दोनवेळच्या पोटाची भूक भागविण्यासाठी जशी अन्नाची गरज असते तशीच आयुष्यभराच्या बुद्धीची भूक भागविण्यासाठी पुस्तक वाचनाची गरज असते. आज जागतिक पुस्तक वाचन दिन...
आपल्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीतील सर्वात महत्वाचा वाटा अर्थात पुस्तक वाचनाचाच असतो हे निर्विवाद सत्य आहे. खरंतर असं म्हटलं जाते की "वाचनाने मस्तक सुधारतं आणि सुधारलेले मस्तक कोणापुढे नतमस्तक होत नाही."
वाचन.. ते मग कोणतंही ही असो.. वर्तमान पत्र, साप्ताहिक किंवा मासिक असो, विविध क्षेत्रातील विविध विषयावरील पुस्तकांचे असो किंवा आधुनिक तंत्रज्ञानातील ईबुक्स च्या स्वरूपात असो, किंवा सोशल साईट्स वरील विविध लेख असो या सर्व स्वरूपामध्ये आपण दररोज काहीं ना काही वाचत असतोच असतो. आणि याच दररोजच्या वाचनाने आपण कालच्या पेक्षा आज आणि आजच्यापेक्षा उद्या अधिक प्रगल्भ होत राहतो. याच प्रगल्भतेचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रभाव आपल्या स्वभावावर, भाषेवर पडत असतो.
खरंतर वाचन हा एक प्रकारे छंद ही आहे पण त्याही पुढे जाऊन मी म्हणेल की हे एक प्रकारचे व्यसन ही आहे, कारण दररोज काहीतरी वाचणाऱ्या माणसाला एखाद्या दिवशी काही वाचले नाही तर असहाय झाल्या सारखे वाटते. मला वाचनाची सवय तशी लहानपासूनच लागली पण खऱ्या अर्थाने सांगली नगर वाचनलयातील अक्षरधारा पुस्तक प्रदर्शनापासून ती खूप मोठ्या प्रमाणात वाढत गेली. विविध लेखकांची विविध वैचारिक विचारधारांची पुस्तके, तसेच अनेक महापुरुषांची, विचारवंतांची चरित्रे ,आत्मचरित्रे वाचत असताना मनाला एकप्रकारचा वेगळा आनंद आणि समाधान लाभते. आपली विचार करण्याची प्रगल्भता ही वाढते, विविध विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन संकुचित न राहता समग्र कधी होऊन जातो हेच आपल्याला समजत नाही. मला भावलेली अनेक पुस्तके आहेत त्यामध्ये स्वामी विवेकानंदजींची रामकृष्ण मठाची विविध विषयावरची विविध पुस्तके, संभाजी, महानायक, अग्निपंख, आमचा बाप अन आम्ही, शिवचरित्र, एका दिशेचा शोध, ज्ञात अज्ञात अहिल्याबाई होळकर, जन्मठेप, यासारखी कित्येक पुस्तके सांगता येतील.
माझे दररोजचे आवडते वर्तमानपत्र म्हणजे लोकसत्ता... त्यातील वास्तविक घटनांवर कधी सणसणीत, तर कधी झणझणीत , तर कधी उपहासात्मक, तर कधी विडंबनात्मक मांडलेले अग्रलेख तर खूपच आवडतात. तसेच इतर लेखकांचे वैचारिक लेखही वाचनीय असेच असतात.
अनेकजण म्हणतात की हल्लीची आधुनिक पिढी जास्त वाचन करीत नाही पण मी म्हणेल की अलीकडच्या पिढीची वाचन करण्याची साधने अवश्य बदलली आहेत पण वाचनपरंपरा कमी झाली आहे असे मला वाटत नाही. अनेक ईबुक च्या स्वरूपात pdf file आज विविध प्रकाशकांच्या त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्यामाध्यमातून ही हल्लीची पिढी वाचन करत आहे. अनेक तरुण ब्लॉग वरतीही विविध प्रकारचे लेख वाचन करताना दिसून येतात. ही वाचनाची समृद्ध परंपरा जोपासूया आणि ती यापुढील काळात वाढवूया हीच वाचन दिनी एक सदिच्छा.
धन्यवाद...
✍पोपट यमगर
बाळेवाडी, ता. आटपाडी,
जि. सांगली
7709935374
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा