र काही केल्या थांबत नाही याचे  कारण म्हणजे अंदाजपत्रकात(कागदावर) शेतीसाठी केलेली गुंतवणूक ही शेतकऱ्याच्या शिवारात किती पोहचते हा खरंतर हा संशोधनाचा विषय होईल. सरकारी पातळीवर अनेक सर्वसामान्य समाजासाठी, वंचित समाज घटकासाठी अनेक योजना आखल्या जातात पण अनेक योजनांची माहितीही त्या लाभार्थ्यांला नसते. त्या योजना आपल्यासाठी आहेत याचीच माहिती त्या सर्वसामान्य लाभार्थ्यांला असत नाही हे खूप मोठे द्वैत सार्वजनिक पातळीवर आपल्याला दिसून येते. त्या योजनाचीं  माहिती योग्य त्या लाभार्थ्यापर्यंत पोहचणे  गरजेच आहे.
अर्थसंकल्पातील दुसरा महत्वाचा घटक म्हणजे युवक वर्ग... आपणा सर्वाना माहित आहेच की जगामध्ये भारतात सर्वात जास्त युवकांची संख्या आहे. त्या युवकांच्या समोर आज सर्वात मोठे आव्हान आहे ते म्हणजे बेरोजगारीचे... दिवसेंदिवस वाढत जाणारी बेरोजगारी नक्कीच सरकारसमोर चिंता वाढवणारी अशीच आहे. देशातील या  युवा शक्तीला त्यांच्या हाताला काम मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती येणाऱ्या काळात करावी लागेल. सरकारी पातळीवरून त्यासाठी 'मेक इन इंडिया', 'स्टार्ट अप इंडिया', 'स्किल इंडिया'  यासारखे नारे दिले आहेत.   त्यासाठी स्थानिक पातळीवर युवकांना प्रशिक्षण दिले गेले पाहिजे.   युवाशक्तीचा योग्य वापर केला तरच आपल्याला महासतेची पाऊले चढता येणार आहेत.  
मध्यमवर्गीयासाठी 2.5 ते 5 लाखापर्यंत केलेली 5 % कर कपात नक्कीच माध्यमवर्गीयासाठी स्वागतार्यच अशीच आहे. लोकशाही मार्गाने होणाऱ्या निवडणुकीसाठी  राजकीय पक्षांच्या देणग्यावर घातलेली 2000 रुपये पर्यंतची मर्यादा नक्कीच पारदर्शक पणाकडे उचललेली योग्य पावले  आहेत असे मला वाटते. 
2017-18 साठी 21,47,000 कोटी रुपये खर्च करण्याची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. त्या सर्व तरतूद खर्चाची योग्य अंमलबजावणी व्हावी आणि  योग्य लाभार्थ्यांपर्यंत  पारदर्शकपणे पोहचावी हीच एक एक माफक अपेक्षा...
धन्यवाद...
पोपट यमगर