भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटना समितीच्या 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाच्या अथक परिश्रमातून तयार केली गेलेली भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आली आणि त्या दिवसापासून भारतात लोकशाही मार्गाने प्रजेच्या हाती सत्ता आली, तो दिवस म्हणजेच आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन... आज आपण सर्वजण 68 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत, त्यानिमित्त प्रथमतः देशामध्ये प्रजेचं राज्य यावं यासाठी स्वतःच्या वैयक्तिक जीवनामध्ये त्याग आणि बलिदान देणाऱ्या सर्व महापुरुषांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन.
आज जगातील नव्या बदलांना आपला भारत देश सामोरे जात असताना मागील 67 वर्षातील चांगल्या वाईट गोष्टीच्या बेरजा वजाबाक्यांचा ताळेबंद लक्षात घेता एक निश्चितपणे दिसून येईल ते म्हणजे आपला भारत देश सकारात्मक दृष्टीकोनातून पुढे वाटचाल करतोय, यामध्ये माझ्या मनात तरी कोणतीच शंका नाही. देशाचे माजी राष्ट्रपती मा. अब्दुल कलाम साहेबांनीं देशाला महासत्ता करण्याचं पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपापल्या क्षेत्रात अविरत प्रयत्न करावे लागणार आहेत.
तुमच्या माझ्या समोर दररोजच्या दैनंदिन जीवनात अनेक प्रश्न, समस्या, आव्हाने आहेतच पण त्या आव्हानांना सामोरे जाण्याची ताकद भारतीय राज्यघटनेने तुम्हा आम्हाला दिली आहे. भारतामध्ये इतकी विविधता, धर्म, जाती, पंथ, भाषा आहेत तरीही भारत हा एकसंघ देश राहू शकतो याचा आदर्श आज आपण सर्वांनी जगासमोर ठेवला आहे. एवढेच नाहीतर जगातील सर्वात मोठा लोकशाही संपन्न देश म्हणून भारताची जगात ओळख आहे.
गेल्या वर्षभरात अनेक सकारात्मक गोष्टी देशाच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात घडून आल्या. त्यापैकीच एक म्हणजे देशाच्या रिझर्व्ह बँकेनं काळा पैसा आणि भ्रष्टचार विरोधी निश्चलीकरणाचा निर्णय घेतल्यानंतर देशातील सर्व जनतेनं याचं स्वागत केलं आणि रांगेत उभा राहण्याचा त्रास होऊनही भारतीय जनता सरकारच्या निर्णयाच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली.
जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे पहिले जातेय. नक्कीच उद्याच्या जगातील नेतृत्वापैकी भारत हा एक प्रमुख देश असेल अशी आशा मला वाटते.
देशाची एकात्मता विस्कळीत करण्यासाठी शेजारील पाकिस्थानकडून देशाच्या सीमारेषेवर वारंवार हल्ले केले जायचे, जात आहेत. पण या हल्ल्यांना एक जोरदार प्रत्यत्तर भारतीय जवानांनी 'लक्ष्यभेदी' कारवाई करून सगळ्या जगाला दाखवुन दिले की आमच्या देशावर हल्ले करणाऱ्याना आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ शकतो.
भारतीय राज्यघटने आपल्याला अनेक अधिकार/ हक्क दिले आहेत. आपण आपल्या देशाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्याचें पालन करणे गरजेचे आहे. मला वाटतं अधिकार आणि कर्तव्ये हि एकमेकांच्या हातात हात घालून जातात . जेवढे अधिकार महत्वाचे आहेत तेवढीच कर्तव्ये देखील आहेत.
ती कर्तव्य समजावून घेऊन त्याचे पालन करणे हीच आजची गरज आहे असे मला वाटते.
केंद्रसरकारमध्ये एक सकारात्मक दुरदृष्टिकोन असणारे नेतृत्व सत्तेमध्ये आहे. त्यांच्याकडून भारतवासीयांना खूप साऱ्या अपेक्षा आहेत . त्याची पुर्ती करण्यासाठी ते अहोरात्र काम करत आहेत. आपणही आपल्या मार्गाने आपल्याला जमेल तसं देशकार्य करत राहूया हीच एक छोटीशी सदिच्छा...
धन्यवाद..
✍श्री. पोपटराव यमगर
बाळेवाडी, ता. आटपाडी,
जि. सांगली.
7709935374
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा