विवेक विचार

विवेक विचार

गुरुवार, २२ सप्टेंबर, २०१६

आज कर्मवीर भाऊराव पाटील(आण्णा) यांची जयंती।।त्यानिमीत्त..............

आज कर्मवीर भाऊराव पाटील(आण्णा) यांची जयंती।।त्यानिमीत्त प्रथमतः यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन।।
माझं जवळ जवळ अर्ध शिक्षण आण्णांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेत झालं यांचा मला आनंद वाटतो. कारण शिक्षण घेत असताना रयत शिक्षण संस्था कधीच परकीय संस्था वाटली नाही. संस्थेत शिक्षण घेत असताना आपुलकी प्रेमच मिळाले संस्थेत शिक्षण घेत असताना आण्णां सारख्या महापुरुषांच्या आदर्श चारित्र्याचे धडे मिळत गेले आणि त्यातुनच माझं हे व्यक्तीगत चारित्र्य घडत गेले. आजच्या काळात शैक्षणिक क्षेत्राचं अनेक मोठ्या राजकीय नेत्यांनी बाजारीकरण करुन टाकलं आहे. पैसे घेऊन जशा बाजारात वस्तु मिळतात तशा अनेक खाजगी विद्यापीठ संस्थामधुन पदव्या मिळत आहेत. आज छोट्या मुलांच्या केजी ला प्रवेश घ्यायला 50000 फी मागितली जाते. या आर्थिक कारणासाठी अनेक गोरगरीब पालकांना आपल्या मुलास दर्जेदार शिक्षणापासुन वंचित ठेवावं लागतं ही मनाला बोचणारी खंत आहे. पण मी ठामपणे सांगु शकतो की माझं संस्थेतील शिक्षण हे खुप कमी खर्चात झालं आहे .
आणांनी रयत शिक्षण संस्था चालु करण्यामागचं खरं उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण भागातील गोरगरीब बहुजन समाजातील मुला मुलींना शिक्षण घेता यावं हे होतं. स्वतः आण्णा फक्त सहावी शिकले आहेत पण त्यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेतुन लाखो कोट्यावधी मुलांनी पदव्युत्तर पदव्या घेतल्या आहेत.
आण्णानी 4 ऑक्टोंबर 1919 रोजी कार्ले या गावी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यांनी 1919 ला रयत शिक्षण संस्थेच्या नावाने लावलेला वेल आज गगणाला गवसणी घालताना आपल्याला दिसुन येतोय. संस्थेच्या नावाप्रमाणेच ही रयतेची म्हणजेच गोरगरीब, दलीत, सर्वसामान्य, वंचीत, शेतकरी, कामगार यांची संस्था आहे असं आण्णानी अनेक वेळा बोलुनही दाखवले आहे. अनेक विद्यार्थ्यांना घरच्या आर्थिक परिस्थीतीमुळे शिक्षण घेता येत नाही अशा शिकण्याची इच्छा असणारया गरजु विद्यार्थ्यासाठी आण्णानी कमवा आणि शिका ही योजना संस्थेत चालु केली. संस्थेतील अनेक शाखामधे बाहेरगावच्या वंचित विद्यार्थ्यासाठी वसतिगृहे चालु केली. स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीदवाक्य असं सांगतांना आण्णांनी संस्थेचं चिन्हसुद्धा वटवृक्ष ठेवलं आहे याचं कारण म्हणजे वटवृक्षाप्रमाणे संस्थेच्या शाखाचा विस्तार होत जावो हीच त्यांची मनोमनी इच्छा होती.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाणसाहेब यांनी कर्मवीर आण्णांच्या विषयी पुढील गौरवोदगार काढले आहेत, "कर्मवीर ही व्यक्ती नव्हती ती एक संस्था होती, बहुजन समाजात ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले व महाराष्ट्रात नवयुग निर्माण केले. त्यांची रयत शिक्षण संस्था म्हणजे महाराष्ट्रात नवजीवन ओतणारी गंगा आहे." सार्वजनिक शिक्षणाबाबत आज सरकारी पातळीवर निर्णय झालेले आहेत. पण एक काळ असा होता की त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अशा काळात मागासवर्गीय बहुजन गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे दूर केले. कष्टकरी विद्यार्थ्यांना रात्रशाळांचा पर्याय उपलब्ध केला. खेड्यातील मुलांना दैनंदिन सुविधा मिळाल्या तर त्यांना शिक्षण घेता येईल या विचारातून त्यांनी मोफत वसतीगृहे चालवली. ‘रयत शिक्षण संस्थे’च्या रूपाने त्यांनी उभे केलेले कार्य सर्वांना परिचित आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबी शिक्षण, श्रमप्रतिष्ठा आणि स्वातंत्र्याची मूल्ये रुजवली. त्यांच्या जयंतीदिनी त्यांचा आदर्श न विसरण्याची शपथ आपण घेतली पाहिजे. पुन्हा एकदा आण्णाच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन।
धन्यवाद।
पोपट यमगर

सोमवार, ५ सप्टेंबर, २०१६

वार्ता विघ्नाची नुरवी



गेले वर्षभर आम्ही जे काही भोगलं, ते आता आम्ही दहा दिवसांच्या उत्साहात विसरून जाणार आहोत आणि तुला निरोप देताना मनांभोवती आवळलेले निराशेचे फासही आम्ही तोडून विसर्जति करून टाकणार आहोत. नव्या वर्षांत आम्हाला नव्या संकटांशी भक्कमपणे लढण्याची ताकद आमच्या मनांना तुझ्याकडून मिळावी एवढीच आमची प्रार्थना आहे.
संध्याकाळ होणार आणि सूर्यास्त झाल्यावर अंधारच पडणार, हे भौगोलिक सत्य आम्हाला माहीत आहे. पण प्रत्येक अंधाऱ्या रात्रीतही, उद्याची पहाट नक्की उगवणार या एकाच जाणिवेने आम्ही आश्वस्तही असतो. पण गेले वर्षभर आम्ही अस्वस्थ आहोत. चिंता आणि काळजीची मनावर धरलेली काजळी दिवसागणिक घट्ट घट्ट होत आहे. उद्याची पहाट उगवेल ना, उगवली तरी, नंतर सूर्योदय होईल ना, ती सोनेरी किरणे सकाळी नवा उत्साह घेऊन येतील, की नवेच काही तरी अप्रिय समोर ठेवतील, या काळजीने प्रत्येक रात्रीच्या अंधारात आमची मने दडपून जात होती. काही तरी चांगले, थोडे फार मनासारखे, आणि अधूनमधून तरी काही हवेहवेसे घडेल, एवढीच आमची अपेक्षा होती. अर्थात, सारे काही छान छान, अच्छे अच्छे दिवस असावेत, असं आमचं म्हणणंच नाही. जगण्याचे सारेच क्षण सुखाने ओसंडून वाहू लागले, तर माणूसपण त्यात हरवून जाईल, हेही आम्हाला माहीत आहे. म्हणूनच, आमच्या अपेक्षाही फार मोठय़ा नव्हत्या. दररोजचा नवा दिवस साऱ्यांना किमान समाधानात साजरा करता यावा, संकटे आली तरी ती पेलवण्याची शक्ती प्रत्येक पाठीच्या कण्यामध्ये असावी अशीच आमची अपेक्षा होती. पण तसे फारसे घडलेच नाही. प्रत्येक दिवस नवी अस्वस्थता, नवी निराशा सोबत घेऊनच जणू उजाडत राहिला. नव्या दिवसागणिक नव्या संकटाचे सावट मनामनावर दाटलेलेच राहिले. असुरक्षिततेच्या, असहायतेच्या ओझ्याखाली दडपून जगणारी मने, मोठी स्वप्नेदेखील पाहू शकत नाहीत. तेवढी त्यांची कुवतच राहात नाही, हा अनुभव आम्हाला काहीसा अस्वस्थ करीत राहिला आणि त्या दडपणाखालीच आम्ही आमचे सरते वर्ष वाया घालविले.
तू आमचा पिता आहेस, त्राताही आहेस. भवदु:खाचे डोंगर समोर उभे राहिले की तुझ्या केवळ स्मरणाने त्यावर मात करण्याची िहमत मनावर स्वार होते, ही आमची श्रद्धा आहे. गेल्या वर्षभरात आम्ही असंख्य दगडधोंडय़ांना ठेचकाळलो आणि प्रत्येक कळ जणू जीवघेणी होती. त्या त्या क्षणी आम्हाला तुझीच आठवण आली होती.
जगण्याची आणि संकटे झेलण्याची आमची उमेद आम्ही हरवलेली नाही. अशी असंख्य संकटे आली तरी ती पेलण्याची आमची तयारी आहे. आमचे तुझ्याकडे एकच मागणे आहे. ते म्हणजे, संकटे झेलण्याची, त्यांच्याशी लढण्याची आणि ती परतवून लावण्याची शक्ती तूच आम्हाला दिली पाहिजे. हे आमचे तुझ्याकडे हक्काचे साकडे आहे. तू संकटमोचक आहेस, तू सुखकर्ता आहेस. तू सोबत असताना कोणत्याही संकटाचे सावटदेखील आसपास असू नये अशी आमची भावना आहे. म्हणूनच, गेले वर्षभर आम्ही जे जे काही भोगलं, ते आता आम्ही दहा दिवसांच्या उत्साहात विसरून जाणार आहोत आणि तुला निरोप देताना, या यातना, संकटे आणि त्यामुळे मनांभोवती आवळलेले निराशेचे फासही आम्ही तोडून विसर्जति करून टाकणार आहोत. नव्या वर्षांत आम्हाला नव्या संकटांशी भक्कमपणे लढण्याचे बळ हवे आहे. ती ताकद आमच्या मनांना तुझ्याकडून मिळावी एवढीच आमची प्रार्थना आहे. आमच्या भक्तीचा तो पारंपरिक वारसा कदाचित आज हरवत चालला असेल. या भक्तीवर नव्या जगाच्या नव्या संस्कृतीची अप्रिय पुटे चढलीही असतील. पण त्याखालची आमची भक्ती मात्र, आजही पारंपरिक भक्तीएवढीच पारदर्शक आहे. तुझ्या मिरवणुकीसमोरची बेभान आणि क्वचित बीभत्सही वाटणारी आमची नृत्ये आणि त्यासाठी वाजविले जाणारे संगीत भक्तिभावाशी पुरते विसंगत आहे, हे आम्हाला मान्य आहे. तुझ्या दहा दिवसांच्या उत्सवकाळात आम्ही आमच्या परंपरांपासून लांब चालल्याचाच पुरावा मिळतो, हेही आम्हाला मान्य आहे. पण आमची भक्ती आणि तुझ्यावरची श्रद्धा मात्र, तेवढीच निखळ आहे. त्याचा स्वीकार कर. नव्या वर्षांत विघ्नाची वार्ता न उरावी, हीच आम्हा भक्तांची भाबडी भावना आहे.

.(.दैनिक लोकसत्ता अग्रलेख )