विवेक विचार

विवेक विचार

रविवार, ३० एप्रिल, २०१७

राकट देशा, कणखर देशा, छत्रपतीच्या देशा 💐💐💐💐💐

                     आज महाराष्ट्र दिन...भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सयुंक्त महाराष्ट्र चळवळीतील  अनेक हुतात्म्यांनी प्राणाचीही बाजी लावली आणि  महाराष्ट्र या राज्याची स्थापना  1 मे 1960 रोजी  केली गेली.  आम्ही  महाराष्ट्र या शब्दाची उत्पत्ती शोधायला जातो त्यावेळी प्राचीन काळात इसवी सन 500 मध्ये महावंश नावाच्या बौद्ध ग्रंथात 'महारठठ' या शब्दापासून झालेली आढळून येते. तसेच पुढे मध्ययुगीन काळात 'मरहट्ट' या शब्दावरून ही महाराष्ट्राला ओळखले जायचे. त्याच महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखे एक दूरदृष्टीकोन असलेलं नेतृत्व लाभले आणि ह्या महाराष्ट्राची माती न माती पवित्र केली.  परकीय आक्रमणापासून  या महाराष्ट्राची पवित्र संस्कृती जपण्यासाठी  कित्येक मावळ्यांनी आपल्या प्राणाची कोणतीही पर्वा न करता छत्रपतीनीं उभारलेल्या हिंदवी स्वराज्य रक्षणार्थ आपल्याला या मातीत गाडले आहे.. त्यामुळे आज या महाराष्ट्राची  या देशात आणि जगामध्ये एक वेगळी अशी ओळख प्राप्त झाली आहे.भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व ही या महाराष्ट्राने केले आहे. महाराष्टाला खूप मोठा सांस्कृतिक इतिहास लाभलेला आहे. याच इतिहासाच्या आधारावर आजचा महाराष्ट्र नक्कीच पुढची पाऊले टाकतो आहे यामध्ये माझ्या मनात तरी कोणतीच शंका नाही. अर्थात महाराष्ट्रासमोर आजची समस्या ही  शेतकऱ्यांना सुस्थितीत आणणे हीच आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य पद्धतीने हमीभाव मिळवून देणे हेच उद्दिष्ट सरकारचे असले पाहिजे. त्यासाठी सरकारने  सकारात्मक दृष्टीकोणातून यावरती निर्णय घेतले गेले पाहिजेत. या महाराष्ट्राला घडवण्यासाठी ज्या ज्या हुतात्म्यांनीं आपल्या प्राणाची बाजी लावली त्या सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन..💐💐               ✍पोपट यमगर

शनिवार, २९ एप्रिल, २०१७

छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंदजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हे कोणत्याही एका संकुचित विचारांच्या चौकटीत बसणारी व्यक्तिमत्त्वे अजिबात नव्हती त्यामुळे त्यांना एक चौकटीत बंदीस्त करून आपण त्यांच्या विचारांना पराभूत तरी करत नाही ना याचा विचार आपल्यासारख्या सुजाण नागरिकांनी केला पाहिजे. खरंतर आजपर्यंत संकुचित विचाराच्या राजकारण्यांनी त्यांच्या वैयक्तीक राजकीय स्वार्थासाठी या महापुरुषांना चुकीच्या पद्धतीने समाजासमोर मांडले आहेत. वरील नेतृत्वे ही जागतिक दर्जाची व्यक्तिमत्वे आहेत. त्यांना एका चौकटीत बांधून न ठेवता समग्र बुद्धीने जगाने स्वीकारावीत आणि आपलीशी करावीत असे वाटत असेल तर समग्र विचारातूनच त्यांना मांडले गेले पाहिजे असे मला वाटते.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचाही अभ्यास आम्ही संकुचित जातीय चष्म्यातून न करता तो चष्मा बाहेर टाकून देऊनच अभ्यास केला गेला पाहिजे. सावरकर यांनी मांडलेले हिंदुत्व हे व्यापक अर्थाने पाहायला गेल्यास खरे भारतीयत्वच होते हे त्यांचा समग्र बुद्धीने अभ्यास केल्यास समजून येते. कट्टरतावाद्यांनीही त्यांचे फक्त हिंदुत्वाचे विचार स्वीकारले पण पुरोगामी विचार सोयीस्कररित्या बासनात गुंडाळून ठेवले आहेत. खरंतर सावरकर यांच्यावर स्वातंत्र्यापूर्वीही आणि त्यांनतर खूप अन्याय झाला आहे. परंतु काळाच्या दुष्टीने आपण आता खूप पुढे आलो आहोत त्यामुळे आपल्यासारख्या सुजाण आणि सुशिक्षित तरुणांनी आधुनिक विचारांचे सावरकर अभ्यासले पाहिजेत आणि ते स्वीकारले पाहिजेत.
✍पोपट यमगर

सत्तेतून बाहेर हाकलण्याची ताकद शेतकर्यांमध्ये

छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारला भाषणातच फक्त शेतकऱयांच्या विषयी प्रेम आणि पुळका दिसत आहे. याचे कारण म्हणजे लाखो टन तूर शेतकऱ्यांच्या जवळ शिल्लक राहिली असताना केंद्र सरकारने खरेदी केंद्रांना तूर खरेदी करण्यास मुदतवाढ नाकारली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पडत्या भावांमध्ये तूर डाळ व्यापाऱ्यांना विकावी लागणार आहे... अच्छे दिनाची स्वप्ने दाखवणाऱ्या सरकारने मात्र शेतकऱयांच्या वरती संक्रात आणायची असे ठरवले आहे की काय?? असा प्रश्न निर्माण होतो.
राज्यासह देशात तुरीचे विक्रमी उत्पादन झालेले असतानाही आणि लाखो टन तूर शेतकऱ्याच्या घरात पडून असताना (22 एप्रिलच्यानंतरही ) केंद्र सरकार एकीकडे बाहेरील देशातून तूर आयात करत आहे, आयात शुल्काचे जे सांगितले जात आहे ते निव्वळ शुद्ध फसवणूक आहे कारण आपण आयात शुल्क माफ असलेल्या देशाकडूनच (म्यानमार) तूर खरेदी करत आहोत. आणि त्याच वेळेस दुसरीकडे निर्यात बंदी ही लागु आहे. इतके विक्रमी उत्पादन झालेले असतानाही केंद्र सरकार निर्यात बंदी का उठवत नाही आहे?? कर्जमाफीवरून काँग्रेस राष्ट्रवादी विरोधक राजकारण करत आहेत असे सत्ताधार्यांना वाटतं या मताशी दुमत नाही परंतु विरोधकाप्रमाणे सत्ताधारी भाजप ही राजकारणच करत आहे याचे कारण एका राज्यात कर्जमाफी करायची आणि दुसऱ्या राज्यात कर्जमाफी न करता कर्जमुक्ती आणि शाश्वत शेतीचे सोज्वळ आणि गोंडस डांगोरे पिटायचे हा सत्ताधाऱ्यांचा दुतोंडीपणा न समजायला शेतकरी काय दुधखुळे आहेत का...????
शेतकऱ्यांना या सरकारने देशोधडीला लावायचे ठरवले आहे की काय?? एकीकडे मन की बात मधून देशातील शेतकऱ्यांना जास्त कडधान्य लावायला सांगायचे, प्रोत्साहन द्यायचे आणि मग आमच्या शेतकरी बांधवांनी दुष्काळ, गारपीट नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करत जास्त तुरीचे उत्पादन केले तर त्यांची तूर शेतामध्ये तशीच पडून ती खरेदी सुद्धा खरेदी केंद्रामार्फत जात नाही व्यापारी निम्याने भाव पाडून शेतकऱ्याला लुटायचे काम करत आहेत. पण हे निरडावलेले सरकार पद्धतशीर पणे शेतकऱ्यांना गोलमाल उत्तरे देत आहे . शेतकऱ्यांचे कैवारी आज मात्र सत्तेसाठी हापापाले दिसत आहेत. आमचे कैवारी विस्तापित शेतकरी बांधवाच्या बाजूने लढता लढता हे धनधांडग्या प्रस्थपिताच्या बाजूने कधी पासून उभे राहू लागले हे आम्हा शेतकऱ्यांना समजेनासे झाले आहे.(खरंतर ही शेतकऱ्यांची दुर्दैवी खंत आहे) अवश्य शेतकऱ्यांच्या जीवावर मिळालेली सत्ता शेतकऱ्यांच्यावर आर्थिक अन्याय करून उपभोगा परंतु या निरडावलेल्या सरकारला सत्तेतून बाहेर हाकलण्याची ताकद शेतकर्यांमध्ये नक्कीच आहे. शेतकऱ्यांचे पडसाद नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सणसणीतपणे ऎकू येतील त्यावेळीच या झोपलेल्या सरकारला खडबडुन जाग येईल..

✍पोपट यमगर

खरसुंडी ते बाळेवाडी या पोटकालवा प्रकल्पासाठी अभिनंदन आणि कामासाठी शुभेच्छा

खरसुंडी ते बाळेवाडी या पोटकालवा प्रकल्पासाठी नाम फाउंडेशनच्या मदतीचे आणि सहकार्याचे जितके कौतुक करावे तितके कमी आहे.... नाम आणि पाणी फाउंडेशन यांच्या निस्वार्थीपणे केलेल्या कामानेच हा महाराष्ट्र पाणीदार होईल अशी आशा आमच्या शेतकरी बांधवाना आहे..... बाळेवाडीतील सर्व शेतकरी बांधव यांनी स्व इच्छेने हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वर्गणी च्या स्वरूपात केलेल्या मदतीचेही कौतुक आहे...... कोणत्याही सार्वजनिक कामामध्ये लोकसहभाग खूप महत्त्वाचा असतो तो बाळेवाडी सह इतर आजूबाजूच्या गांवानी तो दाखवला त्याबद्दल सर्व ग्रामस्तांचे अभिनंदन करायला हवे......
आणि शेवटी हा प्रकल्प पुर्ण करण्यासाठी सांगलीचे जिल्ह्याचे नेते आदरणीय गोपीचंद पडळकर आणि आटपाडीचे उपसभापती तानाजी शेठ यमगर यांनी वेळोवेळी केलेल्या प्रयत्नाचे आणि पाठपुराव्याचेही अभिनंदन.....
मनातून काम करण्याची तीव्र राजकीय इच्छा असली आणि त्यामध्ये लोकांचा उस्फुर्त सहभाग मिळाला आणि नाम सारख्या सामाजिक संघटनांचे निस्वार्थी प्रयत्न असले की ते काम किंवा प्रकल्प पूर्णत्वास लवकरच जातो.....
पुनश्च एकदा या सर्वांचे अभिनंदन आणि कामासाठी शुभेच्छा ही... 💐💐💐💐💐💐💐💐💐 ✍पोपट यमगर

रविवार, २३ एप्रिल, २०१७

समृद्धी महामार्गाने समृद्धी नेमकी कोणाची?


मुंबईहून नागपूरला जाण्यासाठी पाहिलेच तीन महामार्ग असताना राज्य सरकारने नवीन समृद्धी महामार्गाचा घाट का घातला आहे??? आणि या महामार्गाने समृद्धी नेमकी कोणाची होणार आहे??? यामध्ये शेतकऱ्यांना लुटून उद्योगपतींची समृद्धी होणार आहे हे उघड आहे. हजारो शेतकऱ्यांचा विरोध असताना त्या शेतकऱ्यांना चिरडून जर हा महामार्ग सरकर करणार असेल तर ही सरकारची हुकूमशाही आहे.... सरकारची ही हुकूमशाही मोडायला आमच्या शेतकऱ्यांना अजिबात वेळ लागणार नाही... आम्हाला फक्त भाषणात शेती आणि शेतकरी हा विषय नको आहे... आम्ही आयुष्यभर भाषणातच शेतकऱ्याविषयीचा कोरडा कळवळा ऐकत आलो आहे... एकीकडे शेतकऱ्यांची कर्जमाफी म्हटले की  राज्य सरकारची तिजोरीत खणखणाट वाजतो पण त्याच शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडून घेऊन त्यांच्या शेतीवर नांगर फिरवून 46000 कोटी  (आजचा प्रस्तावित खर्च) खर्च करताना तिजोरीत खणखणाट वाजत नाही... त्यावेळी तिजोरी खचाखच भरलेली असते. कारण यामुळे कित्येक उद्योगपतींची घरे भरली जातील. शेतकरी काय अशिक्षित .... त्याला भाषणात गोड गोड थापा मारून भुलविता येते. छत्रपतींचा आशीर्वाद हा फक्त निवडणुकामध्येच घेतला जातो पण राज्य कारभार चालवताना मात्र राजेंची धोरणे राजेंचे विचार सोयीस्कर रित्या गुंडाळून ठेवले जातात. छत्रपतींचा आदेश होता," शेतकऱ्याच्या शेतातील भाजीच्या देठाला जर हात लावला तर त्याचे हात कलम केले जातील".  पण फडणवीस सरकार याच्याउलट कृती करत शेतकऱ्यांच्या जमिनी प्रशासनाच्या माध्यमातून दडपशाही करून घेत आहे.   याची आठवण छत्रपतींचा आशीर्वाद घेताना या फडणवीस सरकारला होत नाही का??  यामुळे येथून पुढे राज्य सरकारने निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांच्या नावाने गळे काढणे बंद करावे. तुम्ही योग्य वेळी कर्जमाफी करणार असाल तर या राज्यातील शेतकरी ही तुम्हाला योग्यवेळी घरचा रस्ता लवकरच दाखवतील.

✍पोपट यमगर

चला वाचन परंपरा जोपासूया..आणि ती वाढवूया.★




दोनवेळच्या पोटाची भूक भागविण्यासाठी जशी अन्नाची गरज असते तशीच आयुष्यभराच्या बुद्धीची भूक भागविण्यासाठी पुस्तक वाचनाची गरज असते. आज जागतिक पुस्तक वाचन दिन...
आपल्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीतील सर्वात महत्वाचा वाटा अर्थात पुस्तक वाचनाचाच असतो हे निर्विवाद सत्य आहे. खरंतर असं म्हटलं जाते की "वाचनाने मस्तक सुधारतं आणि सुधारलेले मस्तक कोणापुढे नतमस्तक होत नाही."
वाचन.. ते मग कोणतंही ही असो.. वर्तमान पत्र, साप्ताहिक किंवा मासिक असो, विविध क्षेत्रातील विविध विषयावरील पुस्तकांचे असो किंवा आधुनिक तंत्रज्ञानातील ईबुक्स च्या स्वरूपात असो, किंवा सोशल साईट्स वरील विविध लेख असो या सर्व स्वरूपामध्ये आपण दररोज काहीं ना काही वाचत असतोच असतो. आणि याच दररोजच्या वाचनाने आपण कालच्या पेक्षा आज आणि आजच्यापेक्षा उद्या अधिक प्रगल्भ होत राहतो. याच प्रगल्भतेचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रभाव आपल्या स्वभावावर, भाषेवर पडत असतो.
खरंतर वाचन हा एक प्रकारे छंद ही आहे पण त्याही पुढे जाऊन मी म्हणेल की हे एक प्रकारचे व्यसन ही आहे, कारण दररोज काहीतरी वाचणाऱ्या माणसाला एखाद्या दिवशी काही वाचले नाही तर  असहाय झाल्या सारखे वाटते. मला वाचनाची सवय तशी लहानपासूनच लागली पण खऱ्या अर्थाने सांगली नगर वाचनलयातील अक्षरधारा पुस्तक प्रदर्शनापासून ती खूप मोठ्या प्रमाणात वाढत गेली. विविध लेखकांची विविध वैचारिक विचारधारांची पुस्तके, तसेच अनेक महापुरुषांची, विचारवंतांची चरित्रे ,आत्मचरित्रे वाचत असताना मनाला एकप्रकारचा वेगळा आनंद आणि समाधान लाभते. आपली विचार करण्याची प्रगल्भता ही वाढते, विविध विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन संकुचित न राहता समग्र कधी होऊन जातो हेच आपल्याला समजत नाही. मला भावलेली अनेक पुस्तके आहेत त्यामध्ये स्वामी विवेकानंदजींची रामकृष्ण मठाची विविध विषयावरची विविध पुस्तके, संभाजी, महानायक, अग्निपंख, आमचा बाप अन आम्ही, शिवचरित्र, एका दिशेचा शोध, ज्ञात अज्ञात अहिल्याबाई होळकर, जन्मठेप, यासारखी कित्येक पुस्तके सांगता येतील.
माझे दररोजचे आवडते वर्तमानपत्र म्हणजे लोकसत्ता... त्यातील वास्तविक घटनांवर कधी सणसणीत, तर कधी झणझणीत , तर कधी उपहासात्मक, तर कधी विडंबनात्मक मांडलेले अग्रलेख तर खूपच आवडतात. तसेच इतर लेखकांचे  वैचारिक लेखही वाचनीय असेच असतात.
अनेकजण म्हणतात की हल्लीची आधुनिक पिढी जास्त वाचन करीत नाही पण मी म्हणेल की अलीकडच्या पिढीची वाचन करण्याची साधने अवश्य बदलली आहेत पण वाचनपरंपरा कमी झाली आहे असे मला वाटत नाही. अनेक ईबुक च्या स्वरूपात pdf file आज विविध प्रकाशकांच्या त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्यामाध्यमातून ही हल्लीची पिढी वाचन करत आहे. अनेक तरुण ब्लॉग वरतीही विविध प्रकारचे लेख वाचन करताना दिसून येतात. ही वाचनाची समृद्ध परंपरा जोपासूया आणि ती यापुढील काळात वाढवूया हीच वाचन दिनी एक सदिच्छा.
धन्यवाद...

✍पोपट यमगर
बाळेवाडी, ता. आटपाडी,
जि. सांगली
7709935374

शनिवार, २२ एप्रिल, २०१७

वसुंधरा दिवस


आज वसुंधरा दिन आहे.. आज दिवसेदिवस जागतिक तापमान वाढ होत आहे ही आपल्या वसुंधरे समोरची परिस्थिती आहे. या तापमान वाढीला माणूस (तुम्ही आम्ही) जबाबदार आहोत.. या जागतिक तामपान वाढीचे धोके आपल्याला पावलापावलावर जाणवताना दिसत आहेत. आज ला निनो आणि एल निनो ही अपत्ये या जागतिक तापमान वाढीतूनच उद्भवली आहेत याचा सामना आपल्याला जरवर्षी दुष्काळ किंवा अतिवृष्टी ने करावा लागत आहे... वसुंधरा जर जपायची असेल तर एक म्हणजे प्रदूषण कमी करणे आणि दुसरे म्हणजे झाडे लावणे...  वसुंधरेला आपण जोपासले तरच वसुंधरा आपल्याला म्हणजेच माणसाला जोपासेल यात तिळमात्र शंका नाही...

✍✍पोपट यमगर

हुंडापद्धत म्हणजे बाजारातील बैलासारखा च माणसातल्या बैलांचा सौदा ....


सरकारने  हुंडाबंदी केली असल्यामुळे अनेकठिकाणी काही मधले दलाल  "मानपान" या  सोज्वळ आणि गोंडस शब्दाच्या नावाखाली हुंडा मागताना अनेकवेळा दिसतात...  
मला एक समजत नाही   भावी साथीदाराला तुम्ही अश्या पैशाच्या स्वरूपात विकत कसे काय घेतात??? बैलांच्या बाजारामध्ये जसे बैलांचे भाव   दलालाकडून ठरवले जातात ना अगदी तसेच( या माणसातल्या बैलांचे) भाव  लग्न या संस्थेमध्ये हुंड्याच्या स्वरूपात ठरवले जातात. अर्थात एकप्रकारे हा आर्थिक सौदाच ठरतो... असे सौदे करणारे अनेक दलाल असतात...  त्या दलालानी मग त्या बैलाचा भाव करून किती पैशात बैल विकत घेतला हे दोन्ही बाजूने सांगायचे असा हा व्यवहार आहे.....  आणि या सौद्यामध्ये बळी जाते ती एक मुलगीच....(असंही जिथे स्त्री भ्रूण हत्या केली जाते ... तिथे मग या मुलींच्या जीवाची चिंता तरी कशी असेल.....????   )
त्यामुळे माझ्या सुशिक्षित भगिनींना आणि मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकाना एक माझा प्रश्न असेल कि तुम्ही तुमचा साथीदार असा बैलाच्या भावासारखा विकत घेणार आहात का???
कुठेतरी हे प्रश्न आम्ही आमच्याच मनाला विचारण्याची गरज आज निर्माण झाली आहे...

"तिलक नही, दहेज नही, शादी कोई व्यापार नही, खरीदा हुआ जीवनसाथी अब हमको स्वीकार नही.."

✍पोपट यमगर

व्हेटोचा गैरवापर होतोय??


सुरक्षा परिषदेच्या पाच कायम सदस्य राष्ट्रांना नकाराधिकार(व्हेटो) वापरण्याचा दिलेला अधिकार म्हणजे एकप्रकारे जागतिक राजकारणात राष्ट्राराष्ट्रामध्ये भेदभाव निर्माण करण्यासारखेच आहे. जागतिक सुरक्षा आणि शांततेसाठी अनेक चांगले निर्णय आणि धोरणे फक्त एका राष्ट्राच्या आडमुठे धोरणामुळे अंमलात आणता येत नाहीत. खरंतर आंतराष्ट्रीय राजकारणात लोकशाहीप्रधान व्यवस्थेमध्ये अश्या प्रकारचा नकाराधिकार हा एका राष्ट्राची अप्रत्यक्षरित्या मक्तेदारीच ठरते. नकारधिकारामुळे विकासाच्या मार्गावर असलेल्या भारतासारख्या अनेक राष्ट्रावर याचा दुजाभाव झाला आहे, होत आहे. चीनने तर प्रत्येकवेळी भारताच्या एन एस जी सदस्यत्वासाठी आणि या सारख्या अनेक विषयांवर आडमुठे पणाने विरोधच केला आहे. कोणताही साधक बाधक दूरदृष्टिकोन आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे संकेत न ठेवता कायम सदस्य असलेल्या राष्ट्रांनी नकारधिकाराचा वापर हा कोणत्यातरी राष्ट्राला विरोध  (स्थानिक भाषेत जिरवजिरवी) करण्यासाठीच केला आहे. सयुंक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेतील सर्व निर्णय हे  बहुमतानेच  घेतले गेले पाहिजेत.

✍✍पोपट यमगर

शुक्रवार, ७ एप्रिल, २०१७

धनगर समाज भीक नाही तर घटनेमध्ये घटनाकारांनी दिलेले हक्क मागतोय...💥


स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही एखादा समाज  राज्यघटनेमध्ये दिलेल्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची फक्त अंमलबजावणी न करण्यावरून  वंचित राहतोय (कि मुद्दाम ठेवला जातोय) हि खरंतर तुमच्या  माझ्या सारख्या  लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या समाजाचे आणि घट्नाकारांचेही  खूप मोठे दुर्दैव म्हणावे लागेल. धनगर समाजाला भारतीय राज्यघटनेत अनुसूचित जमातीच्या ३४२ कलम वरती महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्ठात अ.क्र.३६ वरती धनगड(धनगर), ओरॉन  असा उल्लेख करुन डॉ. बाबासाहेबांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या यादीत अगोदरच समाविष्ट केलेले आहे.  परंतु धनगर व धनगड या र आणि ड च्या चुकीमुळे ते गेली 60 वर्ष धनगर समाजाला ते लागू झाले नाही त्यासाठी धनगर व धनगड या जाती वेगळ्या नसून त्या एकच आहेत अशी फक्त शिफारस राज्य सरकारने केंद्र सरकारला पाठवायची आहे. या शिफारशी च्या  अंमलबजावणीसाठी धनगर समाजाने घटनेच्या चौकटीत शांततेच्या मार्गानेच आजपर्यंत आंदोलने केली आहेत. पण सरकारने अजूनही याची अमलबजावणी केलेली नाही.
मित्रानो मला एक उदाहरण आपल्याला सांगितले पाहिजे ते म्हणजे एखाद्या शिकाऱ्याने यायचे, पक्षांना दाणे टाकायचे आणि त्या शिकाऱ्याच्या प्रलोभनांना भुलून पोटाची खळगी भागवण्यासाठी पक्षी  ते दाणे खाण्यासाठी एकत्र जमल्यानंतर त्या पक्षांना बंदिस्त करायचे.. पुन्हा दुसऱ्या शिकाऱ्याने यायचे, पुन्हा पक्षांना दाणे टाकायचे आणि त्या शिकाऱ्याच्या प्रलोभनांना भुलून पोटाची खळगी भागवण्यासाठी पक्षी  ते दाणे खाण्यासाठी एकत्र जमल्यानंतर पुन्हा त्या पक्षांना बंदिस्त करायचे... असेच तिसरा, चौथा शिकारी येऊन त्या पक्षांना बंदिस्त ठेवायचे काम वारंवार केले जाते. त्या पक्षासारखीच  धनगर समाजाची परिस्थिती झाली आहे. आजपर्यंत प्रत्येक राजकीय पक्षाने सत्तेसाठी आणि स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी धनगर समाजाचा वापर करून घेतला आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये कोणत्या तरी एका पक्षाने धनगर समाजाच्या काही नेत्यांना सोबत घेऊन धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीचे  आश्वासन द्यायचे आणि आमच्या भोळ्या भाबड्या समाजानेही मनात आनंदाच्या उकळ्या फोडत त्यांच्या पाठीमागे भरकटत जाऊन एकगट्टा मते देऊन त्या पक्षाला सत्त्ताधारी  बनवायचे... मग एकदा सत्ता मिळाली की अश्वासनातील शब्दामध्ये चातुर्याने अदलाबदल करून समाजाला पुढच्या लवणातील ससा दाखवायचे काम करायचे... पुन्हा पुढच्या निवडणुकीत दुसरा पक्ष .. तीच आश्वासने तीच धूर्त पद्धत... हेच आजपर्यंत आपण पाहत आलोय.
मित्रांनो पाच सहा महिन्यांपूर्वी आपल्याच मराठा बांधवांचे त्यांच्या मागण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शांततेत आणि निपक्षपातीपणे  मराठा मोर्चे निघाले. या मोर्चामधून धनगर समाजातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी  खूप काही शिकण्यासारखे आहे असे मला वाटते. कारण त्या मोर्चामध्ये सर्व पक्षाचे नेते, कार्यकर्ते त्यांच्या राजकीय चपला बाहेर ठेवून समाजासाठी एकत्र आले होते. तसंच धनगर समाजाच्या सर्व पक्षातील सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपआपल्या राजकीय पक्षाच्या चपला बाहेर ठेवून आरक्षणासाठी निघणाऱ्या मोर्चामध्ये एकत्र आले पाहिजे.. जर खरंच मनातून समाजाला आरक्षण अंमलबजावणीचे हक्क मिळवून द्यायचे असतील तर नेत्यांना  स्वतःचा राजकीय इगो बाजूला ठेवावाच लागेल.
बारामतीच्या उपोषण आणि आंदोलनावेळी सध्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणाले होते की "तुम्ही उपोषणसाठी येथे बसला आहात पण तुमच्या उपोषणामुळे मुंबईच्या मंत्रालयातील मंत्र्यांच्या खुर्च्या थरा  थरा कापत आहेत. "  फडणवीस साहेबांना त्याच वाक्याची आठवण करून देत मला त्यांना सांगायचे आहे की फक्त बारामती या एका शहरातील आंदोलनाने मुंबईतील खुर्च्या कापत असतील तर महाराष्ट्रातील सर्व शहरातील आणि सर्व खेड्या पाड्यातील धनगर समाज आरक्षणासाठी  रस्त्यावर उतरला तर मुंबईतल्या खुर्च्यांचीही  आणि  सरकारचीही काय स्थिती असेल ??? या प्रश्नाचे उत्तर त्यानीच त्यांच्या मनातून शोधण्याची गरज आहे.
मित्रांनो पुन्हा एकदा धनगर समाज अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणी साठी महाराष्ट्रात विविध मेळावे, आंदोलने आणि मोर्चाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरत आहे. असेच एक 'धनगर जमात जनआंदोलन' सांगली जिल्ह्यातील आटपाडी तहसीलदार कार्यालयावर  अनुसूचित जमातीचे आरक्षण अंमलबजावणी त्वरित करावी  या मागणीसाठी  दिनांक 18 एप्रिल 2017 रोजी आक्रोश मोर्चा आयोजित केला आहे.  सरकारला त्यांच्याच आश्वासनाची जाग आणण्यासाठी आपण हि त्या मोर्चात सहभागी होऊन तुमचा आक्रोश सरकारला समजावून सांगण्यासाठी या जनआंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे हीच नम्र विनंती...

✍पोपट यमगर
बाळेवाडी, ता. आटपाडी,
जि. सांगली

बुधवार, ५ एप्रिल, २०१७

कर्जमाफी पेक्षा कर्जमुक्ती केव्हाही चांगलेच पण ....


'शेतकरी' हा केंद्रीभूत घटक मानूनच देशाच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली गेली पाहिजे. याचे कारण म्हणजे देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेचा डोलारा हा शेतीतील शेतकऱ्याच्या  प्रगतीवर अवलंबून आहे. तात्पुरती    कर्जमाफी करून अकार्यक्षम सोसायट्या आणि सहकारी बँकांचे उथळ पांढरे करण्यापेक्षा  शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देऊन कायमची कर्जमुक्ती करणे केव्हाही  चांगलेच... पण सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्याची बिकट अवस्था पाहता त्यांना थेट मदत म्हणून शेतकऱ्यांच्या जनधन  खात्यावर काही प्रमाणात पैसे जमा करणे महत्वाचे आहे.. यातून दोन उद्दिष्टे साध्य होतील एक म्हणजे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पणे मदत होऊन अकार्यक्षम सोसायट्या सहकार सम्राटाच्या पतसंस्था आणि सहकारी बँकां घोटाळा करून शेतकऱ्याच्या नावाने झालेल्या कर्जमाफीवर   डल्ले मारणार नाहीत आणि दुसरे म्हणजे जरवर्षी प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल, आणि  काही प्रमाणात कर्ज थकवण्याची सवयही कमी होईल....
 यामुळे जर खरंच  राज्य सरकारला शेतकऱ्याची कर्जमुक्ती करण्याची इच्छा असेल तर त्यांनी शेतकऱ्यांना प्राथमिक स्वरूपात थेट मदत केली पाहिजे..
 धन्यवाद..
✍पोपट यमगर