वर्षानुवर्षे अज्ञान आणि गुलामीच्या अंधःकारात खितपत पडलेल्या समाजाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी ११ एप्रिल १८२७ रोजी एका #क्रांतीसूर्याचा उदय झाला. ज्यांनी हीनदीन समजल्या जाणाऱ्या समाजाला समता स्वातंत्र्याचे नवजीवन देऊन ज्ञानरूपी प्रकाशात आणले. ज्या काळात स्त्री ही पायातले वहाण समजली जायची, चूल आणि मूल इथपर्यंतच तीचं जग सामावलेलं होतं, त्याकाळी संपूर्ण व्यवस्थेला पायदळी तुडवून या महात्म्याने सर्वप्रथम स्त्रियांना शिक्षण देण्याचं महान कार्य केलं. किती हे धाडस..? किती तळमळ..?
देशात संपूर्ण व्यवस्थेच्या विरुध्द पाऊल उचलणे ही त्या काळी सोपी गोष्ट नव्हती. पुण्यासारख्या ठिकाणी त्यांच्या या कार्याचा प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांनी प्रचंड विरोध केला. त्यांच्या कार्यात त्यांना अतोनात त्रास मानहानी अपमान सहन करावा लागला. पण फुलेंनी माघार घेतली नाही. आयुष्यभर आपल्या रक्ताचं पाणी करुन समस्तांचा उध्दार केला.
असे म्हणतात... " प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो.." या उक्तीला तंतोतंत लागू पडल्या ज्योतीरावांच्या अर्धांगिनी, महामाता, साविञीमाई... पतीच्या कार्यात त्यांना तन मन धनाने साथ देण्यात त्यांनी कधीही कसूर केला नाही. निरक्षर असलेल्या साविञीमाईंना ज्योतीरावांनी शिक्षण दिलं आणि पाहता पाहता ही विद्येची देवी फुलेंच्या पहिल्या शाळेची मुख्याध्यापिका बनली, लेखिका बनली, कवयीञी बनली. आणि या फुले दांपत्यांनी कष्टाने आपल्या ओंजळीतील ज्ञानफुले समाजाच्या झोळीत टाकत शिक्षणाची बाग फुलवली.
रस्त्याने जाताना अंगावर शेणमाती अंगावर झेलत, दगडधोंड्यांचे घाव, अश्लील शिव्याशाप सहन करीत. एवढेच नव्हे तर फुलेंना जीवे मारण्यासाठी मारेकरी पाठवण्यापर्यंत त्यांच्या कार्यात अडसर निर्माण केला. पण जनसेवेचा ध्यास घेतलेल्या ज्योतीराव आणि साविञीमाईंनी आपले कार्य थांबवले नाही. गरीबी आणि हालअपेष्टा सहन करत आपली संपूर्ण हयात घालून अस्पृश्यांना शिक्षणाची द्वारे खुली केली.
ज्या काळात स्ञियांना घराबाहेर निघण्याची मुभा नव्हती, अशावेळी ज्योतीरावांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा उघडून स्त्रीला शिक्षणाच्या प्रवाहात आणले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी आपल्या बांधवांवर मुलांसारखं प्रेम केलं. त्यांना पिण्यासाठी आपल्या घरचा पाण्याचा हौद खुला केला.
२४ सप्टेंबर १८७३ रोजी ज्योतीरावांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून समाजाला अन्याय, अत्याचार आणि गुलामगीरीतून बाहेर काढून, सामाजिक समता असणारी समाजनिर्मिती केली.
डॉ. बाबासाहेबांनी फुलेंना आपले गुरु मानलं होतं.
आधुनिक भारतात शिक्षणक्षेञात क्रांती घडवून जातीव्यवस्था उच्चनीचता, आणि असामानतविरुध्द पाऊल टाकून अमूलाग्र क्रांती घडवून आणणारे ज्योतीराव हे खर्या अर्थाने क्रांतीसूर्य आहेत...
तुम्हा आम्हाला शिक्षणाची दारे खुली करून देणारे , आणि त्यासाठी प्रसंगी समाजाचा त्रास सहन करूनही सामाजाच्या सर्वांगीण हितासाठी झटणारे, प्रत्येक स्त्रीला शिक्षण मिळावे यासाठी स्वतःच्या पत्नीला शिकवून खऱ्या अर्थाने स्त्री पुरुष समानता आणणारे क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन..








कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा