आज महाराष्ट्रातील मराठी साहित्याचा एक मानदंड, थोर कविवर्य वि.वा.शिरवाडकर अर्थातच कुसुमाग्रज यांची जयंती... त्यानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्रसह देशभरामध्ये मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. तो साजरा केला जात असताना मराठी भाषेची आधुनिक युगात प्रगती होत आहे का? या संदर्भात चर्चा करणे अनिवार्य आहे.
"माझा मराठाचि बोलू कवतुके परि अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन" अशी मराठी भाषेची थोरवी गात संत ज्ञानेश्वर माउलींनी गीतेवर भाष्य करीत 'ज्ञानेश्वरी' सारखा विश्वाच्या साहित्यामध्ये मराठी भाषेतील सर्वश्रेष्ठ असा ग्रंथ तुम्हा आम्हाला दिला. हा ग्रंथ म्हणजे मराठी साहित्याचा भक्कम पायाच आहे आणि तिथूनच खऱ्या अर्थाने मराठी साहित्य संसाराला सुरवात झाली, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. माउलींनी लावलेला मराठी भाषेच्या समृद्धीचा वेल आज मराठी साहित्यामध्ये तरी नक्कीच उंच उंच जाताना दिसतो आहे. वैचारिक ज्ञानातून खरे अभिसरण समाजमनात होत असते, या अभिसरणाची महत्वपूर्ण कामगिरी मराठी भाषा पाडत आहे याचा नक्कीच मनस्वी आनंद आहे. मराठी भाषा स्वतः जगली, तिने महाराष्ट्राला येथील समाजाला जगवले, समृद्ध केलंय, त्यामुळे या भाषेविषयीचा अभिमान महाराष्ट्राला आहे.
मराठी भाषेला इतका उज्वल आणि प्रदीर्घ इतिहास लाभला आहे तरीही आज महाराष्ट्रात मराठी माध्यमाच्या शाळांची घसरत जाणारी संख्या नक्कीच चिंताजनक अशीच आहे. मातृभाषेतून घेतलेले शिक्षण लगेच आत्मसात होते किंवा कोणाचाही आधार न घेता डोक्यात शिरते त्यासाठी कोणताही वेगळा विचार करण्याची गरज भासत नाही. तळागाळातील लोकांपर्यंत आपले विचार पोहचविण्यासाठी मातृभाषेवर प्रभुत्व असणे खूप गरजेचे आहे. आज आमच्या आधुनिक पिढीला मराठी मातीचा जाज्वल्य इतिहास समजावून सांगावाच लागेल. जी आपली मातृभाषा आहे त्या मातृभाषेतून आपण चांगल्या पद्धतीने लिहू शकतो, बोलू शकतो, विचार मांडू शकतो. गरज आहे ती आपण मातृभाषेतून व्यक्त होण्याची... ती आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होऊच याबद्दल माझ्या मनात तरी कोणतीच शंका नाही.
महिन्याभरापूर्वी डोंबिवलीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले . त्या संमेलनात मराठी भाषेच्या संवर्धनासंदर्भात चर्चा झाली. मराठी या भाषेला सरकारी पातळीवर लवकरच अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, तसेच मराठी भाषेतील साहित्य जगभरातील इतर भाषिकांना वाचण्यासाठी इतर भाषांमध्ये भाषांतर व्हावे, तसेच आधुनिक माहिती तंत्रज्ञानाची भाषा मराठी व्हावी आणि मराठी भाषेचा वापर आधुनिक तंत्रज्ञामध्ये जास्तीत जास्त केला जावा अश्या काही महत्वाच्या मागण्या त्या संमेलनातून केल्या गेल्या आहेत. त्या येणाऱ्या काळात त्यासंदर्भात सरकारी पातळीवर पावले उचलली गेली पाहिजेत अशी सदिच्छा आहे. शेवटी कवी सुरेश भट यांच्या कवितेतील चार समर्पक ओळी,
"लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी..
जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी..
धर्म, पंथ, जात एक, जाणतो मराठी
एवढ्या जगात माय, मानतो मराठी..."
आपल्या सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
धन्यवाद...
✍पोपट यमगर
बाळेवाडी, ता. आटपाडी,
जि. सांगली.
7709935374