🌷🌷विवेक प्रहार 🌷🌷
भारतामधे गेल्या काही दिवसापासुन बोगस पदव्या घेतलेल्या राजकारण्यांची प्रकरणे दररोज बाहेर येत आहेत. केंद्राच्या मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती ईराणी यांच्यापासुन ते दिल्लीतील आपचे मंत्री जितेंद्र तोमर, महाराष्ट्रातील मंत्री बबनराव लोणीकर, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, यांच्यासह नुकतेच वादात सापडलेले राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे या सर्व पक्षातील नेत्यांचा समावेश होताना दिसत आहे. कालांतराने ही यादी वाढतच जाईल याबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही.
महाराष्ट्र राज्यात शिक्षण क्षेत्रात काय खेळखंडोबा चालवला आहे हे सर्वांना माहित आहेच अशातच महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी घेतलेल्या बोगस पदवीचे प्रकरण पुढे आले आहे. तावडे यांच्यामते माझी इलेक्ट्रॉनिक्स ही पदवी अनधिकृत विद्यापीठाची (ज्ञानेश्वर विद्यापीठ) आहे पण बोगस नाही. तावडेंचं म्हणणं खरं मानून आपण पुढे चर्चा करु. पुण्यातील नव्या पेठेतील एका इमारतीत हे ज्ञानेश्वर विद्यापीठ चालते. याला विद्यापीठ म्हणण्यात येत असले तरी हे एका संस्थेचे नाव असुन यास विद्यापीठाचा दर्जा नाही किंवा विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता नाही. म्हणजे यास विद्यापीठच म्हणता येणार नाही म्हणजे तावडे हे अनधिकृत विद्यापीठातुन पदवी घेतलेले (अनियमीत) विद्यार्थी आहेत.
आज महाराष्ट्रात आणि देशात सध्या अशा अनधिकृत विद्यापीठांनी तर शिक्षणाचे बाजारीकरण करुन ठेवले आहे. विशेषतः राजकीय नेत्यांचा तर एक मोठा व्यवसाय झालेला आहे. आज शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात अशा अनधिकृत विद्यापीठाकडुन लाखो रुपये घेऊन जशा बाजारात वस्तू विकल्या जातात तशा विद्यापीठात पदव्या विकल्या जात आहेत. त्यामुळे प्रामाणिक असणारे गरीब विद्यार्थी हुशार असुनही त्यांना योग्य संधी किंवा योग्य स्थान मिळत नाही.
सन्माननीय तावडेसाहेब तुमच्या भुमिका विषयी माझ्या सारख्या उच्चशिक्षित विद्यार्थ्यांच्या मनाला काय प्रश्न पडतात. ते म्हणजे :
1) राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनीच अनधिकृत विद्यापीठाकडुन पदवी घेतली असल्याने राज्यातील विद्यार्थ्यांनी तुमच्याकडुन कोणता आदर्श घ्यायचा?
2) राज्यातील अशा अनधिकृत शाळांना किंवा बिगरमान्यताप्राप्त संस्थाना तुम्ही पोटतिडकीने विरोध का करता?!!
3) अनधिकृत शाळांना किंवा बिगरमान्यताप्राप्त संस्थाच्या बद्दल आपली भुमिका काय?
म्हणून ज्ञान देणार्या किंवा देशाची भावी पिढी घडवणार्या शिक्षणासारख्या खात्याचा कारभार आपण घेताना अशा गोष्टींचा विचार करायला पाहिजे होता. तावडेंच्या निमीत्ताने वादळ होऊन शिक्षण क्षेत्रातील पवित्रतेला धोका पोहोचू नये हीच माफक अपेक्षा!
श्री पोपट यमगर
(बाळेवाडी ता. आटपाडी,
जि. सांगली)
7709935374
popatgyamgar.blogspot.com🌷
......................
1 टिप्पणी:
टिप्पणी पोस्ट करा