विवेक विचार

विवेक विचार

रविवार, ३१ डिसेंबर, २०१७

2017 वर्षातील जमाखर्चाचा ताळेबंद

2017 या  वर्षाचा आज शेवटचा दिवस......
उद्याच्या नविन वर्षाची सुरवातीची ओढ आपल्या प्रत्येकाला लागली आहे. त्या 2018 या नविन वर्षामध्ये नवचैतन्याने प्रवेश करायचाच आहे. तत्पूर्वी 2017 या वर्षातील काही बऱ्या वाईट आठवणी  माझ्या दृष्टिकोनातून मांडण्यासाठी. हा छोटासा लेखप्रपंच...  2017 या वर्षातून बरेच काही शिकलो. नवनविन विचारांचे  प्रवाह अनुभवता आले.  चौफेर वाचनाबरोबरच चौफेर विचार करून लेखन करण्याची समग्र अशी लेखणी होती तिलाच अधिक प्रगल्भतेकडे नेण्याचा प्रयत्न काही प्रमाणात यशस्वी झाला. बऱ्याच वर्तमानपत्रांकडून काही लेखांची दखल घेतली गेली. त्याचबरोबर अनेक नामवंत अश्या सन्माननीय व्यक्तीकडून प्रेरणा मार्गदर्शन आणि शुभेच्छा हि मिळाल्या... हे माझ्या दृष्टीने आनंदाचे क्षण आहेत. २०१७ या वर्षांतील माझा जो संकल्प होता तो म्हणजे इंग्रजी भाषा लिहिता बोलता आली पाहिजे... तो संकल्प पूर्ण करण्यात मी बऱ्याच प्रमाणात यशस्वी झालो आहे. मी माझ्या मनातील बरेच ठरवलेले संकल्प काही प्रमाणात पुर्ण करण्यात यश मिळाले आहे. परंतु जे पुर्ण होऊ शकले नाहीत ते येणाऱ्या वर्षात पुर्ण करण्याचा माझा मानस असेल.....
    वर्षभर तुमच्या सारख्या मित्रांच्या साथीने काम करत असताना खेळीमेळी च्या वातावरणात  २०१७ हे वर्ष कसे संपले हे सुद्धा समजले नाही. 
राष्ट्रीय भावना मनात ठेऊन राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, तसेच विविध क्षेत्रातील वास्तविक समस्यांवर  मांडलेले सणसणीत विचार आपल्यापर्यंत या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत  पोहचविण्याचा. छोटासा प्रयत्न करतो आहे.  याच बरोबर आपल्याला वर्तमानकाळात काम करत असताना आपली स्फूर्ती आणि प्रेरणा कायम प्रफुल्लित राहण्यासाठी  आपला उज्वल आणि गौरवशाली इतिहास माहित असणे गरजेचे आहे... यासाठी कधी कधी त्यावरती छोटे मोठे लेख लिहून मनाला ऊर्जा देण्याचे एक छोटसं  कार्य करण्याचा प्रयत्न करतो आहे.
खरंतर मला हरण्याची भीती कधीच वाटत नाही कारण मी जे काही निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय ते शून्यातून करतोय.... पाठीशी आईवडिलांचे आशीर्वाद आहेत. डोक्यात स्वामी विवेकानंदजी , छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले , राजमाता अहिल्यादेवी होळकर  यांचे विचार आहेत आणि तुमच्या सारख्या मित्रांची साथ आहे की जिथे हरण्याची कल्पनाच करवत नाही.
 सरत्या वर्षात चांगले वाईट खूप अनुभव  आले. काही गमावलं असेल तर खुप जवळची चांगल्या विचारांच्या माणसाना गमावलं...  Dreams  group  मधुन काही कारणास्तव बाहेर पडावं लागलं... अगदी ह्रदयाजवळची काही माणसेही दूर झाली, पण तितकीची जवळही आली... जीवनामध्ये संकटे अडचणी ह्या येतच राहतात फक्त त्या अडचणींना सामोरे सकारात्मक दृषटिकोनातून कसे जायचे हेही शिकलो. गेल्या वर्षभरात केलेल्या संघर्षातून जीवन कसं जगायच हे ही जीवनातील अनुभवाच्या शाळेतुन शिकलो ....  २०१७ मध्ये माझ्या दृष्टीने सकारात्मक जर   कोणता अनुभव असेल तर तो म्हणजे आदरणीय तुकाराम मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला भेटणे...
त्यांच्याकडून एक तत्व मात्र मी शिकलो ते म्हणजे 'कोणतंही काम करत असताना ते काम समाज हिताचे असेल  (public interest) आणि नियम व कायदा  (rules and law) याच्या चौकटीत बसणारे असेल तर कोणाचाही  विरोध असला तरी ते काम अवश्य करा... तो विरोध वैयक्तीक स्वार्थासाठी (self interest )असेल पण तुमच्या कामामुळे देशाचे हित असणार आहे. 
वर्षाच्या शेवटी नम्रपणे एक सांगु इच्छितो की, माझ्या काही  लेखाच्या मुळे चुकून काही मित्र मैत्रीनींचे, बंधू भगिनीचे, राजकीय कार्यकर्त्यांचे मन दुखावलं  असेल तर मोठ्या मनाने माफ करा .. माझ्या मनामधे सामाजिक जनजागृतीचा आणि चांगले विचार आपल्यापर्यंत पोहचविण्याचा हेतु हा शुद्धच आहे त्यामुळे काही वेळा आपल्याच चुकलेल्या माणसांच्या वरती प्रहार करावे लागतात. वास्तववादी परिस्थिती समजावून घेऊन त्यावरती परखडपणे मत व्यक्त करणे कोणत्याही सर्वांगीण विचार करणाऱ्या  लेखकाचे आद्य कर्तव्य असते तेच कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करतोय......
 तुम्हा सर्वांनीं माझ्या लेखाला दिलेला प्रतिसाद नक्कीच आत्मविश्वास वाढविणारा असाच आहे . नक्कीच येथून पुढे  अजून  चौफेर कश्या पद्धतीने लेखन होईल यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील असा विश्वास तुम्हाला देतो.. माझ्या मनात खूप साऱ्या आशा, अपेक्षा, स्वप्न मनात आहेत. त्या येणाऱ्या वर्षात पूर्ण करण्याचा 100% प्रयत्न असणार आहे.
येणारे २०१८ हे नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुखाचे, समृद्धीचे,भरभराठीचे जाओ.... हीच ईश्वर चरणी प्रार्थना।
सर्व बंधू, भगिनी , मित्र, मैत्रिणी, या सर्वांना नवीन वर्षाच्या कोटी कोटी शुभेच्छा ।।

धन्यवाद....
श्री. प्रतिक यमगर
बाळेवाडी, आटपाडी,  सांगली.
७७०९९३५३७४

शनिवार, ३० डिसेंबर, २०१७

नवीन वर्षा बद्दलच्या समज गैरसमजाबाबत

नमस्कार मित्रांनो, 
नवीन वर्षा बद्दल अनेक मेसेज आपल्या वाचनात येत आहेत. काहींचे मत असे आहे की आपले नववर्ष गुढीपाडव्याला असते त्यामुळे आम्ही गुढीपाडव्याला च शुभेच्छा देणार....  नववर्ष गुढीपाडव्याला असते या मताशी मी सहमत आहे परंतु सध्याच्या  विज्ञान आणि तंत्रद्यानाच्या युगात जागतिक स्थरावर ज्या दिनदर्शिकेचा वापर जास्त केला जातो तसेच  ज्या दिनदर्शिके चा वापर आपण आपल्या दररोजच्या जीवनात करत असतो त्या नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या किंवा स्विकारल्या तरी काही हरकत नाही. कारण आपल्या मराठी महिन्या प्रमाणे फार कमी व्यवहार चालतात सगळीकडे याच  तारखा, वेळ, कॅलेंडर प्रमाणे व्यवहार होत आहेत. खरंतर हे कॅलेंडर आपल्या दररोजच्या जगण्याशी सबंधित झाले आहे... मराठी महिने ही जास्तीत लोकांना माहीत नसतात अर्थात त्यांची काहीच चुकी नाही कारण आपल्या दररोजच्या जगण्यात याचा संबंधच कुठे नसतो...  अगदी पौर्णिमा अमावस्या सुद्धा जरी मराठी महिन्या नुसार वाटत असल्या तरी याच कॅलेंडर मध्ये आपण पाहतो. त्यामुळे नवीन स्वागत आपण सर्वांनी आनंदाने केलं पाहिजे...
फक्त ते करत असताना आपली संस्कृती काय आहे याचेही आत्मभान आपण ठेवणे गरजेचं आहे. जीवनामध्ये एन्जॉय असावा याबद्दल माझ्या मनात तरी नक्कीच दुमत नाही परंतु तो एन्जॉय करत असताना इतर समाजाला काही त्रास होणार नाही तसेच आपल्या संस्कती ला कोणताही तडा जाणार नाही याचा विचार आपण केला पाहिजे. खरंतर यामुळे आपले शरीर आणि  मनही निरोगी राहण्यास मदत होते. अर्थात हल्ली एन्जॉय,  मनोरंजनाच्या संकल्पना बदलल्या आहेत.. पण माझ्या मते व्यसन म्हणजे एन्जॉय नाही....   आपण ते समजण्या इतपत प्रगल्भ नक्कीच आहोत.... 
🖋 प्रतिक यमगर

काल कमला मिल कंपाऊंड या अनधिकृत इमारतीत आग लागून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात...

काल कमला मिल कंपाऊंड या अनधिकृत इमारतीत आग लागून झालेल्या दुर्घटनेमुळे अनधिकृत बांधकामाचा मुद्दा चर्चेत आला आहे. आदरणीय मुंढे साहेब नवी मुंबईचे आयुक्त असताना अनेक अनधिकृत बांधकामे कोणत्याही नेत्यांची भीडभाड न ठेवता जमीनदोस्त केली होती त्यावेळी सर्व राजकीय पक्षातील  सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी मुंढे साहेबांच्या अनधिकृत बांधकामाबाबतच्या मोहिमे विरोधात एकत्र आले होते. अगदी महापालिकेत ठराव ही पास केला होता. परंतु आदरणीय मुंढे साहेबांनी कोणत्याही राजकीय विरोधाला न डगमगता  प्रामाणिक आणि कार्यक्षम पणे भ्रष्ट व्यवस्थेविरोधात काम हाती घेतले होते. अखेर राजकारणी, बिल्डर आणि अधिकारी या लॉबीने मुंढे साहेबांच्या सारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याची बदली घडवून आणली...
फक्त सांगण्याचा मुद्दा इतकाच होता की आपण एखादी घटना घडल्यानंतर त्या गोष्टीकडे जास्त लक्ष देतो. मग पुन्हा त्या घटनेस जबाबदार असणाऱ्या ना काढून टाकले जाते. पण जीव जातो तो सर्वसामान्य माणसांचा..... गेलेले जीव काय कितीही कारवाई केली तर पुन्हा येऊ शकत नाहीत. एखादी दुर्घटना   घडूच नये यासाठी आपण आपत्ती पूर्व व्यवस्थापन किती करतो...  आणि आपत्तीपूर्व  व्यवस्थापन करतो त्याला आपण किती साथ देतो??   हा खरा प्रश्न आहे. 
त्या  कमला मिल कंपाऊंड चे अगोदरच अनधिकृत बांधकाम होऊ दिले नसते तर आज इतक्या जनाचा जीव गेलाच नसता...
अनेक राजकीय नेते एखादी दुर्घटना घडली की जनतेची सहानुभूती मिळावी यासाठी त्या दुर्घटना स्थळाला भेट देतात,(अगदी त्या घटना स्थळाला स्पिकनिक स्पॉट चे स्वरूप आणतात) काही प्रमुख पदाधिकारी माध्यमांना भावनिक  प्रतिक्रिया देतात परंतु आधीच जर अशा गैरव्यवहाराना साथ दिलीच नसती तर ती दुर्घटनाच घडली नसती...   ही खरी वस्तस्थिती आहे...
✒ प्रतिक यमगर
 बाळेवाडी, ता. - आटपाडी,
जि.- सांगली.
७७०९९३५३७४

शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०१७

आदरणीय बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.💐💐💐




आदरणीय बाळासाहेब ठाकरे हे नाव जरी ऐकले तर मनात सर्वप्रथम प्रचंड आदर निर्माण होतो. राजकारणातील एक दमदार कडक स्वभावाचा नेता...  ज्यांनी महाराष्ट्रातील मराठी माणसाला ताठ मानेन जगायला शिकवलं...   ज्यांनी महाराष्ट्रातील मराठी माणसाला स्वतःच्या अन्यायाविरोधात लढायला शिकवलं... ज्यांचे नाव जरी ऐकले तरी अनेकांचे धाबे दणाणतात.....   राजकारणात बिनधास्त बोलणारा माणुस....    विरोधकांच्यावर प्रहार करताना कोणाचीही भीड न बाळगणारा माणूस म्हणजे आदरणीय बाळासाहेब ठाकरे...
 ज्यांच्यामुळे आज असंख्य मराठी पोरं नगरसेवक, आमदार, खासदार, मुख्यमंत्री झाली...    हो त्यांच्यामुळेच आज मुंबई मध्ये मराठी माणूस ताठ मानेने राहू शकतो.. साठ सत्तरीच्या दशकात मराठी माणसांच्या लढ्यात बळ देणारा नेता , साथीदार.......
ज्या ज्या वेळी मराठी आणि हिंदू सामाजाच्या  संस्कृतीवर घाला घालण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा सर्वप्रथम त्याविरोधात बाळासाहेबांचे सणसणीत प्रहार तिथे उमटले गेले........
बाळासाहेब एवढ्या जहरी भाषेत प्रहार करायचे की पुढच्या विरोधकाला काय बोलायचे हेच समजत नसे....   बाळासाहेबानी तो स्वाभिमान शेवटपर्यंत जपला... त्यामूळेच आज सर्वच पक्षाच्या सर्वच नेत्यांना आदरणीय बाळासाहेब यांच्याविषयी प्रचंड आदर आहे...  आज बाळासाहेब आपल्यात नाहीत ही खंत आहे पण जरी नसले तरीही त्यांचे सणसणीत विचार, त्यांचा स्वाभिमान प्रत्येक मराठी माणसाच्या समवेत आहेत. आज दररोज सोशल मीडियामध्ये आम्ही स्वतःला व्यक्त करत असताना कोणाचीही भीती आणि  तमा न बाळगता निर्भीड आणि निपक्षपातीपणे व्यक्त होतो याचे सर्वात महत्त्वाचे प्रथम कारण म्हणजे  संविधानातील मूलभूत अधिकार तर दुसरे महत्वाचे कारण म्हणजे बाळासाहेबांनी चुकीच्या घटनांवर बिनधास्त व्यक्त व्हायला... प्रहार करायला शिकवलं, हो त्यांनीच  आमच्या सारख्या सर्वसामान्य नवतरुणांना सांगितले 'सत्य बोलायला कोणाच्या बापाला ही घाबरायचे नाही.' अश्या शिकवलेल्या स्वाभिमानामुळेच आज असंख्य मराठी बांधव स्वतःला   चांगल्या पद्धतीने व्यक्त करत आहेत... ही समग्र लोकशाहीच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे  पुनश्च एकदा आदरणीय बाळासाहेबांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.💐💐💐

✍🏻प्रतीक यमगर

रविवार, १२ नोव्हेंबर, २०१७

पोलिसांची वर्दी दर्दी होत चालली आहे का?*




महाराष्ट्राच्या इतिहासात सांगली जिल्हा हा राजकारण्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सांगली जिल्ह्यांनं महाराष्ट्राला वसंतदादा पाटील, आर आर (आबा) पंतगरव कदम, जयंत पाटील यांच्यासारखी मोठी नेतृत्व दिली. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अर्धा डझन मंत्री हे सांगली जिल्ह्याचे असायचे. पण आज त्याच सांगली जिल्ह्याचं राजकीय आणि सामाजिक महत्व कमी झालं आहे. आम्हाला सांगली म्हटलं की एवढया मोठ्या नेतृत्वाचा जिल्हा म्हणून आठवतो पण मित्रांनो आज त्याच सांगली जिल्ह्याचं नाव गेल्या पाच दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात  पोलीस अधिकारी आणि काही पोलिसांनी अनिकेत कोथळे नावाच्या तरुणाला थर्ड डिग्रीचा वापर करून तसेच त्याला मारून  आंबोली घाटात जाळून टाकल्याप्रकरणी महाराष्ट्रात मीडियावर, वर्तमानपत्रात आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर गाजत आहे. खरंतर या प्रकरणांमुळे पोलिसांच्या प्रतिमेला तडा गेला आहे त्याबरोबरच जनतेतील त्यांच्या विश्वासार्हतेला हे धोका निर्माण झाला आहे. 'सदरक्षणाय खलनिग्रहणाय ' असे ब्रीद वाक्य घेऊन काम करणाऱ्या पोलीस दलाला आज मात्र आपण नेमकं कोणाचे रक्षण आणि कोणाचे भक्षण करतोय हे प्रश्न विचारण्याची वेळ येऊन ठेपली आहे. सांगली जिल्ह्यानं आर आर पाटील (आबा)  यांच्यासारखा कर्तव्यदक्ष आणि  प्रामाणिक गृहमंत्री या महाराष्ट्राला दिला आज त्याच आबांच्या जिल्ह्यात आणि त्याच पोलीस खात्यात अश्या पद्धतीचे नीच प्रकरण घडत आहे हे दुर्दैव आहे याची खंत सांगलीला जिल्ह्याला नक्की वाटते आहे. आज सांगली जिल्ह्यात चोरीचें, दरोड्यांची प्रकरणे मोठ्या प्रमाणात घडत आहेत. गुंडगिरीचे प्रमाण ही वाढले आहे. काही दिवसांपूर्वी 9 कोटी हडप केल्याचे प्रकरण ही ताजे आहे. गुंडाकडून हप्ते घेण्याचे धंदे ही राजरोसपणे चालू आहेत. काही पोलीस अधिकारी तर त्यांच्या भ्रष्ट कारभाराची बातमी पेपरमध्ये छापली म्हणून संपादकाला धमकी देत आहेत. पांढऱ्या कपड्यातील गुंडगिरी करणारे नेते आणि भ्रष्ट पोलीस अधिकारी यांचं साटलोट  जोरात चालु आहे.
खरंतर पोलीस हे जनतेच्या रक्षणासाठी असतात पण एखादा सर्वसामान्य माणूस पोलिस ठाण्यात एखादी तक्रार किंवा गुन्हा दाखल करण्यासाठी गेला असता त्याची तक्रार ऐकून घेण्याऐवजी त्यालाच उद्धट पद्धतीने बोललं जातं.  त्याचं म्हणणं ऐकून घेण्याऐवजी त्यालाच गुन्हेगारासारखी वागणूक दिली जाते. साधे त्याच्याशी सभ्यतेने बोलत नाहीत, ही अनेक पोलीस ठाण्यातील वस्तुस्थिती आहे.
काही ठिकाणी तर भ्रष्ट आणि लाचार पोलीस अधिकारी आणि त्या भागातील नेते (खरंतर हेच गुंड असतात) यांच्या संगनमताने अनेक बेकायदेशीर व्यवहार चालतात. एखाद्या गुन्हयात त्या नेत्यांच्या कार्यकर्त्याला अटक केली तर लगेच तो गुंडप्रवृत्तीचा नेता फोनवरून पोलिसांना 'तो माझा कार्यकर्ता आहे , त्याला सोडा'    असे सांगीतल्याबरोबर तो पोलीस अधिकारी त्याला सोडतो, अश्या घटना घडत आहेत ही नक्कीच लाजिरवाणी गोष्ट आहे.
त्यामुळे हे भ्रष्ट पोलीस अधिकारी आणि गुंड प्रवृत्तीचें नेते यांच्यामुळे पोलीस खात्याची प्रतिमा मलिन होत आहे. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याला स्वतंत्र गृहमंत्री असणं गरजेचं आहे, परंतु मुख्यमंत्री महोदय स्वतःकडे गृहखाते ठेवून काय साध्य करू इच्छितात हे समजणे कठीण आहे. मला वाटतं, महाराष्ट्रातील संवेदनशील अश्या गृह खात्याला  स्वतंत्र गृहमंत्री मिळाला पाहिजे. आणि जी पोलीस दलात बेबंदशाही चालु आहे तिला कुठेतरी रोखणे शांततामय आणि समृद्ध महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचे आहे. पानिपतच्या युद्धात  जसा विश्वास राहिला नाही असे म्हटले जाते तसेच सामान्य जनतेचा पोलीस खात्यावरचा विश्वास या प्रकरणामुळे  काही प्रमाणात गमावला आहे असेच म्हणावे लागेल. कोथळे मृत्यू प्रकरणात समावेश असलेल्या पोलीस अधीकारी आणि पोलीस यांना शिक्षा झालीच पाहिजे त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील पोलीस खात्यात मोठया ऑपरेशनची गरज आहे, नाहीतर गुंड प्रवृत्तीचे नेते आणि भ्रष्ट पोलीस यांच्यामुळे पोलीसांची वर्दी दर्दी झाल्याशिवाय राहणार नाही.

✍🏻प्रतीक गणपत यमगर
बाळेवाडी,
ता. आटपाडी, जि. सांगली
7709935374
📝Popatgyamgar.blogspot.com
📝https://pratikyamgar.wordpress.com

रविवार, १५ ऑक्टोबर, २०१७

Let this reading day, let us explore the enchanting world of books, charting newer adventures of prose and introduce to our youths the magic of the words. Let our growing fascination with reading be a fitting tribute to the legacy of our beloved former president Dr A.P.J. Abdul Kalam, one book at a time!
He was the most beloved president and India's very own 'Wings of Fire'. Dr A.P.J. Abdul Kalam struck a chord with the young and the old alike, showing the genuine integrity of a man, a quality rarely shown by the men who occupied the position as the 'Head of the State'. Let us bow down in fond remembrance of our beloved former president on his birth anniversary and work hard to realize his Vision 2020 of an empowered, progressive India.

दररोजचे आयुष्य जगताना कलाम साहेबांचे विचार जगण्याचे नवनवीन मार्ग शिकवून जातात. कलाम साहेबांनीच या देशातील सळसळत्या नवरक्तच्या नवतरुणांना मोठी स्वप्ने पाहायला शिकवले....
आणि ती स्वप्न साक्षात उतरविण्यासाठी संघर्ष करायला शिकवले.....
देशाच्या 70 वर्षाच्या इतिहासात एकमेव राष्ट्रपती असे होऊन गेले ज्यांना राजकारणाचा स्पर्श झाला नाही......  राष्ट्रपती भवनात फक्त एक बॅग घेऊन गेले आणि पाच वर्षानंतर एक बॅग घेऊन बाहेर पडले...  पण स्वच्छ आणि चारित्र्यशील प्रतिमा म्हणून ओळख झाली ती कधीच भविष्यात विसरली जाणार  नाही ....

बुधवार, १३ सप्टेंबर, २०१७

विश्वबंधुत्व दिन...


११ सप्टेंबर १८९३ याच दिवशी स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथील सर्वधर्मपरिषदेत जे व्याख्यान दिले त्या भाषणातून सर्व जगाला भारतीय संस्कृती आणि विश्वबंधुत्वचे महत्व पटवून दिले, स्वतःच्या वाणीने जग जिंकले. तोच हा दिवस म्हणजे 11/9...... या घटनेला आज 125 वर्ष पूर्ण होत आहेत... तुमच्या माझ्या अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस... याच घटनेमुळे विवेकानंदजी विश्वविजयी झाले. शिखागोच्या सर्वधर्मपरिषदेतील भाषण हे फक्त 120 सेकंद चालले पण ते भाषण तुमच्या माझ्या हृदयात कोरून ठेवले पाहिजे असे आहे... कित्येक संघर्षाचे डोंगर पार करत, अडथळे पार करत स्वामीजी त्या सर्व धर्म परिषदेत पोहचले बोलण्यासाठी उभे राहिले ...आणि त्यांच्या विवेक अश्या वाणीतून शब्द उमटले.... Sisters and brothers of Amerika... जगातील सर्व देशाच्या नामवंत प्रतिनिधीनीं या एकाच वाक्याचे टाळ्यांच्या कडकडात स्वागत केले..
असे काय होते या वाक्यात???..... या वाक्यात होते आपली भारतीय संस्कृतीचा महान असा परिचय.... बंधू आणि भगिनी या विश्वबंधुत्वाच्या संकल्पनेचा नवीन उदय....
11/9 म्हटले की मला माझ्या डोळ्यासमोर दोन घटना आठवतात..... एक 11/9/1893 चे शिखागोतील स्वामीजींचे भाषण आणि दुसरा म्हणजे 11/9/2001
चा अमेरिका वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ला...
खरंतर हे दोन 11/9 जगातील प्रमुख संघर्ष आहेत.....
आपण कोणत्या बाजूचे सैनिक हे निश्चित आहे.... 12 व्या शतकातही विश्वबंधुत्व ज्ञानेश्वर माउलींनी पसायदानाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला सांगितले.. तेच विश्वबंधुत्व स्वामीजींनी 19 शतकात जगाला सांगितले
अशा स्वामी विवेकानंदांना व त्यांच्या विचारांना त्रिवार त्रिवार प्रणाम!!!
*आसेतु हिमाचल अखंड भारत..
शोभत राहो ऐक्याने....
मिळो प्रेरणा अखिल जगाला दिव्य विवेक विचाराने......॥*
धन्यवाद...



बुधवार, १२ जुलै, २०१७

लोकसत्ता ब्लॉगबेंचर्स स्पर्धेतील या आठवड्यातील विषय 'विद्यासागरातील अविद्या' या विषयावर व्यक्त केलेले माझे मत....


दक्षिण आफ्रिकेतील  विद्यापीठामध्ये एक प्राध्यापकाने पदवी , पदव्युत्तरचे शिक्षण घेणाऱ्या  आणि डॉक्टरेटसाठी संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना भावना व्यक्त करणारे पत्र लिहिले होते आणि ते विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर लावले होते त्या पत्रातील संदेशात म्हटले होते,
"एखादे राष्ट्र कोलमडून पडण्यासाठी क्षेपणास्त्र किंवा अणुबॉम्बची गरज नसते तर  शिक्षणाचा दर्जा खालावला आणि विद्यार्थ्यांना परीक्षेत  स्वतःची फसवणूक करून घ्यायला वाव दिला की ते राष्ट्र कोलमडून पडायला वेळ लागत नाही. अशा शिक्षणातून तयार झालेल्या डॉक्टरच्या हातून रूग्ण मरण पावतो, अभियंत्याने बांधलेली इमारत कोसळते, अकाउंटंट च्या हातातून रक्कम गायब होते, न्यायाधीशाच्या हातातून न्याय मिळत नाही आणि धर्मकार्य करणाऱ्या कडून माणुसकीची हत्या होते."
 वरील वाक्यातून राष्ट्र उभारणीसाठी  शिक्षणाचे महत्व  किती आहे हे आपल्याला दिसून येते.
जगातील सर्वोत्तम  विद्यापीठाच्या यादीमध्ये भारतातील एकही विद्यापीठ येत नाही यावरून आपल्या देशाचा उच्च शिक्षणाचा दर्जा किती आहे हे यावरून दिसून येते. आपल्या राज्यातील विद्यापीठामध्ये  कुलगुरूचीं नियुक्ती करण्यासाठी सुद्धा प्राध्यापकांच्या मध्ये स्वतःचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय  स्तरावरील  केलेले प्रबंध सादर करण्यासाठी स्पर्धा करण्याऐवजी सत्तेतील मंत्र्याशी आपले कसे राजकीय संबध आहेत  हे दाखवण्यासाठी स्पर्धा केली जाते मग तिथे आपण विद्यापीठातील उच्च शिक्षणाच्या दर्जा विषयी चर्चा करणे व्यर्थच ठरेल असे मला वाटते.
महाविद्यालयात एकतर विद्यार्थी बसत नाहीत आणि विद्यार्थी आलेच तर प्राध्यापक वेळेवर पोहचत नाहीत हे अग्रलेखातील मत सद्याची वस्तुस्थिती मांडणारे  आहे. प्राध्यापक वर्गात आलेच तर फक्त हजेरी पुरते आणि औपचारिकतेसाठी हजर राहतात. त्यामुळे हल्ली शैक्षणिक व्यवस्थेमध्ये  क्लास नावाची संकल्पना मोठ्या प्रमाणात रुजत चालली आहे. त्याला खतपाणी घालण्याचे काम हे प्राध्यापक  कशाप्रकारे करतात, प्राध्यापक आणि क्लासचालक यांचे साटेलोटे कसे असते याची सविस्तर लेखमालिका गेल्यावर्षी लोकसत्ता मधून प्रकाशीत केली गेली होती. विद्यापीठातून डॉक्टरेट ही पदवी नवीन विषयावर संशोधन करण्यासाठी दिली जाते परंतु हल्ली phd ही नवीन संशोधन करण्यासाठी नव्हे तर नोकरीमध्ये बढती आणि पगारवाढीसाठी केली जाऊ लागली आहे. तसेच ते प्रबंध सादर कसे करतात याचेही सविस्तर लेखमाला लोकसत्ताने अनेकवेळा दिली  आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल आणि कुलपती सी. विद्यासागर राव यांनी गेल्या शैक्षणिक वर्षाच्या परीक्षांचे निकाल अजून लागले लागले नाहीत यावरून मुंबई विद्यापीठांची कानउघाडणी केली त्याबद्दल राज्यपाल किमान अभिनंदनास पात्र ठरतात.  परीक्षा  घेतल्या नंतर 45 दिवसात जाहीर करणे हे अनिवार्य असूनही राज्यातील  जवळ जवळ सर्वच विद्यापीठामध्ये 45 दिवसात निकाल लावले जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे. परीक्षा आणि निकाल यापेक्षा महाविद्यालयीन निवडणुकांचे वारे सध्या जोरात वाहत आहे. यावरून आम्हाला अभ्याससापेक्षा राजकारण महत्वाचे वाटू लागले आहे हे सिद्ध होते.
आज महाराष्ट्रात आणि देशात सध्या काही खाजगी विद्यापीठांनी तर शिक्षणाचे बाजारीकरण करुन ठेवले आहे. विशेषतः राजकीय नेत्यांचा तर एक  मोठा व्यवसाय झालेला आहे. आज  शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात अशा अनधिकृत विद्यापीठाकडुन लाखो रुपये घेऊन जशा बाजारात वस्तू विकल्या जातात तशा विद्यापीठात पदव्या विकल्या जात आहेत हे चिंताजनक आहे. यामुळे आज अनेक युवक पदवीधर असूनही बेरोजगार आहेत याचे कारण म्हणजे अश्या विकाऊ पदव्या प्राप्त करून घेणे.
शिक्षण या क्षेत्रावर आपले सरकार कायमच कमी खर्च करत आले आहे  आमच्या डोक्यात शिक्षणावर खर्च म्हणजे व्यर्थ जाणारा खर्च होय कारण तिथून प्रत्यक्ष एकगठ्ठा मते भेटत नाहीत .  यामुळे आतापर्यंत शिक्षण हा विषय ऑपशनला टाकला आहे.  ज्ञान देणाऱ्या किंवा देशाची भावी पिढी घडवणाऱ्या शिक्षणासारख्या क्षेत्रावर कमी खर्च करणे हे चिंताजनक आहे.

✍🏻पोपट यमगर
बाळेवाडी, ता. आटपाडी, जि. - सांगली
7709935374

भारत आणि चीन देशातील सीमारेषेवरून चालु असलेला धगधगता संघर्ष





भारत आणि चीन च्या सीमारेषेवर सध्या दोन्ही देशाकडून सध्या सैनिकांची जमवाजमव चालू आहे. चीन हा जगात विस्तारवादी विचारांचा देश म्हणून जगात ओळखला जातो याचे कारण म्हणजे चीनच्या सभोवताली जे देश आहेत त्यातील जवळजवळ 13 देशाशी चीनचा सुरवातीपासून सीमेवर वादविवाद चालू आहे. यातून चीनची प्रतिमा ही जगभरामध्ये अतिक्रमण वादी  देश अशी  झाली आहे.       चीनला  दुसऱ्या देशातील एखादा भुभाग घ्यावयाचा असेल तर चीन सर्वप्रथम त्या भूभागाच्या जवळपास पायाभूत सुविधा विकसित करतो आणि तो भाग विकसित झाल्यानंतर त्यांचे सैनिक पाठीमागून पाठवले जाते. अशी  या देशाची आतापर्यंतची  रणनीती    असल्याचे आपणास दिसून येईल . त्यामुळे दोन्ही देश स्वातंत्र्य झाल्यापासून LOC वरून दोन्ही देशांमध्ये वाद सुरू आहेत यावरूनच 1962 मध्ये दोन्ही देशांमध्ये युद्ध झाले होते. तिथून LOC या सीमारेषेच्या आतमध्ये चीनने रस्ते, वीज यासारख्या पायाभूत सुविधा चांगल्या प्रकारे विकसीत केल्या आहेत. मग लडाख असो,  सिक्किम असो किंवा अरुणाचल प्रदेश असो या सर्व भागाच्या जवळ चीनने पायाभूत सुविधा विकसित केल्या गेल्या आहेत. आताही हा भुतानमधील डोकलाम या भागात चीनने रस्ता बांधणे चालू केले आहे याला भुतानासह भारताचा विरोध आहे. डोकलाम चा मुद्दा मुद्दामहून पेटवत ठेवायचा आणि सिक्कीम भाग बळकवायचा ही चीनची रणनीती दिसते आहे. त्यामुळे आपल्या देशानेही गाफील राहून चालणार नाही. देशाचे अर्थमंत्री आदरणीय अरुण जेटली यांनी 1962 सालचा भारत तसाच राहिलेला नाही असे म्हटले आहे. हे विधान त्रिवार सत्य आहे. पण जसा आपण भारताच्या बाबतीत विचार करतो आहे तसाच विचार आपण चीनच्या बाबतीत केला पाहिजे . 1962 सालचा चीन ही तसाच राहिलेला नसून खूप बदललेला आहे. चीन साम्यवादी आर्थिक धोरणावरून 1980 च्या नंतर उदारीकरणाकडे झुकला आहे. त्यांनी सर्वच क्षेत्रांच्या बाबतीत केलेली प्रगती हे ही आपण लक्षात घेतली पाहिजे.
      चीन आणि भारत या आर्थिक विकासामध्ये वेगाने वाढणाऱ्या दोन्ही देशांनाही युद्ध होणे परवडणारे नाही या मताशी मीही सहमत आहे. तसेच या दोन्ही देशांमध्ये युद्ध होणार नाही या फक्त राजकीय चर्चा असतील  असे मला ही वाटते परंतु म्हणून आपण 1962 सारखे गाफील राहून चालणार नाही. जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालीच तर आपणही त्या साठी सज्ज असले पाहिजे याचे नियोजन करणे गरजेचे आहे आणि ती आपल्या देशाकडून केली जात आहे.

✍🏻पोपट यमगर
आटपाडी सांगली
7709935374

शनिवार, २७ मे, २०१७

महाराष्ट्रासह देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी संपूर्ण शरीरातील ताकदीने निस्वार्थीपणे लढणारा तमाम शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने स्वाभिमानी असणारा स्वाभिमानी नेता खासदार आदरणीय  राजू शेट्टी साहेबांचा गेल्या तीस वर्षातील संघर्षमय प्रवास आपल्या सर्वाना माहीतच आहे. *शिवार ते संसद* हे त्यांचे आत्मचरित्र प्रत्येक  शेतकरी सुपुत्राने वाचावे असेच आहे. मी ही ते चरित्र वाचत असताना बेभान झालो . राजू शेट्टी या माणसावर स्वतःच्या सुख दुःखाची, घरादाराची परवा न करता तन, मन, धनासह इतका जीव ओवाळून  टाकतात हे खरंतर फार कमी नेत्यांच्या वाट्याला येतं.
       *30, 35 वर्षानंतरही त्यांचा लढाऊ बाणा, शेतकऱ्याविषयीची तळमळ कधीच कमी झालेली दिसून येत नाही.* आजच्या परिस्थितीत काही नेते सुरवातीला प्रस्थापिताविरुद्ध टीका करतात आणि पुन्हा त्याच  प्रस्थापितांशी, सत्ताधाऱ्याशी तडजोड करून  पाच दहा  वर्षाच्या तत्वनिष्ठ राजकारणाला तिलांजली वाहतात. पण याला अपवाद म्हणजे आदरणीय राजू शेट्टी साहेब आणि आमदार बचु कडू साहेब...  ही चळवळीतुन पुढे आलेली तुमच्या माझ्या सारख्या सर्वसामान्य बहुजन, वंचित कुटुंबातून पुढे आलेली नेतृत्व आहेत. त्यांची बांधीलकी ही नेहमी शेतकरी आणि वंचित घटक आणि विस्थापित समाज यांच्याशी असते.   राजू शेट्टी साहेब काय आज राजकारण, समाजकारण करत नाहीत. गेली 30- 40 वर्ष राजकारण आणि समाजकारण करत आहेत. पंचायत समिती सदस्यापासून सुरू झालेला प्रवास आज देशाच्या संसदेचा सदस्य होण्यापर्यत मारलेली मजल नक्कीच प्रेरणादायी अशीच आहे.... त्यामुळे भाजपच्या नेत्यानी त्यांना संपवण्याचा प्रयत्नही करू नये तो उलट तुमच्यावरच उलटेल यामध्ये माझ्या मनात तरी शंका नाही.  पाठीमागचे काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार शेतकऱ्यांविषयी  उदासीन   धोरणे राबवत असल्यामुळे राजू शेट्टी साहेब यांनी बहुजनहृद्यसाम्राट गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या मध्यस्तीवरून  शेतकऱ्यांच्या काही मागण्यासह भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी ला पाठिंबा दिला. त्यापैकी प्रमुख मागण्या म्हणजे *स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी केंद्र सरकारने स्वीकारव्यात(शेतमालास दीडपट हमी भाव) आणि शेतकऱ्याचा सात बारा कोरा करावा या होत्या.  मोदीजींनी या मागण्या  सत्ता आल्यानंतर पूर्ण करतो हे आश्वासन दिले होते.  मोदी सरकारला तीन वर्ष पूर्ण झाली पण शेतकऱ्याची आश्वासने काय पूर्ण केली नाहीत. महाराष्ट्रात भाजपची सत्ता येण्यामध्ये राजू शेट्टींचा मोठा वाटा आहे सत्ताधार्यांना कधीच विसरून चालणार नाही. सत्ताधार्यांनी ही आश्वासने पूर्ण करण्याऐवजी शेतकर्याना शिव्या देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सरकार करते आहे ही  शेतकऱ्यांची सर्वात मोठी शोकांतिका आहे.
         * शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी पूर्ण करण्यास सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे आदरणीय राजू शेट्टी यांनी पुण्याच्या महात्मा फुले वाड्या पासून ते महाराष्ट्र राज्यपालांचे मुंबईतील  निवास म्हणजेच राजभवन पर्यंत पायी आत्मक्लेश यात्रा काढण्याचा निर्णय घेतला . 22 मार्च पासून सुरू झालेली ही यात्रा आज अंतिम टप्यात आली आहे. राजू शेट्टी आणि त्यांच्यासोबत असलेल्या शेतकऱ्यांचा त्याग ह्या महाराष्ट्रातील निरडावलेल्या सरकारने राजकारण सत्ताकारण बाजूला ठेऊन खुल्या मनाने समजावून घेणे गरजेचे आहे. उसदरासाठी, स्वाभिमानीची आंदोलने कशी असतात हे महाराष्ट्रासह देशाला माहीत आहे. त्यामुळे स्वाभिमानी कार्यकर्ता आणि शेतकरी बांधव तळमळीने, त्यागाने मुंबईकडे चालला आहे म्हणजे तो शांत आणि अहिंसात्मक आहे असे सत्ताधार्यांनी समजू नये. त्यांच्या संतापाचा स्फोट झाल्यावरती मंत्रालयातील अनेक मंत्र्यांनाही घाम फुटेल. राजू शेट्टींच्या आत्मक्लेश यात्रेला माध्यमे सॉफ्ट कॉर्नर देत  असल्याचे दिसून येते...  ज्या दाखवतात त्या फक्त शेतकर्यांमध्ये फूट निर्माण व्हावी ह्याचपद्धतीने दाखवत आहेत. माध्यमांनी सत्ताधाऱ्यांची भटगिरी करण्यापेक्षा शेतकरी, वंचित सर्वसामान्य जनता यांच्यासारख्या वंचित घटकांच्य बाजूने ठामपणे उभे राहून सत्ताधार्यांना सडेतोड प्रश्न विचारले गेले पाहिजेत. त्यामुळे माध्यमे सुद्धा निपक्षपातीपणे व्यक्त होत नाहीत ही वस्तुस्थिती आहे .
           
   आदरणीय राजू शेट्टींची स्वाभिमानी  आत्मक्लेश यात्रा जस जशी मुंबईकडे पुढे वाटचाल करत राहील तस तसे सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले  जाणार आहेत. त्यामुळे ज्यां शेतकऱ्यांना शक्य आहे त्या सर्वांनी राहिलेल्या दोन तीन दिवसांमध्ये आत्मक्लेश पदयात्रेत सहभागी होऊन शेतकऱ्यांची ताकद या निर्दावलेल्या सरकारला दाखवून दिली गेली पाहिजे आणि आपण सर्व स्वाभिमानी शेतकरी  एकजुटीने एकत्र येऊन आपली  ताकद  या मस्तवाल सरकारला दाखवून नक्की द्याल ही आशा  आहे.

धन्यवाद...
✍पोपटराव यमगर
बाळेवाडी, ता. आटपाडी,
जि. - सांगली.
7709935374

मंगळवार, २ मे, २०१७

सत्ताधार्यांना शेतकऱ्यांचा आणि त्यांचा मुलामुलींचा आक्रोश ऐकू येत नाही का????

     आजच्या सरकारसमोर आमच्या शेतकरी बांधवाने कितीही आरडून ओरडून सांगितले तरी सरकार ऐकायला काय तयार नाही. राज्यातील सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा उद्योगपतीच्या प्रश्नांची जास्त काळजी आहे. खरंतर आम्ही जी शेतकऱ्याची वस्तुस्थिती मांडण्याचा आणि ती सरकारपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करतोय तो प्रामाणिक पणे करतोय...    आम्हाला कोणत्या पक्षाची दलाली करायची नाही आहे. काही आमच्या (राजकीय पक्षाच्या) मित्रांना वाटते की आम्ही त्यांच्या पक्षाविरोधात टीकात्मक लेखन करतोय. खरंतर आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा अभ्यास करून  समग्र मांडत असताना या कार्यकर्त्यांचा आमच्या लेखाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा संकुचित स्वरूपाचाच आहे. परंतु अश्या आंधळ्या भक्तांना  मला सांगायचे आहे की शेतकऱ्यांची वास्तविक परिस्थितीतील अवस्था मांडणे हे आमचे कर्तव्य आहे. ती काल मांडत होतो आज मांडतोय आणि उद्याही मांडू. मग राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार असो त्याने आमच्यावर काहीही फरक पडणार नाही.  तीन वर्षांपूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे सरकार  असतानाही आम्ही शेतकार्यासारख्या वंचित घटकांचे प्रश्न मांडलेले आहेत. त्यामुळे आंधळ्या भक्तांनी एक लक्षात ठेवले पाहिजे की आपण पहिले  शेतकऱ्यांची मुले आहोत आणि मग नंतर कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते, नेते आहोत. त्यामुळे तुम्ही तुमच्या पक्षाची भूमिका अवश्य मांडा पण त्यांची वकिली आणि दलाली करण्याचा प्रयत्न करू नका .  त्यामुळे  या राज्यातील आम्ही शेतकऱ्यांची  हजारो पोरं आज शेतकऱ्यांची वकिली आणि  दलाली सोशल मीडियाच्या माध्यमातून करत  आहोत. कोणाला आवडो आगर न आवडो पण आमची बांधीलकी ही शेतकऱ्यांशी आहे. कोणत्याही पक्षाशी आणि नेत्यांशी तर अजिबातच नाही. आमचे कोणत्याही राजकीय पक्षाशी मित्रत्व ही नाही आणि शत्रुत्व ही नाही. आमचा विरोध आहे तो फक्त राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या शेतकऱ्यांविषयीच्या चुकीच्या धोरणाला....  आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे जाणीवपूर्वक होत असलेल्या दुर्लक्षाला......      त्यामूळे   झोपेची सोंग घेतलेल्या या मस्तवाल सरकारला आम्ही आमच्या परीने जागे करण्याचा प्रयत्न करतोय .........
                    मला माहित नाही किती जणांना आम्ही निरपेक्ष भावनेने लिहिलेले अभ्यासात्मक सणसणीत आणि वस्तुनिष्ठ लेख आवडतात.  परंतु सत्य आणि वस्तू स्थिती मांडलेली अनेकांना  झोबंते. अर्थात म्हणतात ना नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सत्य हे नेहमी कटू वाटते ....  काही निवडणुका मध्ये यश मिळाले म्हणून हवेत असलेल्या सत्ताधार्यांनीं शेतकऱ्यांवरील  वास्तविक परिस्थितीचे भान ठेवावे आणि आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमाफी सारखे निर्णय त्वरित घ्यावेत. जर या महाराष्ट्रातील शेतकऱ्याची कर्जमाफी केली नाही तर महाराष्ट्रातील शेतकरी नक्कीच उद्योग धार्जिनी सरकारला जमिनीवर आणेल यामध्ये माझ्या मनात तरी कोणतीच शंका नाही.   आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या कडून शेतकऱ्याची  कर्जमाफी करण्यापेक्षा शेतकऱ्यांची  कर्जमुक्ती करू अशी दूरदृष्टी कोणाची भूमिका घेतली जात आहे. या भूमिकेचं अर्थात स्वागत आहे परंतु ज्याप्रमाणे एखाद्या रोगी व्यक्तीचा संपूर्ण रोग बरा होण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाच्या  शस्त्रक्रिया कराव्या लागतात तेव्हाच संपूर्ण रोग भविष्यकाळात बरा होण्यास मदत होते  त्याचप्रमाणे शेतकऱ्याची कर्जमुक्ती करत असतांना सरसकट कर्जमाफी न करता  काही अटी आणि शर्तीच्या आधारे कर्जमाफी करणे अत्यंत गरजेचे आहे तरच शेतकरी हळू हळू कर्जमुक्त होण्यास मदत होईल. ....  
              राजकीय पक्ष हे नेहमीच स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी जातीच्या आणि धर्माच्या नावावर लोकांना फसवुन  मतांची झोळी भरून घेतात आणि मग पाच वर्ष अश्या पद्धतीने जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष  करून भांडवलदारासाठी राज्य चालवायचे काम करतात . यामुळे आम्ही  जागृत असले पाहिजे. आजपर्यंत सत्ता असताना ज्यांनी अनेक घोटाळे, भ्रष्टाचार करून स्वतःची घरे भरून घेतली तेच आज संघर्ष(कोणता???)   यात्रा काढत आहेत. अर्थात यांचा दुट्टपीपणा  महाराष्ट्र चांगलाच जाणून आहे त्यामुळे  या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरोधकाकडे अजूनही आमचा शेतकरी गांभीर्याने आणि विश्वासार्हतेने पाहत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे गेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या मध्ये सत्ताधार्यांना यश मिळाले राज्यातील राज्यातील मतदारांनी दगडापेक्षा वीट मऊ मानली एवढाच काय तो  फरक....    

               या सर्व अंदागोंदीमध्ये निवडणुकांच्या अगोदर भाषणातून प्रस्थापितांच्यावर सणसणीत टीका करणारे  विस्थापितांचे कैवारी मात्र तोंड उघडायला तयार नाहीत.(आदरणीय खासदार राजू शेट्टी आणि आमदार बचू कडू यासारख्या काही नेत्यांचा अपवाद वगळता) ही आमच्या शेतकऱ्यांची सर्वात मोठी शोकांतिका आहे.  अर्थात विस्थापितांचे प्रश्न मांडता मांडता तेच कधी प्रस्थापित झाले हेच आमच्या सारख्या विस्थापित कुटुंबातील मुलांच्या लक्षात आले नाही.     त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही.      ..........     आणि एक सर्वात महत्वाचे म्हणचे पाणी फाउंडेशन आणि नाम फाउंडेशन यांच्या माध्यमातून आणि लोकसहभागाने केलेल्या कामांचे श्रेय हे सत्ताधार्यांनी घेण्याचा प्रयत्न अजिबात करू नये..  गावकऱ्यांनी त्यांच्या कष्टाच्या आणि एकतेच्या जोरावर तसेच पाणी फाउंडेशन आणि नाम फाउंडेशन   च्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात चांगले काम केले आहे. ते सत्ताधार्यांनी त्यांनी तीन वर्षांच्या काळात शेतकऱ्यांचा विकास केला ते सांगू नये. ....  
               कालच महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात राज्यभर आपण सर्वांनी साजरा केला.  महाराष्ट्र दिनी या सत्त्ताधारी सरकारने आमच्या शेतकरी बांधवाला दीन करू नये हीच सदिच्छा....  त्यासाठी लवकरच कर्जमाफी जाहीर करावी ही आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने माफक अपेक्षा.......
.✍पोपट यमगर
बाळेवाडी, ता. आटपाडी
 जि. सांगली
7709935374
popatgyamgar.blogspot.com

रविवार, ३० एप्रिल, २०१७

राकट देशा, कणखर देशा, छत्रपतीच्या देशा 💐💐💐💐💐

                     आज महाराष्ट्र दिन...भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सयुंक्त महाराष्ट्र चळवळीतील  अनेक हुतात्म्यांनी प्राणाचीही बाजी लावली आणि  महाराष्ट्र या राज्याची स्थापना  1 मे 1960 रोजी  केली गेली.  आम्ही  महाराष्ट्र या शब्दाची उत्पत्ती शोधायला जातो त्यावेळी प्राचीन काळात इसवी सन 500 मध्ये महावंश नावाच्या बौद्ध ग्रंथात 'महारठठ' या शब्दापासून झालेली आढळून येते. तसेच पुढे मध्ययुगीन काळात 'मरहट्ट' या शब्दावरून ही महाराष्ट्राला ओळखले जायचे. त्याच महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखे एक दूरदृष्टीकोन असलेलं नेतृत्व लाभले आणि ह्या महाराष्ट्राची माती न माती पवित्र केली.  परकीय आक्रमणापासून  या महाराष्ट्राची पवित्र संस्कृती जपण्यासाठी  कित्येक मावळ्यांनी आपल्या प्राणाची कोणतीही पर्वा न करता छत्रपतीनीं उभारलेल्या हिंदवी स्वराज्य रक्षणार्थ आपल्याला या मातीत गाडले आहे.. त्यामुळे आज या महाराष्ट्राची  या देशात आणि जगामध्ये एक वेगळी अशी ओळख प्राप्त झाली आहे.भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व ही या महाराष्ट्राने केले आहे. महाराष्टाला खूप मोठा सांस्कृतिक इतिहास लाभलेला आहे. याच इतिहासाच्या आधारावर आजचा महाराष्ट्र नक्कीच पुढची पाऊले टाकतो आहे यामध्ये माझ्या मनात तरी कोणतीच शंका नाही. अर्थात महाराष्ट्रासमोर आजची समस्या ही  शेतकऱ्यांना सुस्थितीत आणणे हीच आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य पद्धतीने हमीभाव मिळवून देणे हेच उद्दिष्ट सरकारचे असले पाहिजे. त्यासाठी सरकारने  सकारात्मक दृष्टीकोणातून यावरती निर्णय घेतले गेले पाहिजेत. या महाराष्ट्राला घडवण्यासाठी ज्या ज्या हुतात्म्यांनीं आपल्या प्राणाची बाजी लावली त्या सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन..💐💐               ✍पोपट यमगर

शनिवार, २९ एप्रिल, २०१७

छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंदजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हे कोणत्याही एका संकुचित विचारांच्या चौकटीत बसणारी व्यक्तिमत्त्वे अजिबात नव्हती त्यामुळे त्यांना एक चौकटीत बंदीस्त करून आपण त्यांच्या विचारांना पराभूत तरी करत नाही ना याचा विचार आपल्यासारख्या सुजाण नागरिकांनी केला पाहिजे. खरंतर आजपर्यंत संकुचित विचाराच्या राजकारण्यांनी त्यांच्या वैयक्तीक राजकीय स्वार्थासाठी या महापुरुषांना चुकीच्या पद्धतीने समाजासमोर मांडले आहेत. वरील नेतृत्वे ही जागतिक दर्जाची व्यक्तिमत्वे आहेत. त्यांना एका चौकटीत बांधून न ठेवता समग्र बुद्धीने जगाने स्वीकारावीत आणि आपलीशी करावीत असे वाटत असेल तर समग्र विचारातूनच त्यांना मांडले गेले पाहिजे असे मला वाटते.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचाही अभ्यास आम्ही संकुचित जातीय चष्म्यातून न करता तो चष्मा बाहेर टाकून देऊनच अभ्यास केला गेला पाहिजे. सावरकर यांनी मांडलेले हिंदुत्व हे व्यापक अर्थाने पाहायला गेल्यास खरे भारतीयत्वच होते हे त्यांचा समग्र बुद्धीने अभ्यास केल्यास समजून येते. कट्टरतावाद्यांनीही त्यांचे फक्त हिंदुत्वाचे विचार स्वीकारले पण पुरोगामी विचार सोयीस्कररित्या बासनात गुंडाळून ठेवले आहेत. खरंतर सावरकर यांच्यावर स्वातंत्र्यापूर्वीही आणि त्यांनतर खूप अन्याय झाला आहे. परंतु काळाच्या दुष्टीने आपण आता खूप पुढे आलो आहोत त्यामुळे आपल्यासारख्या सुजाण आणि सुशिक्षित तरुणांनी आधुनिक विचारांचे सावरकर अभ्यासले पाहिजेत आणि ते स्वीकारले पाहिजेत.
✍पोपट यमगर

सत्तेतून बाहेर हाकलण्याची ताकद शेतकर्यांमध्ये

छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारला भाषणातच फक्त शेतकऱयांच्या विषयी प्रेम आणि पुळका दिसत आहे. याचे कारण म्हणजे लाखो टन तूर शेतकऱ्यांच्या जवळ शिल्लक राहिली असताना केंद्र सरकारने खरेदी केंद्रांना तूर खरेदी करण्यास मुदतवाढ नाकारली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पडत्या भावांमध्ये तूर डाळ व्यापाऱ्यांना विकावी लागणार आहे... अच्छे दिनाची स्वप्ने दाखवणाऱ्या सरकारने मात्र शेतकऱयांच्या वरती संक्रात आणायची असे ठरवले आहे की काय?? असा प्रश्न निर्माण होतो.
राज्यासह देशात तुरीचे विक्रमी उत्पादन झालेले असतानाही आणि लाखो टन तूर शेतकऱ्याच्या घरात पडून असताना (22 एप्रिलच्यानंतरही ) केंद्र सरकार एकीकडे बाहेरील देशातून तूर आयात करत आहे, आयात शुल्काचे जे सांगितले जात आहे ते निव्वळ शुद्ध फसवणूक आहे कारण आपण आयात शुल्क माफ असलेल्या देशाकडूनच (म्यानमार) तूर खरेदी करत आहोत. आणि त्याच वेळेस दुसरीकडे निर्यात बंदी ही लागु आहे. इतके विक्रमी उत्पादन झालेले असतानाही केंद्र सरकार निर्यात बंदी का उठवत नाही आहे?? कर्जमाफीवरून काँग्रेस राष्ट्रवादी विरोधक राजकारण करत आहेत असे सत्ताधार्यांना वाटतं या मताशी दुमत नाही परंतु विरोधकाप्रमाणे सत्ताधारी भाजप ही राजकारणच करत आहे याचे कारण एका राज्यात कर्जमाफी करायची आणि दुसऱ्या राज्यात कर्जमाफी न करता कर्जमुक्ती आणि शाश्वत शेतीचे सोज्वळ आणि गोंडस डांगोरे पिटायचे हा सत्ताधाऱ्यांचा दुतोंडीपणा न समजायला शेतकरी काय दुधखुळे आहेत का...????
शेतकऱ्यांना या सरकारने देशोधडीला लावायचे ठरवले आहे की काय?? एकीकडे मन की बात मधून देशातील शेतकऱ्यांना जास्त कडधान्य लावायला सांगायचे, प्रोत्साहन द्यायचे आणि मग आमच्या शेतकरी बांधवांनी दुष्काळ, गारपीट नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करत जास्त तुरीचे उत्पादन केले तर त्यांची तूर शेतामध्ये तशीच पडून ती खरेदी सुद्धा खरेदी केंद्रामार्फत जात नाही व्यापारी निम्याने भाव पाडून शेतकऱ्याला लुटायचे काम करत आहेत. पण हे निरडावलेले सरकार पद्धतशीर पणे शेतकऱ्यांना गोलमाल उत्तरे देत आहे . शेतकऱ्यांचे कैवारी आज मात्र सत्तेसाठी हापापाले दिसत आहेत. आमचे कैवारी विस्तापित शेतकरी बांधवाच्या बाजूने लढता लढता हे धनधांडग्या प्रस्थपिताच्या बाजूने कधी पासून उभे राहू लागले हे आम्हा शेतकऱ्यांना समजेनासे झाले आहे.(खरंतर ही शेतकऱ्यांची दुर्दैवी खंत आहे) अवश्य शेतकऱ्यांच्या जीवावर मिळालेली सत्ता शेतकऱ्यांच्यावर आर्थिक अन्याय करून उपभोगा परंतु या निरडावलेल्या सरकारला सत्तेतून बाहेर हाकलण्याची ताकद शेतकर्यांमध्ये नक्कीच आहे. शेतकऱ्यांचे पडसाद नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सणसणीतपणे ऎकू येतील त्यावेळीच या झोपलेल्या सरकारला खडबडुन जाग येईल..

✍पोपट यमगर

खरसुंडी ते बाळेवाडी या पोटकालवा प्रकल्पासाठी अभिनंदन आणि कामासाठी शुभेच्छा

खरसुंडी ते बाळेवाडी या पोटकालवा प्रकल्पासाठी नाम फाउंडेशनच्या मदतीचे आणि सहकार्याचे जितके कौतुक करावे तितके कमी आहे.... नाम आणि पाणी फाउंडेशन यांच्या निस्वार्थीपणे केलेल्या कामानेच हा महाराष्ट्र पाणीदार होईल अशी आशा आमच्या शेतकरी बांधवाना आहे..... बाळेवाडीतील सर्व शेतकरी बांधव यांनी स्व इच्छेने हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वर्गणी च्या स्वरूपात केलेल्या मदतीचेही कौतुक आहे...... कोणत्याही सार्वजनिक कामामध्ये लोकसहभाग खूप महत्त्वाचा असतो तो बाळेवाडी सह इतर आजूबाजूच्या गांवानी तो दाखवला त्याबद्दल सर्व ग्रामस्तांचे अभिनंदन करायला हवे......
आणि शेवटी हा प्रकल्प पुर्ण करण्यासाठी सांगलीचे जिल्ह्याचे नेते आदरणीय गोपीचंद पडळकर आणि आटपाडीचे उपसभापती तानाजी शेठ यमगर यांनी वेळोवेळी केलेल्या प्रयत्नाचे आणि पाठपुराव्याचेही अभिनंदन.....
मनातून काम करण्याची तीव्र राजकीय इच्छा असली आणि त्यामध्ये लोकांचा उस्फुर्त सहभाग मिळाला आणि नाम सारख्या सामाजिक संघटनांचे निस्वार्थी प्रयत्न असले की ते काम किंवा प्रकल्प पूर्णत्वास लवकरच जातो.....
पुनश्च एकदा या सर्वांचे अभिनंदन आणि कामासाठी शुभेच्छा ही... 💐💐💐💐💐💐💐💐💐 ✍पोपट यमगर

रविवार, २३ एप्रिल, २०१७

समृद्धी महामार्गाने समृद्धी नेमकी कोणाची?


मुंबईहून नागपूरला जाण्यासाठी पाहिलेच तीन महामार्ग असताना राज्य सरकारने नवीन समृद्धी महामार्गाचा घाट का घातला आहे??? आणि या महामार्गाने समृद्धी नेमकी कोणाची होणार आहे??? यामध्ये शेतकऱ्यांना लुटून उद्योगपतींची समृद्धी होणार आहे हे उघड आहे. हजारो शेतकऱ्यांचा विरोध असताना त्या शेतकऱ्यांना चिरडून जर हा महामार्ग सरकर करणार असेल तर ही सरकारची हुकूमशाही आहे.... सरकारची ही हुकूमशाही मोडायला आमच्या शेतकऱ्यांना अजिबात वेळ लागणार नाही... आम्हाला फक्त भाषणात शेती आणि शेतकरी हा विषय नको आहे... आम्ही आयुष्यभर भाषणातच शेतकऱ्याविषयीचा कोरडा कळवळा ऐकत आलो आहे... एकीकडे शेतकऱ्यांची कर्जमाफी म्हटले की  राज्य सरकारची तिजोरीत खणखणाट वाजतो पण त्याच शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडून घेऊन त्यांच्या शेतीवर नांगर फिरवून 46000 कोटी  (आजचा प्रस्तावित खर्च) खर्च करताना तिजोरीत खणखणाट वाजत नाही... त्यावेळी तिजोरी खचाखच भरलेली असते. कारण यामुळे कित्येक उद्योगपतींची घरे भरली जातील. शेतकरी काय अशिक्षित .... त्याला भाषणात गोड गोड थापा मारून भुलविता येते. छत्रपतींचा आशीर्वाद हा फक्त निवडणुकामध्येच घेतला जातो पण राज्य कारभार चालवताना मात्र राजेंची धोरणे राजेंचे विचार सोयीस्कर रित्या गुंडाळून ठेवले जातात. छत्रपतींचा आदेश होता," शेतकऱ्याच्या शेतातील भाजीच्या देठाला जर हात लावला तर त्याचे हात कलम केले जातील".  पण फडणवीस सरकार याच्याउलट कृती करत शेतकऱ्यांच्या जमिनी प्रशासनाच्या माध्यमातून दडपशाही करून घेत आहे.   याची आठवण छत्रपतींचा आशीर्वाद घेताना या फडणवीस सरकारला होत नाही का??  यामुळे येथून पुढे राज्य सरकारने निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांच्या नावाने गळे काढणे बंद करावे. तुम्ही योग्य वेळी कर्जमाफी करणार असाल तर या राज्यातील शेतकरी ही तुम्हाला योग्यवेळी घरचा रस्ता लवकरच दाखवतील.

✍पोपट यमगर

चला वाचन परंपरा जोपासूया..आणि ती वाढवूया.★




दोनवेळच्या पोटाची भूक भागविण्यासाठी जशी अन्नाची गरज असते तशीच आयुष्यभराच्या बुद्धीची भूक भागविण्यासाठी पुस्तक वाचनाची गरज असते. आज जागतिक पुस्तक वाचन दिन...
आपल्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीतील सर्वात महत्वाचा वाटा अर्थात पुस्तक वाचनाचाच असतो हे निर्विवाद सत्य आहे. खरंतर असं म्हटलं जाते की "वाचनाने मस्तक सुधारतं आणि सुधारलेले मस्तक कोणापुढे नतमस्तक होत नाही."
वाचन.. ते मग कोणतंही ही असो.. वर्तमान पत्र, साप्ताहिक किंवा मासिक असो, विविध क्षेत्रातील विविध विषयावरील पुस्तकांचे असो किंवा आधुनिक तंत्रज्ञानातील ईबुक्स च्या स्वरूपात असो, किंवा सोशल साईट्स वरील विविध लेख असो या सर्व स्वरूपामध्ये आपण दररोज काहीं ना काही वाचत असतोच असतो. आणि याच दररोजच्या वाचनाने आपण कालच्या पेक्षा आज आणि आजच्यापेक्षा उद्या अधिक प्रगल्भ होत राहतो. याच प्रगल्भतेचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रभाव आपल्या स्वभावावर, भाषेवर पडत असतो.
खरंतर वाचन हा एक प्रकारे छंद ही आहे पण त्याही पुढे जाऊन मी म्हणेल की हे एक प्रकारचे व्यसन ही आहे, कारण दररोज काहीतरी वाचणाऱ्या माणसाला एखाद्या दिवशी काही वाचले नाही तर  असहाय झाल्या सारखे वाटते. मला वाचनाची सवय तशी लहानपासूनच लागली पण खऱ्या अर्थाने सांगली नगर वाचनलयातील अक्षरधारा पुस्तक प्रदर्शनापासून ती खूप मोठ्या प्रमाणात वाढत गेली. विविध लेखकांची विविध वैचारिक विचारधारांची पुस्तके, तसेच अनेक महापुरुषांची, विचारवंतांची चरित्रे ,आत्मचरित्रे वाचत असताना मनाला एकप्रकारचा वेगळा आनंद आणि समाधान लाभते. आपली विचार करण्याची प्रगल्भता ही वाढते, विविध विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन संकुचित न राहता समग्र कधी होऊन जातो हेच आपल्याला समजत नाही. मला भावलेली अनेक पुस्तके आहेत त्यामध्ये स्वामी विवेकानंदजींची रामकृष्ण मठाची विविध विषयावरची विविध पुस्तके, संभाजी, महानायक, अग्निपंख, आमचा बाप अन आम्ही, शिवचरित्र, एका दिशेचा शोध, ज्ञात अज्ञात अहिल्याबाई होळकर, जन्मठेप, यासारखी कित्येक पुस्तके सांगता येतील.
माझे दररोजचे आवडते वर्तमानपत्र म्हणजे लोकसत्ता... त्यातील वास्तविक घटनांवर कधी सणसणीत, तर कधी झणझणीत , तर कधी उपहासात्मक, तर कधी विडंबनात्मक मांडलेले अग्रलेख तर खूपच आवडतात. तसेच इतर लेखकांचे  वैचारिक लेखही वाचनीय असेच असतात.
अनेकजण म्हणतात की हल्लीची आधुनिक पिढी जास्त वाचन करीत नाही पण मी म्हणेल की अलीकडच्या पिढीची वाचन करण्याची साधने अवश्य बदलली आहेत पण वाचनपरंपरा कमी झाली आहे असे मला वाटत नाही. अनेक ईबुक च्या स्वरूपात pdf file आज विविध प्रकाशकांच्या त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्यामाध्यमातून ही हल्लीची पिढी वाचन करत आहे. अनेक तरुण ब्लॉग वरतीही विविध प्रकारचे लेख वाचन करताना दिसून येतात. ही वाचनाची समृद्ध परंपरा जोपासूया आणि ती यापुढील काळात वाढवूया हीच वाचन दिनी एक सदिच्छा.
धन्यवाद...

✍पोपट यमगर
बाळेवाडी, ता. आटपाडी,
जि. सांगली
7709935374

शनिवार, २२ एप्रिल, २०१७

वसुंधरा दिवस


आज वसुंधरा दिन आहे.. आज दिवसेदिवस जागतिक तापमान वाढ होत आहे ही आपल्या वसुंधरे समोरची परिस्थिती आहे. या तापमान वाढीला माणूस (तुम्ही आम्ही) जबाबदार आहोत.. या जागतिक तामपान वाढीचे धोके आपल्याला पावलापावलावर जाणवताना दिसत आहेत. आज ला निनो आणि एल निनो ही अपत्ये या जागतिक तापमान वाढीतूनच उद्भवली आहेत याचा सामना आपल्याला जरवर्षी दुष्काळ किंवा अतिवृष्टी ने करावा लागत आहे... वसुंधरा जर जपायची असेल तर एक म्हणजे प्रदूषण कमी करणे आणि दुसरे म्हणजे झाडे लावणे...  वसुंधरेला आपण जोपासले तरच वसुंधरा आपल्याला म्हणजेच माणसाला जोपासेल यात तिळमात्र शंका नाही...

✍✍पोपट यमगर

हुंडापद्धत म्हणजे बाजारातील बैलासारखा च माणसातल्या बैलांचा सौदा ....


सरकारने  हुंडाबंदी केली असल्यामुळे अनेकठिकाणी काही मधले दलाल  "मानपान" या  सोज्वळ आणि गोंडस शब्दाच्या नावाखाली हुंडा मागताना अनेकवेळा दिसतात...  
मला एक समजत नाही   भावी साथीदाराला तुम्ही अश्या पैशाच्या स्वरूपात विकत कसे काय घेतात??? बैलांच्या बाजारामध्ये जसे बैलांचे भाव   दलालाकडून ठरवले जातात ना अगदी तसेच( या माणसातल्या बैलांचे) भाव  लग्न या संस्थेमध्ये हुंड्याच्या स्वरूपात ठरवले जातात. अर्थात एकप्रकारे हा आर्थिक सौदाच ठरतो... असे सौदे करणारे अनेक दलाल असतात...  त्या दलालानी मग त्या बैलाचा भाव करून किती पैशात बैल विकत घेतला हे दोन्ही बाजूने सांगायचे असा हा व्यवहार आहे.....  आणि या सौद्यामध्ये बळी जाते ती एक मुलगीच....(असंही जिथे स्त्री भ्रूण हत्या केली जाते ... तिथे मग या मुलींच्या जीवाची चिंता तरी कशी असेल.....????   )
त्यामुळे माझ्या सुशिक्षित भगिनींना आणि मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकाना एक माझा प्रश्न असेल कि तुम्ही तुमचा साथीदार असा बैलाच्या भावासारखा विकत घेणार आहात का???
कुठेतरी हे प्रश्न आम्ही आमच्याच मनाला विचारण्याची गरज आज निर्माण झाली आहे...

"तिलक नही, दहेज नही, शादी कोई व्यापार नही, खरीदा हुआ जीवनसाथी अब हमको स्वीकार नही.."

✍पोपट यमगर

व्हेटोचा गैरवापर होतोय??


सुरक्षा परिषदेच्या पाच कायम सदस्य राष्ट्रांना नकाराधिकार(व्हेटो) वापरण्याचा दिलेला अधिकार म्हणजे एकप्रकारे जागतिक राजकारणात राष्ट्राराष्ट्रामध्ये भेदभाव निर्माण करण्यासारखेच आहे. जागतिक सुरक्षा आणि शांततेसाठी अनेक चांगले निर्णय आणि धोरणे फक्त एका राष्ट्राच्या आडमुठे धोरणामुळे अंमलात आणता येत नाहीत. खरंतर आंतराष्ट्रीय राजकारणात लोकशाहीप्रधान व्यवस्थेमध्ये अश्या प्रकारचा नकाराधिकार हा एका राष्ट्राची अप्रत्यक्षरित्या मक्तेदारीच ठरते. नकारधिकारामुळे विकासाच्या मार्गावर असलेल्या भारतासारख्या अनेक राष्ट्रावर याचा दुजाभाव झाला आहे, होत आहे. चीनने तर प्रत्येकवेळी भारताच्या एन एस जी सदस्यत्वासाठी आणि या सारख्या अनेक विषयांवर आडमुठे पणाने विरोधच केला आहे. कोणताही साधक बाधक दूरदृष्टिकोन आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे संकेत न ठेवता कायम सदस्य असलेल्या राष्ट्रांनी नकारधिकाराचा वापर हा कोणत्यातरी राष्ट्राला विरोध  (स्थानिक भाषेत जिरवजिरवी) करण्यासाठीच केला आहे. सयुंक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेतील सर्व निर्णय हे  बहुमतानेच  घेतले गेले पाहिजेत.

✍✍पोपट यमगर

शुक्रवार, ७ एप्रिल, २०१७

धनगर समाज भीक नाही तर घटनेमध्ये घटनाकारांनी दिलेले हक्क मागतोय...💥


स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही एखादा समाज  राज्यघटनेमध्ये दिलेल्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची फक्त अंमलबजावणी न करण्यावरून  वंचित राहतोय (कि मुद्दाम ठेवला जातोय) हि खरंतर तुमच्या  माझ्या सारख्या  लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या समाजाचे आणि घट्नाकारांचेही  खूप मोठे दुर्दैव म्हणावे लागेल. धनगर समाजाला भारतीय राज्यघटनेत अनुसूचित जमातीच्या ३४२ कलम वरती महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्ठात अ.क्र.३६ वरती धनगड(धनगर), ओरॉन  असा उल्लेख करुन डॉ. बाबासाहेबांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या यादीत अगोदरच समाविष्ट केलेले आहे.  परंतु धनगर व धनगड या र आणि ड च्या चुकीमुळे ते गेली 60 वर्ष धनगर समाजाला ते लागू झाले नाही त्यासाठी धनगर व धनगड या जाती वेगळ्या नसून त्या एकच आहेत अशी फक्त शिफारस राज्य सरकारने केंद्र सरकारला पाठवायची आहे. या शिफारशी च्या  अंमलबजावणीसाठी धनगर समाजाने घटनेच्या चौकटीत शांततेच्या मार्गानेच आजपर्यंत आंदोलने केली आहेत. पण सरकारने अजूनही याची अमलबजावणी केलेली नाही.
मित्रानो मला एक उदाहरण आपल्याला सांगितले पाहिजे ते म्हणजे एखाद्या शिकाऱ्याने यायचे, पक्षांना दाणे टाकायचे आणि त्या शिकाऱ्याच्या प्रलोभनांना भुलून पोटाची खळगी भागवण्यासाठी पक्षी  ते दाणे खाण्यासाठी एकत्र जमल्यानंतर त्या पक्षांना बंदिस्त करायचे.. पुन्हा दुसऱ्या शिकाऱ्याने यायचे, पुन्हा पक्षांना दाणे टाकायचे आणि त्या शिकाऱ्याच्या प्रलोभनांना भुलून पोटाची खळगी भागवण्यासाठी पक्षी  ते दाणे खाण्यासाठी एकत्र जमल्यानंतर पुन्हा त्या पक्षांना बंदिस्त करायचे... असेच तिसरा, चौथा शिकारी येऊन त्या पक्षांना बंदिस्त ठेवायचे काम वारंवार केले जाते. त्या पक्षासारखीच  धनगर समाजाची परिस्थिती झाली आहे. आजपर्यंत प्रत्येक राजकीय पक्षाने सत्तेसाठी आणि स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी धनगर समाजाचा वापर करून घेतला आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये कोणत्या तरी एका पक्षाने धनगर समाजाच्या काही नेत्यांना सोबत घेऊन धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीचे  आश्वासन द्यायचे आणि आमच्या भोळ्या भाबड्या समाजानेही मनात आनंदाच्या उकळ्या फोडत त्यांच्या पाठीमागे भरकटत जाऊन एकगट्टा मते देऊन त्या पक्षाला सत्त्ताधारी  बनवायचे... मग एकदा सत्ता मिळाली की अश्वासनातील शब्दामध्ये चातुर्याने अदलाबदल करून समाजाला पुढच्या लवणातील ससा दाखवायचे काम करायचे... पुन्हा पुढच्या निवडणुकीत दुसरा पक्ष .. तीच आश्वासने तीच धूर्त पद्धत... हेच आजपर्यंत आपण पाहत आलोय.
मित्रांनो पाच सहा महिन्यांपूर्वी आपल्याच मराठा बांधवांचे त्यांच्या मागण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शांततेत आणि निपक्षपातीपणे  मराठा मोर्चे निघाले. या मोर्चामधून धनगर समाजातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी  खूप काही शिकण्यासारखे आहे असे मला वाटते. कारण त्या मोर्चामध्ये सर्व पक्षाचे नेते, कार्यकर्ते त्यांच्या राजकीय चपला बाहेर ठेवून समाजासाठी एकत्र आले होते. तसंच धनगर समाजाच्या सर्व पक्षातील सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपआपल्या राजकीय पक्षाच्या चपला बाहेर ठेवून आरक्षणासाठी निघणाऱ्या मोर्चामध्ये एकत्र आले पाहिजे.. जर खरंच मनातून समाजाला आरक्षण अंमलबजावणीचे हक्क मिळवून द्यायचे असतील तर नेत्यांना  स्वतःचा राजकीय इगो बाजूला ठेवावाच लागेल.
बारामतीच्या उपोषण आणि आंदोलनावेळी सध्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणाले होते की "तुम्ही उपोषणसाठी येथे बसला आहात पण तुमच्या उपोषणामुळे मुंबईच्या मंत्रालयातील मंत्र्यांच्या खुर्च्या थरा  थरा कापत आहेत. "  फडणवीस साहेबांना त्याच वाक्याची आठवण करून देत मला त्यांना सांगायचे आहे की फक्त बारामती या एका शहरातील आंदोलनाने मुंबईतील खुर्च्या कापत असतील तर महाराष्ट्रातील सर्व शहरातील आणि सर्व खेड्या पाड्यातील धनगर समाज आरक्षणासाठी  रस्त्यावर उतरला तर मुंबईतल्या खुर्च्यांचीही  आणि  सरकारचीही काय स्थिती असेल ??? या प्रश्नाचे उत्तर त्यानीच त्यांच्या मनातून शोधण्याची गरज आहे.
मित्रांनो पुन्हा एकदा धनगर समाज अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणी साठी महाराष्ट्रात विविध मेळावे, आंदोलने आणि मोर्चाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरत आहे. असेच एक 'धनगर जमात जनआंदोलन' सांगली जिल्ह्यातील आटपाडी तहसीलदार कार्यालयावर  अनुसूचित जमातीचे आरक्षण अंमलबजावणी त्वरित करावी  या मागणीसाठी  दिनांक 18 एप्रिल 2017 रोजी आक्रोश मोर्चा आयोजित केला आहे.  सरकारला त्यांच्याच आश्वासनाची जाग आणण्यासाठी आपण हि त्या मोर्चात सहभागी होऊन तुमचा आक्रोश सरकारला समजावून सांगण्यासाठी या जनआंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे हीच नम्र विनंती...

✍पोपट यमगर
बाळेवाडी, ता. आटपाडी,
जि. सांगली

बुधवार, ५ एप्रिल, २०१७

कर्जमाफी पेक्षा कर्जमुक्ती केव्हाही चांगलेच पण ....


'शेतकरी' हा केंद्रीभूत घटक मानूनच देशाच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली गेली पाहिजे. याचे कारण म्हणजे देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेचा डोलारा हा शेतीतील शेतकऱ्याच्या  प्रगतीवर अवलंबून आहे. तात्पुरती    कर्जमाफी करून अकार्यक्षम सोसायट्या आणि सहकारी बँकांचे उथळ पांढरे करण्यापेक्षा  शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देऊन कायमची कर्जमुक्ती करणे केव्हाही  चांगलेच... पण सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्याची बिकट अवस्था पाहता त्यांना थेट मदत म्हणून शेतकऱ्यांच्या जनधन  खात्यावर काही प्रमाणात पैसे जमा करणे महत्वाचे आहे.. यातून दोन उद्दिष्टे साध्य होतील एक म्हणजे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पणे मदत होऊन अकार्यक्षम सोसायट्या सहकार सम्राटाच्या पतसंस्था आणि सहकारी बँकां घोटाळा करून शेतकऱ्याच्या नावाने झालेल्या कर्जमाफीवर   डल्ले मारणार नाहीत आणि दुसरे म्हणजे जरवर्षी प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल, आणि  काही प्रमाणात कर्ज थकवण्याची सवयही कमी होईल....
 यामुळे जर खरंच  राज्य सरकारला शेतकऱ्याची कर्जमुक्ती करण्याची इच्छा असेल तर त्यांनी शेतकऱ्यांना प्राथमिक स्वरूपात थेट मदत केली पाहिजे..
 धन्यवाद..
✍पोपट यमगर

सोमवार, २७ मार्च, २०१७

प्रामाणिक अधिकाऱ्यांचे खच्चीकरण केलं जातंय....🇮🇳


नवी मुंबईचे आयुक्त आणि अनधिकृत बांधकामाविरुद्ध जबरदस्त मोहिम राबवणारे एक प्रामाणिक आणि कार्यक्षम अधिकारी आदरणीय तुकाराम मुंढे साहेब यांची  तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. आजपर्यंत अश्या अनेक प्रामाणिक आणि कार्यक्षम अधिकाऱ्यांना यासारख्या बदल्यानां अनेक वेळा सामोरे जावे लागले आहे. एखादा अधिकारी किंवा व्यक्ती जर प्रामाणिक पणाने स्वतःचे कर्तव्य पार पाडत असेल तर त्या व्यक्तीस आजूबाजूच्या स्वार्थी मंडळींकडून अश्या प्रकारचा त्रास देऊन त्याची बदली करण्यापर्यंत मजल जाते. खरंतर हा दोष या भ्रष्ट व्यवस्थेचा आहे. हि व्यवस्था बदलू पाहणाऱ्या अधिकाऱ्यांची जर अश्या पद्धतीने बदली करून जर खच्चीकरण केले तर पुढच्या नव्या पिढीपुढे कोणता आदर्श आम्ही ठेवतोय याचाही विचार सरकारने केला पाहिजे. जर अश्याच पद्धतीने चालत राहिले तर नवीन येणाऱ्या अधिकाऱ्यांनी प्रामाणिक पणे काम करायचे कि नाही??? हा माझा सरकारला सवाल आहे. अनेक प्रामाणिक अधिकारी अश्या राजकारण्यांच्या दबावाला बळी पडून बाहेर पडतात. प्रशासन आणि सरकार यांनी सामंजस्याने काम केले तरच जनतेचे प्रश्न सुटू शकणार आहेत. पण हल्ली राजकारण्यांना मान, सन्मान, मुजरा हवा असतो. तसेच आपण म्हणेल तसेच अधिकाऱ्यांनी वागले पाहिजे, बोलले पाहिजे, सही कर म्हणेल तिथे सही केली पाहिजे, आपण जनतेचे मालक आहोत असा दृष्टीकोन त्यांचा असतो. पण खरंतर लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक आहेत ही गोष्टच लोकप्रतिनिधी विसरून चालले आहेत. नव्हे नव्हे ते गेलेच आहेत. दिल्ली मध्ये सेना खासदाराने एका एअर इंडिया च्या व्यस्थापकाला इकॉनॉमी श्रेणीमध्ये बसवल्याच्या कारणावरून चप्पलने मारहाण केली. कायदे बनवणाऱ्या संसदेचे संसदेचे सदस्य असताना तेच  कायदे बिनधास्त पणे मोडून हे लोकप्रतिनिधी काय साध्य करत आहेत?  आम्ही जनतेचे सेवक आहोत कि गुंड आहोत? हा प्रश्न कायदा हातात घेणाऱ्या लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या मनाला विचारला पाहिजे.
या लोकप्रतिनिधींना भ्रष्ट अधिकारी हवे असतात.  वर्षानुवर्षे  भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट नेते यांची जी युती झाली आहे त्यामुळे देशाच्या सर्वांगीण विकासाला खीळ बसली आहे.
सरकारने  प्रामाणिक आणि कार्यक्षम अधिकाऱ्यांना काम करण्यास मोकळीक दिली तर ते नक्कीच चांगले काम करतील. हल्ली अश्या प्रामाणिक अधिकाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे यासाठी  प्रयत्न होणे गरजेचे आहे.

✍पोपट यमगर
   आटपाडी, सांगली
7709935374

शनिवार, ११ मार्च, २०१७

अखेर मोदीजींच्या सब का साथ सब का विकास या धोरणालाच उत्तर प्रदेशची भक्कम साथ..


2019 मध्ये होणाऱ्या देशाच्या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तरप्रदेशसह पाच राज्याच्या निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत. त्यानुसार उत्तरप्रदेश सारख्या देशाच्या राजकारणावर आणि समाजकारणावर प्रभाव पाडू शकणाऱ्या या राज्यात भारतीय जनता पार्टी स्पष्ट बहुमतासह विजयी होत आहे. फक्त विजयीच झाली नसून 300 जागापेक्षा जास्त जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळवत कमळ जोरात फुलले आहे. उत्तराखंडमध्येही कमळ चांगलेच फुलले आहे.  पंजाब मध्ये मात्र अकाली दलासोबतची युती त्यांना सत्ता वाचवण्यासाठी तारू शकली नाही. तिथे काँग्रेसने विजय मिळविला आहे. खरंतर या निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी त्यांची प्रतिष्ठा खूप पणाला लावली होती. उत्तरप्रदेश मध्ये तर त्यांनी अगदी  शेवटच्या दिवसापर्यंत जो प्रचार केला होता त्याचा फायदा भाजपाला होताना दिसतो आहे. उत्तर प्रदेश च्या निकालानंतर राज्यसभेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळविण्यासाठी जी आकडेवारी लागत होती तीही या राज्यातून मिळणार आहे. त्यामुळे अनेक  विधेयके हि लोकसभेत पास होऊन राज्यसभेत अडखळत होती त्या विधेयकाचा मार्ग आता मोखळा झाला आहे. येणारी राष्ट्रपती पदाची निवडणूक साठीही स्पष्ट बहुमत भाजपकडे उपलब्ध झाले आहे.
केंद्रामध्ये सरकार येऊन भाजपला  तीन वर्ष होत आहेत त्या तीन वर्षातील सकारात्मक विकासकामांच्या जोरावर  भाजप  निवडूक लढवीत होता .  काळ्या पैशाच्या विरोधात नोटबंदी सारखा एक ठामपणे निर्णय घेऊन पारदर्शकतेचा मुद्द्यावर हि भाजपने भर दिला आहे. नोटबंदी नंतर होणारा त्रास जनतेने झेलूनही त्याचे दूरगामी फायदे अर्थव्यवस्थेला आणि पर्यायाने सर्वसामान्य लोकांना होणार आहेत ह्या दृढ विश्वासाला  मतदारांनी साथ दिली आहे.
सर्वसामान्य लोकांच्या मनात एखाद्या नेत्याविषयीची  विश्वासार्हता असते ती खूप महत्त्वाची असते त्याआधारेच  मतदार त्या पक्षाला मतदान करत असतो. मला वाटते ती विश्वासार्हता मोदींजीनी मिळवली आहे आणि मतदारांच्या मनामध्ये  अजूनही ती टिकवुन ठेवली आहे,   ही भाजपच्या होणाऱ्या विजयावरून स्पष्ट जाणवते. मोदीजींची लोकप्रियता   स्थानिक पातळीवर  कायम आहे इतकेच काय तो वाढतहि आहे.  आज अनेक राज्यात गाव, शहर ते केंद्र यामध्ये भाजप सत्तेवर येत आहे. हे आपण महाराष्ट्रासह इतर राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निकालावरून स्पष्ट पणे दिसून येते.भाजपने स्थानिक पातळीवरील प्रचार आणि परिवर्तन रॅली आणि मोठ्या प्रचारसभामधील  करावयाची भाषणे  याची आखलेली रणनीती खूप महत्वाची ठरली.  मोदीजींनी अनेक रोड शो करत, जनतेत मिसळत मतदारांना सामोरे गेले.
उत्तरप्रदेश मध्ये सत्ताधारी मुख्यमंत्री  अखिलेश यादव यांची हार होण्याची सर्वात महत्वाची कारणे म्हटले तर गेल्या दोन महिन्यातील ताणला गेलेला कौटूबिक कलह,  आणि तिथल्या दिल्या जाणाऱ्या नोकऱ्यांमध्ये केला गेलेला भेदभाव, ऐनवेळी काँग्रेस सोबत केलेली आघाडी हे मुद्दे खूप महत्त्वाचे ठरले आहेत.
भाजपच्या विजयाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणता येईल ते म्हणजे भाजप पूर्ण आत्मविश्वासाने निवडूक लढवत होती तो अभाव मात्र इतर काँग्रेस, सपा आणि बसपा कडे होता.  लोकसभेत आलेली मोदी लाट पुन्हा या पुढच्या लोकसभेसाठीच्या घेतल्या गेलेल्या सेमी फायनल मध्ये येणार का ??? अशी चिंता त्यांच्यात ठळकपणे दिसत होती. विरोधकासाठी एक अनुभव आला असेल तो म्हणजे  पराभव हा रणात नाही तर पहिल्यांदा मनात होत असतो याचेच उत्तम उदाहरण म्हणजे या निवडणूका.....
येथून पुढील दोन वर्षाच्या कार्यकाळात मोदीजींच्या नेतृत्वाला आव्हान देईल असे सध्या तरी कोणतेच नेतृत्व राष्ट्रीय पातळीवर दिसून येत नाही. तरीही भाजपाला खूप कार्यक्षमतेने  आणि पारदर्शकपणे कारभार करून जनतेचा विश्वास कायम ठेवावा लागणार आहे. शेवटी या विजयाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि विकापर्वासाठी खूप साऱ्या शुभेच्छा... आणि जनतेने जो लोकशाही मार्गाने मतपेटीतुन सत्ताधाऱ्यावरती  विश्वास दाखवला आहे तो विश्वास सार्थ ठरावा हीच एक छोटीशी सदिच्छा..

धन्यवाद..

✍✍पोपट यमगर

मंगळवार, ७ मार्च, २०१७

जागतिक महिला दिनानिमित्त



8 मार्च म्हणजेच जागतिक महिला दिन...
             जागतिक महिला दिनाच्या सर्व माता, भगिनी, मैत्रिणी या सर्वांनाच सर्वप्रथम खूप साऱ्या शुभेच्छा आहेत... त्या व्यक्त करत असताना समाजातील  महिलासंबंधीच्या काही प्रश्नावर चर्चा करणे  हे आपले कर्तव्य आहे .  माझ्या परीने हा विषय मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय.
    यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता: । यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया:
अर्थात ज्या ठिकाणी महिलांचा सन्मान होतो तेथे देवतांचे वास्तव्य असते आणि ज्या ठिकाणी महिलांवर अत्याचार होतात तेथे कोणतीही क्रिया सफल होत नाही... असं मानणारी आमची संस्कृती एवढेच काय तर संपुर्ण जगाच्या पाठीवर ईश्वराची सुद्धा स्त्रीरुपामधे पुजा करणारे बहुधा आपली एकमेव संस्कृती आहे. एवढेच नाहीतर आपण आपल्या देशाला भारतमाता म्हणतो. आपल्यासाठी ही मायभुमी आहे मातृभुमी आहे.एका बाजुला संस्कृतीमधे हे सगळे पण दुसर्या बाजुला दररोज वर्तमापत्रात, टी व्ही वरच्या बातम्या ऐकुन मन सुन्न होते. आजच्या आधुनिक युगातही हुंडाबळी, स्त्री भ्रुण हत्या, घरगुती छळाला कंटाळुन विवाहितेची आत्महत्या, जातपंचायतीकडुन अमानुष मारहाण, रस्त्यावरुन चालत असताना होणारी छेडछाड , बलात्कार यासारख्या घटना ऐकल्या, वाचल्या, पाहिल्या की मान शरमेने खाली जाते आणि मग मनामधे विचारांचं वादळ निर्माण होतं, आणि विचारी मनाला काही प्रश्न पडतात ते म्हणजे हीच आपली संस्कृती आहे का ?? ज्या  स्त्रीचा आपण सन्मान करत होतो त्याच स्त्रीवर आज अत्याचारासारख्या घटना का घडत आहेत??? स्त्रीयावरतीच बंधने का?? यासारख्या असंख्य प्रश्नाच्या मंथनातून  मग कविवर्य कुसुमाग्रजांनी स्वांतत्र्यदेवतेची विनवणी या फटका काव्यप्रकारातुन परखड केलेले प्रहार आठवतात,
" समान मानव माना स्त्रीला
तिची अस्मिता खुडु नका।
दासी म्हणुनी  पिटु नका वा
देवी म्हणुनी भजू नका॥"

          देवघरात तीची पुजा करायची आणि तिला चार भिंतीच्या आतच  बंदिस्त करायचं अश्या संकुचित प्रथाना स्त्रियांनीच आव्हान दिले गेले पाहिजे, असे मला वाटते आणि त्या देत आहेत याचाही नक्कीच मनात आनंद आहे.
            स्त्रीवाद हा विषय फक्त माहिलांशीच संबंधित न राहता तो पुरुषांशीही संबंधित आहे. स्त्रीचा विकासाचा संबंध हा  पुरुषांचा विकासाशी आहे.यामुळेच ज्या संधी पुरुषाला उपलब्ध आहेत त्या स्त्रियांनाही मिळाल्या पाहिजेत हा वर्षानुवर्षाचा आग्रह आजही आहे. त्यासाठी अजूनही स्त्री लढते आहे, संघर्ष करते आहे.  आज अनेक स्त्री विषयी काम करणाऱ्या चळवळी देशात आणि जगात काम करत आहेत. त्यांना त्यांच्या आयुष्यात जन्मताच मिळालेले हक्क इथल्या प्रस्थापित समाज व्यवस्थेने नाकारल्यामुळे ते हक्क मिळविण्यासाठी प्रदीर्घ लढा देण्यासाठी झगडत असल्याचे आपणास दिसून येते. खरंतर भारत सोडून अनेक देशामध्ये मतदानाचा हक्क हि पुरुषांच्या बरोबरीने न मिळता त्यासाठी त्यांना संघर्ष करून तो मिळवावा लागला. याबाबतीत तुमच्या माझ्या देशाचं एक सुदैव म्हटले पाहिजे की इथल्या प्रत्येक स्त्रीला मतदानाचा अधिकार हा राज्यघट्नाकारांनी राज्यघटनेच्या चौकटीत पुरुषांच्या बरोबरीने दिला आहे.

            आज अनेक ठिकाणी महिला मोठ्या पदावर काम करत आहेत. राजकीय क्षेत्रात हि स्त्री पुढे जाण्यासाठी धडपडते आहे. महिला आरक्षणामूळे अनेक ठिकाणी महिला या पदाधिकारी झाल्या पण त्यांना तिथंही स्वातंत्र्य मिळत नाही कारण तिथेही तिच्या कामात तिचा पती किंवा इतर नातेवाईक हस्तक्षेप करीतच असतो.त्यामुळे ग्रामीण भागात तर त्या महिलेपेक्षा तिच्या पतीलाच सरपंच म्हंटलं जाते. म्हणूनच म्हणावेसे वाटते की स्त्रिया या मोठमोठ्या राजकीय पदावरती पोहचल्या पण त्या खुर्चीवर बसण्यापुरत्याच नाममात्र पदाधिकारी झाल्या आहेत की काय असा प्रश्न मला पडतो??ही जी राजकीय पदं मिळतात त्यापदामधील अधिकारामधुन  महिलांचे विविध प्रश्न, उपेक्षीत वंचीत घटकांचे काही प्रश्न,  शेतकर्यांचे प्रश्न, समस्या अडचणी सोडवण्यात येतात. काही प्रमाणात चांगल्या योजना राबवुन सामाजिक विकास करता येतो. स्वतः सर्व आढावा बैठकांना उपस्थित राहुन वेळोवेळी अधिकार्यांच्या कडुन कामाची माहिती घेतली  पाहिजे.  शहरातील अनेक ठिकाणी महिलांनी कृतीतुन सिद्धही केले आहे, तळागाळातील ग्रामीण भागातील  महिलांनी स्वतः पुढे येऊन ही कमतरता भरुन काढली पाहिजे.
                आज भारतामध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेत आणि नंतर महाविद्यालयात   मुलींचे गळतीचे प्रमाण मुलांच्या पेक्षा खूप मोठे म्हणजेच दुप्पट आहे. यामागील कारणे ही खूप आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाचे म्हणजे मुलीवर शिक्षणासाठी जास्त पैसे खर्च करून काय उपयोग? पुढे तिच्या लग्नासाठीच्या पैशाचे काय??  कितीही केले तरी मुलगी हि परक्या घरची संपत्ती या सारखी खुळचट विचारांची प्रवृत्ती, वंशाचा दिवा (पणती नको पण दिवा पाहिजे) यासारखी अनेक कारणे आपल्याला  पाहायला मिळतील. आजही स्त्रीभ्रूण हत्या सारखी स्त्रीला मुळातूनच संपवण्यासारखी समस्या घडत आहे आणि ती वाढत हि आहे. दुर्दैवाने सांगावं लागते कि स्त्री भ्रूण हत्याही सुशिक्षित समाजात मोठ्या प्रमाणात घडत आहेत... मग आम्ही शिक्षण घेतले ते कशा साठी हा प्रश्न कुठेतरी मनालाच विचारण्याची गरज निर्माण झाली आहे. तिला भीती आहे की कदाचित आईच्या उदरामध्ये तिला मृत्यु येईल व जरी जन्मले तरी तिचे रडणे हसणे हे कचराकुंडी मध्ये बंदीस्त होईल. आजही ती जन्मताच ती च्या लग्नाची काळजी  वडिलांना व्याकुळतेच्या दुर्गंधीमध्ये बुडवत असते. आजही तिला घराच्या बाहेर सात नंतर एकटे न पडण्याची सक्ती असते आणि पडलीच तर बाहेरील जगात असणाऱ्या गिधाडांच्या अत्याचारापासून  तिला सतत चिंता करावी लागते. आजही शिव्यांची लाखोली वाहताना हि तिच्या अब्रूची लक्तरे तोडली जातात, म्हणूनच कितीही कायदे करूनही निर्भयकांड ते कोपर्डी घटना सगळ्या देशाला हादरवून गेल्या पण त्यातून आपण किती शिकलो  हा खरंतर चिंतनाचा विषय आहे.

लेखाच्या शेवटी  मला आवडणारी  आणि भावलेली 'जगदंब' नावाची कविता  मला आपणाशी शेअर करायला आवडेल,

" ती जीव लावते, जीव टाकते, जीव गुंतवते,
तुम्ही जीव घेता, ती सुद्धा जीव घेते पण तिनीच का मरावं ?? अशा पद्धतीने जीव घेते.
तुमचंच जगताना, ती स्वताःला विसरते,
तुम्ही तिलाच विसरता।
ती  सर्व सांभाळते, तुम्ही तिचं मनसुद्धा सांभाळत नाही.
तुमच्या यशात ती आनंद घेते, तुम्ही आनंदाच्या भरात तिचा उल्लेख सुद्धा विसरता।।
तिचं अस्तित्वच सुंदर आहे,
पण तुम्हाला तिच्या शरीरापलीकडे काही दिसत नाही.
ती जीवन सुंदर करते तिच्या वाट्याला कायम विटंबनाच येते .
तिचं रक्षण काय करणार? ,,
अरे तिचं रक्षण काय करणार?
तीच तुमची तटबंदी आहे तिलाच बंदिस्त करुन तुम्ही आत्मपात करुन घेताय.
घरात ती लक्ष्मी बनुन येते, तुम्ही तिचं पोत्यारं करता.
ती  धनधन्याचं माफ घरात येताना ओलांडते, तुम्ही तिच्या आईबापासकट लुटून तिचं मातेरं करता.
ती माणूस आहे, आई आहे, बहीण आहे, मैत्रीण, बायको,   प्रेयसी इत्यादी इत्यादी आहे
तमच्या लेकी ती फक्त मादी आहे.
ती लक्ष्मी, ती सरस्वती,  ती दुर्गा, गौरी आहे,
निपात केलेल्या दुष्टांच्या कप्यांची माळ गळ्यात घालुन रक्तांनी वितळणारं राक्षसाचं मुंडकं हातात धरुन लाल भडक जीभ बाहेर काढत ती अष्टपुजा आहे, ती चंडीका आहे,
तुम्ही शिवशंकर व्हावं। तुम्ही शिवशंकर व्हावं। "
धन्यवाद।

✍✍पोपट यमगर
popatgyamgar.blogspot.com

गुरुवार, २ मार्च, २०१७

लोकसत्ताच्या ब्लॉगबेंचर्स मध्ये या आठवड्यातील 'घराणेशाहीची गरज ' या विषयावर मी व्यक्त केलेलं माझं मत...

शेतकरी सुखी तर जग सुखी" हि संकल्पना सोशल मीडियाच्या संदेशामधून आपण दररोज वाचतो. भारतातील शेतकऱ्याला मुळात बाजारपेठेचे अज्ञान आहे या अज्ञानाचा फायदा घेऊन आजपर्यंत बाजारातील मधल्या दलालांनी अनेकवेळा शेतकऱ्याचे आर्थिक शोषण केले आहे. शेतकऱ्याचे सर्वात मोठे दुर्दैव असे आहे कि ज्यावेळी शेतकऱ्याचा शेतमाल शेतात असतो त्यावेळी त्याचे बाजार भाव जास्त असतात. आणि शेतमाल बाजारपेठेत विकण्यासाठी आणला असता त्या शेतमालाचे बाजारभाव व्यापाऱ्यांच्याकडून मुद्द्दामहून पडले जात जातात. भारतातील विविध पक्षांच्या कडून शेतकरी आणि शेती हा विषय नेहमीच सवेंदनशीलतेने मांडला जातो. अर्थात भारतातील सर्वात मोठा वर्गापैकी शेतकरी वर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे. शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनात शेतकऱ्यास अनेक समस्या अडचणींना सामोरे जावे लागते. शेतकरी शेतीमध्ये राब राब राबतो आणि शेतकऱ्यास त्यांच्या घामाचा मोबदला हि मिळत नाही हि सर्वात मोठं दुदैव म्हणावं लागेल. शेतकऱ्याला बाजारपेठेच्या अपुऱ्या ज्ञानामुळे शेतकरी भरडला जात आहे. आपला भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो, हे वाक्य लहानापासून आपण विविध अभ्यासक्रमातून अभ्यासले असेल, वर्तमानपत्रातून वाचले असेल, विविध नामवंत वक्त्यांच्या भाषणातून आजपर्यंत अनेकवेळा ऐकले असेल. आज शेतकऱ्यास बँकेतून कर्ज घ्यायला गेला तरी तिथले अधिकारी हि शेतकऱ्यास वेठीस धरतात. शेतकऱ्यास बँकिंग प्रणालीची माहिती हि अपुरी असते. अशी सर्वकाही परिस्थिती असताना पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या शेती व्यवसायात शेतकऱ्याची पुढची शेतीतून बाहेर पडत आहे या स्वामिनाथन यांच्या मतांशी मी 100% सहमत आहे. लहानपणापासून मोठे होत असताना शेती मध्ये राब राब राबणारा आमचा शेतकरी बाप पाहिल्यावर आमच्या कोणत्या शेतकरी बापाच्या पोराला त्यांच्या बापासारखेच काबाड कष्ट करण्यासाठी शेती करावी वाटेल?? एवढे सारे काबाड कष्ट करूनही शेतकऱ्याला साधा त्याच्या घामाचा मोबदला हि भेटत नाहीच नाही वरून त्याने घातलेला उत्पादन खर्चही भेटत नाही ही सत्य वस्तुस्थिती आहे. आमच्या भारतातील शेतकरी बापाविषयी बोलले जाते ते म्हणजे भारतीय शेतकरी कर्जातच जन्मतो, कर्जातच जगतो, कर्जातच मरतो... अशी समोर परिस्थिती असताना कोणत्याही शेतकऱ्याच्या पोराला आपली पिढ्यांनपिढ्याची शेतीतील घराणेशाही पुढे न्यावी वाटणार नाही. सर्वच राजकारणी शेतकाऱ्याबद्दल निवडणुकां काळामध्ये खोटी आणि दांभिक सहानुभूती दाखवत असले तरी प्रत्यक्षात त्याच्या पदरात काहीच पडत नाही . शेतकऱ्याला बाजारपेठ आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान फार कमी प्रमाणात दिसून येते. आज वकिलाच्या पोराला वकील, इंजिनियर च्या पोराला इंजिनियर शिक्षकाच्या पोराला शिक्षक व्हावेसे वाटते पण शेतकऱ्याच्या पोराला कधीच शेतकरी व्हावेसे वाटत नाही ही दुर्दैवी शोकांतिका आहे. याचे कारण स्वातंत्र्यानंतरही शेतकऱ्याच्या दारिद्र्याच्या अवस्थेत फार फरक पडला आहे असे म्हणता येणार नाही. आज अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी जमीन विकून दुसरा व्यवसाय करण्याचा पर्याय निवडला आहे. शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी यासाठी प्रत्येक अधिवेशनात त्यावर खडाजंगी होत असल्याचे आपणा सर्वाना दिसून येते. पण कर्जमाफी सारखे वरवरच्या मलमपट्टीचे उपाय योजण्यापेक्षा त्या शेतकऱ्यावर कर्ज मागायची वेळच येऊ नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. राजकारणातील घराणेशाही वाढत असताना शेतीतील घराणेशाही कमी होत आहे हा विरोधाभास आपल्या सर्वांच्या डोळ्यात चक्क अंजन घालून जातो. अर्थात जर भविष्यात अश्या पद्धतीने शेतीतील घराणेशाही कमी झाली तर संपूर्ण जगाला अन्न कोण पुरविणार ??? या प्रश्नांची उत्तरे मिळणे कठीण आहे. 

रविवार, २६ फेब्रुवारी, २०१७

मराठी राजभाषा दिनानिमित्त...


आज महाराष्ट्रातील मराठी साहित्याचा एक मानदंड, थोर कविवर्य वि.वा.शिरवाडकर अर्थातच कुसुमाग्रज  यांची   जयंती... त्यानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.  त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्रसह देशभरामध्ये मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. तो साजरा केला जात असताना मराठी भाषेची आधुनिक युगात प्रगती होत आहे का? या संदर्भात चर्चा करणे अनिवार्य आहे.
"माझा मराठाचि बोलू कवतुके परि अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन"  अशी मराठी भाषेची थोरवी गात संत ज्ञानेश्वर माउलींनी गीतेवर भाष्य करीत 'ज्ञानेश्वरी' सारखा विश्वाच्या साहित्यामध्ये मराठी भाषेतील सर्वश्रेष्ठ असा ग्रंथ तुम्हा आम्हाला दिला. हा ग्रंथ म्हणजे मराठी साहित्याचा भक्कम पायाच आहे आणि तिथूनच खऱ्या अर्थाने मराठी साहित्य संसाराला सुरवात झाली, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. माउलींनी लावलेला मराठी भाषेच्या समृद्धीचा वेल आज  मराठी साहित्यामध्ये तरी नक्कीच उंच उंच   जाताना दिसतो आहे.  वैचारिक ज्ञानातून खरे अभिसरण समाजमनात होत असते, या अभिसरणाची महत्वपूर्ण कामगिरी मराठी भाषा पाडत आहे याचा नक्कीच मनस्वी आनंद आहे. मराठी भाषा स्वतः  जगली, तिने महाराष्ट्राला येथील समाजाला जगवले, समृद्ध केलंय, त्यामुळे या भाषेविषयीचा अभिमान महाराष्ट्राला आहे.
मराठी भाषेला इतका उज्वल आणि प्रदीर्घ इतिहास लाभला  आहे तरीही आज  महाराष्ट्रात मराठी माध्यमाच्या शाळांची घसरत जाणारी संख्या नक्कीच चिंताजनक अशीच आहे. मातृभाषेतून घेतलेले शिक्षण लगेच आत्मसात होते किंवा कोणाचाही आधार न घेता डोक्यात शिरते त्यासाठी कोणताही वेगळा विचार करण्याची गरज भासत नाही. तळागाळातील लोकांपर्यंत  आपले विचार पोहचविण्यासाठी मातृभाषेवर प्रभुत्व असणे खूप गरजेचे आहे. आज आमच्या आधुनिक पिढीला मराठी मातीचा जाज्वल्य इतिहास समजावून सांगावाच लागेल.  जी आपली मातृभाषा आहे त्या मातृभाषेतून आपण चांगल्या पद्धतीने लिहू शकतो, बोलू शकतो, विचार मांडू शकतो. गरज आहे ती आपण मातृभाषेतून व्यक्त होण्याची... ती आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होऊच याबद्दल माझ्या मनात तरी कोणतीच शंका नाही.
महिन्याभरापूर्वी डोंबिवलीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले . त्या संमेलनात मराठी भाषेच्या संवर्धनासंदर्भात चर्चा झाली.  मराठी या भाषेला सरकारी पातळीवर लवकरच अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, तसेच मराठी  भाषेतील साहित्य जगभरातील इतर भाषिकांना वाचण्यासाठी  इतर भाषांमध्ये भाषांतर व्हावे, तसेच आधुनिक माहिती तंत्रज्ञानाची भाषा मराठी व्हावी आणि मराठी भाषेचा वापर आधुनिक तंत्रज्ञामध्ये जास्तीत जास्त केला जावा अश्या काही महत्वाच्या मागण्या त्या संमेलनातून केल्या गेल्या आहेत.  त्या येणाऱ्या काळात त्यासंदर्भात सरकारी पातळीवर पावले उचलली गेली पाहिजेत अशी सदिच्छा आहे. शेवटी कवी सुरेश भट यांच्या कवितेतील चार समर्पक ओळी,
"लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी..
जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी..
धर्म, पंथ, जात एक, जाणतो मराठी
एवढ्या जगात माय, मानतो मराठी..."
आपल्या सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
धन्यवाद...

✍पोपट यमगर
बाळेवाडी, ता. आटपाडी,
जि. सांगली.
7709935374

गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०१७

आटपाडी तालुक्याच्या राजकारणातील एक प्रामाणिक आणि कार्यक्षम नेतृत्व : मा. तानाजी शेठ यमगर


महाराष्ट्र राज्याच्या भूपटलावर आटपाडी तालुका म्हटले की आम्हाला आमच्या डोळ्यासमोर एक चित्र उभे राहते ते म्हणजे पिढ्यानपिढ्या दुष्काळ ग्रस्त असलेला तालुका... शेकडो एकर जमीन असतानाही पिण्याच्या पाण्यासाठी आणि पोटाची खळगी भागविण्यासाठी रानोवनी भटकणारे मेंढपाळ बांधव आणि सांगली जिल्ह्याच्या सदन भागात ऊसतोड करणारे मजूर यांचा हा तालुका... याच पिढ्यानपिढ्याच्या दुष्काळामुळे स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी तालुक्यातील बहुसंख्य युवक हे पुणे, मुंबई , दिल्ली यासारख्या मोठ्या शहरामध्ये जाऊन सोन्या चांदीसारख्या गलाई व्यवसायामध्ये काम करत आहेत. अनेक अश्या युवकांनी या व्यवसायामध्ये स्वतःची अशी एक छाप पाडली आहे. यामधीलच एक व्यक्तीमत्व म्हणजे आदरणीय तानाजी शेठ यमगर... आटपाडी तालुक्यातील बाळेवाडी सारख्या  छोट्याश्या खेडेगावामध्ये  एका तुमच्या माझ्या सारख्या सर्वसामान्य कुटुंबातुन   संघर्षाचे घाव झेलत, परिवर्तन वादी विचारांची बीजे पेरत पुढे वाटचाल केली आहे, करत आहेत. स्वतःच्या  व्यवसायामध्ये कर्तबगारी आणि चातुर्याने त्यांनी चांगला जम बसवला आहे. तो जम बसवत असतानाच गावातील आणि तालुक्यातील अनेक तरुणांनाही सोने चांदी किंवा इतर व्यवसायामध्ये  त्यांच्या पायावर उभे करण्यात शेठचा वाटा महत्वाचा आहे. बेरोजगारी सारखा राष्ट्रीय प्रश्न असतानाही  ते रडगाणे न गाता आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून  तालुक्यातील अनेक तरुण मुले  शेठच्या मार्गदर्शनाखाली स्वतःच्या व्यवसायामध्ये उत्तम प्रगती करत असताना आपल्याला दिसून येत आहेत. व्यावसायिक क्षेत्रात उत्तम प्रगती करत असताना आपण आपल्या गावातील, तालुक्यातील समाजालाही आपल्या सोबत पुढे घेऊन गेले पाहिजे, आणले पाहिजे या समाज हिताच्या विचाराने प्रेरीत होऊन शेठनी समाजकारणासाठी तालुक्याच्या राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. खरंतर सात वर्षांपूर्वी तालुक्याच्या राजकारणात, सत्ताकारणात आम्हीच असले पाहिजे अश्या विचारांचे  तसेच राजकारणाला धंदा मानून 'सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता ' अशासाठी वापर करणारे प्रबळ आणि धनाढ्य विरोधक समोर होते. त्यामुळे त्यांचा राजकीय प्रवास किती काटेरी वाटेवरून झाला आहे हे आपल्या लक्षात येईलच. त्यावेळेस सांगली जिल्ह्याच्या राजकारणात स्वतःचे एक वेगळं वलय निर्माण केलेले आणि आपल्या वक्तृत्व शैलीच्या आधारावर मोठ मोठ्या प्रस्थपिताना विचारातून घायाळ करणारे आदरणीय गोपीचंद पडळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली एकनिष्ठ राहून राजकारण आणि समाजकारण   करण्याचा निर्णय तानाजी शेठनी घेतला. पडळकर साहेबांनीं तालुक्यासह जिल्ह्यात केलेल्या विविध आंदोलनात , मोर्चात, रास्ता रोको मध्ये आदरणीय शेठचा सक्रिय सहभाग होता. हे सर्व करत असतानाच 2012 मध्ये जिल्हा परिषद आणिआटपाडी तालुक्याच्या राजकारणातील एक प्रामाणिक आणि कार्यक्षम नेतृत्व : मा. तानाजी शेठ यमगर  पंचायत समिती च्या निवडणुका तालुक्यामध्ये  पडळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठ्या ताकदीने लढवल्या गेल्या . त्यामध्ये अनेक उमेदवारांनी तालुक्यातून दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती.  घरनिकी पंचायत समिती गटातून तानाजी शेठ यमगर विजयी मिळवीत आटपाडी पंचायत समिती मध्ये एकमेव विरोधी गटाचे सदस्य म्हणून प्रवेश केला होता. तालुक्यात मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या अनेक पंचायत समितीच्या सभांमध्ये तानाजी शेठनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडली. तालुक्यातील वर्षानुवर्षाचा प्रश्न म्हणजे पाणी आणि चांगले रस्ते... या दोन्हीही प्रश्नावर कोणतीही न तडजोड करता ते सोडविण्यासाठी पडळकरसाहेबांच्या मार्गदर्शनाने अगदी जिल्हाधिकारी ते विविध खात्याचे मंत्री, मुख्यमंत्र्यापर्यत पाठपुरावा केला.
पंचायत समितीमध्ये फक्त एका घरनिकी गटाचे पंचायत समिती सदस्य असूनही संपूर्ण आटपाडी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांचा पाठपुरावा पंचायत समिती च्या सर्व सभांमध्ये केला. बाळेवाडी बनपुरीसह अनेक गावातील पिढ्यानपिढ्या असलेला पाण्याचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सोडवण्यात यश मिळवले आहे.  घरनिकी पंचायत समिती गटातील झरे, पारेकरवाडी, विभूतवाडी, पिंपरी, घरनिकी, घानंद, कामथ येथे रस्ते, सभामंडप यासह अनेक छोटी मोठी कामे शेठनी त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात केली आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकऱ्यासंबधीच्या,  गोरगरीब जनतेच्या कल्याणासंबधीच्या विविध योजनाची माहिती शेठनी वेळोवेळी विविध माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे. पंचायत समिती मध्ये शेतकरी बांधवांसाठी येणाऱ्या वस्तू या गरजू पर्यंत कश्या पोहचतील यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केल्याचे आपणास दिसून येतात.  तालुक्यातील विरोधकांचीही कामे कोणताही मतभेद मनात न ठेवता मार्गी लावली आहेत. एखाद्या जिल्हा परिषद सदस्याला हि पाच वर्षाच्या कार्यकाळात जितकी कामे झाली नसतील त्याच्यापेक्षाही किंबहुना जास्तच कामे तानाजी शेठ नि मार्गी लावली आहेत. तालुक्यातील गुणवंत आणि यशवंत मुलांच्या नेहमीच पाठीशी राहत त्यांना त्यांच्या भविष्यातील प्रगती साठी कायमच साथ आणि प्रोत्साहन दिले आहे.
राजकारण म्हणजे भ्रष्टाचार , 'पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा' कमावण्याचा उद्योग, अनेक नेत्यांची पोकळ आश्वासने अशी सर्वसामान्य लोकांच्या मनातील राजकारण्याविषयीची भावना झाली आहे परंतु मला ठामपणे सांगायला आवडेल ते म्हणजे या सर्वाना अपवाद व कोणत्याही वाद विवादात न पडता सर्वांशी मिळून मिसळून सर्वांशी आदराचे  असे संबंध निर्माण करणारे, आटपाडी तालुक्याच्या राजकारणातील एक स्वच्छ, प्रामाणिक आणि कार्यक्षम नेतृत्व म्हटले की मा. तानाजी शेठ यमगर यांचे नाव नक्कीच सर्वांच्या मनामध्ये येईल यामध्ये मनात तरी कोणतीच शंका नाही. इतर मुरब्बी राजकारण्यासारखे डावपेच आखून फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण न करता सर्व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वाना सोबत पुढे घेऊन जाण्याच्या विचारातून ते काम करत आहेत. स्वतःच्या कुटुंबाकडे प्रसंगी स्वतःच्या उद्योगाकडेही कमी वेळ देत सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठी स्वतःला संपूर्णपणे झोकून देऊन समाजकारणातून राजकारण करत आहेत. अनेकजण म्हणतात की राजकारण हे प्रामाणिक माणसाचे क्षेत्र नाही आहे, पण मला त्यांना सांगायला आवडेल ते म्हणजे प्रामाणिकपणाने आणि तत्वनिष्ठेने केलेलं राजकारण हे प्रदीर्घ कालावधी पर्यंत टिकते. तात्पुरत्या क्षणिक स्वार्थासाठी केलेलं मुरब्बी राजकारण हे जास्त काळ टिकू शकत नाही, हे आपण सद्य परिस्थितील  राजकीय निकालावरून पाहत आहोत.
तालुक्यामध्ये सन्माननिय  पडळकर साहेबांच्या काटेरी वाटेवरील संघर्षाच्या प्रवासामध्ये त्यांच्यासोबत वाटचाल करण्यात आणि समर्थपणे साथ देण्यात आदरणीय तानाजी शेठचा सहभाग हा महत्वपूर्ण होता. पडळकर साहेबांनीही तानाजी शेठना कायमच आदरात्मक संबोधले आहे. तानाजी शेठनी नेहमीच तालुक्यातील कार्यक्रमांना पडळकर साहेबांच्या साथीने उपस्थित राहत तळागाळातील जनमाणसापर्यंत आपला जनसंपर्क वाढवला.   करगणी जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य जनतेला वाटत होते कि तानाजी शेठनी जिल्हा परिषद निवडणूक लढवावी परंतु जिल्हा परिषद गटात पडलेलं महिला आरक्षण आणि  त्यांचे सन्माननीय मित्र हरिशेठ गायकवाड यांच्या सोबत असलेला दिलदार मैत्रीचा वसा पेलण्यासाठी एक पाऊल मागे घेऊन  जिल्हा परिषद गटातून सौ. वंदना गायकवाड यांना मोठ्या मनाने संधी दिली आणि त्यांनी  करगणी पंचायत समिती गटातून निवडणूक लढविण्याचा  निर्णय घेतला. भाजपने आणि पडळकर साहेबानी त्यांच्या आजवरच्या प्रामाणिकपणाच्या राजकारणाला साथ देत पक्षाचे तिकीट  दिले.  त्यांच्या समोरील विरोधक उमेदवार हा तालुक्याच्या राजकारणातील मुरब्बी आणि 60 वर्षाहून जास्त राजकीय अनुभव असलेले  आण्णासाहेब पत्की  होते. तरीही शेठनी पाच वर्षातील विकासकामाच्या  आणि प्रामाणिक राजकारणाच्या  जोरावर निवडणूक लढवून ती यशस्वीपणे जिंकली यांचा आनंद तुमच्या माझ्या सह तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या मनात निकालादिवशी दिसून येत होता.
सध्या तालुक्याच्या पंचायत समिती आणि जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेमध्ये भाजपची सत्ता आली आहे. अश्या रीतीने तालुक्यापासून ते केंद्रापर्यंत भाजप सत्तेत आहे, त्यामुळे खऱ्या अर्थाने आता तालुक्यात विकासपर्वाची सुरवात होत आहे असे म्हटले तरी काय वावगे ठरणार नाही.
 'Let us grow together' अशी राजकीय भूमिका मनात ठेवून वाटचाल करणाऱ्या आदरणीय तानाजी शेठना तालुक्याच्या विकास कार्यासाठी आणि राजकारणातील पुढील प्रगती साठी माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा...💐


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालाबाबत....

राज्यात काल झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निकालामध्ये राज्यात भारतीय जनता पार्टीने  प्रचंड आणि घवघवीत यश संपादन केल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन आणि महाराष्ट्राच्या  उज्वल विकासपर्वासाठी  आपल्या  वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा...
कालच्या विजयावरून करगणी गटासह आटपाडी, सांगली आणि राज्यातील अनेक भागामध्ये  सर्वसामान्य नागरिकांच्या एका मतांची  ताकद काय असू शकते हे लोकशाहीमध्ये दिसून आले. लोकशाही संपन्न  असलेल्या आपल्या देशात एखादा उमेदवार विजयी करायचा कि पराभूत याचं सर्वस्व अर्थात सार्वभौमत्व जनता आहे, हे कालच्या विजयावरून स्पष्टपणे दिसून येते.  यावेळेस  राज्यातील  मतदानाची टक्केवारी दिवसेंदिवस वाढत आहे याचा नक्कीच सकारात्मक परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. राज्याच्या राजकारणात सांगली जिल्हा हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जायचा पण याच बाल्लेकिल्ल्यात कधीही न उमळणारे कमळ मात्र या निवडणुकीत जबरदस्त उमलले. आटपाडी तालुक्यावर हि राज्याचे युवा नेते गोपीचंद पडळकर आणि माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांच्यातील एकीने तालुक्यावर प्रथमच भाजपची सत्ता पाहायला मिळाली. पुढील काळात तालुक्यांत खूप काही सकारात्मक होण्याच्या दृष्टीने  हा विजय भाजप साठी खूप महत्त्वाचा आहे.
राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचा झंझावाती दौरा , प्रचार सभा, आणि त्यांचा प्रामाणिक, पारदर्शक  चेहरा हे भाजपच्या विजयाचे कारण आहे. तसेच देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदींजी यांचेही भ्रष्टाचार विरोधी नोटबंदी ची मोहीम, देशातील पारदर्शकपणे   चालू असलेला कारभार, देशाची जगामध्ये उंचावलेली प्रतिमा,  यासह भाजप पक्षाची वाढ कशी होईल यासाठी वरिष्ठ पातळीवर चालू असलेले प्रयत्न या विजयास कारणीभूत आहेत  असे मला वाटते. सद्य परिस्थितीत तालुक्यात भाजप , जिल्ह्यात भाजप,  राज्यात भाजप आणि देशातही भाजप सत्तेत आहे त्यामुळे आता खऱ्या अर्थाने विकासकामे होतील अशी आशा प्रत्येक तालकावासीयांच्या मनामध्ये आहे. टेंभुच्या पाण्यासारखे विषय, रस्त्यांचे विषय मार्गी लागतील अशी आशा जनतेच्या मनात आहे. जनतेने जो लोकशाही मार्गाने मतपेटीतुन विश्वास दाखवला आहे तो विश्वास सार्थ ठरावा हीच एक छोटीशी सदिच्छा...
धन्यवाद...

श्री पोपट यमगर
बाळेवाडी, आटपाडी
सांगली.
7709935374

रविवार, १९ फेब्रुवारी, २०१७

लोकशाहीचं सर्वस्व अर्थातच सार्वभौमत्व जनता म्हणजेच तुम्ही आम्ही......


देशातील अनेक राज्यातील विधानसभा निवडणुकीसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा जोरदार रणसंग्राम चालू आहे. महाराष्ट्रात २१ फेब्रुवारीला महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी मतदान होत आहे.
लोकशाही म्हटले की  मला तर अब्राहम लिंकन यांची लोकशाही विषयी केलेली साधी, सरळ सोप्या शब्दातील व्याख्या आठवतेच आठवते, ती म्हणजे " लोकानी लोकांसाठी  चालवलेले लोकांचे राज्य म्हणजे लोकशाही"  लोकशाहीत जनतेचा कौल हा सर्वाधिक महत्वाचा असतो. हा कौल जनतेकडून मागण्यासाठी गेल्या महिन्याभरात सर्वच राजकीय पक्षांचा
प्रचारांचा उडालेला धुरळा आपण पाहिला.. एकमेकांवरील आरोप , प्रत्यारोप,  उमेदवारांचे फटाक्यांनी केलेलं स्वागत,  प्रचाराच्या भोंग्याचे कर्णकर्कश आवाज, विविध रॅली, पदयात्रा आपण सर्वांनीच पहिल्या. आता जनता   21 तारखेला  कोणाला कौल देणार याकडे तुमच्या माझ्यासह राजकर्त्यांचेही लक्ष लागले आहे.
 ज्या ज्या क्षेत्रात मतदान होत आहे त्या क्षेत्रातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींना माझी एक नम्र विनंती आहे कि प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे. मतदान हा फक्त प्रत्येक व्यक्तीचा अधिकारच नसून ते एक राष्ट्रीय कर्तव्यसुद्धा आहे. लोकशाही मध्ये जनता ही सार्वभौम आहे. हे आपण अनेक निवडणूकातून पहिले आहे, पाहतोय, आणि येथून पुढेही नक्कीच दिसेल यामध्ये माझ्या मनात तरी कोणतीच शंका नाही.  मी अनेकवेळा समाजात वावरत असताना पाहतो कि 'राजकारण्याविषयी असलेली प्रचंड चीड' आणि 'आमची काहीच काहीच कामं करत नाहीत तर स्वतःचं घरे भरण्यासाठीच' हे आम्हाला मतं मागायला येतात'  हि नकारात्मक भावना अनेक मतदारांमध्ये असल्याचे पाहायला मिळते. यासाठी अनेकजण (सुशिक्षित तर मोठ्या प्रमाणात) मतदान न करण्याचा निर्णय घेऊन बाहेर फिरायला जातात. त्यामुळे अश्या  मतदार बंधू आणि भगिनींना माझी एक नम्र विनंती आहे की बाहेर कितीही ओरडून सांगितले तरी राज्यकर्त्यांना काही फरक पडणार नाही, तो तुमच्या एका एका मतदानाच्या माध्यमातूनच फरक पडू शकतो.  तुमचं एक मत लोकशाहीमध्ये खूप महत्वाचे आहे. तुमचे एक मत एखाद्या उमेदवारास विजयी करू शकते किंवा पराभूत करू शकते. सद्याच्या राजकीय प्रचाराच्या लढाईमध्ये विचारांची लढाई विचारांनी करणारे राज्यकर्ते फार कमी प्रमाणात उरले आहेत हि एक लोकशाही समोरचे आव्हान आहे पण जनतेने जर योग्य वैचारिकतेने पुढे जाणाऱ्या नेतृत्वाला संधी दिली तर ते आव्हान लोकशाही नक्की पेलू  शकेल याचा ठाम विश्वास मला आहे. यासाठी जनतेची राजकीय प्रगल्भता वाढली पाहिजे. फक्त टीका टिपण्या करणाऱ्यांच्या पेक्षा एक चांगल्या विकासाच व्हिजन देणाऱ्या उमेदवारांना महापालिकेत किंवा जिल्हा परिषदेत पाठवा.. लोकशाहीतील तुमच्या मतांची किमंत खूप मोठी आहे. त्याचा तात्पुरत्या स्वार्थासाठी  सौदा करू नका. निवडणुका आल्यावर अनेक नेते जरी स्वाभिमान गहाण ठेवत असले, तडजोड करत असले तरी तुम्ही मात्र तुमचा स्वाभिमान मतपेटीतून व्यक्त केलाच पाहिजे.  तुमच्या एका मताच्या माध्यमातून 100% बदल घडू शकतो, लोकशाहीत तुमचे एक मत खूप महत्वाचे आहे. उमेदवार वर्षानुवर्षे फक्त घराणेशाहीच्या जोरावर जर राजकारण करत असेल तर  अश्या  प्रस्थपित उमेदवारांना नाकारले पाहिजे.  तुम्हाला जर आता योग्य पर्याय निवडता आला नाही तर पुन्हा पाच वर्ष वाट पाहावी लागेल. यासाठी तुम्हाला तुमच्या भागातील समस्यां भविष्यात कोणता उमेदवार सोडवू शकतो अश्या पारदर्शक आणि कार्यक्षम,  सुशिक्षीत आणि सुसंकृत उमेदवाराना निवडुया, आणि भारतीय  लोकशाही सदृढ करूया.
धन्यवाद.

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✍पोपटराव यमगर
बाळेवाडी, ता. आटपाडी,
जि. सांगली.
7709935374

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

सोमवार, १३ फेब्रुवारी, २०१७

या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे...


आज प्रेम दिवस जगभरामध्ये साजरा करण्यात  येत आहे.  त्या प्रेमदिवसाच्या आपणा सर्वांना अगदी मनापासून प्रेमळ शुभेच्छा...
कवी मंगेश पाडगावकर एका सुंदर अश्या कवितेतून आपल्याला सांगतात की,
 "या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे"  दररोज चे  जीवन जगत असताना  मानवतेच्या नात्याने सर्वांशी प्रेमानं वागणे आणि बोलणे गरजेचे आहे. आपले साने गुरुजी हि सांगून गेलेत कि "खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे"  एखादी व्यक्ती रागावली असल्यास प्रेमाने चार शब्द बोलल्यास त्याच्याही मनातील कटुता दूर होऊन जाते. म्हणूनच म्हणतात ना प्रेमाने जग जिंकता येते. प्रेम म्हटले की आपुलकी, माया, जिव्हाळा असे बरेच काही असताना आज  काही जणांनी मात्र हल्ली प्रेमाचा अर्थ फारच संकुचित करून ठेवला आहे. फक्त प्रियकर आणि प्रेयसी यांच्यामधीलच प्रेम आपल्या सर्वांना दिसते. तेही प्रेम असतेच, नक्कीच असले पाहिजे यामध्ये माझ्या मनात तर नक्कीच दुमत नाही पण त्याच्या पलीकडेही जाऊन प्रेम नावाची संकल्पना समग्र बुद्धीने आम्ही कधी समजावून घेणार कि नाही?? ती समजावून घेणे गरजेचे आहे. आजच्या युगामध्ये समोर दिसणाऱ्या घटना पहिल्या कि  प्रेम म्हणजे फक्त शारीरिक आकर्षण अशीच व्याख्या आजच्या मजनू आणि लैला यांनी करून ठेवली आहे. यासाठी कोणतेही समाजभान, संस्कृतीभान न ठेवता गार्डन्स किंवा सार्वजनिक ठिकाणी  चालणारे प्रकार तुमच्या माझ्या देशात लोकसंख्येने सर्वाधिक असलेल्या तरुण पिढीला (अर्थात देशाचा कणा) नक्कीच विचार करावयास लावणारेच आहेत. आज देशात लव्ह जिहाद (अनेक मुलींना  प्रेमाच्या नावाने फसवून धर्मांतर करावयास लावणे) सारखीही प्रकरणे मोठ्या प्रमाणात घडत आहेत. ती फक्त घडतच नाहीत तर दररोज वाढत आहेत हे आपल्या सारख्या छत्रपतीच्या राज्यात राहणार्या मावळ्यांनी समजावून घेतले पाहिजे. शारीरिक आकर्षण आणि उपभोगासाठी केलेले प्रेम हे खरे प्रेम नसते तर ते ढोंगी प्रेम स्वतःच्या स्वार्थासाठी तात्पुरत्या कार्यकाळासाठी केलेले असते. एखाद्या आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीवर, वस्तुवर, देशावर, निसर्गावर,  ह्रद्यापासुन मनातुन निस्वार्थी भावनेने  केलेले प्रेम हे खरे प्रेम असते. अशा निस्वार्थी भावनेने प्रेम हि संकल्पना जपणाऱ्या तुम्हा सर्व मित्रांना माझ्या पुन्हा एकदा प्रेम दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...
धन्यवाद...

✍पोपटराव यमगर

शनिवार, ११ फेब्रुवारी, २०१७

समाज माध्यमे (सोशल मीडिया), समाज आणि आपण...


मानवी संस्कृतीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे माणसाने केलेली स्वतःची समूह रचना. प्रत्येक माणूस हा मन, मेंदू आणि विचार यांनी दुसऱ्याशी जोडला गेला आहे. आपण दररोजचे जीवन जगत असताना आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांचा आपल्या आयुष्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे परिणाम होत असतो. त्यातूनच आपले व्यक्तिमत्व घडत जाऊन आपण सवेंदनशील होतो.
'बदल' हा निसर्गाचा नियम आहे. गेल्या काही वर्षापासून माणसाच्या आयुष्यात खूपच आमूलाग्र बदल घडून आले आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या काळात रेडिओ, साठ सत्तर च्या दशकात दूरदर्शन, ऐंशीच्या दशकात संगणक, नव्वदच्या दशकात केबल नेटवर्क, मोबाईल आणि एकविसाव्या शतकात इंटरनेटच्या माध्यमातून, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप, ब्लॉग अशी विविध माध्यमे माणसांच्या हातात आली. तंत्रज्ञान क्षेत्रात झालेले हे बदल तुमच्या माझ्या आयुष्यात आमूलाग्र अश्या पद्धतीचेच आहेत. 1991 ला भारताने जागतिकीकरण स्वीकारल्यांनतर संपूर्ण जग हीच भारतासाठी एक बाजारपेठ निर्माण झाली. तशी आज या सर्व सोशल मीडियाच्या प्रगतीने संपूर्ण जग हे तुमच्या एका क्लीक वर संपर्कात आले आहे. आज शेतीपासून उद्योगधंद्यापर्यंत, समाजकारणापासून ते राजकारणापर्यंत, विज्ञापासून शिक्षणापर्यंत सगळीच क्षेत्रे सोशल मीडियाच्या कल्पनाविष्काराने बहरली आहेत. तरुणाईसह इतर वर्गाची सोशल मीडियाच्या वापरकर्त्यांची संख्या जास्त आहे. आणि दिवसेंदिवस ती वाढतच आहे. या तरुणाईला सोशल मीडिया च्या माध्यमातून वैचारिक आणि तांत्रिक पाया असणारा तत्वांचा एक गट आहे. ज्याद्वारे आपले विचार आपले मत समाजसमोर बिनधास्तपणे मांडता येते. तसेच आपल्या विचारांची देवाण घेवाण करता येते. दररोज विचारांच्या माध्यमातून नवीन नवीन मित्र भेटत राहतात. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक ग्रुप हे समाजाच्या विविध प्रश्नांवर समाजाची मते जाणून घेऊन त्यावरती उपाययोजना करण्याचे काम समाजात करत असताना दिसत आहेत. दररोजच्या धकाधकीच्या आणि धावत्या जीवन शैलीमुळे समाजमनावर आलेली मरगळ काहीवेळा विनोदाच्या माध्यमातून दूर होण्यासही मदत होते.
          आज विविध प्रकारच्या उद्योगधंद्यामध्ये ही स्वतःच्या उत्पादित वस्तू किंवा सेवा बाजारपेठेतील ग्राहकापर्यंत पोहचविण्यासाठी किंवा विकण्यासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. कारण सोशल मीडिया हे कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त ग्राहकापर्यंत आपल्या माहिती पोहचविणारे असे साधन आहे. सोशल मीडियामुळे उद्योजकांना आपल्या वस्तू आणि सेवांची माहिती थेट ग्राहकापर्यंत पोहचविता येते. यामध्ये कोणत्याही प्रकारची साखळी असत नाही. आज देशातील काही भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शिवारातील शेतीमालाची माहिती याच सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट ग्राहकांच्या घरापर्यंत पोहचविण्यासाठी सुरवात केली आहे. अर्थात किती वस्तू किंवा सेवा विकल्या गेल्या यापेक्षा त्या वस्तू आणि सेवांची माहिती समाज माध्यमातून ग्राहकापर्यंत पोहचली हे महत्वाचे आहे. भविष्यात गुणवत्तेच्या आधारे ग्राहकाला जर आपल्या सेवा किंवा वस्तू आवडल्या तर नक्की त्याचा फायदा त्या उद्योगास होईल हे नक्की.
        सोशल मीडियाचा राजकीय क्षेत्रावरतीही मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. 2014 ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत केंद्रातील परिवर्तनामध्ये सोशल मीडियाचा परिणाम हा मोठा होता हे आपल्या सर्वाना माहित आहेच. सध्या निवडणुकांचा रणसंग्राम चालू आहे. करोडोंच्या संख्येने सोशल साईटचा वापर करणाऱ्या मतदाराला आकर्षित करण्यासाठी प्रत्येक पक्ष, नेता आणि उमेदवार प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर करत असल्याचे आपल्याला दिसून येईल. अनेक माध्यमांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून नवीन तरुणांना व्यक्त होण्यासाठी (लोकसत्ता ब्लॉगबेंचर्स किंवा माध्यमाची विविध आप्लिकेशन) विचारपीठ उपलब्ध करून दिली आहेत. आज समाजात घडणाऱ्या विविध घटनांवर जर माध्यमे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत असतील तर सोशल मीडियातील दबाव गटाच्या माध्यमातून मीडियाला त्या घटनांची दखल घेण्यास भाग पाडले आहे. खरंतर सोशल मीडिया हा लोकशाहीचा पाचवा स्तंभ म्हणून नावारूपाला येत आहे. देशातील प्रत्येक व्यक्तीला आपले अभिव्यक्ती मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य राज्यघटनेने दिले आहे. त्याचा वापर आमच्या आधुनिक युवा पिढीने गावापासून ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध क्षेत्रातील घडामोडीवर स्वतःला व्यक्त होण्यासाठीच केला पाहिजे. आपण स्वतः एक समाजातील जबाबदार घटक म्हणून सोशल मीडियाचा वापर चांगल्या गोष्टीसाठीच केला पाहिजे.
         अगदी सकारात्मक दृष्ट्या विचार करता सोशल मीडियाने वैयक्तिक आयुष्य मनमोकळे केले आहे. असे असले तरी काही दुष्परिणामही आपल्याला नाकारून चालणार नाहीत. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वापर वाढल्यास त्याचे पडसाद नकारात्मकच अधिक पहायला मिळतात. सोशल मीडियाच्या अतिवापराने वैयक्तिक आयुष्यात कोटुंबिक जीवन दुःखाच्या छायेत गेल्याच्या घटनाही आपल्याला पाहायला मिळतील. मानसिक विकृतीतून अनेक सायबर गुन्हेगारांचा जन्म झाला आहे. आजची तरुण पिढी दहा दहा तास फक्त फेसबुक, व्हॉट्सअप वर वैयक्तिक संभाषणासाठी स्वःतला गुंतवून घेते. यामधून अनेक आजारांना स्वतःहून आमंत्रण देण्याचा हा प्रकार दिसून येतो. अनेक मुलींना वैयक्तिक अकाउंट वरून ब्लॅकमेलिंग केल्याच्या हि घटना आपल्यासमोर आहेत.. त्या आहेतच असे नाहीतर त्या दररोज वाढतच आहेत हि तुमची माझी बोचरी खंत आहे. शेवटी तीक्ष्ण हत्याराने जशी शस्त्रक्रिया करून एखाद्याचे प्राण वाचविले जातात तसेच त्याच हत्याराच्या चुकीच्या पद्धतीच्या वापराने एखाद्याचे प्राणही घेतले जाऊ शकतात . त्यामुळे सोशल मीडियाबरोबर आनंद घेत असताना आपल्या इतर मित्रांच्या किंवा समाजाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी हि आपल्या सारख्या सुशिक्षित समाजाने घ्यायला हवी हीच एक माफक अपेक्षा...!
धन्यवाद.