विवेक विचार

विवेक विचार

शनिवार, ३ डिसेंबर, २०१६

माणदेशाचं लोकनृत्य : गजनृत्य(गजीढोल)




महाराष्ट्राला अनेक लोककलांचा, लोकनृत्यांचा  प्रदीर्घ असा इतिहास लाभला आहे. याच महाराष्ट्रातील गजनृत्य (गजीढोल नृत्य) लोकप्रिय आहे. त्यामुळे ते लोकनृत्य माणदेशासह  महाराष्ट्रात गजीढोल या नावाने लोकप्रसिद्ध आहे. माणदेशाला  गजीढोलाची दीड-दोनशे वर्षांची उज्वल अशी परंपरा लाभली आहे. माणदेशातील सांगली सातारा सोलापूर या जिल्ह्यातील खानापूर आटपाडी माण खटाव सांगोला माळशिरस जत कवठे महांकाळ या तालुक्यासह महाराष्ट्रात गजीढोल मोठ्या प्रमाणात  खेळला जातो. अनेक गावोगावी वाड्या वस्त्यावरती  गजी ढोल मंडळाचे  ताफे  अस्तित्वात आहेत.
गजीढोल नृत्यामध्ये गजी वर्तुळाकार नाच करतात.  गजनृत्यामध्ये नृत्य करणाऱ्यास गजी म्हणतात. ढोल वाजवणाऱ्यास ढोल्या म्हणतात.ढोलाच्या तालावरच ताल धरला जातो. गजाची घाई लावणाऱ्यास म्होऱ्या म्हणतात. या खेळात म्होऱ्याची भूमिका महत्वाची असते. रंगीत रुमाल  उडवत डाव्या-उजव्या बाजूला वळत तालबध्द नृत्य करतात. नृत्यात पंचवीस ते तीस लोकांचा सहभाग असतो. त्यांचा पोषाख अंगात तीन बटनी नेहरु शर्ट, डोक्यावर तुरा काढलेला फेटा, दोन्ही हातांत रुमाल, कमरेलाही रंगीत रुमाल  व विजार किवां धोतर घातलेली असा असतो.  अनेक ठिकाणी गजनृत्याला  चुळण असेही म्हटले जाते.
गजीढोलात नृत्य करणारे गजी अनेक प्रकारे गजीनृत्य करतात. नृत्यात ढोलाच्या आणि सनईच्या सुरावर पावलांचा संबंध जोडला जातो. नृत्य करताना गुणगुणणे चालू असते. त्याला ढोलाची साथ असते. ढोलवादक समुहाचा नायक असतो. ढोलवादक ज्याप्रमाणे ढोलावर टिपरी मारतो त्याप्रमाणे नृत्याचा प्रकार चाल बदलतो. ढोलवादकाचा हावभाव, त्याच्या पायांची हालचाल महत्त्वपूर्ण असते. तो आवाजामध्ये चढउतार करतो, त्याक्षणी नृत्याला गती आणि हळुवारपणा  येत असतो. सनई, सूर, तुतारी नृत्यास ताल निर्माण करतात. नृत्य करणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात त्यामुळे उत्साह निर्माण होतो. गजनृत्याच्या पंचावन्न प्रकारांपैकी उपलब्ध असलेल्या नऊ-दहा प्रकारांना घाय असे म्हणतात. कापसी घाय, थोरली घाय, गळा मिठी घाय, रिंगन घाय, घोड घाय, टिपरी घाय, दुपारतीची घाय, इत्यादी. एक घाय बारा ते पंधरा मिनिटे चालते. नृत्य तीन तास चालत असते.
अनेक लोकनृत्याप्रमाणे  गजीढोल हा नृत्यप्रकार हि फार जोशपूर्ण असा आहे. तो फक्त पुरुष मंडळी सादर करतात. ग्रामीण महाराष्ट्रातील यात्रा, जत्रा, सप्ताह, भंडारा, वालुग, दिवाळी , दसरा, यासह अनेक महत्वाच्या कार्यक्रमा च्या ठिकाणी  गजनृत्याचे  सादरीकरण केले जाते. चपळता, कल्पकता, बुद्धिमत्ता आणि नैसर्गिक रचनाबद्ध असा तो नृत्यप्रकार असल्याने गजीढोल या नृत्याची रचना वैशिष्‍ट्यपूर्ण आहे. गजीढोल खेळत असताना चांगभलं चा तसेच यळकोट यळकोट जय मल्हार' असा मुक्त जयघोष केला जातो. एक वैशिष्ट्य म्हणजे वाद्यांच्या तालावरून रांगडे स्वर, खणखणीत आवाज आणि जोशपूर्ण वातावरणात केलं जाणारं जोमदार गजनृत्य! आरेवाडी  परिसरातल्या अशा एका चैतन्यपूर्ण गजनृत्याचा पथकाचा समावेश दिल्लीच्या प्रजासत्ताकदिनाच्या संचालनात करण्यात आला होता, आणि परदेशातही  ते सादर करण्याची संधी त्या कलाकारांना मिळाली होती. हि नक्कीच आनंदनीय अशीच बाब म्हणावी लागेल. आमच्या आधुनिक शिकलेल्या पिढीने माणदेशाची हि लोकनृत्य कला समजावून घेतली पाहिजे.  हल्ली लग्नाच्या वरातीमध्ये डॉल्बीच्या तालावर बेधुंदपणे   झिंगाट होऊन नाचणारी तरुणाई पाहतो त्यावेळी  मला या पूर्वी च्या लग्नातील वरातीमध्ये नाचणारी गजी ढोल पथके आणि लेझम पथके आठवतात. मित्रानो गजिढोल हि आपल्या समाजाची परंपरा आहे. ती काळाच्या ओघात इतिहातात दडप होऊ नये हीच छोटीशी अपेक्षा......।

श्री पोपटराव यमगर
बाळेवाडी ता आटपाडी
7709935374

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: