विवेक विचार

विवेक विचार

बुधवार, २४ जानेवारी, २०१८

मतदार जनजागृती ही काळाची गरज (आज राष्ट्रीय मतदार दिन २५ जानेवारी त्यानिमित्त)

भारताची लोकसंख्या जगातील अन्य देशांच्या तुलनेत भरमसाठ पद्धतीने वाढत आहे. एकीकडे देशाची लोकसंख्या भरमसाठ पद्धतीने वाढत असताना दुसऱ्या बाजूला १८ ते ३५ या वयोगटातील तरुणांची लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जगामध्ये सर्वात जास्त तरुणांचा देश म्हणून भारताचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. देशातील तरुणांची लोकसंख्या जास्त असणं आणि ती वाढत राहणं हे सदृढ लोकशाहीच्या दृष्टीने सकारात्मक गोष्ट आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी देशातील तरुणाईच्या बुद्धिमता आणि संशोधक वृत्तीच्या आधारावर ‘भारत महासत्ता २०२०’ करायचे स्वप्न त्यांनीही पाहिले आणि कोट्यावधी तरुणांना ते स्वप्न पाहायला शिकवले. भारताला महासत्तेकडे वाटचाल करावयाची असेल तर आपल्या तरुणांना लोकशाहीमध्ये आपल्या राज्यघटनेमध्ये दिलेले मुलभूत हक्क आणि कर्तव्ये तसेच जबाबदाऱ्या काय आहेत? हे माहित असणं आणि ते समजावून घेणे तितकेच गरजेचे आहे.
लोकशाहीतील राजकारणामध्ये सत्तेसाठी युवकांची भूमिका खूप महत्वाची असते. सर्वच राजकीय पक्षांचा आणि राजकीय नेत्यांचा युवा मतदारावरती सर्वात जास्त डोळा असतो. प्रत्येक राजकीय पक्षात युवा मतदार आपल्याकडे खेचून आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. आणि यामध्ये काही गैर आहे असे मला वाटत नाही. लोकशाही सदृढ करण्यामध्ये युवकांचा सहभाग असणं हे खूप गरजेच आहे. लोकशाहीमध्ये जनता ही सार्वभौम, सर्वश्रेष्ठ आहे, पण समाजामध्ये दररोज वावरत असताना मी पाहतो कि, भ्रष्ट राजकारण्यांच्या विषयी युवकांच्यात आणि एकंदरीत समाजात असेलली प्रचंड चीड, नाराजी, लोकांच्या हिताच्या कामाऐवजी स्वतःची घरे भरण्यासाठीच हे आम्हाला निवडणुकांच्या मध्ये मते मागायला येतात, सर्व राजकारणी स्वार्थी आहेत, सर्वच नेते निवडणुकात आश्वासने देतात, आणि परत पाच वर्ष तोंड दाखवायलाही येत नाहीत. अशा प्रकारची एक नकारात्मक भावना अनेक मतदारामध्ये असल्याचे आपणास दिसून येते. याच नकारात्मक भावनेमुळे युवा सुशिक्षित मतदार वर्ग मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असूनही मतदान न करता सुट्टीचा उपभोग घेण्यासाठी फिरायला पिकनिक स्पॉटला जातात. याचमुळे आजपर्यंत देशाच्या निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी ६० टक्यांच्या वरही जात नाही आणि यामुळेच फक्त ३० % मतदारांच्या पाठिंबा मिळवून देशातील एखादा राजकीय पक्ष सत्ता हस्तगत करतो हे आपण अनेक निकालामधून पाहिले आहे.
लोकशाहीमध्ये बहुमत मिळालेल्या पक्षाचे सरकार असते परंतु सध्या अनेक ठिकाणी एकूण मतदानापैकी ३० % मतदान मिळूनही ते इतर पक्षांच्या तुलनेत जास्त असल्याने ते बहुमत ठरते आहे. त्यामुळे मतदार बंधू आणि भगिनींना माझी नम्रतीची विनंती आहे कि, बाहेर रस्त्यावर शिव्या देऊन, चिडचिड करून, नाराजी व्यक्त करून, आरडून ओरडून सांगून राजकारण्यांना काहीही फरक पडणार नाही आणि त्याने काहीही साध्य होत नाही. पण लोकशाहीच्या माध्यमातून तुम्हाला मला मिळालेल्या एका मताच्या माध्यमातून १००% फरक पडू शकतो. फक्त मतदान करताना सजगतेने, डोळसपणे आणि विचार करून केले पाहिजे. कारण एखाद्या निवडणुकीत तुमचं एक मत एखाद्या उमेदवाराला विजयी ही करू शकते तसेच पराभूत ही करू शकते. त्यामुळे सर्वप्रथम ज्यांचे नाव मतदार यादीमध्ये नाही अश्या १८ वर्षावरील सर्व युवकांनी आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदवून घ्यावे तसेच ज्यावेळी भविष्यात कोणत्याही निवडणुका येतील त्यावेळी सुशिक्षित तरुणानी जात, पात, धर्म, पंथ यापलीकडे जाऊन मतदान करावे. मतदान करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे फक्त कर्तव्यच नसून ती एक जबाबदारीही आहे. ही मतदार जागृती तुमच्या माझ्या सारख्या सुशिक्षित नवयुवकामध्ये होणं नितांत गरजेची आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्रपती अब्राहम लिंकन यांनी लोकशाहीची साध्या, सरळ, सोप्या आणि अत्यंत कमी शब्दात व्याख्या केली आहे., ती म्हणजे “लोकांनी, लोकासाठी चालवलेले लोकांचे राज्य म्हणजे लोकशाही”. पूर्वी राजा हा आईच्या पोटी जन्माला येत असे पण सध्याच्या युगात तुम्ही आम्ही केलेल्या एका एका मताच्या माध्यमातून लोकशाहीतील राजा (लोकप्रतिनिधी) जन्माला येत आहे. म्हणून पाच वर्षांनी येणाऱ्या प्रत्येक निवडणुकामध्ये योग्य वैचारिक आणि सर्वांगीण विकासाची भूमिका घेणारा तसेच चांगला, पारदर्शक आणि कार्यक्षम उमेदवार निवडून जाण्यासाठी सर्वप्रथम आपण सर्वांनी मतदान करणं ही काळाची गरज आहे.
लोकशाहीचा राजा मी,
वाढवीन देशाचा मान मी,
देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी,
अभिमानाने करीन मतदान मी....I
धन्यवाद...
श्री. प्रतिक यमगर
बाळेवाडी, ता. आटपाडी,
जि. सांगली.
७७०९९३५३७४

८ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

Good

SARJERAO म्हणाले...

छान

Unknown म्हणाले...

खूपच छान लेख, अप्रतिम।।।

Unknown म्हणाले...

Very good

अनामित म्हणाले...

Khup Chan lekh aahe ...👌🏻👌🏻

अनामित म्हणाले...

Very Good

अनामित म्हणाले...

He margdarshan kelyabaddal dhnywad🙏

अनामित म्हणाले...

Very good