विवेक विचार

विवेक विचार

बुधवार, २६ ऑक्टोबर, २०१६

आपल्या आटपाडी तालुक्याविषयी माझ्या लेखणीतुन उमटलेले विवेक प्रहार


आटपाडी म्हणजे प्रभु श्री रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या खरसुंडी च्या श्री सिद्धनाथाची ही भूमी, थोर साहित्यिक ग.दि माडगुळकर, व्यंकटेश माडगुळकर, ना.स. इनामदार या थोर साहित्यिकांची भूमी.., एका तराळाच्या पोरानं कर्तृत्वाच्या जोरावर अवघं अंतराळ काबीज केलं त्या साहित्यीक कुलगुरु शंकरराव खरातांची जन्मभूमी. लालभडक आणि चविष्ट आणि गुणवत्तापुर्ण अशा डाळिंबांची भूमी.....अशी कितीतरी वैशिष्ट्य आपल्या आटपाडीची आहेत.
आटपाडी तालुक्यातील दुष्काळग्रस्त जनतेला आपल्या वाट्याला आलेला भोग आपल्या मुलाबाळांच्या वाट्याला येऊ नये म्हणुन शिक्षणावर भर दिल्याशिवाय पर्याय उरत नाही.प्रतिकुल भौगोलिक, आर्थिक परिस्थितीतही या तालुक्यातील युवक युवती भविष्यातील सुखाची स्वप्न पाहत यशाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. नव्या युगाची आव्हाने पेलण्यासाठी ही पिढी सदैव सज्ज असेल यात कोणतीच शंका नाही.
तालुक्यातील मोठ मोठ्या पदावर पोहचलेल्या अनेकजणांच्या शैक्षणिक जडणघडणीमधे आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे महत्व अबाधित असेच आहे. सन्माननीय श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांनी दुष्काळी भागातील गोरगरीब व सर्वसामान्य तरुणांनी सुशिक्षीत होऊन स्वतःच्या पायावरती उभं रहावं यासाठी आटपाडी एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्या परिश्रमाने मजबुत पाया उभारल्यामुळे नावलौकिकास आलेली ही शिक्षण संस्था दिवसेदिवस विस्तारतच आहे. आज या संस्थेतुन जरवर्षी हजारो विद्यार्थी (केजी पासुन पीजी पर्यंत) शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत. आटपाडीच्या शैक्षणिक विकासात इतर अनेक संस्थानी आपला महत्वाचा वाटा उचलला आहे.त्यामधे झरे येथील अहिल्यादेवी शिक्षणसंस्था, आटपाडी येथील श्री राम एज्युकेशन सोसायटी खरसुंडीतील रयत शिक्षण संस्थेचे विद्यालय, धुळाजीराव झिंबल शिक्षण संस्था, यासह अनेक गावातील छोट्या मोठ्या शाळांचा यामधे समावेश होतो. खरंतर कोणत्याही भागाचा सर्वांगीण विकास हा त्या भागाच्या शैक्षणिक प्रगतीवर अवलंबुन असतो. विकास असतो. शैक्षणिक विकास झाल्याशिवाय आर्थिक, सामाजिक आणि वैचारिक विकास होत नाही ही वस्तस्थिती आहे. आपल्या तालुक्यातील, समाजातील मुलांमुलींनी शिकावं, शिकुन मोठ्या पदावरती विराजमान व्हावं हे प्रत्येकालाच वाटतं याचा आनंद आहे. समाजातील मुलांच्या उज्वल भविष्यासाठी आपण करिअरविषयक मार्गदर्शनपर कार्यशाळा राबविल्या पाहिजेत. भविष्यात शिक्षणाच्या जोरावरच येथील युवक युवती आकाशाला गवसणी घालुन तालुक्याचा नावलौकिक वाढवतील यामधे माझ्या मनात तरी कोणती शंका नाही...
धन्यवाद..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: