विवेक विचार

विवेक विचार

सोमवार, १ ऑक्टोबर, २०१८

*तळागाळातील जनमाणसाला मान सन्मान आणि स्वाभिमान मिळवून देणारा स्वाभिमानी आवाज म्हणजे मा. गोपीचंद पडळकर साहेब*


महाराष्ट्राच्या  राजकारणात स्वतःच एक वेगळं वलंय निर्माण केलेले, गेल्या दहा वर्षात सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातील  प्रस्थापित घराण्याच्या विरोधात आवाज उठवत विस्थापीत झालेल्या बहुजन समाजाची मोट बांधत आपल्या उत्तम अशा वक्तृत्व शैलीने वर्षानुवर्षे  जनतेवर स्थान मांडून असलेल्या प्रस्थापित  राजकारण्यांना घायाळ करणारे महाराष्ट्रातील एक  स्वाभिमानी नेता म्हणून अल्प कालावधीत मिळवलेली ओळख तसेच बहुजन, गोरगरीब, शेतकरी, कामगार, वंचित समाजाचा स्वाभिमानी आवाज, युवाहृदयसम्राट सन्माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांचा आज वाढदिवस.... वाढदिवसाच्या निमीत्ताने प्रथमतः  त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा...
सांगलीच्या राजकारणात (लोकसभेला आणि विधानसभेला आणि इतर निवडणुकांना) आपण किंगमेकर ठरलाच आहात पण येणारया काळात २०१९ ला सांगलीसह महाराष्ट्राच्या  राजकारणातील सतेत  आपण किंगमेकर  व्हावं हीच मनापासुन सदिच्छा आहे...
      २००७ पासून सुरु झालेली प्रस्थापित राजकीय व्यवस्थेविरोधातील पडळकर यांची राजकीय वाटचाल ही प्रचंड संघर्षमय अशीच ठरली आहे.  गेल्या १२  वर्षातील राजकीय , सामाजिक वाटचाल ही खडतर, काटेरी वाटेवरील अनवाणी पायाने केलेला प्रवास अशीच म्हणावी लागेल... मी तर याला तिमीरातुन तेजाकडे निघालेला संघर्षमय प्रवास असंच म्हणु इच्छितो...
खरंतर गोपीचंद पडळकर हे नाव या जिल्ह्यान आणि राज्यांन  पहिल्यांदा ऐकलं, पाहिलं, वाचलं ते म्हणजे 2009 च्या विधानसभा निवडणुकीपुर्वी फक्त 15-20 दिवस अगोदर...  त्यावेळी राजकारण, समाजकारनात नवख्या असेलल्या पडळकर यांनी खानापूर आटपाडी मतदार संघाचा निकाल बदलून ते किंगमेकर ठरले.  त्यामुळे अनेक प्रस्थापित त्यांना राजकारणात पुढे जाऊ नये म्हणून कुरघोड्या करू लागले... त्यामध्ये त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल करून त्यांना मानसिक त्रास देणे, त्यांना अडवण्याची भाषा करणे यासारख्या कुरघोड्या प्रस्थापितांनी करूनही त्यांचा स्वाभिमानी आवाज  ना कोणासमोर दबला ना कोणासमोर झुकला ... त्यामुळे जिल्ह्यातील युवकांना असेच नेतृत्व आपल्या जिल्ह्याला पाहिजे असे वाटू लागले...  तिथुन चालू झालेली संघर्षात्मक वाटचाल  अजूनही अविरतपणे चालू आहे...
वर्षानुवर्षे पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या माणदेश सारख्या दुष्काळी भागात टेंभुसाठी आक्रमक पद्धतीने आंदोलने तसेच ओगलेवाडी टेंभु कार्यालय तोडफोड प्रकरण, मंत्र्याना तालुक्यात येण्यास बंदी, राजेवाडी पोट कालवा आंदोलन, दुष्काळी परिषदा, धनगर आरक्षण साठी विविध मेळावे, मोर्चे  यासह विविध माध्यमातुन जनतेप्रती असलेली आपुलकीची जाणीव जनमाणसात रुजविली.
त्यानंतर 2012 मधील जि. प. पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढवत तालुक्यात दुसरया क्रंमाकाची मते मिळवत तानाजीशेठ यमगर यांच्या रुपाने एक पंचायत समिती सदस्यही निवडुन आणला.. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत  उमेदवार म्हणुन खानापुर आटपाडी मतदारसंघात ज्या झंझावत अशा पद्धतीने आपण निवडणुक लढविली ती नक्कीच सर्वसामान्य माणसांना प्रेरणा देणारी अशीच आहे..समोर आर्थिक सामाजिक दृष्ट्या प्रस्थापित असलेल्या तीन उमेदवारांना तुमची उमेदवारी आणि तुम्ही मिळविलेली मते ही नक्कीच सणसणीत चपराकच ठरली.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ग्रामपंचायत निवडणुकात तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती स्वबळावर ताब्यात घेतल्या.. २०१७ च्या सांगली जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता येण्यामध्ये तुमची भूमिका महत्त्वाची होती. अनेकजण जिल्ह्यात लोकसभेला निभावलेली किंगमेकर ची भुमिका विसरलेही असतील कदाचित पण सर्वसामान्य माणुस मात्र कधीच विसरणार नाही.  एकीकडे राजकारणाचा चढता आलेख चालु असताना दुसरीकडे सामाजिक कार्याबरोबरच शेतकर्यासाठी, कामगारांसाठी, गोरगरीब, दीनदलीत जनतेसाठी आक्रमक पद्धतीने आंदोलने चालुच होती. माझासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील हजारो मुलांना स्वाभिमानानं जगणं म्हणजे काय असतं हे तुमच्या वाणीतुन आणि कर्तृत्वातुन दाखवुन दिलं. राजसत्ता आणि राजपाठ कधी मागुन मिळत नसतो तर तो हिसकावुन घ्यायचा असतो  असं पडळकर साहेबांनी बहूजन पोरांना ठामपणे ओरडुन सांगितलं...  त्यांना हिम्मत देऊन स्वाभिमानाने जगायला शिकवलं.
महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकावर  असणाऱ्या धनगर समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत अनुसूची क्र. ३६ वर  दिलेल अनुसुचित जमातीच आरक्षण र आणि ढ च्या चुकीमुळे  झाले नाही. यासाठी भारताच्या स्वांतत्र्यापासुन ते आजपर्यंत गेली ७१ वर्ष रस्त्यावर उतरून विविध मार्गांनी समाजाने आंदोलने केली पण अजूनही तो प्रश्न मार्गी लागला नाही... सत्तेत येण्यासाठी सर्वच पक्षांनी आरक्षणाचे आश्वासन दिले पण ते आश्वासन कोणत्याच पक्षानी अजूनपर्यंत तरी पाळले नाही. आज

गुरुवार, २३ ऑगस्ट, २०१८

महाराष्ट्रात आरक्षणाचा अखेरचा लढा गाजतोय..... बरसतोय..... आता सर्वांचे लक्ष फक्त आणि फक्त औरंगाबादच्या आमखास मैदानाकडे.........



गेल्या दोन महिन्यापासून अखंड महाराष्ट्रात चालू असलेला धनगर समाजाच्या आरक्षणाचा अखेरचा लढा संपूर्ण राज्यभर गाजत आहे. या अखेरच्या लढ्याची नियोजन बैठक पुण्यात १ ऑगस्ट ला पार पडली.. आणि तिथून चालू झाला या लढ्याचा झंजावात....... या अखेरच्या लढ्यात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, विदर्भ या महाराष्ट्रातील सर्वच विभागातून समाजाचा प्रचंड असा प्रतिसाद मिळतो आहे. समाजातील प्रत्येकाला हा लढा खुणावतो आहे, या लढ्यात प्रत्येकाला सामील व्हावेसे वाटत आहे.... आणि आजचा युवक सर्व राजकारण, पक्ष, गट, तट बाजूला ठेऊन या लढ्यात सहभागी होत आहे. गेल्या सत्तर वर्षातील भिजत पडलेले आरक्षणाचे घोंगडे या लढ्यामुळे साध्य होइल असा आत्मविश्वास समाजाच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. या अखेरच्या लढ्याचा महामेळावा औरंगाबाद येथील आमखास मैदानावर ३१ ऑगस्ट रोजी दुपारी ३.०० वाजता संपन्न होणार आहे... या महामेळाव्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या मैदानावर सरकारची अग्निपरीक्षा आहे... त्यामुळे विवध राजकीय नेत्यांचे, विविध राजकीय पक्षांचे तसेच राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. या अखेरच्या लढ्याला विविध विभागातून मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादावरून या मैदानावर प्रचंड अश्या मोठ्या संख्येने समाज येईल अशी शक्यता विविध वाहिन्यांनी आणि वर्तमानपत्रांनी दर्शविली आहे. या महामेळाव्याच्या विचारपीठावर एकमेव असे व्यक्तिमत्व असेल ते म्हणजे भारतातील ऋषितुल्य आणि जगातील रेकॉर्ड ब्रेक आमदार आदरणीय गणपतराव (आबासाहेब) देशमुख हे एकटेच असणार आहेत. हा महामेळावा यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्रातील युवकांच्या गळ्यातील ताईत आणि या महाराष्ट्राचा बुलंद आवाज सन्माननीय गोपीचंदजी पडळकर आणि मा. उत्तमरावजी जानकर साहेब हे दिवस रात्र मेहनत करून गावागावामध्ये जाऊन समाजातील तळागाळातील घटकांना जागृत करण्याचे काम करत आहेत. अखंड महाराष्ट्रातील समाज हा त्यांच्या या अखेरच्या लढ्यात उस्फुर्तपणे सहभागी होत आहे... यामुळे अनेक प्रस्थापित नेत्यांच्या मनात धडकी भरली आहे... त्यांना यामुळे राज्यातील सत्तेत भीती वाटत आहे. अनेकांना समाजामुळे भेटलेली आपली पदे जातील याची चिंता सतावत आहे. तर अनेकांना आपले नेतृत्व कमी होऊन ही नवीन नेतृत्व राज्यभरात मोठी होतील याची काळजी वाटत आहे... याच त्यांच्या द्वेषातून अखेरच्या लढ्याच्या दोन्हीही कार्यक्षम नेतृत्वावर चिंता वाटणाऱ्या नेत्यांच्याकडून आणि त्यांच्या बगलबच्याकडून टीकाटिपण्या केल्या जात आहेत... त्यांच्या भाषणाचा अगदी शब्द न शब्द चाळून पहिला जात आहे... या महाराष्ट्रातील धनगर समाजाचा विश्वास या दोन्हीही कार्यक्षम नेतृत्वानी कधीच जिंकला आहे त्यामुळे एखाद्या शब्दछलमध्ये हा धनगर समाज अडकायला काय एवढा दुधखुळा नाही... या समाजाला चांगले माहित आहे कि यापूर्वी सामाजाच्या नावावर कोणी किती आमदारक्या आणि कोणी किती मंत्रिपदे लाटली आहेत... त्यामुळे समाजातील युवक आज जागृत झाला आहे... त्याला समजायला लागले आहे कोणते नेतृत्व खऱ्या अर्थाने समाजासाठी तळमळीने काम करत आहे, कोणते नेतृत्व महाराष्ट्रव्यापी होऊ शकते हे सर्व आजचा युवक जाणून आहे.खरंतर यावर बोलण्यासारखे बरेच आहे पण आताचा वेळ हा कोणावर टीकाटिपण्या करण्याचा नसून समजत नवचैतन्य निर्माण करून समाजाला अखेरच्या लढ्यात सहभागी करावयाचा आहे. त्यामुळे या विषयावर जास्त बोलणे उचित होणार नाही.
१ ऑगस्ट पासून चालू झालेला हा अखेरचा लढा तुमच्या माझ्यासारख्या नवयुवकाच्या हातात अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र भेटल्याशिवाय थांबणार नाही हे निशंक आहे. त्यामुळे आपल्या सारख्या सुशिक्षित युवा बंधू आणि भगिनींना एक नम्र विनंती आहे कि या अखेरच्या लढ्याची असणारी मुद्देसूद अभ्यासात्मक माहिती समाजातील तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत पोहचावावी... आणि येणाऱ्या ३१ ऑगस्टच्या आमखास मैदानावरील कार्यक्रमात सर्वांनी आल्या नंतरचे महत्व त्यांना समजावून सांगावे. मित्रानो औरंगाबाद मध्ये ३१ तारखेला ऐतिहासिक कार्यक्रम होणार आहे... त्यामुळे या ऐतिहासिक कार्यक्रमात आपण सर्वेसर्वानी येऊन या आरक्षणाच्या अखेरच्या लढाईत सहभागी व्हावे ही नम्र विनंती.

श्री. प्रतिक यमगर

गुरुवार, ९ ऑगस्ट, २०१८

देशातील आदर्श नेता कसा असावा याचे उत्तम उदाहरण ज्यांनी जगण्यातून दाखवून दिले ते आदरणीय असे व्यक्तिमत्व आ. गणपतराव देशमुख (आबासाहेब)






राजकारण म्हणजे भ्रष्टाचार, 'पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसाकमावण्याचा उद्योगअनेक नेत्यांची पोकळ आश्वासने अशी सर्वसामान्य लोकांच्या मनातील राजकारण्याविषयीची भावना झाली आहे परंतु मला ठामपणे सांगायला आवडेल ते म्हणजे या सर्वाना अपवाद व कोणत्याही वाद विवादात न पडता सर्वांशी मिळून मिसळून सर्वांशी आदराचे असे संबंध निर्माण करणारे देशातील आदर्श नेता कसा असावा याचे उत्तम उदाहरण ज्यांनी जगण्यातून दाखवून दिले असे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आदरणीय आमदार गणपतराव (आबासाहेब) देशमुख साहेब यांचा आज वाढदिवस... त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम त्यांना सदा सर्वकाळ कोटी कोटी शुभेच्छा... आपणास उदंड आयुष्य लाभावे हीच आपल्या वाढदिनी मनस्वी सदिच्छा...

सध्याचा काळच असा आहे कीराजकारणात सगळीकडे दलदल माजली आहे,  जनतेचा नेत्यांवर  काडीचा भरोसा वाटत नाही. पांढऱ्या खादीतल्या कोणालाही हात लावा. भ्रष्टाचाराचं काळं हाताला लागल्याशिवाय राहत नाही. पण आपल्या राज्यात असा एक नेता आहेज्याच्यावर राखलेल्या तळ्याचं पाणी चाखल्याचे आरोप करायला कुणी धजावत नाही. या बिनडागी नेत्याचं नाव मा. गणपतराव देशमुख  म्हणजेच आदरणीय सन्माननीय आबासाहेब. त्यांच्या वयाला 91 वर्षे पूर्ण होत आहेत. हा 91 वर्षांचा तरुण माणूस गेली 11 निवडणुका सतत आमदार म्हणून निवडून येतोय. राज्याच्या विधानसभेत कष्टकरी, शेतकरी, कामगार, वंचित घटकांचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी राजकारणातले कित्येक उन्हाळे पावसाळे पाहिलेत. ते बोलायला उभे राहिले की विधानसभा स्तब्ध होते. मुख्यमंत्र्यांपासून ते पहिल्यांदाच सभागृहात आलेल्या तरुण आमदारापर्यंत प्रत्येकजण त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकतो. ते आहेतसोलापुरातल्या सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख. आबासाहेबांच्या राजकीय वाटचालीत गेल्या 55 वर्षांचा महाराष्ट्राचा सामाजिक आणि राजकीय इतिहास सापडतो.

             आमदारपद स्वतःच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी नाही तर जनता जनार्दनासाठी आहे हे त्यांनी जाणलं. आपलं तनमनधनसेवावेळशीलहृदय असं सगळं जनता जनार्दनाला अर्पण केलं. जनतेनंही त्यांना आपलं मानलं.  एवढं काम केलं पण आबासाहेब त्याविषयी फारसं बोलत नाहीत. आबासाहेबांचे काम हे फक्त सांगोल्यापुरतंच नाही. दुष्काळपाणीशेतीवीजमहागाईरोजगार हमी योजनाकापूस एकाधिकार योजनाशेतीमालाचे भाव अशा प्रश्नांवर त्यांनी राज्याला दिशा देणारं काम  केलं आहे. विधानसभेचे नियमविधानसभेने केलेले कायदे, संसदीय कामकाज पद्धतीवर आबासाहेबांचे प्रभुत्व आहे. नवे आमदार त्यांच्याकडून म्हणूनच सतत सल्ला घेत असतात. आबानी सकाळी वाजता कामाला सुरुवात केली की रात्री उशिरापर्यंत त्यांचे ते काम सुरू असतं. डोंगराएवढं काम करूनही `मी हे काम केलं.’ असं म्हणत नाहीत. सतत आम्ही केलं असं म्हणतात.  आजच्या काळात एखाद्या गावात काम करण्याच्या अगोदरच त्या कामाचे नारळ फोडले जातात. त्याची फलकबाजी गावभर केली जाते.. त्यामुळेच आबासाहेब या आजच्या आमदारापेक्षा वेगळे वाटतात ते यावरुनच... आणि यामुळेच जनता त्यांना सतत ५५ वर्षे साथ देते आहे.
राज्यातील इतर राजकीय आणि सहकार सम्राटांचा बडेजावत्यांचं वैभव, त्यांची खोटी आश्वासने एका बाजूला आणि आबासाहेबांचे साध राहणीमान, कोणताही बडेजाव नाही, सर्वसामान्य माणसामध्ये मिसळून त्यांची तळमळीने विचारपूस करणारे असे सन्माननीय आबासाहेब एका बाजूला आहेत म्हणूनच महाराष्ट्रातील तुमच्या माझ्या सारख्याच्या मनात आबासाहेबांची स्वच्छ प्रतिमा मनात घर केल्याशिवाय राहत नाही. त्यांच्यावर तळं राखलं पण पाणी चाखल्याचे आरोप कुणी करायला धजणार नाही. सध्या सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळलाय. अशा काळात आबासाहेबासारखासारखा बिनडागाचा नेता आपलं काम नेकीनं पुढे नेतोय. आज त्यांच्या वाढदिवसानिमित त्यांच्या असामान्य कर्तुत्वास मनापासून सलाम... खरंतर त्यांच्याविषयी किती जरी लिहिले, बोलले तरी मला मनातून ते कमीच वाटत आहे. शेवटी पुनश्च एकदा त्यांच्या वाढदिवसानिमित कोटी कोटी मनस्वी अश्या शुभेच्छा... आमच्या सारख्या आपल्या हितचिंतकाचे आयुष्य पाच दहा वर्ष कमी मिळावे आणि ते आपल्या सारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वास उदंड असं दीर्घायुष्य लाभावे हीच मनस्वी सदिच्छा आहे.



श्री. प्रतिक यमगर

आटपाडी, सांगली

७७०९९३५३७४



मंगळवार, ७ ऑगस्ट, २०१८

अखेरचा लढा योग्य दिशेने पुढे वाटचाल करतोय ... गरज आहे ती आपल्या सहकार्याची....


दै. जनशक्ती या वर्तमानपत्रात वसंत घुले नामक पत्रकाराने दिलेली एक बातमी कालपासून सोशल मिडीयावर फिरताना दिसते आहे. या बातमीमध्ये राज्याभरातील युवकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, युवा हृद्यसम्राट मा. गोपीचंद पडळकर आणि समाजाच्या न्याय हक्कासाठी हिरीरीने लढणारे सन्माननीय उत्तमराव जानकर यांच्या बाबत समाजात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. १ ऑगस्ट ला पुण्यातील दुधाने लोन्सवर झालेल्या समाजाच्या अखेरच्या लढ्याला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर राज्य सरकार, मंत्री महोदय, आणि मोठ मोठ्या नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यांना माहित आहे हा लढा लोकशाही मार्गाने आणि माहितीच्या आधारावर चालला आहे. या लढ्यातून सरकार अडचणीत सापडणार आहे. कारण या राज्यात धनगड नावाची जातच अस्तित्वात नसताना त्या जातीचे भूत धनगर समाजाच्या मानगुटीवर बसवले आहे.. त्यामुळे गेली 70 वर्षे धनगर समाज राज्यघटनेत मिळालेल्या आरक्षणच्या न्यायहक्कापासून वंचित राहिला आहे.
वरील बातमीमध्ये जानकर साहेब आणि पडळकर साहेब यांनी पवार साहेबांची भेट घेतली असल्याचे म्हटले आहे.. खरे तर राज्यातील तमाम समाज अश्या खोट्या बातमीवर विश्वास कधीच ठेवणार नाही... जर या बातमीमध्ये काही तथ्य असेल तर वर्तमान पत्राने अखंड समाजाला पुरावे द्यावेत अन्यथा समाजाच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागेल.
मित्रानो आदरणीय पडळकर साहेब आणि जानकर साहेब यांनी जो अखेरचा लढा चालू केला त्याला गट, तट, पक्ष आपल्यातील हेवेदावे विसरून आपण सर्वांनी साथ दिली आहे, देत आहोत यापुढे ती साथ वाढत राहणार आहे हे अनेक राजकीय नेत्यांच्या लक्षात आल्यामुळे अश्या बिनबुडाच्या बातम्या पसरवायचे काम काही विघ्नसंतोषी मंडळी करत आहेत.... पण मला पूर्ण विश्वास आहे कि अश्या बातम्यांना समाज कधीच भिक घालणार नाही.. तितका समाजाचा विश्वास आहे.
नवीन नेतृत्व जर समाजात तळमळीने उभे राहत असेल, समाजाच्या सर्वांगीण प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करत असेल, अखेरचा लढा या आंदोलनाच्या माध्यमातून आरक्षणाच्या प्रश्नांवर सरकारला घेरण्याचे आणि सडेतोड जाब विचारण्याचे काम करत असेल तर करुद्या ना यामध्ये इतर नेत्यांना वाईट वाटण्याचे कारण काय ?? हाच खरा सवाल राज्यातील तमाम समाजाला पडला आहे. आणि गोपीचंद पडळकर यांचा राजकीय संघर्ष हा काटेरी वाटेवरून अनवाणी पायांनी झालेला आहे अनेकांनी त्यांना यापूर्वी ही दाबण्याचा खूपवेळा प्रयत्न केला आहे पण हे नेतृत्व कधी दबले नाही न कधी झुकले नाही... राज्यातील समाजाचे नेतृत्व करेल इतकी धमक या माणसामध्ये आहे.. कदाचित त्यांच्या वक्तृत्व आणि कर्तुत्व यामुळे अनेकांना त्यांचे नेतृत्व आपल्यापेक्षा मोठे होईल ही भीती वाटते आहे त्यामुळे त्यांच्यावर अशा पद्धतीने चुकीच्या बातम्या आणि आरोप केले जात आहेत पण त्यांना माझे सांगणे आहे कि तुमच्या या कुटील कारस्थानांमुळे हे नेतृत्व पुढे जायचे कधीच थांबणार नाही. अर्थात कोंबड आरवतय म्हणून ते झाकलं तर ते आरवायचे कधीच थांबत नाही... म्हणून अशा प्रकारे समाजाची दिशाभूल करण्यापेक्षा समस्त धनगर समाजाने चालू केलेल्या अखेरच्या लढ्यात सर्व बंधू आणि भगिनींनी सर्व राजकीय मतभेद विसरून सहभागी व्हा.... हा अखेरचा लढा नक्कीच आपल्या हातात ST चे प्रमाणपत्र घेऊनच थांबला जाणार आहे. आणि शेवटची हात जोडून सर्वाना कळकळीची एक नम्र विनंती आहे कि आत्महत्या करून आपले इतके सुंदर असे मिळालेले ही जीवन आपण संपवून घरच्यांना असे आपल्यापासून असे परके करू नका ... त्यांना तुमची खूप गरज आहे त्यामुळे या अखेरच्या लढ्यात सहभागी व्हा नक्कीच यामुळे आपण आरक्षणच्या दिशेने नक्की जाऊ हा विश्वास मला आहे.
श्री. प्रतिक यमगर
आटपाडी, सांगली.
7709935374

सोमवार, १४ मे, २०१८

स्वराज्य रक्षक संभाजी....



एक दोन नव्हे तर एकाच वेळी पाच आघांड्यावर निकराची झुंज देऊन लढणारे धुरंधर.! औरंगजेबाच्या पाच लाख फौजेशी सलग आठ वर्षे कडवी झुंज देणारा मराठ्यांचा दुसरा छत्रपती, ज्याने वयाच्या बत्तीसाव्या वर्षी कराल काळाच्या वेदीवर आपले मस्तक दिले; पण शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील एकही महत्त्वपूर्ण किल्ला किंवा आपल्या आरमारातील एकही जहाज गमावले नाही! असे हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्याचे धाकले धनी, अजिंक्य योद्धा, महापराक्रमी, शिवपुत्र म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रथमतः त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन...
गेली सव्वातीनशे वर्षे या विचारी, कवी-राज्यकर्त्यांची आणि पराक्रमी सेनानीची गाथा संशयाच्या धडप्यामध्ये गुंडाळून ठेवली गेली होती! तीनशे वर्ष रचलेली खोटी, मिथ्यापवादी नाटके, सिनेमे बंद करून खरी दिव्य भव्य तेजस्वी ऐतिहासिक व्यक्तिमत्वे नव्या पिढीपुढे ठेवणे गरजेचे आहे... मराठी मानसिकतेतील निर्धाराची, नवोन्मेषशालीन उत्साहाची हवा काढून मराठी मन पंक्चर करण्यासाठी ज्यांनी टोकदार लेखण्या हातात घेतल्या होत्या अशा अस्तानीतल्या निखाऱ्यांचा बंदोबस्त आजच्या नवीन मावळ्यांनी करावयास हवा. अज्ञानी, अहंकारी, जातीवर्चस्वाच्या स्वार्थासाठी बखरकारांनी आणि त्याच्या आधारे इतिहास लिहिणाऱ्या कोत्या, स्वार्थी लोकांनी महाराष्ट्राचा हा अत्यंत तेजस्वी, चिरंतन प्रेरणा देणारा इतिहास आपल्या नीच हितसबंधाचे डांबर ओतून काळाकुट करून ठेवला. इतिहास हा पुराव्याच्या आधारे तटस्थ आणि तर्कनिष्ठ पद्धतीने लिहायचा असतो परंतु गेल्या काही वर्षात आमच्याकडे स्वतःच्या जातीला पूरक असा इतिहास लिहिण्याची परंपरा काही नीच आणि जातीयवादी मानसिकतेच्या लोकांनी केली आहे. परंतु असत्य हे फारकाळ टिकत नसते कधी न कधी सत्य हे बाहेर येतच आणि ते सत्य बाहेर काढण्याचे कार्य इतिहास संशोधक स्वर्गीय वा.सी. बेंद्रे यांच्यासारख्या महान लेखकाने केले आहे. संशोधक स्वर्गीय वा.सी. बेंद्रे यांच्या संभाजी महाराज चरित्र ग्रंथाचा पुरस्कार करताना तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात, “ मराठ्यांच्या इतिहासाची साधने संग्रहित करणाऱ्या विद्वानाच्या चार पिढ्यांच्या संशोधनाला व परिश्रमाला आलेले फळ म्हणजे हे संभाजी चरित्र आहे. इतकी या पुस्तकाची योग्यता आहे.”
हिंदवी स्वराज्याच्या इमारतीला भूमी तयार करून देणारे शहाजीराजे, स्वराज्याची सशस्त्र इमारत उभी करणारे छत्रपती शिवाजी महाराज व त्या इमारतीवर भयंकर आपत्ती कोसळली असताना,तिला तोंड देऊन व नव्या पिढीमध्ये त्या आपत्तीला तोंड देण्यास चैतन्य, सामर्थ्य, शिस्त, पेरून जिवापाड सांभाळ करणारे युवराज शंभूराजे हे सर्व लहानपणापासून आपल्या अभ्यासाने वपूर्ण सुसंस्कृत, सुविद्य, राज्यव्यवहारकुल व युद्धविद्या निष्णात झालेले होते, यात कोणतीच शंका नाही. संभाजी राजांचे बालपण हे सामान्य गृह्सुखालाही मुकलेले आहे. पहिल्या १२ वर्षाच्या काळातच अशा काही आपत्ती कोसळल्या कि, त्यातून राजकारणातील व दरबारी व्यवहारातील अत्यंत कटू असे पण फार मोठे अनुभूव घेण्याची अलौकिक संधीच संभाजी राजांना मिळाली. त्यामुळे संभाजी राजेंच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण फार चांगली झाली, आत्मविश्वास वाढला. स्वतःच्या निर्णयाने राज्यकारभार आटोपण्याची खात्री झाली किवा तसे वळण लागले. हीच लहान शंभू राजांची वृत्ती रायगडावरील काही कारभाऱ्यानां जाचक वाटू लागली. शंभूराजेचे शिक्षण, अनुभव, कुवत, आत्मविश्वास वयोवृधानाही चकित करणारा असल्यामुळे त्यातून त्यांचा द्वेष करणारे व संभाजीमुळे आमचा पाणउतारा होतो असे समजणारे आणि वेळोवेळी बोलणारे काही सरकारकून आणि पेशवे संभाजीराजेबद्दल मनात अडी ठेऊन वावरत होते. जिजाऊ साहेब जिवंत होत्या, तोपर्यंत त्यांना मनातल्या मनात कुडण्यापलीकडे काही करता येत नव्हते. पण राज्यभिषेक सोहळ्यामध्ये संभाजी महाराजांचा युवराज म्हणून अभिषेक झाल्याने, अण्णाजी दत्तोसारख्या पोटात द्वेषाचे विष बाळगून असलेल्या सापांनी जिजाऊसाहेब यांच्या मृत्यूनंतर वाटेल तसे गरळ ओक्ण्यास सुरवात केली. विधियुक्त युवराज म्हणून संभाजीचे स्थानही ब्राम्हनापेक्षा श्रेष्ठ ठरले आणि ‘असा कर्तबगार, हुशार मुलगा उद्या छत्रपती झाला तर आपले काय?’ या चिंतेत अण्णाजी दत्तो आणि काही पेशवे पडले. याच चिंतेतून संभाजी राजांची बदनामी करण्याकरिता सर्वोतोपरी प्रयत्न केले आणि शास्त्र विद्यासंपन्न शौर्य, धैर्य आणि प्रचंड स्वाभिमानी असलेल्या संभाजी राजांचे चरितत्राला डाग लावण्याचे काम ह्या स्वराज्य द्रोही अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या साथीदारांनी व त्यांच्या पुढील वारसदार इतिहासकारांनी केले हे तुमचे माझे आणि या महाराष्ट्राचे दुर्दैवच....
छत्रपती संभाजी महाराज म्हणजे ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ या दिव्य विचारांचे मूर्तिमंत आचारप्रतीक... सामान्य गृहसुखालाही विन्मुख राहून शिवरायानाही जेवढ्या मोठ्या परचक्राचा सामना करावा लागला नाही अशा आलमगीर औरंगजेबाच्या अचाट शक्ती सामर्थ्याचा मुकाबला करण्यासाठी जीवनाचा प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस झगडत रहावे लागले. स्वराज्य संरक्षणासाठी थोडी थोडकी नव्हे, तर आठ-नऊ वर्षे दिवसरात्र झगडून स्वराज्याचा सांभाळ केला. एवढेच नव्हे, तर त्या भयंकर परचक्राला स्वतच्या प्राणाचे बलिदान देऊन मोगली सत्तेला नामोहरण केले आणि महाराष्ट्राला अत्याचारी परकीय सत्तेपासून दूर ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
सध्या झी मराठी या वाहिनीवर संभाजी महाराज यांच्या जीवनावर ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ म्हणून एक अप्रतिम अशी मालिका दाखवली जात आहे. संभाजी महाराजांविषयी जाणीवपूर्वक निर्माण केलेले अनेक समज, गैरसमज या मालिकेच्या माध्यमातून दूर होण्यास नक्की मदत होईल... ती मालिका पाहून शंभूराजेंचा दैदिप्यमान, शौर्याचा, त्यागाचा इतिहास आजच्या युवकांनी जाणून घेतला पाहिजे. आपले आदर्श शंभूराजे यांच्यासारखी स्वाभिमानी आणि महापराक्रमी अशी व्यक्तिमत्वे असली पाहिजेत.असे मला वाटते... शंभूराजेंचा खरा इतिहास समजावून घेणे आणि तो सर्वांच्या पर्यंत पोहचवणे हीच त्यांना खऱ्या अर्थाने आदर्नाजली ठरेल..... पुनश्च एकदा त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन......

सह्याद्रीवर शौर्याचा रेखीव पुतळा जसा ।
स्वराज्याच्या छातीवरती रायगडाचा ठसा, माझ्या रायगडाचा ठसा ।।
बुरुजावरती ऐकू येतो भगव्याचा फर्रार ।
लक्ख चमकते आणि दिपवते बुलंद भवानी तलवार ।।
अंधार भेटण्या रयतेचा हा देई तेजाचा वसा ।
रायगडाचा ठसा, माझ्या रायगडाचा ठसा ।।




धन्यवाद...
श्री. प्रतिक यमगर
बाळेवाडी, ता. आटपाडी,
जि. सांगली.
७७०९९३५३७४

बुधवार, ११ एप्रिल, २०१८

क्रांतीसूर्य महात्मा फुले


वर्षानुवर्षे अज्ञान आणि गुलामीच्या अंधःकारात खितपत पडलेल्या समाजाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी ११ एप्रिल १८२७ रोजी एका #क्रांतीसूर्याचा उदय झाला. ज्यांनी हीनदीन समजल्या जाणाऱ्या समाजाला समता स्वातंत्र्याचे नवजीवन देऊन ज्ञानरूपी प्रकाशात आणले. ज्या काळात स्त्री ही पायातले वहाण समजली जायची, चूल आणि मूल इथपर्यंतच तीचं जग सामावलेलं होतं, त्याकाळी संपूर्ण व्यवस्थेला पायदळी तुडवून या महात्म्याने सर्वप्रथम स्त्रियांना शिक्षण देण्याचं महान कार्य केलं. किती हे धाडस..? किती तळमळ..?
देशात संपूर्ण व्यवस्थेच्या विरुध्द पाऊल उचलणे ही त्या काळी सोपी गोष्ट नव्हती. पुण्यासारख्या ठिकाणी त्यांच्या या कार्याचा प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांनी प्रचंड विरोध केला. त्यांच्या कार्यात त्यांना अतोनात त्रास मानहानी अपमान सहन करावा लागला. पण फुलेंनी माघार घेतली नाही. आयुष्यभर आपल्या रक्ताचं पाणी करुन समस्तांचा उध्दार केला.
असे म्हणतात... " प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो.." या उक्तीला तंतोतंत लागू पडल्या ज्योतीरावांच्या अर्धांगिनी, महामाता, साविञीमाई... पतीच्या कार्यात त्यांना तन मन धनाने साथ देण्यात त्यांनी कधीही कसूर केला नाही. निरक्षर असलेल्या साविञीमाईंना ज्योतीरावांनी शिक्षण दिलं आणि पाहता पाहता ही विद्येची देवी फुलेंच्या पहिल्या शाळेची मुख्याध्यापिका बनली, लेखिका बनली, कवयीञी बनली. आणि या फुले दांपत्यांनी कष्टाने आपल्या ओंजळीतील ज्ञानफुले समाजाच्या झोळीत टाकत शिक्षणाची बाग फुलवली.
रस्त्याने जाताना अंगावर शेणमाती अंगावर झेलत, दगडधोंड्यांचे घाव, अश्लील शिव्याशाप सहन करीत. एवढेच नव्हे तर फुलेंना जीवे मारण्यासाठी मारेकरी पाठवण्यापर्यंत त्यांच्या कार्यात अडसर निर्माण केला. पण जनसेवेचा ध्यास घेतलेल्या ज्योतीराव आणि साविञीमाईंनी आपले कार्य थांबवले नाही. गरीबी आणि हालअपेष्टा सहन करत आपली संपूर्ण हयात घालून अस्पृश्यांना शिक्षणाची द्वारे खुली केली.
ज्या काळात स्ञियांना घराबाहेर निघण्याची मुभा नव्हती, अशावेळी ज्योतीरावांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा उघडून स्त्रीला शिक्षणाच्या प्रवाहात आणले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी आपल्या बांधवांवर मुलांसारखं प्रेम केलं. त्यांना पिण्यासाठी आपल्या घरचा पाण्याचा हौद खुला केला.
२४ सप्टेंबर १८७३ रोजी ज्योतीरावांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून समाजाला अन्याय, अत्याचार आणि गुलामगीरीतून बाहेर काढून, सामाजिक समता असणारी समाजनिर्मिती केली.
डॉ. बाबासाहेबांनी फुलेंना आपले गुरु मानलं होतं.
आधुनिक भारतात शिक्षणक्षेञात क्रांती घडवून जातीव्यवस्था उच्चनीचता, आणि असामानतविरुध्द पाऊल टाकून अमूलाग्र क्रांती घडवून आणणारे ज्योतीराव हे खर्या अर्थाने क्रांतीसूर्य आहेत...
तुम्हा आम्हाला शिक्षणाची दारे खुली करून देणारे , आणि त्यासाठी प्रसंगी समाजाचा त्रास सहन करूनही सामाजाच्या सर्वांगीण हितासाठी झटणारे, प्रत्येक स्त्रीला शिक्षण मिळावे यासाठी स्वतःच्या पत्नीला शिकवून खऱ्या अर्थाने स्त्री पुरुष समानता आणणारे क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन..💐💐💐🙏🙏🙏🙏
प्रतिक यमगर 

बुधवार, २४ जानेवारी, २०१८

मतदार जनजागृती ही काळाची गरज (आज राष्ट्रीय मतदार दिन २५ जानेवारी त्यानिमित्त)

भारताची लोकसंख्या जगातील अन्य देशांच्या तुलनेत भरमसाठ पद्धतीने वाढत आहे. एकीकडे देशाची लोकसंख्या भरमसाठ पद्धतीने वाढत असताना दुसऱ्या बाजूला १८ ते ३५ या वयोगटातील तरुणांची लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जगामध्ये सर्वात जास्त तरुणांचा देश म्हणून भारताचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. देशातील तरुणांची लोकसंख्या जास्त असणं आणि ती वाढत राहणं हे सदृढ लोकशाहीच्या दृष्टीने सकारात्मक गोष्ट आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी देशातील तरुणाईच्या बुद्धिमता आणि संशोधक वृत्तीच्या आधारावर ‘भारत महासत्ता २०२०’ करायचे स्वप्न त्यांनीही पाहिले आणि कोट्यावधी तरुणांना ते स्वप्न पाहायला शिकवले. भारताला महासत्तेकडे वाटचाल करावयाची असेल तर आपल्या तरुणांना लोकशाहीमध्ये आपल्या राज्यघटनेमध्ये दिलेले मुलभूत हक्क आणि कर्तव्ये तसेच जबाबदाऱ्या काय आहेत? हे माहित असणं आणि ते समजावून घेणे तितकेच गरजेचे आहे.
लोकशाहीतील राजकारणामध्ये सत्तेसाठी युवकांची भूमिका खूप महत्वाची असते. सर्वच राजकीय पक्षांचा आणि राजकीय नेत्यांचा युवा मतदारावरती सर्वात जास्त डोळा असतो. प्रत्येक राजकीय पक्षात युवा मतदार आपल्याकडे खेचून आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. आणि यामध्ये काही गैर आहे असे मला वाटत नाही. लोकशाही सदृढ करण्यामध्ये युवकांचा सहभाग असणं हे खूप गरजेच आहे. लोकशाहीमध्ये जनता ही सार्वभौम, सर्वश्रेष्ठ आहे, पण समाजामध्ये दररोज वावरत असताना मी पाहतो कि, भ्रष्ट राजकारण्यांच्या विषयी युवकांच्यात आणि एकंदरीत समाजात असेलली प्रचंड चीड, नाराजी, लोकांच्या हिताच्या कामाऐवजी स्वतःची घरे भरण्यासाठीच हे आम्हाला निवडणुकांच्या मध्ये मते मागायला येतात, सर्व राजकारणी स्वार्थी आहेत, सर्वच नेते निवडणुकात आश्वासने देतात, आणि परत पाच वर्ष तोंड दाखवायलाही येत नाहीत. अशा प्रकारची एक नकारात्मक भावना अनेक मतदारामध्ये असल्याचे आपणास दिसून येते. याच नकारात्मक भावनेमुळे युवा सुशिक्षित मतदार वर्ग मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असूनही मतदान न करता सुट्टीचा उपभोग घेण्यासाठी फिरायला पिकनिक स्पॉटला जातात. याचमुळे आजपर्यंत देशाच्या निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी ६० टक्यांच्या वरही जात नाही आणि यामुळेच फक्त ३० % मतदारांच्या पाठिंबा मिळवून देशातील एखादा राजकीय पक्ष सत्ता हस्तगत करतो हे आपण अनेक निकालामधून पाहिले आहे.
लोकशाहीमध्ये बहुमत मिळालेल्या पक्षाचे सरकार असते परंतु सध्या अनेक ठिकाणी एकूण मतदानापैकी ३० % मतदान मिळूनही ते इतर पक्षांच्या तुलनेत जास्त असल्याने ते बहुमत ठरते आहे. त्यामुळे मतदार बंधू आणि भगिनींना माझी नम्रतीची विनंती आहे कि, बाहेर रस्त्यावर शिव्या देऊन, चिडचिड करून, नाराजी व्यक्त करून, आरडून ओरडून सांगून राजकारण्यांना काहीही फरक पडणार नाही आणि त्याने काहीही साध्य होत नाही. पण लोकशाहीच्या माध्यमातून तुम्हाला मला मिळालेल्या एका मताच्या माध्यमातून १००% फरक पडू शकतो. फक्त मतदान करताना सजगतेने, डोळसपणे आणि विचार करून केले पाहिजे. कारण एखाद्या निवडणुकीत तुमचं एक मत एखाद्या उमेदवाराला विजयी ही करू शकते तसेच पराभूत ही करू शकते. त्यामुळे सर्वप्रथम ज्यांचे नाव मतदार यादीमध्ये नाही अश्या १८ वर्षावरील सर्व युवकांनी आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदवून घ्यावे तसेच ज्यावेळी भविष्यात कोणत्याही निवडणुका येतील त्यावेळी सुशिक्षित तरुणानी जात, पात, धर्म, पंथ यापलीकडे जाऊन मतदान करावे. मतदान करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे फक्त कर्तव्यच नसून ती एक जबाबदारीही आहे. ही मतदार जागृती तुमच्या माझ्या सारख्या सुशिक्षित नवयुवकामध्ये होणं नितांत गरजेची आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्रपती अब्राहम लिंकन यांनी लोकशाहीची साध्या, सरळ, सोप्या आणि अत्यंत कमी शब्दात व्याख्या केली आहे., ती म्हणजे “लोकांनी, लोकासाठी चालवलेले लोकांचे राज्य म्हणजे लोकशाही”. पूर्वी राजा हा आईच्या पोटी जन्माला येत असे पण सध्याच्या युगात तुम्ही आम्ही केलेल्या एका एका मताच्या माध्यमातून लोकशाहीतील राजा (लोकप्रतिनिधी) जन्माला येत आहे. म्हणून पाच वर्षांनी येणाऱ्या प्रत्येक निवडणुकामध्ये योग्य वैचारिक आणि सर्वांगीण विकासाची भूमिका घेणारा तसेच चांगला, पारदर्शक आणि कार्यक्षम उमेदवार निवडून जाण्यासाठी सर्वप्रथम आपण सर्वांनी मतदान करणं ही काळाची गरज आहे.
लोकशाहीचा राजा मी,
वाढवीन देशाचा मान मी,
देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी,
अभिमानाने करीन मतदान मी....I
धन्यवाद...
श्री. प्रतिक यमगर
बाळेवाडी, ता. आटपाडी,
जि. सांगली.
७७०९९३५३७४

मंगळवार, २३ जानेवारी, २०१८

अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वयंशिस्त

आज देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा केली जात आहे. वर्तमानपत्रात, मिडीयावर, सभांच्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य विषयांवर अनेकवेळा  बोलले जात आहे. तुमच्या माझ्या दररोजच्या जगण्याशी सबंधित असलेला विषय म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य होय. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय याचा कधी शोधही न घेता केवळ मुक्तपणा तोही सोयीस्कर उधळत बेधुंद होत आजूबाजूच्या कोणाचाही कशाचाही विचार न करता त्या जगण्याला आपण आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य समजत असतो.  काहींना तर सैराट होण, कसही सैरभैर होऊन मोकाट सुटलेल्या घोड्यासारख उधळणं हेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य वाटतं.  कुटुंबाचा, समाजाचा, आजूबाजूच्या नागरिकांचा देशाचा कोणताही, कसलाही विचार न करता फक्त मी आणि मला वाटेल तसं वागणं, बोलणं याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणता येणार नाही हे  अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसून त्याच्या नावाखाली चालवला गेलेला स्वैराचार आहे.
      मग आपल्या मनात हा प्रश्न उभा राहू शकतो तो म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय?? देशाचे  सार्वभौमत्व, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रीय सुरक्षा , सार्वजनिक कायदा आणि सभ्यता, नैतिकता यांपैकी एखाद्याही गोष्टीचा भंग न करता आपले मत योग्य त्या माध्यमातून (व्यंगचित्र, लेखन, वक्तृत्व, सभा संमेलने,) मांडणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य होय. आपल्या राज्यघटनेतील कलम क्र. १९ मध्ये प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुलभूत हक्क दिला आहे. योगायोग असा की,  जागतिक मानव अधिकाराच्या घोषणापत्रात ही  १९ व्या क्रमांकाच्या कलमात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उल्लेख आहे. तसेच कलम क्र. १९ च्या उपकलमामध्ये काही निर्बंध आणि बंधनाचा स्पष्ट उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो. याचाच अर्थ आपल्या सर्वाना अभिव्यक्ती स्वातंत्र्य घटनेने बहाल जरी केले गेले असले तरी ते अनियंत्रित आणि मुक्त नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आपल्या वर्तनामुळे अथवा आचरणामुळे इतरांच्या स्वातंत्र्याला अडथळा येत नाही ना?? हे पाहणे प्रत्येक सजग नागरिकाचे कर्तव्य आहे. एका सुशिक्षित, सुसंस्कृत समाजात वावरत असताना येथील त्या समाजाच्या श्रद्धावर टीका टिपण्या करणे, शिवीगाळ करणे हे वैयक्तिक स्वातंत्र्याच्या नावाखाली अतिरेक होत नाही का?? ज्यांना श्रद्धाचे पालन करावायचे नसेल तर त्यांनी अवश्य करू नये, त्यांना त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. परंतु आपणही पालन करावयाचे नाही आणि जे नियम पालन करतात त्यांच्यावर टीका करायच्या हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही तर इतरांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर केलेला हल्ला आहे.
      सध्याच्या सोशल मिडियासारख्या गंगाजळात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सर्व मनांचा, मतांचा आणि भावनांचा बाजार मांडला गेला आहे. कोणत्याही वैचारिक विचारांचा, महापुरुषांचा सन्मान न ठेवता कोणीही कशाही अफवा पसरवण्याचे काम करताहेत... कोणाही विरुद्ध काहीही बरळले जात आहे. एखाद्या बातमीची सत्यता न पाहता ती बातमी पसरविली जात आहे त्यामुळे अनेक सामाजिक अशांततेचे प्रश्न निर्माण झाल्याचे आपणास सध्याच्या परिस्थितीवरून पहायला मिळते. आजकाल नियम न पाळणे म्हणजे भूषणावह, कोणीतरी व्हीआयपी असण्याचा परवाना अशाप्रकारची मानसिकता समाजात रुजत चालली आहे.
      अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाही व्यवस्थेचा आत्मा आहे यामुळेच भारतात विविध वैचारिक मतप्रवाह, वेगवेगळ्या विचारधारा, यांच्यात वैचारिक खंडन मंडन चालू असते. लोकशाहीत प्रत्येक मनाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे पण व्यक्त होत असताना सारासार विवेकनिष्ठ विचार करून व्यक्त होणं हे खूप महत्वाचे आहे. म्हणूनच मला वाटतं कि अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वयंशिस्त ...! ती स्वयंशिस्त जपत आपल्या आवडत्या क्षेत्रातील आपली निर्भीड आणि निपक्षपातीपणे मांडलेली गेलेली मते चांगल्या समाजासाठी अत्यंत आवश्यक आहेत... एवढेच नाहीतर ती स्वतच्या आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी गरजेची आहेत.
धन्यवाद...
श्री. प्रतिक यमगर
बाळेवाडी, ता. आटपाडी,
जि. सांगली.
७७०९९३५३७४
Popatgyamgar.blogspot.com
Pratikyamgar.wordpress.com

सोमवार, २२ जानेवारी, २०१८

विनम्र अभिवादन...

नेताजी सुभाषचंद्र बोस हे नाव जरी ऐकले तरी एक विलक्षण असा इतिहास समोर उभा राहतो तो म्हणजे अडतीस कोटी देशबांधवांची गुलामीतून मुक्तता;याच एका प्राणप्रिय ध्येयासाठी एका कडव्या,लढवय्या देशभक्ताने अर्ध्या जगात मारलेली गरुडभरारी! जीवनभरचा धगधगता संघर्ष, जिवलग स्वकीयांशी आणि ब्रिटिश साम्राज्यासारख्या परकीयांशीही. त्याला व्यक्ती म्हणून नव्हे, तर एक लढाऊ राष्ट्र मानून, जपानसारख्या हिशेबी देशानेही अभूतपूर्व मदत केली.'चलो दिल्ली'ची त्याची गर्जना साकारण्यासाठी इंफाळ-कोहिमा-ब्रह्मदेशाच्या अरण्यात जुंपला एकघना रणसंग्राम! नियतीच्या आडव्यातिडव्या भेसूरनाचानेही ज्याची कवचकुंडले कधीही निस्तेज झाली नाहीत असा- महानायक! अश्या या महानायकाची आज जयंती ... त्यानिमित त्यांच्या विनम्र स्मृतीस विनम्र अभिवादन...

रविवार, २१ जानेवारी, २०१८

कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय गणपतराव देशमुख (आबासाहेब)

समाजकारणात एखादा नेता किती कार्य तत्पर असावा  याचे उदाहरण म्हणजे आदरणीय आमदार गणपतराव देशमुख ...
ते त्यांच्या कामाबद्दल किती गांभीर्याने पाहतात हे आपल्याला परवाच एका विद्यार्थिनीने  बसथांब्यासाठी केलेल्या पत्रावरून दिसून आले. त्या पत्रातील जो प्रश्न होता बसथांब्याचा तो तर सोडविलाच सोबत त्या विद्यार्थिनीला  अतिशय प्रांजळ भाषेत पत्र  लिहून सांगितले की बस थांबली नाही तर मला फोन करून सांग..... लोकप्रिनिधींची जनते प्रती असलेली ही कर्तव्याची, जबाबदारीची भावनाच जनतेला त्या लोकप्रिनिधींला पंचावन्न वर्ष विधानसभेत पाठवते... लहान असो किंवा वयस्कर असो त्यांनी मांडलेला प्रश्न तडीस लावणे, ते सोडविणे हेच आजपर्यंत आबासाहेबानी कटाक्षाने पाहिले त्यामुळेच  आबासाहेब आज सांगोला मतदारसंघाचं प्रतिनिधित्व  सल्लग 55 वर्ष करत आहेत. मतदारसंघातील एखादा माणूस आज एखाद्या लोकप्रतनिधींकडे त्याच्या कामासाठी किंवा सामाजिक समस्या घेऊन गेला तर तो लोकप्रतिनिधी  उद्या करू, परवा करू, आठवड्यात करू पुढच्या महिन्यात करू अशी उडवाउडवी ची उत्तरे देऊन निव्वळ आश्वासने देण्याचे काम करत असतात... पण आबासाहेब या सर्वाहून वेगळे ठरतात ते अश्या प्रकारच्या उदाहरणावरून.......
🖋 प्रतिक यमगर.

मंगळवार, १६ जानेवारी, २०१८

गोरगरिबांचा कैवारी, सर्वसामान्य लोकांचा संरक्षक, दानवांचा गुंडाचा सर्वनाश करणारा, कृष्णाकाठचा ढाण्या वाघ म्हणजेच आदरणीय बापु बिरू वाटेगावकर (आप्पा)*



आज अचानक दुपारी एकच्या  सुमारास सोशल मिडिया वरुन  एक  बातमी  येऊन  धडकली. बापु  बिरू  वाटेगावकर  यांचे  निधन ... बातमी आली आणि बातमी  सोशल  मीडियावरिल असल्याने  सर्वप्रथम  चौकशी केली.. बातमी  खरी आहे असे समजताच  थोडा  वेळ स्तब्ध  झालो.. आणि बापू बिरू वाटेगावकर यांच्या  विषयी  असंख्य आठवणी मनात  येऊन  गेल्या..  बापू बिरू वाटेगावकर म्हटले की  आमच्या समोर  चित्र उभा राहतं ते म्हणजे धिप्पाड  शरीर यष्टीचा माणूस,  सांगली कोल्हापूर  च्या तांबड्या मातीतील रांगडा गडी,  पिवळा फेटा , धोतर !  शर्ट आणि  पायात कोल्हापुरी पायताण असा पेहराव असणारा माणूस ....
ज्यावेळी बोरगाव  आणि आजबाजुच्या  गावात  रंगा  शिंदे आणि त्यांच्या गुंडांनी दिवसा  ढवळ्या  थैमान घातलं होतं , आया  बहिणीवर  अन्याय अत्याचार बलात्कार करून अब्रू लुटुन  मारून  टाकलं  जायचं,   गोरगरीबांच्या  घरांवर  दरोडे टाकून त्यांना लुटलं  जायचं,  त्यांच्या विरोधात ब्र जरी  कोणी  काढला  तरी  त्याला ठार  मारलं  जायचं,  त्यावेळी अश्या अन्यायग्रस्थाच्या,  गोरगरीबांच्या,  पीडितांच्या,  दीनदुबळ्यांच्या  पाठीमागे ठामपणे  भाऊ बाप  म्हणून उभा राहिला  तो म्हणजे बापु  बिरू वाटेगावकर अर्थात  आदरणीय  आप्पा ....
आप्पांनी दारूमुळे, हुंड्यामुळे , सासरच्या  त्रासामुळे  उद्वस्त  झालेले अनेक संसार रुळांवर  आणले. खरंतर  आप्पा  गावात  कोणतंही  वैर असू  नये,  भावभावकीत कोणतेही  वाद  नसावेत गावात बंधुत्वाचे  मित्रत्वाचे  संबंध  असावे याच  मतांचे होते. परंतु  वासनेने आणि मस्तीने  बरबटलेल्या  रंगा  शिंदे आणि  त्यांने  पोसलेल्या  गुंडांना गावावर  दहशत  गाजवायची  होती. वासना  भागवायचा होत्या त्यासाठी  गावांतील  मुलींच्यावर  अन्याय  केले  जायचे... आप्पांनी  अनेकवेळा  सांगून  समजाऊन  पाहिले  पण  काय  ऐकले  नाही  म्हणून  शेवटी  त्याचा   कोथळा  बाहेर  काडला...  त्यांच्यानंतर  गावांतील  हे वैर  चालू  झाले  तरीही  आप्पांनी  हे मिटविण्याचे  वारंवार  प्रयत्न  करूनही  तो अयशस्वी  झाला...  सहयाद्रीच्या  खोऱ्यात  बापू बिरू  वाटेगावकर कित्तेक वर्ष  राहत  होते. पोलिसांचे जे ब्रीदवाक्य  आहे ते म्हणजे 'सदरक्षणाय  खलनिग्रहनाय' (सज्जनांच रक्षण दुर्जनांचा  नाश ) मला  वाटत हे तत्व  आप्पा  अखंड  आयुष्य  जगले  असे म्हटले  तरी  काय वावगे ठरणार नाही.
 आप्पा नेहमी म्हणायचे,
 "कल्पव्रुक्षाखाली  बसुन  झोळीला गाठी  मारायच्या  नसतात... तुम्हाला  बापू  कळला  न्हाय, तुम्हांलाच  न्हाय,   कित्येकाना कळला  न्हाय...
विचारा  या झाडांना, पानांना,  फुलांना, पाखरांना... विचारा  त्या  वाऱ्याला... बापू  बिरू  वाटेगावकर कोण  होता ?
मेंढरं  हाकायची घुंगराची काठी सोडूं त्यानं  बंदूक  हातात का घेतली?"
या  प्रश्नांची  उत्तरं  मिळविण्याचा  प्रयत्न  जो  कोणी सुशिक्षीत सुजान युवक  करेल  त्याला  बापू  बिरू  वाटेगावकर ही  व्यक्ती आणि  शक्ती समजल्याशिवाय राहणार नाही.
न्यायालयाने  सुनावलेली  जन्मठेपेची  शिक्षा भोगून आल्यानंतर  त्यांनी
महाराष्ट्रातील  तमाम  युवकांना  व्यसनापासून  दूर  राहण्यास  सांगतिले  आणि  त्याबद्द्ल  वेळोवेळी खेड्यापाड्यांत जाऊन  प्रवचन देणारे  आप्पा  आपल्याला मार्गदर्शक  म्हणून  ठिकठिकाणी  दिसले.
शेवटी  आज  आपल्यातीलच  एका  असामान्य  पर्वाचा  अंत  झाला असला  तरी  आप्पांनी दिलेले  विचार तुमच्या माझ्या सारख्या नवतरुणाच्या मनाला  सदैव प्रेरणा देत राहतील यामधे  माझ्या मनात तरी कोणतीच  शंका नाही. आज आप्पा शरीराने आपल्यामध्ये नाही आहेत  पण  त्यांनी  ज्यासाठी ज्या  प्रव्रुत्तीविरोधात  संघर्ष  केला  त्या  प्रव्रुत्ती  आज  ही समाजात  आहेत ... फक्त  आहेतच  असं  नाही  तर  त्या वाढत  आहेत..ते आपल्याला  दररोजच्या  वर्तमानपत्रातून  दिसतेच  आहे. शेवटी त्या प्रव्रुत्ती  कमी  होण्याच्या  द्रुष्टीने पावलं उचलणं  आणि  त्याविरोधात जनजागृती  करून  नवयुवक  यांच्यामधे  जाग्रुती निर्माण करणं हीच  खऱ्या  अर्थाने  आदरणीय  आप्पांना श्रधांजली ठरेल असे मला वाटतं. शेवटी पुन्हा  एकदा  आप्पांच्या विनम्र स्म्रुतीस भावपूर्ण श्रधांजली....💐💐💐
✒ प्रतिक यमगर
 बाळेवाडी, ता. - आटपाडी,
जि.- सांगली.
७७०९९३५३७४
Pratikyamgar.wordpress.com
Popatgyamgar.blogspot.com