आज ११ जुलै. म्हणजेच जागतिक लोकसंख्या दिन आहे. सध्या लोकसंख्या झपाट्याने वाढते आहे. जगातील वाढत्या लोकसंख्येच्या समस्यांविषयी लोकांच्या मनात जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी ११ जुलैला जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. आज वाढत्या लोकसंख्येमुळे बेरोजगारी, दारिद्रय़, एक वेळची भूक भागविण्याची धडपड, वाढती गुन्हेगारी, ढासळणाऱ्या पर्यावरणाचा असमतोल यामुळे कमी होणारी वने, जंगलतोड, वाढते स्थलांतर असे आजचे चित्र दिसत आहे. लोकसंख्या वाढीचा परिणाम निसर्गावर झाल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. ही स्थिती बदलण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण हाच एकमेव उपाय आहे. भारताची लोकसंख्या जागतिक लोकसंख्येच्या 17 टक्के इतकी आहे. लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. वाढती लोकसंख्या ही भारताच्या आर्थिक विकासातील मोठा अडथळा आहे. दिवसेंदिवस लोकसंख्येचे वाढत जाणारे प्रमाण नक्कीच चिंताजनक आहे.
भारतामध्ये लोकसंख्या वाढीची कारणे अनेक आहेत. दारिद्र्य असलेल्या कुटुंबात लोकसंख्या वाढण्याचे प्रमाण जास्त आहे. एकीकडे घरात दोनवेळच्या अन्नासाठी धडपडत असताना दुसरीकडे त्याच कुटुंबात वाढत्या मुलांचे प्रमाणही काळजाचा ठोका चुकवून जाते. त्या कारणांचा शोध घेण्यासाठी गेले असता पुढील कारणे नक्कीच मनामध्ये स्पष्टपणे दिसून येतात. निरक्षरता, भारतीय समाजात असणाऱ्या काही अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, दारिद्र्य, वंशाला वारस (दिवा) म्हणून मुलगाच हवा यासारख्या वेडपट समजूती यासारख्या कारणामुळे भारताची भरमसाठ लोकसंख्या वाढत आहे, वाढते आहे. यातील वंशाला वारस अर्थातच दिवा मुलगाच हवा यासाख्या कारणामुळे तर मनात चीडच येऊन जाते आणि धुमसणाऱ्या मनाला एक प्रश्न पडतो तो म्हणजे वंशाचा दिवा(मुलगा) लावण्यासाठी पणती(मुलगी) हवी का नको?? जर पणतीच नसेल तर दिवा लावणार कसा??? २१ व्या आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या शतकात जगत असतानाही आम्हाला वरील कारणांना सामोरे जावे लागते हे नक्कीच तुमचे माझे दुर्दैव आहे.
जागतिक महाशक्ती म्हणून आपला देश पुढे येत असताना लोकसंख्या वाढीवर नियंत्रण राखणे अतिशय आवश्यक आहे. यासाठी कुटुंबनियोजन करणे काळाची गरज आहे. देशाच्या विकासाच्या दृष्टीने लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कुटुंब नियोजन जितके महत्वाचे आहे तितकेच समाजातील प्रत्येक कुटुंबाचे उज्वल भवितव्य घडविण्यासाठी कुटुंब कल्याण कार्यक्रमही तितकाच आवश्यक आहे. जागितक लोकसंख्येच्या आकडेवारीत अग्रस्थानावर असलेल्या चीनचा लोकसंख्या वाढीचा दर भारतापेक्षाही कमी आहे. अनेक तज्ञाच्या मते २०२५ साली भारत हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्येचा देश असेल. चीनने राबविलेले ‘हम दो हमारा एक’ हे कुटुंब नियोजनाचे धोरण यशस्वी होत असल्याचे दिसून येत आहे. चीनच्या या धोरणाच्या धर्तीवर भारतानेही अनेक धोरणे, योजना, कायदे आखले पण या सर्वांची अंमलबजावणी मात्र फार कमी प्रमाणात होताना दिसून येत आहे. लोकसंख्या वाढ नियंत्रणाविषयीच्या सरकारच्या धोरणाचा, योजनांचा सन्मान ठेऊन त्या आचरणात आणणे ही प्रत्येक सुजाण भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे.
सध्याच्या लोकसंख्येचे आकडे पाहिले तर मुलांचं म्हणजेच १५ वर्षाखालील व्यक्तींचं प्रमाण ३१ %, कमावत्या वयातील म्हणजेच १५ ते ५९ वयोगटातील व्यक्तींची संख्या ६० % आहे, आणि ज्येष्ठ नागरिकांची म्हणजेच ६० वर्षावरील व्यक्तींची संख्या ९% आहे. भारताच्या लोकसंख्या वाढीतील जमेची बाजू जर कोणती असेल तर ती म्हणजे तरुणांची वाढती संख्या. परंतु या नव्या पिढीला चांगल्या दर्जाचे शिक्षण आणि रोजगाराच्या संधी पुरवण्याची नितांत गरज आहे. जर या युवकांना चांगले शिक्षण आणि रोजगार मिळाला तर हीच वाढती लोकसंख्या देशाच्या आर्थिक विकासातील ओझं ठरणार नाही तर ती एक देशाची आर्थिक संपत्ती असेल असं म्हणायला काही हरकत नसावी असे मला वाटते..
धन्यवाद....
✍✍✍पोपटराव यमगर
07709935374
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा