बुधवार, २४ जानेवारी, २०१८

मतदार जनजागृती ही काळाची गरज (आज राष्ट्रीय मतदार दिन २५ जानेवारी त्यानिमित्त)

भारताची लोकसंख्या जगातील अन्य देशांच्या तुलनेत भरमसाठ पद्धतीने वाढत आहे. एकीकडे देशाची लोकसंख्या भरमसाठ पद्धतीने वाढत असताना दुसऱ्या बाजूला १८ ते ३५ या वयोगटातील तरुणांची लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जगामध्ये सर्वात जास्त तरुणांचा देश म्हणून भारताचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. देशातील तरुणांची लोकसंख्या जास्त असणं आणि ती वाढत राहणं हे सदृढ लोकशाहीच्या दृष्टीने सकारात्मक गोष्ट आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी देशातील तरुणाईच्या बुद्धिमता आणि संशोधक वृत्तीच्या आधारावर ‘भारत महासत्ता २०२०’ करायचे स्वप्न त्यांनीही पाहिले आणि कोट्यावधी तरुणांना ते स्वप्न पाहायला शिकवले. भारताला महासत्तेकडे वाटचाल करावयाची असेल तर आपल्या तरुणांना लोकशाहीमध्ये आपल्या राज्यघटनेमध्ये दिलेले मुलभूत हक्क आणि कर्तव्ये तसेच जबाबदाऱ्या काय आहेत? हे माहित असणं आणि ते समजावून घेणे तितकेच गरजेचे आहे.
लोकशाहीतील राजकारणामध्ये सत्तेसाठी युवकांची भूमिका खूप महत्वाची असते. सर्वच राजकीय पक्षांचा आणि राजकीय नेत्यांचा युवा मतदारावरती सर्वात जास्त डोळा असतो. प्रत्येक राजकीय पक्षात युवा मतदार आपल्याकडे खेचून आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. आणि यामध्ये काही गैर आहे असे मला वाटत नाही. लोकशाही सदृढ करण्यामध्ये युवकांचा सहभाग असणं हे खूप गरजेच आहे. लोकशाहीमध्ये जनता ही सार्वभौम, सर्वश्रेष्ठ आहे, पण समाजामध्ये दररोज वावरत असताना मी पाहतो कि, भ्रष्ट राजकारण्यांच्या विषयी युवकांच्यात आणि एकंदरीत समाजात असेलली प्रचंड चीड, नाराजी, लोकांच्या हिताच्या कामाऐवजी स्वतःची घरे भरण्यासाठीच हे आम्हाला निवडणुकांच्या मध्ये मते मागायला येतात, सर्व राजकारणी स्वार्थी आहेत, सर्वच नेते निवडणुकात आश्वासने देतात, आणि परत पाच वर्ष तोंड दाखवायलाही येत नाहीत. अशा प्रकारची एक नकारात्मक भावना अनेक मतदारामध्ये असल्याचे आपणास दिसून येते. याच नकारात्मक भावनेमुळे युवा सुशिक्षित मतदार वर्ग मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असूनही मतदान न करता सुट्टीचा उपभोग घेण्यासाठी फिरायला पिकनिक स्पॉटला जातात. याचमुळे आजपर्यंत देशाच्या निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी ६० टक्यांच्या वरही जात नाही आणि यामुळेच फक्त ३० % मतदारांच्या पाठिंबा मिळवून देशातील एखादा राजकीय पक्ष सत्ता हस्तगत करतो हे आपण अनेक निकालामधून पाहिले आहे.
लोकशाहीमध्ये बहुमत मिळालेल्या पक्षाचे सरकार असते परंतु सध्या अनेक ठिकाणी एकूण मतदानापैकी ३० % मतदान मिळूनही ते इतर पक्षांच्या तुलनेत जास्त असल्याने ते बहुमत ठरते आहे. त्यामुळे मतदार बंधू आणि भगिनींना माझी नम्रतीची विनंती आहे कि, बाहेर रस्त्यावर शिव्या देऊन, चिडचिड करून, नाराजी व्यक्त करून, आरडून ओरडून सांगून राजकारण्यांना काहीही फरक पडणार नाही आणि त्याने काहीही साध्य होत नाही. पण लोकशाहीच्या माध्यमातून तुम्हाला मला मिळालेल्या एका मताच्या माध्यमातून १००% फरक पडू शकतो. फक्त मतदान करताना सजगतेने, डोळसपणे आणि विचार करून केले पाहिजे. कारण एखाद्या निवडणुकीत तुमचं एक मत एखाद्या उमेदवाराला विजयी ही करू शकते तसेच पराभूत ही करू शकते. त्यामुळे सर्वप्रथम ज्यांचे नाव मतदार यादीमध्ये नाही अश्या १८ वर्षावरील सर्व युवकांनी आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदवून घ्यावे तसेच ज्यावेळी भविष्यात कोणत्याही निवडणुका येतील त्यावेळी सुशिक्षित तरुणानी जात, पात, धर्म, पंथ यापलीकडे जाऊन मतदान करावे. मतदान करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे फक्त कर्तव्यच नसून ती एक जबाबदारीही आहे. ही मतदार जागृती तुमच्या माझ्या सारख्या सुशिक्षित नवयुवकामध्ये होणं नितांत गरजेची आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्रपती अब्राहम लिंकन यांनी लोकशाहीची साध्या, सरळ, सोप्या आणि अत्यंत कमी शब्दात व्याख्या केली आहे., ती म्हणजे “लोकांनी, लोकासाठी चालवलेले लोकांचे राज्य म्हणजे लोकशाही”. पूर्वी राजा हा आईच्या पोटी जन्माला येत असे पण सध्याच्या युगात तुम्ही आम्ही केलेल्या एका एका मताच्या माध्यमातून लोकशाहीतील राजा (लोकप्रतिनिधी) जन्माला येत आहे. म्हणून पाच वर्षांनी येणाऱ्या प्रत्येक निवडणुकामध्ये योग्य वैचारिक आणि सर्वांगीण विकासाची भूमिका घेणारा तसेच चांगला, पारदर्शक आणि कार्यक्षम उमेदवार निवडून जाण्यासाठी सर्वप्रथम आपण सर्वांनी मतदान करणं ही काळाची गरज आहे.
लोकशाहीचा राजा मी,
वाढवीन देशाचा मान मी,
देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी,
अभिमानाने करीन मतदान मी....I
धन्यवाद...
श्री. प्रतिक यमगर
बाळेवाडी, ता. आटपाडी,
जि. सांगली.
७७०९९३५३७४

मंगळवार, २३ जानेवारी, २०१८

अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वयंशिस्त

आज देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा केली जात आहे. वर्तमानपत्रात, मिडीयावर, सभांच्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य विषयांवर अनेकवेळा  बोलले जात आहे. तुमच्या माझ्या दररोजच्या जगण्याशी सबंधित असलेला विषय म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य होय. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय याचा कधी शोधही न घेता केवळ मुक्तपणा तोही सोयीस्कर उधळत बेधुंद होत आजूबाजूच्या कोणाचाही कशाचाही विचार न करता त्या जगण्याला आपण आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य समजत असतो.  काहींना तर सैराट होण, कसही सैरभैर होऊन मोकाट सुटलेल्या घोड्यासारख उधळणं हेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य वाटतं.  कुटुंबाचा, समाजाचा, आजूबाजूच्या नागरिकांचा देशाचा कोणताही, कसलाही विचार न करता फक्त मी आणि मला वाटेल तसं वागणं, बोलणं याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणता येणार नाही हे  अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसून त्याच्या नावाखाली चालवला गेलेला स्वैराचार आहे.
      मग आपल्या मनात हा प्रश्न उभा राहू शकतो तो म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय?? देशाचे  सार्वभौमत्व, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रीय सुरक्षा , सार्वजनिक कायदा आणि सभ्यता, नैतिकता यांपैकी एखाद्याही गोष्टीचा भंग न करता आपले मत योग्य त्या माध्यमातून (व्यंगचित्र, लेखन, वक्तृत्व, सभा संमेलने,) मांडणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य होय. आपल्या राज्यघटनेतील कलम क्र. १९ मध्ये प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुलभूत हक्क दिला आहे. योगायोग असा की,  जागतिक मानव अधिकाराच्या घोषणापत्रात ही  १९ व्या क्रमांकाच्या कलमात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उल्लेख आहे. तसेच कलम क्र. १९ च्या उपकलमामध्ये काही निर्बंध आणि बंधनाचा स्पष्ट उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो. याचाच अर्थ आपल्या सर्वाना अभिव्यक्ती स्वातंत्र्य घटनेने बहाल जरी केले गेले असले तरी ते अनियंत्रित आणि मुक्त नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आपल्या वर्तनामुळे अथवा आचरणामुळे इतरांच्या स्वातंत्र्याला अडथळा येत नाही ना?? हे पाहणे प्रत्येक सजग नागरिकाचे कर्तव्य आहे. एका सुशिक्षित, सुसंस्कृत समाजात वावरत असताना येथील त्या समाजाच्या श्रद्धावर टीका टिपण्या करणे, शिवीगाळ करणे हे वैयक्तिक स्वातंत्र्याच्या नावाखाली अतिरेक होत नाही का?? ज्यांना श्रद्धाचे पालन करावायचे नसेल तर त्यांनी अवश्य करू नये, त्यांना त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. परंतु आपणही पालन करावयाचे नाही आणि जे नियम पालन करतात त्यांच्यावर टीका करायच्या हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही तर इतरांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर केलेला हल्ला आहे.
      सध्याच्या सोशल मिडियासारख्या गंगाजळात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सर्व मनांचा, मतांचा आणि भावनांचा बाजार मांडला गेला आहे. कोणत्याही वैचारिक विचारांचा, महापुरुषांचा सन्मान न ठेवता कोणीही कशाही अफवा पसरवण्याचे काम करताहेत... कोणाही विरुद्ध काहीही बरळले जात आहे. एखाद्या बातमीची सत्यता न पाहता ती बातमी पसरविली जात आहे त्यामुळे अनेक सामाजिक अशांततेचे प्रश्न निर्माण झाल्याचे आपणास सध्याच्या परिस्थितीवरून पहायला मिळते. आजकाल नियम न पाळणे म्हणजे भूषणावह, कोणीतरी व्हीआयपी असण्याचा परवाना अशाप्रकारची मानसिकता समाजात रुजत चालली आहे.
      अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाही व्यवस्थेचा आत्मा आहे यामुळेच भारतात विविध वैचारिक मतप्रवाह, वेगवेगळ्या विचारधारा, यांच्यात वैचारिक खंडन मंडन चालू असते. लोकशाहीत प्रत्येक मनाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे पण व्यक्त होत असताना सारासार विवेकनिष्ठ विचार करून व्यक्त होणं हे खूप महत्वाचे आहे. म्हणूनच मला वाटतं कि अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वयंशिस्त ...! ती स्वयंशिस्त जपत आपल्या आवडत्या क्षेत्रातील आपली निर्भीड आणि निपक्षपातीपणे मांडलेली गेलेली मते चांगल्या समाजासाठी अत्यंत आवश्यक आहेत... एवढेच नाहीतर ती स्वतच्या आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी गरजेची आहेत.
धन्यवाद...
श्री. प्रतिक यमगर
बाळेवाडी, ता. आटपाडी,
जि. सांगली.
७७०९९३५३७४
Popatgyamgar.blogspot.com
Pratikyamgar.wordpress.com

सोमवार, २२ जानेवारी, २०१८

विनम्र अभिवादन...

नेताजी सुभाषचंद्र बोस हे नाव जरी ऐकले तरी एक विलक्षण असा इतिहास समोर उभा राहतो तो म्हणजे अडतीस कोटी देशबांधवांची गुलामीतून मुक्तता;याच एका प्राणप्रिय ध्येयासाठी एका कडव्या,लढवय्या देशभक्ताने अर्ध्या जगात मारलेली गरुडभरारी! जीवनभरचा धगधगता संघर्ष, जिवलग स्वकीयांशी आणि ब्रिटिश साम्राज्यासारख्या परकीयांशीही. त्याला व्यक्ती म्हणून नव्हे, तर एक लढाऊ राष्ट्र मानून, जपानसारख्या हिशेबी देशानेही अभूतपूर्व मदत केली.'चलो दिल्ली'ची त्याची गर्जना साकारण्यासाठी इंफाळ-कोहिमा-ब्रह्मदेशाच्या अरण्यात जुंपला एकघना रणसंग्राम! नियतीच्या आडव्यातिडव्या भेसूरनाचानेही ज्याची कवचकुंडले कधीही निस्तेज झाली नाहीत असा- महानायक! अश्या या महानायकाची आज जयंती ... त्यानिमित त्यांच्या विनम्र स्मृतीस विनम्र अभिवादन...

रविवार, २१ जानेवारी, २०१८

कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय गणपतराव देशमुख (आबासाहेब)

समाजकारणात एखादा नेता किती कार्य तत्पर असावा  याचे उदाहरण म्हणजे आदरणीय आमदार गणपतराव देशमुख ...
ते त्यांच्या कामाबद्दल किती गांभीर्याने पाहतात हे आपल्याला परवाच एका विद्यार्थिनीने  बसथांब्यासाठी केलेल्या पत्रावरून दिसून आले. त्या पत्रातील जो प्रश्न होता बसथांब्याचा तो तर सोडविलाच सोबत त्या विद्यार्थिनीला  अतिशय प्रांजळ भाषेत पत्र  लिहून सांगितले की बस थांबली नाही तर मला फोन करून सांग..... लोकप्रिनिधींची जनते प्रती असलेली ही कर्तव्याची, जबाबदारीची भावनाच जनतेला त्या लोकप्रिनिधींला पंचावन्न वर्ष विधानसभेत पाठवते... लहान असो किंवा वयस्कर असो त्यांनी मांडलेला प्रश्न तडीस लावणे, ते सोडविणे हेच आजपर्यंत आबासाहेबानी कटाक्षाने पाहिले त्यामुळेच  आबासाहेब आज सांगोला मतदारसंघाचं प्रतिनिधित्व  सल्लग 55 वर्ष करत आहेत. मतदारसंघातील एखादा माणूस आज एखाद्या लोकप्रतनिधींकडे त्याच्या कामासाठी किंवा सामाजिक समस्या घेऊन गेला तर तो लोकप्रतिनिधी  उद्या करू, परवा करू, आठवड्यात करू पुढच्या महिन्यात करू अशी उडवाउडवी ची उत्तरे देऊन निव्वळ आश्वासने देण्याचे काम करत असतात... पण आबासाहेब या सर्वाहून वेगळे ठरतात ते अश्या प्रकारच्या उदाहरणावरून.......
🖋 प्रतिक यमगर.

मंगळवार, १६ जानेवारी, २०१८

गोरगरिबांचा कैवारी, सर्वसामान्य लोकांचा संरक्षक, दानवांचा गुंडाचा सर्वनाश करणारा, कृष्णाकाठचा ढाण्या वाघ म्हणजेच आदरणीय बापु बिरू वाटेगावकर (आप्पा)*



आज अचानक दुपारी एकच्या  सुमारास सोशल मिडिया वरुन  एक  बातमी  येऊन  धडकली. बापु  बिरू  वाटेगावकर  यांचे  निधन ... बातमी आली आणि बातमी  सोशल  मीडियावरिल असल्याने  सर्वप्रथम  चौकशी केली.. बातमी  खरी आहे असे समजताच  थोडा  वेळ स्तब्ध  झालो.. आणि बापू बिरू वाटेगावकर यांच्या  विषयी  असंख्य आठवणी मनात  येऊन  गेल्या..  बापू बिरू वाटेगावकर म्हटले की  आमच्या समोर  चित्र उभा राहतं ते म्हणजे धिप्पाड  शरीर यष्टीचा माणूस,  सांगली कोल्हापूर  च्या तांबड्या मातीतील रांगडा गडी,  पिवळा फेटा , धोतर !  शर्ट आणि  पायात कोल्हापुरी पायताण असा पेहराव असणारा माणूस ....
ज्यावेळी बोरगाव  आणि आजबाजुच्या  गावात  रंगा  शिंदे आणि त्यांच्या गुंडांनी दिवसा  ढवळ्या  थैमान घातलं होतं , आया  बहिणीवर  अन्याय अत्याचार बलात्कार करून अब्रू लुटुन  मारून  टाकलं  जायचं,   गोरगरीबांच्या  घरांवर  दरोडे टाकून त्यांना लुटलं  जायचं,  त्यांच्या विरोधात ब्र जरी  कोणी  काढला  तरी  त्याला ठार  मारलं  जायचं,  त्यावेळी अश्या अन्यायग्रस्थाच्या,  गोरगरीबांच्या,  पीडितांच्या,  दीनदुबळ्यांच्या  पाठीमागे ठामपणे  भाऊ बाप  म्हणून उभा राहिला  तो म्हणजे बापु  बिरू वाटेगावकर अर्थात  आदरणीय  आप्पा ....
आप्पांनी दारूमुळे, हुंड्यामुळे , सासरच्या  त्रासामुळे  उद्वस्त  झालेले अनेक संसार रुळांवर  आणले. खरंतर  आप्पा  गावात  कोणतंही  वैर असू  नये,  भावभावकीत कोणतेही  वाद  नसावेत गावात बंधुत्वाचे  मित्रत्वाचे  संबंध  असावे याच  मतांचे होते. परंतु  वासनेने आणि मस्तीने  बरबटलेल्या  रंगा  शिंदे आणि  त्यांने  पोसलेल्या  गुंडांना गावावर  दहशत  गाजवायची  होती. वासना  भागवायचा होत्या त्यासाठी  गावांतील  मुलींच्यावर  अन्याय  केले  जायचे... आप्पांनी  अनेकवेळा  सांगून  समजाऊन  पाहिले  पण  काय  ऐकले  नाही  म्हणून  शेवटी  त्याचा   कोथळा  बाहेर  काडला...  त्यांच्यानंतर  गावांतील  हे वैर  चालू  झाले  तरीही  आप्पांनी  हे मिटविण्याचे  वारंवार  प्रयत्न  करूनही  तो अयशस्वी  झाला...  सहयाद्रीच्या  खोऱ्यात  बापू बिरू  वाटेगावकर कित्तेक वर्ष  राहत  होते. पोलिसांचे जे ब्रीदवाक्य  आहे ते म्हणजे 'सदरक्षणाय  खलनिग्रहनाय' (सज्जनांच रक्षण दुर्जनांचा  नाश ) मला  वाटत हे तत्व  आप्पा  अखंड  आयुष्य  जगले  असे म्हटले  तरी  काय वावगे ठरणार नाही.
 आप्पा नेहमी म्हणायचे,
 "कल्पव्रुक्षाखाली  बसुन  झोळीला गाठी  मारायच्या  नसतात... तुम्हाला  बापू  कळला  न्हाय, तुम्हांलाच  न्हाय,   कित्येकाना कळला  न्हाय...
विचारा  या झाडांना, पानांना,  फुलांना, पाखरांना... विचारा  त्या  वाऱ्याला... बापू  बिरू  वाटेगावकर कोण  होता ?
मेंढरं  हाकायची घुंगराची काठी सोडूं त्यानं  बंदूक  हातात का घेतली?"
या  प्रश्नांची  उत्तरं  मिळविण्याचा  प्रयत्न  जो  कोणी सुशिक्षीत सुजान युवक  करेल  त्याला  बापू  बिरू  वाटेगावकर ही  व्यक्ती आणि  शक्ती समजल्याशिवाय राहणार नाही.
न्यायालयाने  सुनावलेली  जन्मठेपेची  शिक्षा भोगून आल्यानंतर  त्यांनी
महाराष्ट्रातील  तमाम  युवकांना  व्यसनापासून  दूर  राहण्यास  सांगतिले  आणि  त्याबद्द्ल  वेळोवेळी खेड्यापाड्यांत जाऊन  प्रवचन देणारे  आप्पा  आपल्याला मार्गदर्शक  म्हणून  ठिकठिकाणी  दिसले.
शेवटी  आज  आपल्यातीलच  एका  असामान्य  पर्वाचा  अंत  झाला असला  तरी  आप्पांनी दिलेले  विचार तुमच्या माझ्या सारख्या नवतरुणाच्या मनाला  सदैव प्रेरणा देत राहतील यामधे  माझ्या मनात तरी कोणतीच  शंका नाही. आज आप्पा शरीराने आपल्यामध्ये नाही आहेत  पण  त्यांनी  ज्यासाठी ज्या  प्रव्रुत्तीविरोधात  संघर्ष  केला  त्या  प्रव्रुत्ती  आज  ही समाजात  आहेत ... फक्त  आहेतच  असं  नाही  तर  त्या वाढत  आहेत..ते आपल्याला  दररोजच्या  वर्तमानपत्रातून  दिसतेच  आहे. शेवटी त्या प्रव्रुत्ती  कमी  होण्याच्या  द्रुष्टीने पावलं उचलणं  आणि  त्याविरोधात जनजागृती  करून  नवयुवक  यांच्यामधे  जाग्रुती निर्माण करणं हीच  खऱ्या  अर्थाने  आदरणीय  आप्पांना श्रधांजली ठरेल असे मला वाटतं. शेवटी पुन्हा  एकदा  आप्पांच्या विनम्र स्म्रुतीस भावपूर्ण श्रधांजली....💐💐💐
✒ प्रतिक यमगर
 बाळेवाडी, ता. - आटपाडी,
जि.- सांगली.
७७०९९३५३७४
Pratikyamgar.wordpress.com
Popatgyamgar.blogspot.com